Monday, June 2, 2014

सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड - भाग ६

म्हणायला गेलं तर सहलीचे अजून तीन दिवस बाकी होते. सहावा दिवस मनाली मार्केट मधील खरेदीचा, सातवा चंडीगडच्या ३१० किमी प्रवासाचा आणि आठवा मुंबईच्या प्रवासाचा. परंतु सर्व प्रेक्षणीय स्थळे बघून झाल्याने मनातील उत्सुकता उतरणीच्या मार्गावर होती.
सहावा दिवस उजाडला. आज आदित्य आणि मंडळी जरा सावकाश होती. सर्वांना SUV मध्ये कोंबून कुठे दूरवर न्यायचे नव्हते ना! सकाळी सात वाजताचा निद्रामोड कॉल, तयारीची धावपळ आणि मग न्याहारीला काय पदार्थ असणार ह्याची उत्सुकता! ह्या सर्व प्रकारांची आता काहीशी सवय होऊन राहिली होती. आजचे खास आकर्षण होते, ग्रुप फोटो! न्याहारी झाल्यानंतर दोन्ही बसमधील सर्वांना गच्चीवर एकत्र बसवून एक सुंदरसा फोटो काढण्यात आला. सोशल मिडियावर बाकीच्या सहप्रवाशांची परवानगी न घेता तो प्रसिद्ध करणे उचित होणार नाही म्हणून तो इथे मी आणत नाहीये. ह्या गच्चीवरून दिसणारी ही मोहक दृश्ये!






बच्चेमंडळी, तरुण जोडपी, मध्यमवयस्क जोडपी आणि जेष्ठ जोडपी आणि आदित्य मंडळी  ह्यांना ह्या छायाचित्रासाठी कसे बसवायचं ह्यासाठी त्या स्थानिक छायाचित्रकाराचे काही नियम होते. हे नियम लागू करता करता त्याच्या नाकी नऊ आले. प्राजक्ता आणि माझ्याकडे बघून आमचे वर्गीकरण कोणत्या गटात करायचे ह्याचा संभ्रम पडणारा तो काही पहिला नव्हता. मी त्याची ही संभ्रमावस्था गमतीने पाहत होतो. शेवटी माझ्या केशरंगाचा मान राखून आम्हांला खुर्च्यांवर बसविण्यात आले!
त्यानंतर आम्ही मनाली मार्केटच्या दिशेने मार्गक्रमण केले.


वाटेतील प्रवासात दिसलेलं गुलाबाचं मोहक झाड!



खरेदी करणे हा काही माझा आवडीचा प्रांत नाही. आम्हांला काही चांगल्या दुकानांची नावे सुचविण्यात आली होती. अग्रवाल शॉपिंग सेंटर ह्या दुकानाचे मराठी मालक कुलकर्णी ह्यांनी सर्वांचे स्वागत केले. इथे शाली, अक्रोड, बदाम तत्सम वर्गातील प्रकार, लसूण आणि सफरचंदाचे लोणचे वगैरे खरेदी आम्ही केली. सफरचंदाच्या लोणच्यावरून मला २००२ साली फिनिक्स, अरिझोना  इथे तेलगु मित्राकडे पाहिलेल्या चिकनच्या लोणच्याची आठवण झाली. त्यावेळी त्या चिकनच्या लोणच्याची चव घेऊन पाहण्याची हिम्मत मला झाली नव्हती. परंतु इथे मात्र ह्या लोणच्याची चव घेत मी ते विकतसुद्धा घेतले. लोणचं आणि मनातील काही कप्पे ह्यात कसे साधर्म्य आहे पहा ना! क्षणभंगुर गोष्टींना टिकवून धरण्याचा आटोकाट प्रयत्न माणसं ह्या दोन प्रकारात करतात. मे महिन्यात आंब्यांचा मनमुराद आनंद घेतल्यावर धुमशान पाऊस चालू होतो आणि मग त्या आंब्यांची आठवण काढत काढत आपण त्या कुंद वातावरणात लोणच्याचा स्वाद घेत राहतो आणि पुढच्या मे महिन्याची आस धरून बसतो. आयुष्यातील भेटून गेलेल्या काही व्यक्तीसुद्धा अशाच कोठेतरी एका कोपऱ्यात कशा दडून बसून राहतात.
खरेदी करून बाहेर आल्यावर मालक कुलकर्णी भेटले. बोलता बोलता मी वसईचा आहे हे कळल्यावर ते म्हणाले, "गैरसमज नको, पण तुमच्या बोलण्याच्या लकबीवरून मला वाटलंच की तुम्ही वसई विरारचे असावेत!" नंतर ते म्हणाले की "मी बोळींजचा!" वसई विरार भागातील माणसाचे मनालीला दुकान असावे ह्याचा रास्त अभिमान आम्हांला वाटला. त्यांचे गेले १२ वर्षे इथे वास्तव्य आहे. तिथल्या नियमानुसार त्यांना अजूनही मालमत्ता खरेदी करता येत नाही. सर्व काही भाड्याने! बहुदा १६ वर्षांच्या वास्तव्यानंतर परिस्थिती बदलेल असा आशावाद त्यांनी दर्शविला.
पुढे एक तिबेटी मार्केट आणि अजून एक शॉपिंग सेंटर (बहुदा R. K. ) होते. इथे केसर चांगला असावा असा अंदाज होता. परंतु तिथला वाढीव भाव न पटल्याने आम्ही परत येऊन अग्रवाल शॉपिंग मध्येच तो खरेदी केला. बाकी इथे एक सुरेख बाग होती. आम्ही, कुलकर्णी आणि आफळे कुटुंबीयांनी तिथे वेळ व्यतीत करणे पसंत केले. त्या उद्यानातील काही सुंदर निसर्गचित्रे!






तिथे खेळताना मुलांना आईसक्रीम खाण्याची खुमखुमी आली. उद्यानाबाहेर आईसक्रीमखरेदी करायला गेलेली मंडळी बऱ्याच वेळाने परत आल्यावर त्यांनी पाणीपुरीचे सुद्धा रसग्रहण केले हे ऐकून बरे वाटले. पाणीपुरी, पावभाजी, वडापाव अशा तत्सम वर्गाच्या खऱ्याखुऱ्या रसिकांविषयी मला सदैव आदर वाटत आला आहे . त्यांना उत्तर ध्रुवावर उणे ५० सेल्सिअस तापमानात जरी ठेवले तरी त्यांना ह्या खाद्यपदार्थांची एका तासाभरात आठवण येईल हे नक्की!
सोहमला तिथे एक देवदार वृक्षाची बर्यापैकी मोठी फांदी सापडली. ती त्याने वसईला घेऊन जाण्याचा मानस व्यक्त केला. आता एका महिन्यानंतर अजूनही ती फांदी वसईच्या अंगणात आहे आणि तिला फुटणाऱ्या पहिल्या नवीन हिरव्या कोंबाच्या प्रतीक्षेत आम्ही सर्व अजूनही आहोत.
बाकी मग परतल्यावर दुपारचं पोटभर जेवण. आता जवळजवळ एका महिन्यानंतर नक्की आठवत नाही, पण बहुदा जेवणात मटण  होतं. परंतु त्याला काहीसा उग्र वास येत असल्याने आम्ही त्यापासून दूरच राहिलो. जेवणानंतर सहप्रवाशांशी गप्पा वगैरे मारण्यात वेळ गेला. आता हा रम्य प्रवास, चार दिवसांची सोबत संपुष्टात येणार ह्याची खंत सर्वांनाच लागून राहिली होती. काही वेळाने पुन्हा एक वामकुक्षी आणि चहापान! चहाबरोबर केवळ मारी बिस्किटे पाहून आम्ही वीणा वर्ल्डला धन्यवाद दिलं!

 अमोल कुलकर्णी ह्यांनी हॉटेलसमोरून जाणाऱ्या रस्त्यावर पुढे मजल मारली होती. तिथली सफरचंद आणि नाशपत (हा त्यांचा उच्चार, मी त्याला नासपत म्हणायचो!) ह्याच्या बागा पाहण्याचे आम्ही ठरविले. ह्या बागा छोट्याशाच पण सुंदर होत्या. त्याचे आम्ही निरीक्षण केले आणि हो फोटोही काढले. हिमाचलप्रदेशातील उंच पर्वतराजीतील एका छोट्या गावातील मे महिन्यातील संध्याकाळची सात वाजताची शांत वेळ आपणास बरेच अंतर्मुख करून जाते. आयुष्य अगदी असेच शांतपणे व्यतीत करण्याची अगदी दाट इच्छा असली ती पूर्ण करण्याची हिंमत आपल्यात नाही ह्याची खंत नक्कीच जाणवते.








परत येताना एक छोटेखानी घर होते. तिथे विणकाम वगैरे करीत असलेली एक महिला पाहून महिलावर्गाने तिच्याकडे आपला मोर्चा वळविला. डिस्कवरी वाहिन्या, मीना प्रभू ह्यांची प्रवासवर्णने वगैरे वाचून स्थानिक रहिवाश्यांशी संवाद, तिथल्या संस्कृतीचा अभ्यास वगैरे प्रकार आपणसुद्धा करावेत अशी मनीषा आमच्याकडे सुद्धा निर्माण झाली आहे. त्यानुसार त्या महिलेशी पाटील आणि कुलकर्णी महिलावर्गाने संवाद सुरु केला. सुरुवात अर्थातच तिच्या हातातील बांगड्यांच्या नक्षीवरून झाली. तिच्या पेहरावाचे सुद्धा मनसोक्त कौतुक करण्यात आले. डिस्कवरीचा विडीओ फोटोग्राफर आपल्यासोबत नाहीय ह्याची राहून राहून मला खंत वाटत होती. ही महिला बोलण्यात अगदी हुशार होती. हिवाळ्यात रस्त्यावरील बर्फ कसा तात्काळ काढला जातो, आम्ही हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी उत्तर प्रदेश वगैरे भागातील तीर्थस्थानांना भेट देऊन येतो अशी सर्व माहिती तिने आम्हाला दिली. तिची परवानगी घेऊन आम्ही काढलेला तिचे  हे  फोटो!





आम्ही परतलो तोवर सोहम आमची वाट पाहत होता. ह्या हॉटेलातील निरोपसोहळा सुरु झाला होता. प्रथम आदित्याने उद्याचा कार्यक्रम सांगितला. ह्याला मध्येच आम्ही लग्न कधी करणार असे छेडले होते. तर तो म्हणाला, " वर्षातील नऊ महिने इथेच जातात तर लग्न कसे करणार?" "मग इथलीच मुलगी का नाही बघत?" हा प्रश्न ओघाने विचारला गेला. "इथल्या मुली आखडू असतात!" तो म्हणाला! अनुभवांचे बोल असे म्हणून आम्ही त्याची बराच वेळ मस्करी करीत होतो. तर ह्याची उद्याचा कार्यक्रम सांगण्याची सवय मला फार आवडून गेली. समजा पुढे मागे मुलगी पाहायला गेला तरीसुद्धा तिला उद्याचा कार्यक्रम सांगूनच तो पुढे बोलेल असे मला वाटतं!
 मग हौसी नावाचा महिलावर्गात आवडता असलेला खेळ खेळण्यात आला. अशा खेळात मी शक्यतो जिंकत वगैरे नाही. प्राजक्ताचे नशीब तसे चांगले असते पण माझ्याजवळ बसल्याने असेल म्हणून तिचे अथवा सोहमचे नशीब उजळले नाही. त्यानंतर वैयक्तिक कार्यक्रमासाठी प्रवाशांना विनंती करण्यात आली. मुग्धा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात सुरेख गाणं गायलं. त्यांना वन्स मोर ची विनंती सुद्धा झाली. दोन दक्षिणी (बहुदा जुळ्या) बहिणींनी आधुनिक हिंदी  गाण्यावर सुरेख नाच केला. अशा दोघी नर्तिका पाहिल्या की मला हल्लीच पुन्हा पाहिलेलं १९६४ च्या आसपासचे 'तुमको पिया दिल दिया बडे नाज से' हे गाणे आठवते. असा नाच हल्ली का बरे शिकविला जात नसावा?
त्यानंतर विविध स्पर्धातील विजेत्यांना मराठी पुस्तके बक्षीस देण्यात आली. मराठी वाचन संस्कृती जोपासण्याचा वीणा पाटील  ह्यांचा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. चार पाच महिन्यानंतर ह्या ब्लॉगच्या छापील प्रती बक्षीस म्हणून वाटल्या जातील असा मानस मी मनी बाळगून आहे. त्यानंतर कोळी आणि पाटील (अर्थात आम्ही) ह्या कुटुंबियांचे गेल्या आठवड्यातील लग्नाचे वाढदिवस केक कापून साजरे करण्यात आले. रात्रीची जेवण आटपली. ह्या हॉटेलची साथ सुटणार ह्या विचाराने मला तर समोर आयतं ताट वाढून येण्याचे दिवस संपत आले आहेत ह्या विचाराने प्राजक्ताला गहिवरून आले होते!
रोज रात्री रंगणाऱ्या गप्पा आज रात्री अधिकच रंगल्या होत्या. तिथून पाय निघता निघवत नव्हता. परंतु उद्याचा लांब प्रवास आणि भराव्या लागणाऱ्या बॅगांच्या विचाराने शेवटी गप्पा आवरत्या घ्याव्या लागल्या. ई मेल, फोन क्रमाकांची देवाणघेवाण झाली. WHATSAPP वर एकमेकांना जोडण्यात आले. एक तत्वाचा प्रश्न म्हणून मी अजूनही WHATSAPP वर नसल्याने माझ्या बाबतीत हे लागू नव्हते.

आवराआवर करून आम्ही मनालीतील शेवटच्या रात्री निद्राधीन झालो. आवराआवर करताना वीणा वर्ल्डच्या सुक्क्या खाऊला कसे बरे विसरणार?





(क्रमशः )


आताच गोपीनाथ मुंडे ह्यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकली. आपले कर्तृत्व राष्ट्रीय पातळीवर दाखवून देण्याची वेळ आली असताना त्यांना काळाने आपल्यातून असे ओढून न्यावे ही अगदी दुर्दैवी घटना आहे. त्यांना माझी ही भावपूर्ण आदरांजली!

No comments:

Post a Comment