Sunday, March 2, 2014

थरार भाग ११..


बाली पोलिसांनी मुख्य दार तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना फक्त मुलकानीचा निष्प्राण देह सापडला. त्यांना मिळालेल्या खबरीनुसार तिथे मुलकानीचे मारेकरी सुद्धा असायला हवे होते. लगेचच त्यांनी सर्व घराला सीलबंद केले. आणि हाताचे ठसे घेणाऱ्या तज्ञ लोकांना पाचारण केले.
ज्या प्रकारे नंदनने आपल्याला त्या घराच्या मागच्या दलदलीच्या भागातून पळायला लावले त्यावर भोसले जबरदस्त नाखूष होते. आपण पोलिस आणि त्यात आपण काहीही चुकीचे केले नसताना आपण पळायचं कशाला हा त्यांचा प्रश्न तसा रास्तच होता. परंतु नंदनच्या मनात वेगवेगळ्या कुशंका निर्माण झाल्या होत्या. बाहेरील पोलिसांची गाडी खऱ्या पोलिसांची नसली तर हा मुख्य संशय होता.
नंदनने अजून एका सुरक्षित घराची तरतूद करून ठेवलेलीच होती. तिथे शिरल्यावर त्याने दिल्लीतील केंद्रीय गुप्तहेर खात्यातील आपल्या माणसाशी, सोमणशी संपर्क साधला. तिथली बातमी चिंताजनक होती. ह्या एकंदरीत चौकशीला थोड्या धीम्या गतीने घेण्याचे वरून आदेश आले होते. सोमणही संतापला होता परंतु त्याचा नाईलाज होता. नंदन आता बराच चिंताग्रस्त झाला होता. बालीत एक दोन दिवस लपून काढले की तोवर भारतीय पोलिसांची आणि इंटरपोलची मदत पोहोचेल हा त्याचा अंदाज चुकीचा ठरू लागला होता. बोलणं संपता संपता सोमण म्हणाला, "अगदीच गरज पडली तर माझा मित्र जोशी त्याची पर्यटन यात्रा घेऊन बालीत आला आहे, त्याला संपर्क कर!"
"काका, तुम्हांला कितपत जेवण बनविता येते?"  साधा कांदाही चिरू न शकणाऱ्या नंदनने भोसलेकाकांना प्रश्न केला. "अरे, बल्लवाचार्य सुद्धा माझ्यापुढे हार मानेल!" भोसले काकांनी दर्पोक्ती केली. "उगाच मोठ्या फुशारक्या मारू नका! ५० जणांना एका वेळी जेवण बनविण्याची तयारी ठेवा! जिवंत राहायचं असेल तर हाच एक मार्ग आहे" नंदनचा प्लान D  तयार होता.
मुलकानीच्या खुनाची बातमी बाहेर पडल्यावर गटातील सर्व सदस्य अगदी हवालदिल झाले होते. त्याच्या बायकोच्या शोकाला तर पारावार उरला नाही. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात सुद्धा आता बऱ्याच अडचणी होत्या. बनावट कागदपत्र तिवारीच्या नावाने बनविली गेली होती. त्यामुळे दुःख बाजूला ठेवून हे सारे ह्यातून कसे बाहेर पडायचं ह्याचाच विचार करीत होते. सुप्रीमला संपर्क करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते. मुलकानीच्या घरची बैठक आटपून सर्व मंडळी आपल्या घरी परतू लागली होती. वर्माची पत्नी मुलकानीच्या पत्नीसोबत  मुक्कामाला राहिली होती. वर्माने  अगदी चिंताग्रस्त मुद्रेतच आपल्या घराचे दार उघडले. आणि दिवा लावला. सोफ्यासमोरील टीपॉयवरील फुलदाणी टीपॉयच्या मध्यावरून एका कोपऱ्यात आल्याचे पाहून तो थरारला. पटकन मागे वळून घराबाहेर पडण्याचा त्याचा प्रयत्न मानेभोवती आवळल्या गेलेल्या नायलॉनच्या दोरीने फोल ठरविला. ह्या नाट्यातील बालीतील दुसरा बळी गेला होता.
जोशीच्या सहलीतील पर्यटक रात्रीच्या जेवणाच्या नावाने खडी फोडत होते. "जाहिरात करताना मोठमोठी आश्वासने देतात, अगदी पंचतारांकित हॉटेलसारखे जेवण असेल वगैरे वगैरे! आणि आता समोर करपलेली भाजी! त्यांच्या संतापाला तोंड देता देता जोशीच्या नाकी नऊ आले होते. त्यांना सामोरे जाऊन मुद्पाकखान्यात शिरताना त्याला प्रथम भांड्यांचे करपलेल्या भाजीने खराब झालेले गज घासण्याचा प्रयत्न करणारा नंदन दिसला. आपला सगळा राग त्याने नंदनवर काढला. जोशीची मुद्रा पाहून भोसलेंनी बाहेर न येणेच पसंत केले.
जोशी थोडा शांत झाल्यावर त्याला भोसले आणि नंदनने समजावले. उद्यापासून कामगिरीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
भोसलेकाकांची करपलेली भाजी खाण्याची अजिबात इच्छा नसलेल्या नंदनने मागच्या दरवाज्याने बाहेर जाऊन जेवण करण्याची इच्छा प्रदर्शित केली. "आयुष्यात कधी मागच्या दाराने बाहेर पडलो नाही आणि आता तू किती दिवस हे माझ्या नशिबी आणणार आहेस?" भोसलेकाका कुरकुरले. मागच्या दारापाशी जाताना नंदनला आवाज आला. नंदन आणि भोसलेकाका कोपऱ्यात जाऊन लपले. जोशीच्या सहलीत आलेले दोन  तगडे जवान परत त्या बंगल्यात शिरत होते. "ह्यांना मागच्या दाराने शिरायची काय गरज?" असा प्रश्न नंदन विचारणार तितक्यात त्याचे लक्ष त्या दोघातील एकाच्या पैंटमधून लोंबकणाऱ्या नायलॉनच्या दोरीकडे गेले!


1 comment:

  1. chhan chalalay kathanak. pan thode mothe bhag yeyu dya maja yeil.

    ReplyDelete