महादेवच्या बोलण्यावर संपतरावांचा अजिबात विश्वास बसेना. आपल्या पक्षात असे कटकारस्थान आणि ते ही आपल्या गावात! संपतराव एकदम सुन्न होऊन विचारात पडले. भ्रमणध्वनीच्या कॉलच्या नोंदीत सकाळी आलेला वसंतरावांचा फोन त्यांनी एक दोनदा चाळूनही पाहिला.
सुजितकुमारांशी बोलणे आटोपल्यावर भाऊरावांना दरदरून घाम फुटला. ह्या प्रकरणातून निस्तरण्याची जबाबदारी आता तुमची, मी ह्यात अजिबात पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट बजावून सांगितले होते. आणि ह्या विषयावर पुन्हा फोनवर न बोलण्याची तंबीही दिली होती. ह्याचा अर्थ स्पष्ट होता. एक तर हे प्रकरण पूर्णपणे दाबून टाकावयास हवे किंवा कोणाच्या तरी ह्यात अडकवायला हवे. ह्या दोन्ही शक्यता जर जमल्या नाहीत आणि हे प्रकरण जर बाहेर पडले तर भाऊराव त्यात पूर्ण अडकणार होते. राजकारणाची ही रीत भाऊरावांना नवी नव्हती. मोठा मासा केव्हाच गळाला लागत नाही, नेहमी छोटा मासाच अडकतो आणि जमेल तसं मोठा मासा मग छोट्याला सोडवितो. परंतु छोटा मासा होण्याची भाऊरावांची अजिबात तयारी नव्हती.
दोन दिवस छातीच्या दुखण्याचे नाटक करून हणम्या अगदी वैतागला होता. आणि अचानक ज्यावेळी रमाकांतच्या मृत्यूची बातमी घेवून नर्स अतिदक्षता विभागातून बाहेर पडली तसा तो अगदी भेदरून गेला. पहिली संधी मिळताच त्याने रुग्णालयातून पलायन केले. घरात कालचा दिवस त्याने एकदम लपून काढला होता. बायकोच्या चौकश्यांना तोंड देता देता त्याच्या नाकी नऊ आले होते. त्यात भर म्हणून आता भाऊराव फोनही उचलत नव्हते.
बाजारात ज्यावेळी जाधव आणि महादेव ह्याचे बोलणे चालू होते त्यावेळी भाऊरावांचा कार्यकर्ता रमेश हॉटेलात बसला होता. त्याच्या नजरेस ही जोडगोळी गप्पा मारताना दिसली. त्यावेळी त्याला फारसे काही विशेष वाटले नाही. परंतु नंतर जेव्हा महादेव घाईघाईने बाईक काढून निघाला तेव्हा त्याला काहीसे खटकले होते. पण नंतर तो ही गोष्ट विसरून गेला होता. भाऊरावांचा जसा फोन आला तसा तो घाईनेच त्याच्या घरी पोहचला. भाऊराव प्रचंड बेचैन दिसत होते. 'गावात सतत फिरत राहा, कोठे काय थोडे जरी घडताना दिसले तर तत्काळ मला कळवा' भाऊरावांनी त्याला आज्ञा केली. 'आता थोडे जरी म्हणजे काय?' रमेश प्रश्न विचारता झाला. कोणी निवडणुकीच्या चर्चा करताना दिसले, माझ्याविषयी बोलताना दिसले तर कळवायचे' . 'बघा आताच इन्स्पेक्टर जाधव आणि महादेव गप्पा मारताना दिसले आणि महादेव त्यानंतर अचानक घाईने बाईकवरून निघाला' आता हे ही कळवायचे का?' रमेशच्या ह्या प्रश्नाने भाऊराव हादरून गेले. त्याची कशीबशी बोळवण काढून ते खुर्चीवर बसतात तोच हणम्याचा फोन आला. भाऊरावांनी त्याचा फोन उचलण्याचे टाळले. अचानक त्यांच्या डोक्यात एक विचार आला. ह्या हणम्याला कसे वापरता येईल ह्याविषयी त्यांनी काही कुटील योजना आखली. हणम्याला थोड्याच वेळात एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. निवडणुकीच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी विश्वासरावांच्या उसाच्या मळ्यात कार्यकर्त्याची सभा भरविण्यात आली आहे असे समोरची व्यक्ती बोलत होती.
विश्वासरावांनी कार्यकर्त्याच्या मोठ्या उपस्थितीत वाजतगाजत निवडणुकीचा अर्ज सकाळी ११ वाजता भरला. गावातील अनेक लोकही स्वेच्छेने त्यात सहभागी झाले होते. लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांचा विजय एकदम नक्की आहे असेच सर्व बोलू लागले होते. अर्ज भरून घरी पोहचेपर्यंत दुपारचे २ वाजले. जेवण आटपून आणि वामकुक्षी काढून दुपारचे तीन वाजले.
आणि मग ती बातमी आली. विश्वासरावांच्या उसाच्या मळ्यात जबर जखमी अवस्थेत हणम्या सापडला होता. त्याला संपविण्याचाच मारेकऱ्यांचा हेतू होता. पण ऐनवेळी ऊसकामगार आल्याने त्यांनी तिथून पळ काढला. गावात ही बातमी पसरताच हल्लकल्लोळ माजला. विश्वासराव आणि संपतराव दोघेही एकदम अस्वस्थ झाले. अशा प्रसंगी थोड्या शांत डोक्यानेच काम केले पाहिजे हे ठरवत संपतरावांनी आपल्या सासऱ्यांना फोन लावला. पाच मिनटात वसंतराव आणि जाधवांबरोबर घडलेल्या घटनांचा सारांश त्यांनी विश्वासरावांना कथन केला. विश्वासराव अवाक झाले, पण इतक्या वर्षाचा अनुभव होता त्यांच्यापाशी. 'संपत, काहीतरी मोठे कारस्थान रचते आहे इथे! ताबडतोब वसंतरावांना फोन लावा, अर्ज भरायला दीड तास बाकी आहे. ताबडतोब अर्ज भरा.' संपतराव अवाक झाले. पण वेळेची मर्यादा लक्षात घेत त्यांनी ताबडतोब वसंतरावांना फोन लावला.