केंद्रीय मंडळाचे संध्याकाळी मुंबईत आगमन झाले. शिष्टमंडळाचे नेतृत्व स्वरूपसिंग करीत होते. स्वरूपसिंगांच्या स्वागताला अण्णासाहेब आणि सुजितकुमार दोघेही विमानतळावर उपस्थित होते. ठेवणीतल्या शाब्दिक कोट्या, पत्रकारांसाठी / छायाचित्रकरांसाठी खास राखून ठेवलेल्या हास्यमुद्रा ह्यांना उधाण आले होते. पक्षात सर्व काही आलबेल आहे असा कोणाही पाहणाऱ्याचा समाज झाला असता. मंडळींचे रात्रीचे जेवण पंचतारांकित हॉटेलात आटोपल्यावर सुजीतकुमार म्हणाले, "मी सोडतो स्वरुपसिंगांना, त्यांच्या हॉटेलावर!" अण्णासाहेबांना काही पर्याय आहे कि नाही हे तात्काळ लक्षात न आल्याने त्यांनी मान डोलावली. स्वरुपसिंगाच्या हॉटेलावर सुजीतकुमारांची गाडी पोहचली. "आता इथपर्यंत आलात तर दोन मिनटे रूमवर या की!" स्वरूपसिंग उद्गारले! सुजीतकुमारांनी पडत्या फळाची आज्ञा मानून चालकाला गाडी पार्क करण्यास सांगितले. खोलीवर थोड्या वेळातच मदिरेने प्रवेश केला आणि वातावरणात जान आली. 'दिल्ली काय म्हणतेय?' सुजीतकुमार उद्गारले. स्वरुपसिंगांनी एक मोठा श्वास घेतला आणि मग दिल्लीची कहाणी सांगण्यास आरंभ केला. पक्षाचे युवा नेते मुकुल हे गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने प्रबळ बनत चालले होते. पंतप्रधान जीवनरामांची त्यांनी खास मर्जी संपादन केली होती. ह्याचाच पुरावा म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सारी सूत्रे मुकुल हे हलवीत होते. पक्षातील जेष्ठ नेत्यांमध्ये ह्यामुळे नक्कीच नाराजीचे वातावरण पसरले होते. तरुणांना राजकारणातील काय कळते असा त्यांचा पक्का समज होता. परंतु एकदा आपटी खाल्ल्याशिवाय ह्यांना काही समजणार नाही असे ठरवून ही जेष्ठ मंडळी शांत बसून सारा खेळ पाहत होती. मध्येच एक भाऊरावांचा फोन आला परंतु तो सुजीतकुमारांनी न घेता भ्रमणध्वनीला शांत (silent) अवस्थेत करून ठेवले. 'पण पैश्याशिवाय गाडी चालायची कशी? नवीन रक्त थोडेच पैसा पुरविणार आहे?' सुजीतकुमार विचारते झाले. 'आता नियमाला अपवाद असतातच की, तुमची अशी काही खास माणसे असतील आपण बघूयात' स्वरुपसिंगांच्या ह्या आश्वासनाने सुजीतकुमार थोडे शांत झाले.
संपतराव सकाळीच परत आले होते. स्वारी एकंदरीत खुशीत असल्याचे सगुणाबाईंच्या केव्हाचेच ध्यानात आले. मुलांना शाळेत सोडण्याची जबाबदारी संपतरावांनी स्वतः हून स्वीकारली. आकाशवाणीवर मराठी गाणी ऐकणारे संपतराव आज किशोरकुमारची गाणी ऐकत बसले होते. अशा प्रसन्न वातावरणातच दुपार गेली. चार वाजता मुले शाळेतून परत आली आणि त्यांनी बाबांमागे बाहेर जाण्याचा आग्रह धरला. 'कुठे जायचे फिरायला' असे संपतराव म्हणत असतानाच फोनची बेल खणखणली. आईचा आवाज ऐकताच सगुणाबाईंचा चेहरा खुलला. 'आज संध्याकाळी तुम्ही सर्वांनी जेवायलाच यायचे असे इंदुमतीबाई म्हणत होत्या. 'थांब ह्यांना विचारून बघते' असे सगुणाने म्हणताच. 'कशाला विचारायला पाहिजे? आम्ही तुमची वाट पाहत आहोत' असे म्हणून इंदुमतीबाईंनी फोन ठेवला. आश्चर्याची बाब म्हणजे संपतरावांनी सुद्धा फारसे आढेवेढे घेतले नाहीत. सुगरण इंदुमतीबाईंनी खास स्वयंपाकाची तयारी चालवली होती. 'या संपतराव या' असे म्हणत विश्वासरावांनी त्यांचे स्वागत केले. हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर नातवंडांनी विश्वासरावांचा ताबा घेतला. आजोबांच्या तोंडून ऐतिहासिक गोष्टी ऐकणे त्यांचा आवडता छंद होता. सगुणाबाई आपल्या आईला मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात शिरल्या. संपतरावांनी दूरदर्शनसंच सुरु केला. प्रादेशिक बातम्या सुरु होत्या. 'सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन' दूरदर्शनवरील निवेदिका सांगत होती. संपतराव स्वतःशीच हसले. तसे म्हणायला गेले तर ही बातमी ही गेले कित्येक वर्षे काही महिन्याच्या कालावधीनंतर सतत येणारी! निमित्त वेगवेगळी असोत पण केंद्रीय शिष्टमंडळाशिवाय आपले पानही हलायचे नाही हे जाणवून संपतरावांना हसू आले. पण ह्या वेळचे शिष्टमंडळ आपल्या भवितव्याची किल्ली घेवून आले आहे ह्या जाणीवेने ते थोडे अस्वस्थ झाले. सगुणाबाई मात्र एकदम प्रसन्न मुद्रेत होत्या . जीवनात ही घडी अशीच राहू दे हे आपल्या आवडीचे गाणे गुणगुणत होत्या. इंदुमतीबाई मात्र थोड्याशा अस्वस्थ होत्या. ज्यावेळी विश्वासरावांनी जावयाला सहकुटुंब जेवायला बोलाविले तेव्हा ते सकाळच्या भाऊरावांच्या फोनविषयी चर्चा करायला असे त्यांना वाटले होते. पण इथे तर अशी काही चिन्हे दिसत नव्हती. आणि आपण हा विषय काढला तर विश्वासरावांना आवडेल की नाही ह्याची खात्री नसल्याने त्या गप्प राहिल्या. जेवणे एकदम प्रसन्न वातावरणात पार पडली. 'संपतराव, बाकी तुमचे वजन हल्ली वाढत चालले आहे' ह्या विश्वासरावांच्या वाक्यावर संपतराव मनापासून खुश झाले. आपल्या राजकीय प्रभावाची सासऱ्याने केलेली ही स्तुती आहे असे वाटून त्यांनी दोन घास अधिक घेतले.
रात्री घरी परतताना अकरा वाजून गेले. सगुणाबाई मुलांना झोपवीत असताना सवयीनुसार संपतरावांनी दूरदर्शन संच लावला. आणि त्यावरील ब्रेकिंग न्यूज पाहून ते हादरून गेले. 'सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजयराव ह्यांच्या जीपला मुंबईला जाताना अपघात, विजयरावांचे अपघाती निधन!'
No comments:
Post a Comment