Sunday, September 28, 2014

दुरावा - ३

 
आठवडाभरच्या बँकेच्या प्रशिक्षणवर्गासाठी सर्जी रविवारी संध्याकाळी आपल्या सहकाऱ्यांसोबत त्या हिल स्टेशनला चालला होता. इवाची आठवण तर त्यालाही यायचीच पण तो बराच व्यवहारी होता आणि त्यापेक्षाही खूप मानी होता. प्रेम आणि आत्मसन्मान ह्यात निवड करायची तर शंभरातल्या नव्वदवेळा त्याने आत्मसन्मानच निवडला असता. म्हणायला गेलं तर मेंदू आणि हृदय ह्यांच्यातल्या संघर्षाचा मामला होता. पण उरलेल्या १० वेळांचे काय? ज्या ज्या वेळी हृदयातील भावना उफाळून येत त्यावेळी सर्जी अगदी बेचैन होत असे. अगदी मॉस्को सोडून कझानला परत जायचा निर्णय सुद्धा घेत असे आणि बॅगाही भरू लागे. पण शेवटचं पाऊल उचलायच्या वेळी मात्र त्याचं डोकं नेमकं जागं होई आणि मग तो आवरतं घेई.
आतासुद्धा हिल स्टेशनच्या प्रवासात पूर्ण वेळ इवाच त्याच्या मनात होती. आणि अचानक समोरच्या बसमध्ये ती दिसताच क्षणभर त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आणि जेव्हा विश्वास बसला तोवर त्याच्या बसला मात्र निघायची घाई झाली होती. त्याने ताबडतोब बस ड्रायव्हरला बस बाजूला घ्यायला लावली होती. बसमधून घाईघाईने उतरल्यावर मात्र वेगाने दूर जाणारी इवाची बस पाहणेच त्याच्या नशिबी आलं. बाकी त्याच्या बसमध्ये बँकेमधील मोठे अधिकारी असल्याने त्याला भानावर येणं भाग पडलं. सर्वांच्या चमत्कारिक नजरांना तोंड देत सर्जी मुकाट्याने आपल्या सीटवर येऊन बसला.
हिल स्टेशनवर पोहोचल्यावर सर्वांनी आपल्या खोलींचा ताबा घेतला. ताजातवाना होऊन सर्जी स्वागतकक्षात आला. तिथे त्या हॉटेलातला कर्मचारी फ्रंट डेस्कवरील रिसेप्शनिस्टला एक स्कार्फ परत करीत होता. "मगाशीच जो मुलींचा गट परत गेला, त्यातल्या एकीचा हा स्कार्फ आहे. विसरून गेली ती आपल्या खोलीत!" कर्मचारी रिसेप्शनिस्टला सांगत होता. सर्जी होता तर खरा आपल्याच तंद्रीत पण अचानक त्याचं लक्ष त्या स्कार्फवरील अगदी कलात्मकरित्या कोरलेल्या E आणि S ह्या अक्षरांकडे गेलं. "अरे हा तर आपण इवाला घेऊन दिलेला स्कार्फ!" त्याच्या डोळ्यात तात्काळ उजेड पडला. अजूनही मेंदूच हृदयावर वर्चस्व राखून होता. त्याने त्या कर्मचाऱ्याला जाऊ द्यायची वाट पाहिली आणि मग हळूच तो रिसेप्शनिस्टकडे गेला. त्याची ही दुनियावेगळी विनंती रिसेप्शनिस्टने साफ धुडकावून लावली. "आमच्या नियमात हे बसत नाही; माझी नोकरी जाईल!" रिसेप्शनिस्टने नियमावलीकडे बोट दाखवलं.
पूर्ण निराश होऊन सर्जी हॉटेलबाहेर चक्कर मारायला निघाला. पुढील आठवडाभर हे प्रशिक्षण सहन करायचं म्हणजे त्याच्या अगदी जीवावर आलं होतं. थोडाफार पुढे जाताच थंडीचा बोचरेपणा त्याला अधिकाधिक जाणवू लागला आणि मग त्याने हॉटेलवर परतायचं ठरवलं. हॉटेलच्या जवळ येताच त्याचं लक्ष बाहेर पडणाऱ्या रिसेप्शनिस्टकडे गेलं. पुन्हा त्याचा राग उफाळून आला. स्वागतकक्षात येताच त्यानं पाहिलं की फ्रंट डेस्कवर कोणीच नव्हतं. संध्याकाळची वेळ असल्याने आता कोणी नवीन पर्यटक येण्याची शक्यता नव्हती आणि त्यामुळेच आपली वेळ होताच ही बया निघून गेली असावी असा त्याने कयास काढला. अचानक त्याच्या डोक्यात एक विचार आला. अजूनही तिथं कोणीच नव्हतं. सर्जी पटकन फ्रंट डेस्कजवळ गेला आणि आतल्या बाजूला त्याने डोकावून पाहिलं. स्कार्फ तिथेच होता. पटकन त्याने आपल्या शर्टात तो कोंबला आणि तो तात्काळ आपल्या खोलीत जाऊन पोहोचला. आजचा दिवस अगदीच निराशेचा नव्हता तर!!
सर्जीचा आठवडा प्रशिक्षणात अगदी व्यग्र गेला. सकाळी आठ वाजता सुरु होणारे प्रशिक्षण वर्ग सायंकाळी सात वाजेपर्यंत चालायचे. ज्याची वाट पाहत होता ती शुक्रवार संध्याकाळ एकदाची आली. मॉस्कोला निघणाऱ्या बसमध्ये बसल्यावर सर्जीला बरं वाटलं. म्हटलं तर प्रशिक्षण वर्गात चांगली कामगिरी झाल्यानं तो खुशीत होताच. बस निघाली आणि थोड्याच वेळात मागच्या रविवारी इवाची आणि त्याची जिथं चुकामुक झाली तो स्पॉट आला. आजही तिथे थोडा ट्राफिक जॅम झालाच होता. हृदयाने मेंदूवर वर्चस्व मिळविण्याचा काळ सुरु झाला होता. जुनी रशियन गाणी आठवत बसच्या खिडकीमधून दिसणाऱ्या चंद्राकडे पहात सर्जी मॉस्कोचा रस्ता काटत होता. कोणाचं लक्ष नाही ह्याची खबरदारी घेत त्याने स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळला होता.
इवा आणि मारियाचा मॉस्कोला जायचा बेत तसा पक्का झाल्याने इवा तशी खुशीत होती. ह्या खुशीने सर्जीने दिलेला स्कार्फ आपण गमावला ह्याचं दुःख काहीसं कमी झालं होतं. आपल्याला मॉस्कोला सर्जी भेटेल आणि मग त्याच्याकडे आपण नवीन स्कार्फचा हट्ट धरू असा विचार करण्यात ती मग्न झाली होती.
मॉस्कोला पोहोचेस्तोवर बरीच रात्र झाली होती. एक सॅंडविच खाऊन सर्जी झोपी गेला. शनिवारी सकाळी गाढ झोपेत असतानाच दारावर वाजणाऱ्या सततच्या बेलने त्याची झोपमोड झाली. डोळे चोळतच त्याने दरवाजा उघडला तर समोर त्याचे आईबाबा होते. "तुम्ही असे अचानक कसे आलात?" सर्जीने काहीसं आश्चर्यचकित होऊन विचारलं. "अरे तुला वॉईसमेल सोडला होता तो तू ऐकला नाही वाटतं!" सर्जीच्या रूमची नजरेने तपासणी करीत त्याची आई उदगारली. सर्जीची नजर फोनकडे गेली. फोनच्या वॉईसमेल बटनावरील लाल खुण अजूनही मिणमिणत होती. "हं मी काल रात्री उशिराने आलो म्हणून बघायचं राहून गेलं!" सर्जी उत्तरला. एव्हाना आईने त्याच्या स्वयंपाकघराचा ताबा घेतला होता. स्वयंपाकघर अगदी व्यवस्थित ठेवलेलं पाहून ती मनातून अगदी खूष झाली होती!" बाकी आईवडिलांच्या भेटीचं तसं खास कारण नव्हतं. महिन्यातून एकदा ते तसे सर्जीला भेटायला येतच. आणि ह्यावेळी आईच्या मैत्रिणीकडे शनिवारी संध्याकाळी पार्टी होती. तिथेही त्यांना जायचं होतं.
मारिया आणि इवा शनिवारी सकाळीच मावशीकडे येवून थडकल्या. मावशीच्या घरी अगदी गडबडीच वातावरण पाहून मारिया अगदी चपापली. "अग आज आमच्या लग्नाचा २५ वाढदिवस म्हणून हा छोटासा समारंभ! मी तुला फोन करणारच होते आणि मग तुझाच फोन आला. मी म्हटलं मिळू दे हिला थोडासा आश्चर्याचा धक्का!" मावशीच्या ह्या स्पष्टीकरणावर मारियाकडे उत्तर नव्हतं. इवा मात्र खट्टू झाली होती. दोन्ही दिवस जर ह्या समारंभात गेले तर आपण ज्या कामासाठी आलो ते तसेच राहून जाणार असंच तिला वाटलं! परंतु आता इलाज नव्हता. सगळीकडे गडबड चालू होती. "आणि ही तुझी मैत्रीण किती सुंदर दिसतेय! नाव काय बरं हिचं?" मावशीच्या प्रश्नाने इवाचं विचारचक्र भंगल! "इवा" ती उत्तरली. "लग्न जमलं का गं पोरी तुझं!" मावशीचं प्रश्नचक्र सुरूच होतं. आता मात्र मारिया तिच्या मदतीला धावली. "हो जमलंय तिचं लग्न! उद्या तिच्या हिरोला भेटायला ती जाणार आहे!" फटकळ मारियाने उत्तर दिले. नाहीतर एव्हाना आपल्या मावशीच्या डोक्यात इवासाठी स्थळनिश्चिती झाली असेल असा कयास तिने बांधला होता.

(क्रमशः)


 

No comments:

Post a Comment