Thursday, May 16, 2013

आभास - भाग ७



निघताना आलोकने डोळे भरून आपल्या घराकडे पहिले होते. आई  बाबा, बायको मुलगा ह्याचे फोटो साथीला होते.  त्याने गाडी cruise कंट्रोल मध्ये टाकली होती. थोड्या वेळातच तो मुंबई पार करून मनोर मार्गे तलासरी, वापीपर्यंत पोहोचला होता. साथीला १९७० च्या सुमारातील किशोरची गाणी होतीच. आलोकने खास 'मुसाफिर हुं यारो ना घर है ना  ठिकाना, मुझे बस चलते जाना है' वगैरे गाणी लावली होती. तंत्रज्ञान थोडे अधिक प्रगत झाले होते आणि त्यामुळे एकटा प्रवासी अशी थीम दिल्यावर त्याच्या गाडीत ह्या विषयावरची सर्व गाणी वाजवली जात होती. पण ही सर्व गाणी १९८० सालापर्यंत येवून थांबत होती. त्यानंतर निर्माण झालेले हे सर्व तंत्रज्ञान आपल्याच काळातील गाणी निवडत नाही ह्याचे आलोकला अजिबात आश्चर्य वाटत नव्हते.
वापीला त्याने गाडी थांबविली. एका बंगल्यात शिरून तो ताजातवाना झाला. हल्ली एक बरे होते, सर्व जगभरच्या सपाट भूप्रदेशात  wi fi ची व्याप्ती पोहोचलेली होती. त्याला एव्हाना डायनाची आठवण झाली. त्याने तिला फोन लावला. 'कसा आहेस तू?, कुठवर पोहोचलास?' डायनाच्या स्वरात पहिल्यांदा त्याला ओलावा जाणवला. 'वापी' आलोक उत्तरला. 'तू कशी आहेस?' 'आहे मजेत! आताच बीचवर जावून मस्तपैकी पोहून आलेय!' डायना उत्तरली. 'आज कितपर्यंत मजल गाठणार?' डायनाने विचारले. 'बघुयात, आज उशिरा निघालोय, गांधीनगर तर नक्की पार करीनच, परंतु उदयपूरला पोहोचणे कठीण आहे.' आलोक उत्तरला. 'बघ रे बाबा, अगदीच अनोळखी भागात रात्र घालवू नकोस' डायना चिंतेच्या स्वरात बोलली. 'का अनोळखी भागातील भुते काय शहरातील भागापेक्षा जास्त त्रासदायक असतील?' आलोकने विचारले. 'मला भूतांची चिंता नाही, भूतीणींची आहे, त्या तुझ्या मागे लागल्या तर?' डायनाने आपणही काही कमी नाही हे दाखवून दिले. निरुत्तर होवून अलोकने संभाषण आवरते घेतले. तिचा निरोप घेवून, बंगल्यातील आवश्यक ते जिन्नस घेवून गाडी पुढे निघाली. आता आलोकने 'अजनबी' ह्या थीमची गाणी लावली. संध्याकाळची उन्हे गाडीत शिरत होती. 'अजनबी कौन हो तुम जबसे तुम्हे देखा है' ह्या गाण्यावर रमलेला आलोक आपल्या मनातील वादळांना शमविण्याचा प्रयत्न करीत होता.  

No comments:

Post a Comment