Thursday, July 1, 2010

कोऽहं

२०६० सालची एक रम्य पहाट. चितळे कुटुंबीय उठले आणि आपापल्या फेसबुक खुर्च्यांवर जाऊन बसले. खुर्चीवरची कळ दाबताच प्रत्येक जण हा मनाने फेसबुकच्या विश्वात प्रवेश करता झाला.

या युगाचा हा नियमच होता. सकाळी उठताच प्रत्येक जण फेसबुकमध्ये प्रवेश करता व्हायचा. शरीर खुर्चीवर पण मन मात्र फेसबुकच्या विश्वात. शरीर बनायचे अचेतन आणि मन सक्रीय व्हायचे फेसबुकच्या विश्वात. दुनियेचे सर्व व्यवहार फेसबुक मध्ये चालायचे! शाळा, कॉलेज, ऑफिस, मैदाने सर्व काही त्या विश्वात. या मुळे भूतलावरील बर्याच समस्या फेसबुकच्या विश्वात शिरल्या होत्या. लोकसंख्या, वाहतूक कोंडी सर्व काही. आपापली कामे आटपून लोक मग logout करायचे आणि जेवून झोपी जायचे. अजूनही काही गोष्टींवर मनुष्यजात शरीरावर अवलंबून होती. येत्या काही वर्षात मनुष्यदेहावरील अवलंबिता पूर्णपणे नष्ट करण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न होता. परंतु त्याआधीच फेसबुकातून भूतलावर परत येण्याचा मार्ग तोडून टाकण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न असल्याची वदंता होती.

रमेश चितळेचे फेसबुकातील कॉलेज संपले, तिथल्याच कॅन्टीन मध्ये थोडाफार वेळ घालवून तो भूतलावर येण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु काही कारणास्तव बर्याच वेळा प्रयत्न करून सुद्धा परतू शकला नाही. त्याने आपल्या वडिलांशी संपर्क केला. त्यानाही तोच प्रश्न पडला होता. थोड्याच वेळात फेसबुकच्या विश्वात खळबळ माजली. अवघी मनुष्यजात देहाविना फेस्बुकात अडकून बसली होती. पृथ्वीवर उरले होते मनुष्यांचे अचेतन देह!

वरती विधाता मात्र स्मितहास्य करीत होता. मनुष्यजातीला पृथ्वीवर आणून बरीच युगे झाली होती. तिथले मनुष्याचे विश्व त्याला भावेनासे झाले होते आता एका झटक्यात देह विरहीत मनुष्यजातीला फेसबुकच्या विश्वात आणून पुढील कित्येक युगाच्या करमणुकीची त्याने सोय केली होती. कोऽहं चा शोध फेसबुकाच्या विश्वात सुरूच राहणार होता!

No comments:

Post a Comment