Thursday, March 6, 2014

Empathy


अमेरिकतील एक हॉस्पिटल. कॅमेरा तिथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकावर क्षणभर स्थिरावतो. कोणाला आपण प्रथमच बाप होणार असल्याची बातमी कळली असते, तर कोणाला स्वतःला कॅन्सर झाल्याचे नुकतेच समजले असते, कोणाला उपचाराचा खर्च कसा फेडायचा ह्याची चिंता भेडसावत असते, कोणी एक छोटुकली आपल्या आजारी बापाला भेटायला जात असते आणि ही बहुदा वडिलांबरोबरची तिची शेवटची भेट आहे हे तिच्यासोबत चालणाऱ्या तिच्या आईला माहीत असते. कंपनीतल्या एका प्रेसेंटेशनच्या वेळी ही चित्रफीत दाखविण्यात आली.
आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक व्यक्ती येत असतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या भावनांतून जात असतो. अशा ठिकाणी Empathy म्हणजेच परभावनांची अनुभूती ही महत्वाची संकल्पना विचारात घ्यावी लागते. पुढील भाग मला बहुदा पूर्णपणे समजला नाही. तरीपण प्रयत्न करायला काय हरकत आहे?
परभावनांच्या अनुभूतीचे तीन टप्पे मानू शकतो.
१) मेंदू - आपण आपल्या मेंदूत दुसरा कोणत्या मानसिक परिस्थितीतून जात आहे ह्याविषयी  विचार करू शकतो.
२) हृदय - दुसऱ्याच्या त्या स्थितीतील भावना आपल्या हृदयात सुद्धा निर्माण होतात.
३) हस्त - त्या दुसऱ्या व्यक्तीची त्या स्थितीत असताना आपल्याकडून कोणत्या कृतीची अपेक्षा आहे ह्याचा अंदाज बांधून आपण तशी कृती करू शकतो.
आता हे बोलायला, लिहायला सोपे आहे पण प्रत्यक्ष आचरणात आणायला फार कठीण! कारण आपण सुद्धा एका वेगळ्या मानसिक स्थितीतून जात असतो.
पुढे अजून एक चित्रफीत दाखवली गेली. एक वक्ता बोलत होता. सकाळी न्हाणीघराकडे जाताना त्याची नजर पत्नीकडे गेली. ती एकटीच खिन्न होऊन आरशात पाहत बसली होती. वक्ता म्हणाला की मी तिला पाहिलेच नाही असे भासवू शकलो असतो. आणि माझ्या कामकाजात स्वतःला गुंगवू शकलो असतो, परंतु ती काहीतरी
उदासीतून जात आहे हे मी जाणले, तिच्याजवळ गेलो. तिच्याशी दोन शब्द बोललो. आणि मग माझ्या कामाला लागलो. त्या क्षणी कोणीतरी तिला उदासीतून बाहेर आणण्याची गरज होती आणि ती मी जाणून त्या क्षणाच्या तिच्या गरजेला मी उभा राहिलो.
मग आमचे मोठे बॉस उभे राहिले आणि त्यांनी ह्या क्षणाला 'क्लोजिंग डोअर मोमेंट' असे संबोधिले. बऱ्याच वेळा असे होते की आपण धावत धावत उद्वाहक पकडण्यासाठी येत असतो आणि त्याच वेळी स्वयंचलित दार बंद होत असते. आत उभा असणारा माणूस आपल्या हाताने हे बंद होणारे दार थांबवू शकतो आणि आपल्याला प्रवेश देवू शकतो.
प्रत्यक्ष जीवनात आपल्या जीवनसाथीच्या बाबतीत असे अनेक क्षण येतात ज्यावेळी त्यांना आपली गरज असते. प्रश्न असा येतो की आपण हे क्षण ओळखू शकतो का आणि ओळखू शकलो तरी त्यावेळी आवश्यक कृती करू करतो का? हे असे गरजेचे क्षण स्त्रियांच्या बाबतीतच येत नाहीत तर ते पुरुषांच्या बाबतीत सुद्धा येवू शकतात. ह्या क्षणाची गरज प्रत्येकाची अशी खास (UNIQUE) असते. आणि ती ओळखण्याची सर्वात जास्त संधी जीवनसाथीला असते.
नंतर मग चर्चा कार्यालयीन जगाकडे वळाली. आपल्या टीममधील लोकांकडून काम करून घेताना त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार किती व्यवस्थापक करतात वगैरे वगैरे! त्यांचे आपण वेळच्या वेळी कौतुक करतो का? प्रत्येकाच्या कौतुकाच्या गरजा कशा वेगवेगळ्या असतात आणि त्या आपण कशा ओळखल्या पाहिजेत!
मोठ्या बॉसने अजून एक लक्षात राहण्यासारखे विधान केले. परभावनांच्या अनुभूतीचे जे तीन टप्पे असतात, त्यात आपण सद्यस्थितीत एका कोणत्या स्थितीत असतो. त्या स्थितीतून पुढच्या स्थितीत जाणे हे जरा कठीण काम आहे. त्यासाठी खूप प्रयत्नांची गरज असते.
एक सुंदर सत्र! ह्याचा शेवट एका यु ट्यूब वरील एका चांगल्या क्लिपने केला.
http://www.youtube.com/watch?v=Cl7qgaO36O8
ह्यातील नातवंडे परभावनांच्या अनुभूतीचा कोणता टप्पा दर्शवितात बरे?










थरारचा शेवट बऱ्याच वाचकांना आवडला नसावा. नेहमीप्रमाणे अचानक शेवट केला वगैरे वगैरे! बहुदा मध्येच ह्या सत्राला उपस्थित  राहिल्यामुळे माझे लक्ष विचलित झाले असावे! तरीपण आधीच्या कथांपेक्षा थोडी प्रगती!

No comments:

Post a Comment