डायनाची प्रतिक्रिया आलोकच्या प्रतीक्रियेपेक्षा थोड्याफार प्रमाणात सारखी होती. सारखेपणा होता तो मनात येणाऱ्या विचारांच्या बाबतीत, परंतु तिची कृतीतील प्रतिक्रिया मात्र बरीच वेगळी होती. तिने शांतपणे कॉफी करून घेतली. कॉफीचे घुटके घेत घेत ती विचार करू लागली, मी ह्या होव गावात एकटी आहे की ससेक्स कौंटी मध्ये एकटी आहे की इंग्लंड मध्ये एकटी आहे की … डायना संगणकाच्या जाळ्यांच्या (internet network) क्षेत्रातील काहीशी तज्ञ होती. कॉफी संपल्यावर तिने संगणकाचा ताबा घेतला. एखाद्या संकेतस्थळाला किती भेटी दिल्या जातात हे कसे माहित करून घ्यायचे ह्या गोष्टीचे तिला जुजबी ज्ञान होते. परंतु इथे जुजबी ज्ञानाने भागणारे नव्हते. त्यावर अधिक मेहनतीची आवश्यकता होती.
आलोक केकचा आस्वाद घेतल्यावर बराच शांत झाला होता. आता त्याने एकंदरीत परिस्थिती किती गंभीर आहे ह्याचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती. अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजांपासून त्याने सुरुवात करण्याचे ठरविले. मेरवान केक कितीही स्वादिष्ट असले तरी ते आपण सतत खाऊ शकणार नाहीत ह्याची आलोकला जाणीव होती. त्यामुळे कधीतरी आपल्याला स्वतः अन्न शिजवायला सुरुवात करावी लागणार हे तो जाणून होता. आता अन्न शिजवायला गैसचा पुरवठा लागणार आणि त्यावर आपले नियंत्रण नाही हे तो जाणून होता. जितके दिवस गैस चालू राहणार तोवर ठीक आहे पण नंतर पर्यायी स्त्रोताची सोय करावी लागणार ह्याची त्याने नोंद केली. त्यानंतर त्याच्या विचाराची गाडी पाणी आणि वीज पुरवठ्याकडे वळली. ह्याही गोष्टी एकदा का बंद पडल्या की आपली हालत खराब होणार हे तो जाणून होता. वीजपुरवठ्यासाठी जनरेटर हा एक दुसरा पर्याय उपलब्ध आहे ह्याची त्याला आठवण झाली. हे सर्व विचार येता त्याच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. गावात जीवन स्वावलंबी असते हे तो ऐकून होता. इथे जास्तच प्रश्न निर्माण झाले तर गावात जाऊन राहण्याचा पर्याय उपलब्ध आहे ह्याचीही त्याने नोंद घेतली. हे सारे विचाराचे थैमान सुरु असताना आपल्या बायको, मुलाची त्याला अचानक आठवण आली आणि त्याने तो कासावीस झाला. असाच काही वेळ त्याला नैराश्याने ग्रासल्यावर तो पुन्हा सावरून बसला. प्रसंग कितीही बाका असला तरीही असे हातपाय गाळून चालणार नाही ह्याचीसुद्धा त्याने नोंद केली. शहरातील मुलभूत गरजा भागविणाऱ्या यंत्रणामध्ये एक प्रश्न होता. ह्या सर्व यंत्रणा सुरळीतपणे चालु ठेवण्यासाठीसुद्धा एका सुनियोजित व्यवस्थापकीय प्रणालीची गरज होती. ह्यातील एखादा दुवा जरी निखळून पडला तरी पूर्ण यंत्रणाच कोलमडून पडणार होती. त्यामुळे गावात जाणे किंवा शहरातीलच सभोवताली अंगण वगैरे असलेल्या बंगल्याचा शोध घेणे अशा पर्यायांचा विचार करण्याची त्याने नोंद केली.
इतका सर्व विचार केल्यावर स्वतःचे काहीसे लाड करून घ्यावेत असे त्याला वाटू लागले. मग त्याची गाडी आणि स्वारी मॉलकडे वळली. मेरवानचे दार फोडताना त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीने त्याला क्षणभर रोखले होते परंतु आता मात्र असा काही प्रश्न आला नाही. गाडीबाहेर पडतानाच हत्यार घ्यायला तो विसरला नव्हता. एकंदरीत अशी दार फोडताना कमीत कमी हानी कशी करावी ह्याचे तंत्र विकसित करावे अशी मनातल्या मनात त्याने नोंद केली. मॉलच्या सुरुवातीलाच J C Penny चे सुंदर दुकान होते. त्यातील महागातील महाग असे टी शर्ट आणि जीन्सची विजार त्याने उचलली. कपडे बदलण्याची खोली कुठे असावी असा विचार त्याच्या मनात आला पण तो क्षणभरच. अशा प्रकारे नव्या कपड्यात स्वतःला सजवून घेतल्यावर त्याने आरशातील आपले रूप न्याहाळले आणि स्वतःच स्तुती करीत तो मॉलमधील दुसऱ्या दुकानाकडे वळला. Barnes and Noble चे प्रशस्त दुकान त्याच्यासमोर होते. त्याचे दार अधिक सुदैवी होते! त्याची कमीत कमी हानी करून आलोक त्यात शिरला. जर पृथ्वीवर दुसरा कोणी सजीव / मनुष्य अस्तित्वात असेल तर त्याला शोधण्यात इंटरनेट हा आपला मुख्य आधार असल्याचे तो जाणून होता. त्यामुळे त्याने संगणक क्षेत्राच्या कक्षाकडे आपली पावले उचलली.
डायनाने थोडासा विचार केल्यावर घरात पडलेल्या एका मस्त चित्रपटाच्या DVD चा आनंद लुटला. तो चित्रपट पाहताना तिने फ्रीजमधील पिझ्झा मायक्रोवेव मध्ये गरम करून हादडलाही! दुपारनंतर गुगल, फेसबुक (हो फेसबुक अजूनही आपले अग्रगण्य स्थान टिकवून होते. ) ह्या संकेतस्थळांना कोणी भेट देत आहे का हे शोधून काढण्याचा मार्ग कोणता हे शोधून काढण्याचे तिने ठरविले. अनपेक्षितपणे मिळालेल्या ह्या स्वातंत्र्याच्या ह्या अनुभवावर ती एकंदरीत बेहद खुश होती.
ka hi hi
ReplyDelete