आलोकने गेल्या दोन दिवसात बराच वेळ चेनशी संवाद साधला होता. चेनला मनुष्याशी इतका वेळ संभाषण करण्याची सवय नव्हती. नाही पुरत तर आलोक आपल्या सर्व भावना संभाषणातून व्यक्त करीत होता. आणि त्यामुळे नकळतपणे चेनचा भावनाबिंदू चेतवला जात होता.
गाडीतील विद्युतुउर्जा आता केवळ ५०० किमी प्रवासापुरती राहिली होती. आलोकच्या मनात कुठेतरी नवीन गाडी शोधण्याचा विचार सुरु होता. अचानक त्याचे लक्ष विमानतळाच्या मार्गाच्या खुणेकडे गेले. चेनला त्याने गाडी विमानतळाच्या दिशेने वळविण्याचा संकेत दिला. भावनेच्या पुढील पातळीवर आलेल्या चेनने त्याच्याकडे काहीश्या आश्चर्यकारक नजरेने पाहिले. गाडी व्यवस्थितपणे पार्क करून चेन आणि आलोक विमानतळाच्या मुख्य इमारतीत घुसले. (चेनला वैमानिक बनवायला सांगणाऱ्या वाचकाचे आभार!)
पुढचे दोन तास आलोकने अगदी झपाट्याने हालचाली केल्या. प्रथम त्याने चेनला निद्रितावस्थेत टाकले. वैमानिकाच्या प्रशिक्षणाचा संगणकीय कोर्स शोधून काढला. आणि बघता बघता तो चेनमध्ये घुसवून टाकला देखील. दोन तासांनी निद्रीतावस्थेतून बाहेर आलेल्या चेनचा चेहरा अगदी ज्ञानी पुरुषासारखा दिसत होता.
गेल्या काही दिवसांच्या अनुभवाने आलोक आता एकदम सतर्कावस्थेत पोहोचला होता. धावपट्टीवर एक विमान अगदी उड्डाणाच्या तयारीत होते, म्हणजे अगदी ज्या क्षणी मनुष्यजात नाहीशी झाली त्यावेळेसारखे (आता आकाशातील विमानांचे काय झाले किंवा रस्त्यावरील धावत्या वाहनांचे काय झाले असे प्रश्न आपल्या मनात आल्यास लेखकाशी संपर्क साधा). आलोकने चेनला विमानात बसून १०० किमी अंतराचे उड्डाण करून यायची आज्ञा दिली. आलोकाच्या मनातील स्वार्थी विचार ओळखण्याची क्षमता एव्हाना आलेल्या चेनच्या चेहऱ्यावरील दुःखी भाव आलोकला जाणविले सुद्धा! अशा दोन यशस्वी उड्डाणानंतर खात्री पटलेल्या आलोकने चेनबरोबर विमानात प्रवेश केला. इंग्लंडपर्यंत पोहोचण्याइतके इंधन विमानात होते.
चार तासांनी गटविक विमानतळावर यशस्वीपणे उतरलेल्या आलोकच्या मनात स्वतःविषयी अत्यंत आदर दाटून आला होता. ह्या सर्व घटनेवर पुस्तक लिहायचे त्याने नक्की केले होते. परंतु ह्या पुस्तकाला डायनाशिवाय वाचक कोण लाभणार ह्या विचाराने तो काहीसा दुःखी झाला.
डायनाबाई स्कॉटलंडच्या लेक District मधील नयनरम्य निसर्गाचा आस्वाद घेण्यात रमल्या होत्या. तिचा शोध घेण्याचे आव्हान आता आलोकपुढे होते!!
No comments:
Post a Comment