Sunday, July 25, 2010

जीवन प्रत्यक्षातील / फेसबुकातील, बाकी काही

आपण मान्य करो अथवा न करो फेसबुकाने आपल्याला व्यापून टाकले आहे. उद्या दहावीच्या मराठीच्या परीक्षेत 'फेसबुकाविना एक दिवस' असा निबंधाचा विषय ठेवला तर आश्चर्य वाटावयास नको. फेसबुक आपल्याला का मोहित करते ह्याचे विश्लेषण करण्याचा हा प्रयत्न.

फेसबुक म्हणजे प्रत्यक्षातील जीवनापासून काढलेली पळवाट. आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी नाहीशा करून निर्माण केलेले एक काल्पनिक विश्व. सर्वात महत्वाचे म्हणजे इथे आपल्याला नको असलेल्या व्यक्तीशी संबंध ठेवण्याचे बंधन नाही. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीच इथे दिसणार. आपल्याला आवडले जाईल असेच इथे बोलले जाणार. अगदीच टोकाची भूमिका घेवून बोलायचे झाले तर माणसाला लाडावणारे विश्व म्हणजे फेसबुक. आधुनिक जगातील कमकुवत मनोशक्तीला कुरवाळणारे ते हे फेसबुक.

मध्येच माझ्या मनात एक विचार आला की जर ह्या फेसबुकावर शत्रू हा प्रकार अस्तित्वात आला तर मग काय होईल? आपण काही जणांना शत्रू म्हणून घोषित करू, काही जण आपणास त्यांचे शत्रू म्हणून घोषित करतील. आपल्या शत्रूला अजून कोणी शत्रू म्हणून घोषित केले तर आपल्याला त्याची मैत्रीची विनंती येईल आणि बरेच काही! अजून कल्पनाविलास करायचा झाला तर आपला शत्रू जर online दिसला तर युद्ध नावाचे application चालू करण्याचा आपणास किंवा शत्रूस पर्याय असेल. आणि मग त्यात विविध हत्यारे (त्यात शिवी ह्या प्रकारचा समावेश आलाच) वापरली जाऊ शकतील. विनोदाचा भाग सोडला तर एक गोष्ट आपणास लक्षात येईल की जर शत्रू फेसबुकावर अस्तित्वात आले तर फेसबुकाची लोकप्रियता घसरू शकेल.

फेसबुकाचेच सोडा, आजच्या जगातील प्रत्येक गोष्टीचे काही दिवसांनी स्वरूप कसे असेल याचे भाकीत करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. शाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलाने कोणत्या क्षेत्रात भवितव्य घडवावे हे ठरविणे आज शक्य नाही, त्याला शिक्षणाला किती पैसा लागेल याविषयी ठोकताळे मांडणे हे ही शक्य नाही. ही एक असुरक्षिततेची भावना मग आपल्यात जागृत होते आणि मग आपण एकच गोष्टीचा निर्धार करतो, तो म्हणजे जमेल तेवढा पैसा कमावणे आणि साठवणे.

बहुदा आपल्या पुर्वजांनी या गोष्टीचा अंदाज बांधला होता आणि त्यामुळेच त्यांनी या युगाला कलियुग म्हणून नाव दिले होते. समाजावर बौद्धिकदृष्ट्या मार्गदर्शन करण्याची क्षमता विद्वान बाळगून असतो, परंतु ज्या युगात विद्वानांचे महत्व कमी होऊन बळाच्या मार्गे काही लोक समाजावर वर्चस्व प्रस्थापित करतात ते कलियुग. आपल्या पुर्वजांनी कलीयुगानंतर कोणते युग येईल याचे भाकीत केले आहे याचे मला ज्ञान नाही.

प्रश्न असा आहे की आपण सगळे पडलो मध्यमवर्गीय मनोवृत्तीचे. आजूबाजूला घडणार्या कित्येक गोष्टी पटत नाहीत पण त्याला संघटीतपणे विरोध करण्याची क्षमता आपल्यात नाही. आपला विरोध असणार तो दिवाणखान्यातील चर्चेत चहाचे घोट घेत किंवा blog वर. मी अतिरेकी वृत्तीचं अजिबात समर्थन करीत नाही पण एक ध्येयासाठी (मग ते कितीही चुकीचे असो) आपल्या सर्वस्वाची कुर्बानी देण्याच्या त्यांच्या क्षमतेविषयी मात्र मी आदर बाळगतो. आज bank balance च्या मोहाने आपली हीच क्षमता आपण पूर्णपणे गमावून बसलो आहोत. आजूबाजूला न पटणारे एवढे बदल होत असताना आपण केवळ फेसबुकाच्या मोहमायेत गुरफटून जात आहोत.

No comments:

Post a Comment