Saturday, December 22, 2012

प्रसारमाध्यमांची जबाबदारी



आजचा ब्लॉग फार छोटा असेल असे ठरवूनच लिहितोय. गेल्या एक दोन आठवड्यात फार दुर्दैवी घटना घडल्या. स्त्रियांविरुद्ध अत्याचाराच्या असो की अमेरिकेतील निष्पाप मुलांच्या हत्येच्या असोत, ह्या घटना सर्वसाधारण माणसास फार अस्वस्थ करून गेल्या. त्याविषयी बऱ्याच जणांनी लिहिले. त्यात मी फारसे काही अधिक मुल्य वाढवू शकत नाही म्हणून मी लिहित नाही.
आज मला म्हणायचे आहे ते ह्या बातम्या वाचून सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होणाऱ्या तणावाविषयी! आपल्या वृत्तपत्राचा / वाहिनीचा खप / प्रेक्षकवर्ग वाढावा म्हणून सतत ह्याच बातम्यांना प्रसिद्धी देण्याचे धोरण जर स्वीकारले जात असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. कल्पना करा की समजा आपले काम नियमित करणाऱ्या प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याच्या, हुशार विद्यार्थ्याच्या अथक परिश्रमांच्या, सर्वसामान्य गृहिणीने घरखर्च चालविण्यासाठी केलेल्या खटाटोपीच्या बातम्या जर सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्राने / वाहिनीने सर्वात जास्त प्रसिद्ध केल्या तर मध्यमवर्गीयांना किती मानसिक दिलासा मिळेल आणि अत्याचाराच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने ती वृत्ती ज्यांच्या मनात फोफावते ते किती प्रमाणात कमी होईल! पण हे नक्कीच होणार नाही. आर्थिक नफ्याची गणिते हे कधीच शक्य होवू देणार नाही.
जितका जास्त विचार करतो तितके कलियुगाची संकल्पना किती बरोबर आहे हे जाणवते. बहुदा आपण मनुष्यजातीने गमाविलेला निरागसपणा मनुष्यजातीच्या ह्या अवताराततरी पुन्हा मिळविणे शक्य दिसत नाही. असो मागच्याच आठवड्यात एका बातमीने लक्ष वेधून घेतले. आपली पृथ्वी, आपली मनुष्यजात आणि हे सर्व विश्व हा एका प्रचंड महासंगणकाने बनविलेल्या महाप्रचंड आज्ञावलीचा खेळ आहे अशी ती बातमी होती. म्हणजे ह्या २१ शतकात वसईत बसून लेख लिहिणाऱ्या माझ्या मेंदूतील विचारासाठी सुद्धा तिथे काही आज्ञा लिहलेल्या असणार. आणि ते मला कळले आहे हे ही त्या सर्वज्ञानीला कळले असणार!

No comments:

Post a Comment