Thursday, May 9, 2013

आभास - भाग ४




आलोक संगणकाच्या पुस्तक कक्षात बराच काळ रमला होता. अचानक त्याला भुकेची जाणीव झाली. पुन्हा एकदा शीतगृहात साठविलेल्या अन्नाच्या आधारे त्याने आपली क्षुधा शांत केली. असाच रमत गमत चालत असताना त्याचे लक्ष हायपरसिटी मध्ये असलेल्या ताज्या भाज्यांकडे गेले. त्याला एव्हाना वरण भाताची आठवण येऊ लागली होती. काही भाज्या उचलून तो उद्वाहकाकडे चालू लागला. अचानक मधल्या एका दुकानातील सर्व दिवे बंद असल्याचे त्याला दिसले. एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. अशा परिस्थितीमध्ये उद्वाहकाचा वापर करणे किती धोक्याचे आहे हे त्याला कळून चुकले. मग जिन्याने तो खाली उतरला. गाडीत बसता बसता पेट्रोलच्या मध्यावर आलेल्या खुणेवर त्याचे लक्ष गेले. म्हणजे आता पेट्रोल सुद्धा भरायला शिकावे लागणार तर असा विचार त्याच्या मनात येवून गेला. वाटेत त्याला गणपतीचे देऊळ दिसले. नेहमी देवळात जायला का कु करणारा आलोक शांतपणे गाडी थांबवून देवळात शिरला. 'देवा, ३३ कोटी देवांपैकी एकाला तरी पृथ्वीवर पाठव रे' अशी मनोभावे प्रार्थना करून तो परत निघाला. पुन्हा एकदा आपण देवळात न जाण्याबद्दल कटकट करणाऱ्या आई आणि बायकोची त्याला आठवण आली आणि तो काहीसा गहिवरला.
गाडी पार्क करता करता त्याचे लक्ष नाक्यावरील किराणा मालाच्या दुकानाकडे गेले. कोणास ठावूक कसे पण त्याला आगपेटीची, मेणबत्तीची आठवण झाली. किराणा मालाच्या कुलुपाला फोडून त्यातून हव्या त्या गोष्टी घेवून तो परत निघाला. ब्लॉकचे कुलूप उघडता उघडता त्याचे लक्ष जोश्यांच्या ब्लॉककडे गेले. अरे ह्यांची चावी तर आपल्याकडेच आहे, त्यांच्या आलिशान सोफ्यावर मस्त पैकी ताणून द्यावे असा विचार त्याच्या मनात आला आणि मग त्याने तो लगेच अमलात आणला सुद्धा!
त्याच्या अपेक्षेनुसार वरण भात भाजीचा मेनू फिस्कटलाच. तरीही त्याला एकंदरीत करपलेली भाजी, कच्चे भात, वरण काहीसे समाधान देवून गेले. मग तो तास दोन तास संगणकावर गुगल, फेसबुक अशा संकेतस्थळावर जावून आला. फेसबुकवर शेवटचा अपडेट येवून १८ तास होवून गेले होते. 'Anybody there?' असे स्टेटस अपडेट करून कंटाळून तो झोपी गेला. सुरुवातीला त्याला झोप काही लागत नव्हती. एकट्याने रात्र घालविणे किती कठीण आहे हे त्याला प्रथमच जाणविले.
आलोकचे पुढचे दोन तीन दिवस काहीसे अशाच प्रकारे गेले. नाही म्हणायला त्याला पाण्याची टाकी कशी भरायची हे समजावून घ्यावे लागले. आता वरण, भाजीच्या दर्ज्यात बरीच सुधारणा झाली होती. आपला संगणक सुरु राहायला हवा आणि त्यासाठी त्याने जनरेटर सेटची पण सोय केली होती. हळू हळू एकटेपणा त्याच्या मनःस्थितीवर परिणाम करू लागला होता.
डायना मात्र एकदम झपाटल्यासारखे काम करीत होती. खाण्यापिण्याकडे तिचे फारसे लक्ष नव्हते. तिसऱ्या दिवशी दुपारी अचानक तिला गुगलच्या संकेतस्थळाला किती जणांनी भेट दिली हे कसे शोधायचे हे कळाले आणि तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. थोड्या प्रयत्नानंतर तिला फेसबुकच्या बाबतीत ही यश आले. आणि मग एका विशिष्ट संगणकावरून ही दोन्ही संकेतस्थळे गेले दोन दिवस धुंडाळली जात आहेत हे जेव्हा तिला समजले तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
 

No comments:

Post a Comment