सन २१३४
मानवाने आपल्या प्रगतीची अधिकाधिक शिखरे गाठली होती. साधारणतः १०० - १२५ वर्षांपूर्वी जी भ्रष्टाचार, अतिरेकी, महागाई, बेफाम लोकसंख्यावाढ, धर्मवेडे ह्यांची अनागोंदी माजली होती ती बुद्धिवंतांनी हुशारीने नियंत्रण आपल्या हाती घेवून आटोक्यात आणली होती. हे सर्व कसे साधले गेले ह्याचा अभ्यासू लोकांना बराच अचंबा वाटत होता. बुद्धिवंतांनी जैविक शास्त्रातील प्रगतीच्या आधारे मनुष्यातील द्रुष्ट विचार निर्माण करणाऱ्या मेंदुंतील पेशींचा नाश केला असावा अशी वदंता होती. परंतु हे सर्वच अभियान इतक्या गुप्तपणे आणि पुरावा न ठेवता राबविले गेले की त्याविरुद्ध कोणीच काही बोलू शकत नव्हते.
राष्ट्रांनी आपल्या संरक्षण खर्चात ९९.९९ टक्के कपात केली होती. चान्दोबा मासिकासारखी सुंदर गावे जगभर निर्माण केली गेली होती. साक्षरेतेचे प्रमाण ९९.९९ टक्क्यावर आले होते. जन्मणाऱ्या प्रत्येक बालकाच्या भविष्यातील अभ्यासक्रमांची, व्यवसायाची तरतूद जन्मतःच केली जात होती. संस्कार शिबिरांना गावात, शहरात सर्वत्र स्थान होते. कृषीव्यवसायाला जगभर मानाचे स्थान प्राप्त झाले होते. संगणक, इंटरनेट ह्यांचे नवीन पिढीतील खूळ बरेच कमी झाले होते.
आलोक आपल्या ठाण्याच्या घरावरून बेस्ट बसने आपल्या दादरच्या कार्यालयाकडे निघाला होता. वाहतूककोंडी हा प्रकार ह्या पिढीला माहित नव्हता. ९ ते ६ ह्या वेळात कार्यालयातील काम आटपून तो वेळच्या वेळी घरी परतत होता. जीवनातील ही घडी अशीच राहू दे हे जुने गाणे तो आणि त्यावेळचे बरेच लोक फुरसतीच्या वेळी गुणगुणत असत.
डायना आपल्या ससेक्स, होव इथल्या घरातून ब्रायटन मधल्या कार्यालयाकडे चालत चालली होती. मे मधले इंग्लंडमधील आल्हाददायक वातावरणात तिचा मूड एकदम बनून गेला होता. आपला मित्र जॉनशी आदल्या दिवशी झालेले भांडण ती विसरून सुद्धा गेली होती.
आपला दिवस आटपून आलोक घरी परतला होता. पत्नी, मुलांसमवेत गुणात्मक वेळ घालवून तो १० वाजता निद्राधीन झाला होता. रटाळ, निरर्थक अशा मालिकांवर ५० वर्षांपूर्वी बंदी आल्याने मानवांच्या झोपेच्या कालावधीत सरासरी दीड तासांची वाढ झाली होती.
नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाचच्या सुमारास आलोकला जाग आली. बिछान्यावर बाजूला पत्नी नव्हती हे पाहून त्याला काहीसे नवल वाटले. तो हळूच उठून मुलांच्या खोलीत आला. मुलेही तिथे नव्हती आता मात्र आलोक दचकला. त्याने पटापट पूर्ण घराची तपासणी केली. परंतु तिथे कोणीच नव्हते. त्याने पटापट आपल्या सासरचा फोन लावला. तिथे कोणीच फोन उचलला नाही. तो पटापट कपडे चढवून खाली उतरला. बिल्डींगचा रखवालदार जागी नाही हे पाहून त्याचे पित्त खवळले. अशा शिस्तबद्ध जीवनात आज हे काय चालले आहे हे त्याला न कळल्याने त्याचा मेंदू दचकुन गेला होता. बिल्डींगबाहेर आल्यावर पण अशीच परिस्थिती होती. गेल्या दहा मिनिटात आपल्याला एकही माणूसच काय पण एकही सजीव दिसला नाही ह्याची जाणीव व्हायला त्याला फारसा वेळ लागला नाही.
No comments:
Post a Comment