Thursday, May 30, 2013

आभास - भाग १५



मे महिन्यातील लांबलेल्या संध्याकाळी घराबाहेरील बागेत खुर्च्या टाकून आलोक आणि डायना बसले होते. आणि बाजूला होता चेन! चेनचे अस्तित्व डायनाला राहून राहून खटकत होते. स्थिर होण्यासाठी ब्रायटन / होवलाच डायनाची पसंती होती. परंतु इतक्या ऐतिहासिक दीर्घ प्रवासानंतर त्या ठिकाणावरून हलण्याची आलोकची अजिबात तयारी नव्हती. स्कॉटलंडचा झोंबरा हिवाळा अजूनही चार - पाच महिने दूर होता. थोड्या चर्चेनंतर पुढील एक महिना स्कॉटलंडमध्येच घालविण्याचे त्यांनी ठरविले.
आलोकच्या गाडीतील मेणबत्त्या त्यांना आता कामी आल्या होत्या. आजच्या जेवणाचा मेनू डायनानेच ठरविला होता. आजूबाजूच्या मळ्यातील गोळा केलेल्या भाज्यांचा उकडलेला सूप, उकडलेले बटाटे असा सर्व मेनू होता. सुपरमार्केट मध्ये विजेच्या अभावाने शीतगृहातील पदार्थ खाण्याच्या पलीकडे गेले होते. असल्या मेनूवर आलोक नाराज झाला होता. त्याने आपल्या गाडीतून नुडल्सचे पाकीट काढले आणि ते गरम पाण्यात उकळविण्यास टाकले. त्याच्या ह्या कृतीवर डायना काहीशी नाराज झाली. ती काहीच बोलत नाही हे पाहून आलोकला आपली चूक ध्यानात आली. त्याने आपला मोर्चा मग उकडलेल्या सूपाकडे वळविला. 'वाह, काय सूप आहे' खरोखरीची दाद देण्याचा त्याचा प्रयत्न डायनाला जसा भावला तसेच त्याला सूप काही आवडला नाही हे मात्र तिच्या लक्षात आले.
चेनचे प्रकरण एकंदरीत दोघांच्या आवाक्यापलीकडे होते. ह्या दोघांच्या प्रत्येक संभाषणात चेनला सहभाग घ्यायचा असायचा. सहभाग ऐकण्यापुरता आणि अधूनमधून अभिप्राय देण्यासाठी! डायनाला चेनचे अस्तित्व आता अजिबात झेपेनासे झाले होते. परंतु आलोकला हे घर सद्यपरिस्थितीत राहण्यायोग्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या चेनच्या मदतीची जाणीव होती आणि ज्या माणसाने नव्हे रोबोने आपल्याला अशक्यप्राय असलेला प्रवास इतक्या सहजासहजी गाठून दिला त्याची गरज संपताच त्याला पळवून लावणे आलोकला  योग्य वाटत नव्हते.
पुढील ३ - ४ दिवसात चेनच्या मदतीने आलोक आणि डायना बर्यापैकी स्थिरस्थावर झाले. एका मोठ्या दुकानातून सौर उर्जेवर विद्युत निर्मिती करणारे यंत्र त्या घराला बसविण्यात आल्यावर पुढील काही महिन्याचा प्रश्न सुटला. चेनने त्यात अजून सुधारणा करून ह्या यंत्राद्वारे अधिक विद्युत उर्जा निर्माण करून ती हिवाळ्यापुरता साठविण्याचा मार्गही शोधला होता. त्यामुळे आता मोठा प्रश्न सुटला होता. डायनाला हे घर एव्हाना आवडू लागले होते. आणि दक्षिणेकडे जाण्याचा बेत आता बर्याच काळापर्यंत पुढे ढकलण्याची तिची तयारी होती.
डायनाला जसे हे घर  आवडले होते तसंच तिला आलोकसुद्धा एव्हाना आवडू लागला होता. भारतीय भोजनाचा मोठा भोक्ता असलेला आलोक तिला वैविध्यपूर्ण भारतीय खाद्यपदार्थ खावू घाली. परंतु त्याचवेळी तिच्या इंग्लिश जेवणातील विविध पदार्थही त्याने शिकून घेतले होते. सतत हिंदी गाणी ऐकण्यात मश्गुल असलेल्या आलोकने इंग्लिश पॉप संगीताचा कान विकसित केला होता. अंगणातील गवत कापण्याचे वेळापत्रक  त्याने पूर्णपणे लक्षात ठेवले होते. घराच्या साफसफाईत सुद्धा तो पुढाकार घेत असे. दिवेलागणीच्या वेळी आलोक आपल्या देवांची पूजा करून शुभंकरोती म्हणे ते तर डायनाला खूपच आवडायचे. डायनाला आलोकच्या मनाचा मात्र थांगपत्ता लागत नव्हता. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आलोक कधी गेला नव्हता. आणि हो चेनला पळवून लावायचे आलोक मनावर घेत नव्हता ही डायनाची तक्रार होती. एक दिवशी तिने थोडी जास्तच कटकट केल्यावर चेनच्या विकसित झालेल्या भावनिक बुद्धीचा आलोकने उल्लेख केला आणि त्याच्याकडे असलेल्या रोबोच्या पलटणीविषयी सुद्धा तिला सांगितले.
इथे चेनची समस्या वेगळीच होती. त्याला आता मनुष्यांचा सहवास आवडू लागला होता. परत रोबोच्या विश्वात जाण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती.
अशाच एका रम्य संध्याकाळी आलोक 'दो दिल मिल रहे है, मगर चुपके चुपके' 'सबको हो रही खबर चुपके चुपके' असे गुणगुणत बसला होता. डायनाची मिश्किल बुद्धी उफाळून आली आणि तिने गुणगुण्यास प्रारंभ केला. 'दो दिल मिल रहे है, मगर चुपके चुपके' 'चेनको हो रही खबर चुपके चुपके'. तिच्या ह्या विनोद्बुद्धीवर आलोक एकदम खळखळून हसला आणि दोघे हास्यकल्लोळात बुडून गेले. ह्या सर्व प्रकारात थोड्या बाजूलाच असलेल्या चेनचे अस्तित्व ते दोघे पार विसरून गेले होते. चेनला जसे हिंदी गाणे समजले होते तसेच आपला असा केलेला उल्लेख त्याला आवडला नाही.
रात्री जेवणानंतर दार बंद करण्याआधी आलोक चेनची शोधाशोध करीत होता. काही वेळाने न राहवून डायना सुद्धा त्यात सामील झाली. त्या रात्री भावनिक पातळी उंचावलेला चेन कायमचेच त्या दोघांना सोडून गेला होता हे कळायला त्यांना काही काळ लागणार होता.
निरंजन काहीसा बेचैन झाला होता. निरंजनच्या प्रयोगातील बराच टप्पा बाकी होता पण वेळ मात्र कमी होता. ह्या प्रतिकृती ग्रहावर जरी काल मूळ पृथ्वीच्या तुलनेत बऱ्याच वेगाने चालत असला तरी मूळ पृथ्वीवर ह्या दोघांना सकाळ होईपर्यंत परत पाठविण्याची वेळ आता जवळ येत चालली होती. कचने रोबोप्रकरण अचानक आवरते घेतले होते. पण तो अजून काही करणार नाही ह्याचा मात्र भरवसा निरंजनला वाटत नव्हता!

 

No comments:

Post a Comment