Friday, December 7, 2012

जडणघडण कळत नकळत


मनुष्याच्या लहानपणापासून त्याचा जडणघडण ह्या संकल्पनेशी संबंध येतो. लहानपणी बालकाचे पालक त्याच्यावर आपल्या निवडीनुसार, जमेल तितके संस्कार करायचा प्रयत्न करतात. असे म्हणतात की बालक ही ओल्या मातीच्या गोळ्यासारखी असतात, त्यांना जसे घडवावे तशी ती घडतात. बालक एका विशिष्ट काळापर्यंत हे संस्कार बिनबोभाट स्वीकारत. हा काळ (ज्यात बालक पालकांनी केलेल्या संस्काराला विरोध करीत नाही) प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. त्यानंतर बालकास स्वत्वाची जाणीव होते. मग बालक त्याच्यावर होणार्या जडणघडणीच्या प्रयत्नांविषयी आपली मते दर्शविण्यास सुरुवात करते. ह्या क्षणानंतर चालू होतो तो मनुष्याच्या आयुष्यातील एक प्रवास ज्यात मनुष्य एक तर कोणाकडून तरी घडविला जातो किंवा मनुष्य कोणाला तरी घडवितो. आता ह्यातला कोण म्हणजे आजूबाजूचे लोक किंवा परिस्थिती.
बालकाच्या जडणघडणीचे ढोबळमानाने दोन प्रकार करता येतात. पालक एक तर बालकास आपण जसे घडलो तसे बनविण्याचा प्रयत्न करतात किंवा बालकाला बाहेरच्या जगात सक्षम नागरिक बनविण्याच्या हेतूने त्याची जडणघडण करतात. हल्ली आढळून येणारा नवीन प्रकार म्हणजे बालकाच्या जडणघडणीस त्याच्या दैवावर सोडून देणे. काही कालावधीनंतर मुलं परिसरातील मुलांशी खेळतात, शाळेत जाऊ लागतात. बालकाचा ओलावा अजूनही कायम असतो. इथे मित्र आणि शिक्षक हे जडणघडणीतील दोन महत्वाचे घटक समोर येतात. इथे एक नवीन गोष्ट घडते आणि ती म्हणजे बालक हळूहळू दुसर्याशी संवाद साधताना आपली मते दर्शविते आणि जेणेकरून दुसर्या व्यक्तीच्या जडणघडणीत थोडाफार भाग घेते.
शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करताना हळूहळू बालकाचा ओलावा कमी होत जातो. त्याची व्यक्ती म्हणून जडणघडण बर्याच प्रमाणात पूर्णत्वास आलेली असते. ह्या इथवरच्या प्रवासात त्या बालकाची पैसा ह्या घटकाशी वेगवेगळ्या प्रमाणात ओळख झालेली असते. ज्यांना अर्थाजनाची जबाबदारी ह्या वयातच घ्यावी लागते त्यांच्या बाबतीत पैसा हा घटक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ह्या वयातच एक वेगळी झालर देवू शकतो. बाकी सर्वांच्या बाबतीत महाविद्यालयीन जीवनानंतर नोकरी/ व्यवसाय हा प्रकार समोर येतो. माणसाच्या व्यावसायिक व्यक्तिमत्वावर हे दोन घटक (नोकरी / व्यवसाय आणि त्या अनुषगाने सामोरे जाव्या लागणाऱ्या व्यक्ती) परिणाम करतात. काहींच्या बाबतीत व्यावसायिक व्यक्तिमत्वातील हा बदल इतका प्रभावी ठरतो की त्यांचे वैयक्तिक व्यक्तिमत्व बदलून जाते.
ह्या क्षणी नैसर्गिक पणे होऊ शकणारी माणसाची जडणघडण पूर्णत्वास आलेली असते. आणि एक नवीन घटनेस तो समोर जातो आणि ती म्हणजे विवाह. ह्या घटनेमुळे मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचा जिच्यावर सर्वात जास्त परिणाम होतो अशी व्यक्ती त्याच्या जीवनात येते आणि येताना ती व्यक्ती आपले पूर्णत्वास आलेले व्यक्तिमत्व घेवून येते. आपले पूर्वज बालविवाहाच्या प्रथेचा पुरस्कार करायचे. त्यात आपल्या घरातील येणाऱ्या सुनेची जडणघडण सुद्धा आपल्या घराण्याच्या पद्धतीनुसार व्हावी असा प्रयत्न असायचा. असो परत हल्लीच्या काळाकडे. विवाहानंतर दोन पूर्णत्वाला आलेली व्यक्तिमत्व एकत्र नांदू लागतात. आणि मग सुरु होतो तो एकमेकांच्या जडणघडणीचा एक अदृश्य, कळत नकळत प्रयत्न. मगाशी एक मी वाक्य टाकले. ' ह्या क्षणी नैसर्गिक पणे होऊ शकणारी माणसाची जडणघडण पूर्णत्वास आलेली असते.' इथे मग पती पत्नी ह्यांनी एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक असते. व आपल्या व्यक्तीमत्वात आवश्यक अशी जडण घडण करणे अनिवार्य बनते. काही जोडप्यांच्या बाबतीत हा प्रकार सुरुळीतपणे पार पडतो आणि काही जोडपी ह्या बाबतीत थोडा संघर्ष करतात. कधी हा प्रवास संवादासहीत होतो तर कधी छुप्या रीतीने होते. कधी ही एकमेकाला अनुरूप बनविण्याची जडणघडण यशस्वी होते तर कधी नाही.
इथे एक अजून घटना घडत असते. मनुष्य आपल्या मुलांवर जडणघडणीचा प्रयत्न करीत असतो. एक आलेख असतो तो मनुष्याच्या स्वतःच्या जडणघडणीचा जो आपला उच्च बिंदू गाठून आपल्या साथीदाराच्या व्यक्तिमत्वाच्या आलेखावर नजर ठेवीत काहीसा समांतर दिशेने प्रवास करीत असतो आणि त्याच वेळी उभारणाऱ्या आपल्या मुलांच्या आलेखावर परिणाम करण्याचा प्रयत्न करतो. कधी ही समीकरणे फार क्लिष्ट बनून जातात आणि मग माणसाला एक प्रकारचे वैराग्य येते. माणूस आपल्या खर्या व्यक्तिमत्वाला आवरण घालतो आणि सभोवतालच्या परिस्थितीला अनुकूल असे खोटे व्यक्तिमत्व बनवून जीवन जगत राहतो.
काही माणसे समाजाच्या जडणघडणीचा प्रयत्न करतात. पूर्वी समाज थोड्याफार प्रमाणात आपला ओलावा राखून होता आणि त्यामुळे संत मंडळी, लेखक, नेते ह्यांनी हा प्रयत्न यशस्वीरित्या केला. आता हा प्रयत्नही सोपा राहिला नाही!

1 comment:

  1. आजकाल मुलांची चढण घडण सोशल मिडिया करते.

    ReplyDelete