आलोकला मदत करतानाचे डायनाचे दिवस भरभर निघून गेले होते. पण आता परिस्थिती एकंदरीत कठीण होत चालली होती. आलोकशी संपर्क तुटला होता. पुढील एक दोन दिवसात इमारतीमधील वीजपुरवठाही बंद पडला. सौरउर्जेवर चालणाऱ्या उपकरणांना इंग्लंडच्या हवामानामुळे फारशी मागणी नव्हती आणि त्यामुळे त्यांचा वापरही फारसा प्रचलित नव्हता. आलोक ज्या ज्या वेळी दुसऱ्याची गाडी घेतली, दुसऱ्याच्या घरात जाऊन झोपलो असे म्हणायचा तेव्हा डायनाला कसेसच वाटायचं. ह्या माणसाला काहीच कशा वागण्याच्या चालीरीती नाहीत असे तिला राहून राहून वाटायचं. 'संस्कार, चालीरीतीचे राजमान्य संकेत हे सभोवतालच्या परिस्थितीनुसार बदलतात आणि हे बदल घडवून आणणारा माणूस हा मोठा द्रष्टा असतो' तिच्या मनातील विचार ओळखून आलोकने दिलेला मोठा डोससुद्धा तिला आठवला. आपल्यालाही हे द्रष्टेपण स्वीकारायला हरकत नसावी अशी तिने आपल्या मनाची समजूत घातली आणि लाकडांवर चालणारी फायरप्लेस ज्या घरात आहे अशा घराचा शोध सुरु केला. तिचं नशीब तसं जोरात होत आणि दुसऱ्याच घरात तिला हवी तशी फायरप्लेस मिळाली. हो तिने waitrose मधून कच्चे मांस, पाव असे पदार्थ आणले होतेच. परंतु दीड दिवसापूर्वी बंद पडलेल्या विद्युतपुरवठ्यामुळे त्यांचा ताजेपणा उतरणीच्या मार्गावर होता. Wick Hall च्या बागेत लाकडांवर अन्न गरम करताना एकंदरीत पुढे परिस्थिती बिकट होत जाणार हे तिला कळून चुकले होते. आणि तिला आपल्या इमारतीच्या आसपासच फिरकत राहणे आवश्यक होते. कारण आलोक तर इथेच येणार होता. 'अरे पण आलोकला इथे पोहोचायला अजून किमान २० दिवसतर लागतील तोवर सारे इंग्लंड फिरून होईल' डायनाच्या मनात विचार आला. तसं पाहिलं तर स्कॉटलंड फिरण्याची तिची इच्छा फार जुनी होती. मग थोड्या फार प्रमाणात आलोककडून ऐकलेल्या माहितीच्या जोरावर दुसर्याच्या गाडीत प्रवेश करून, आवश्यक सामान गाडीत भरून बाईसाहेब लंडनच्या दिशेने दोन तासांनी निघाल्या सुद्धा! तिचा हा निर्णय योग्य की अयोग्य हे येणारा काळच सांगू शकणार होता.
आलोकचा संघर्षाचा काळ सुरु होता. उंच प्रदेशातील कमी ऑक्सिजनच्या पुरवठ्यात वेगाने गाडी चालविणे त्याला कठीण झाले होते. काठमांडू ते बनेपा ह्या २२ किमी अंतराने त्याचे चांगले २ तास घेतले. गाडीत भरलेल्या maggi ला सुर्यचुलीवर शिजवून त्याने आपली क्षुधा शांत केली होती. पुढील आरनिको राजमार्गावरील प्रवास त्याची कसोटी पाहणारा होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मनात भय निर्माण करणाऱ्या दऱ्या, अंगाला गारठवून टाकणारा बोचरा वारा, अन्नाचा मर्यादित पुरवठा ह्यामुळे आलोकला दिवेसंदिवस अशक्तपणा जाणवू लागला होता. शेवटी मग त्याने त्या उंच हिमशिखरातील एक गाव निवडून तिथे एक दिवस विश्रांती घेण्याचे ठरविले.
No comments:
Post a Comment