Wednesday, May 22, 2013

आभास - भाग ११


पुढचे दोन तीन दिवस आलोकची स्थिती खराबच होती. त्यानंतर मात्र त्याला खूपच बरे वाटू लागले. आणि त्याने आपला पुढील प्रवास सुरु केला. ताजातवाना झालेल्या आलोकने गाडी जोरात दामटवली आणि तो चीनच्या सीमारेषेवर येवून पोहोचला सुद्धा! दूरवर G318 ची खुण दिसताच आलोकला काहीसे बरे वाटले आणि तो चीनमध्ये प्रवेश करता झाला. चीनचे ठाणे आलोकने पार करताच अचानक भोंगे वाजू लागले. 'अरे बापरे, जगात जिवंत राहून राहून फक्त चिनीच जिवंत राहावेत का?' असा विचार त्याच्या मनात डोकावला. इतक्यात रोबोंची एक रांगच त्याच्या दिशेने सरकताना त्याला दिसली. 'हुं, असा मामला आहे तर' आलोक विचार करता झाला. परंतु त्याला त्वरित कृती करणे आवश्यक होते. त्याच्या नशिबाने रोबोंची हालचाल म्हणावी तितकी जलद नव्हती. आलोकला त्या आठ रोबोंच्या हालचालीत काही एक लयबद्धता असावी असे वाटले. अरेच्च्या हे तर बुद्धिबळातील सोंगट्यासारखे येतायेत, कडेचे दोन सरळ, त्यांच्या बाजूचे दोन अडीच घरवाले आणि … (वाचक प्रतिक्रिया - का हि हि) आलोकच्या चाणाक्ष बुद्धीने हे लगेच ओळखले. तत्काळ त्याने जावून राजा रोबोची एक कळ दाबली, ज्यावर 'stop' असे लिहिले होते.  ती कळ दाबताच सर्व रोबो शांत झाले. त्याच्या बायकोचे आणि आता काही प्रमाणात डायनाचे मत काहीही असो, आलोक एकदमच मठ्ठ नव्हता. सर्व रोबो शांत होताच त्याने राजा रोबोकडे चक्क दुर्लक्ष केले आणि तो वजीर रोबोचे निरीक्षण करू लागला. त्याचे लक्ष 'स्वतंत्र हालचाल' ह्या पर्यायाकडे गेले. तो निवडताच 'स्वतः' आणि 'बाह्य' असे दोन पर्याय देण्यात आले. आलोकने बाह्य पर्याय निवडला, मग पुढील आज्ञा द्या असे सांगण्यात आले. थोड्याशा मेहनतीनंतर 'तळाकडे परत चला' ही आज्ञा आलोक योग्य रुपात देवू शकला. एखाद्या आज्ञाधारक मुलासारखा (दुर्मिळ जात! - किंबहुना  आज्ञाधारक नवर्यासारखा) रोबो तळाच्या दिशेने वाटचाल करू लागला. त्या वजीर रोबोने तळाचे प्रवेशद्वार उघडले आणि आतील संरचना पाहून आलोक थक्क झाला. बाहेरील जगातील घडामोडींचा त्या तळावर काहीच परिणाम झाला नव्हता. रोबोंची आतमध्ये वर्दळ सुरु होती. रोबोंनी हा तळ व्यवस्थित चालू ठेवला होता. वजीर रोबो बाह्य नियंत्रणाखाली असल्याने आलोक काहीसा बिनधास्त होता. वजीर रोबो आत येताच त्याने काही विशिष्ट आज्ञा बाकी सर्वांना दिल्या होत्या. आलोकने वजीर रोबोला जवळ बोलाविले. त्याचे थोडे अधिक निरीक्षण करताच आवाजाद्वारे त्याला नियंत्रित करण्याचा पर्याय आलोकला सापडला. आलोकला धन्य वाटले, परंतु त्याच्या पहिल्या एक दोन आज्ञेला रोबोने प्रतिसाद न दिल्याने तो हैराण झाला. मग भाषा बदलावी लागेल हे त्याला कळाले. भाषेच्या विविध पर्यायांमध्ये मराठी भाषा सुद्धा होती हे पाहून आलोक हैराण झाला. परंतु त्यामुळे त्याच्या जीवनातील सुसह्यता जाणून घेऊन त्याने काही वेळात  आंघोळ वगैरे आटपून घेतली. रोबोनी त्याला व्यवस्थित भोजनही आणून दिले. वजीर रोबो द्वारे सर्व रोबोंना PAUSE स्थितीत टाकून आलोकने ताणून दिली.
जागे झाल्यावर आलोकने संपूर्ण तळाचा अभ्यास केला. अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असा तळ होता तो! तिथे वीज निर्माण केली जात होती. उपग्रहांद्वारे सर्व पृथ्वीवरच्या प्रतिमा तिथे पाठविल्या जात होत्या. बहुदा तेथील कोण्या माणसाला आपण नाहीसे होत आहोत ह्याची जाणीव झाली असावी आणि म्हणून त्याने संपूर्ण नियंत्रण रोबोंकडे सोपविले होते. आलोकचे लक्ष तेथील रोबोंची तुलना करणाऱ्या तक्त्याकडे गेले. त्यातील काही रोबोमध्ये मानवी भावनांचे रोपण करण्यात चीनी लोकांना यश आल्याचे पाहून आलोक पुरता अचंबित झाला. अशा प्रकारे रोबो विश्वात गढून गेलेल्या आलोकला अचानक डायनाची आठवण आली. उपग्रहांच्या प्रतिमांचा वापर करून ती होवमध्येच आहे की नाही हे निश्चित करण्याचे त्याने ठरविले. त्याने एका उपग्रहाची प्रतिमा होववर लक्षित केली. परंतु त्या पूर्ण गावात 'मनुष्य गणन' शून्य दाखविले गेले. चिंतीत होऊन आलोकने पूर्ण इंग्लंडची गणना केली. थोड्या प्रयासानंतर बाईसाहेब लंडन जवळ पोहोचल्याचे आलोकला आढळून आले. स्त्री स्वभावाचा स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या आलोकने ह्या घटनेवर आश्चर्यचकित होण्याचे नाकारले. मग त्याच्या मनात पर्यायी गाडीचा विचार आला. सौरउर्जेवर चालणारी गाडी काहीशी थंडावली होती. थोड्याच वेळात वजीर रोबोच्या मदतीने आलोकने एक विद्युतुर्जेवर चालणारी गाडी पुढील प्रवासासाठी निवडली. आलोक आणि त्याचा मेंदू आता पूर्ण सक्रिय झाला होता. तो आता चालकाचा विचार करू लागला. त्याने संपूर्ण रोबोमध्ये चांगला सारथी कोण अशी चौकशी माहितीभांडाराकडे केली. त्यावेळी वजीर रोबोच्या मनात काहीशी दुःखी छटा आली असे त्याला उगाचच वाटून गेले. पण मग आलोकने त्याचाच विचार करण्याचे ठरविले. वजीर चालककौशल्यात पहिल्या दहात होता परंतु महत्वाची बाब म्हणजे त्याचा भावनिक बुद्ध्यांक सर्वात वरच्या क्रमांकावर होता. आलोकने त्यालाच निवडले.
नवीन गाडी, नवीन चालक घेऊन पूर्णपणे ताजातवाना झालेला आलोक पुढच्या प्रवासाकडे निघाला. निघतानिघता चिन्यांचा हा तळ उद्ध्वस्त करून टाकावा असा विचार त्याच्या मनात आला. परंतु 'chan' च्या नजरेकडे पाहून आलोकने हा विचार बदलला.

No comments:

Post a Comment