Thursday, December 27, 2012

पट मांडला भाग पाचवा



रमाकांत घरी सापडेल अशी जाधवांनी आशाच केली नव्हती. परंतु त्याला जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केल्याची बातमी त्यांच्यासाठी सुद्धा धक्कादायक होती. तातडीने ते जिल्हा रुग्णालयाकडे निघाले. निघण्याआधी रुग्णालयावर पहाऱ्यासाठी २ हवालदार पाठवून देण्याचा फोन त्यांनी ठाण्यात केला. रुग्णालयातील निवासी डॉक्टरने त्यांचे स्वागत केले. रमाकांतला अन्नातून विषबाधा झाली असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तो म्हणाला. जाधवांनी बाहेरूनच रमाकांतकडे नजर टाकली. दोन हवालदार तिथे पोहोचताच केवळ रमाकांतच्या पत्नीसच त्याला भेटण्याची परवानगी द्यायचे बजावून जाधव निघाले.
रुग्णालयाच्या जनरल वार्डात कालच दाखल झालेल्या एका रुग्णाकडे नर्स उषा खास लक्ष ठेवून होती. साधारणतः चाळीशीच्या आसपास असलेला हा रुग्ण छातीत दुखल्याची तक्रार घेवून तिथे दाखल झाला होता. पण नातेवाईक दाखल झाल्याशिवाय कोणतीही तपासणी करून द्यायला नकार देत होता. आता त्याला फोनवर बोलताना पाहून मात्र तिचे माथे सणकले. कसले बोलणे चाललंय फोनवर ह्या तिच्या दामटवून विचारण्याकडे त्याने चक्क दुर्लक्ष केले. 'साहेब, रुग्णालयापर्यंत पोलिस येवून पोहोचलेत की!, तो दबल्या आवाजात पलीकडील व्यक्तीशी बोलत होता. समोरून खास ठेवणीतले शब्द ऐकल्यावर त्याने बोलणे आटोपते घेतले. पलीकडील व्यक्ती मात्र प्रचंड अस्वस्थ झाली होती. तिने ताबडतोब मुंबईला फोन लावला. तीन चार वेळा समोरून फोन कट झाला. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी केलेला पाचवा प्रयत्न मात्र यशस्वी ठरला. 'महत्वाची बैठक चाललेय, समजत नाही का?' समोरून रागीट आवाज आला. 'महत्वाची बातमी होती म्हणूनच फोन केला, रुग्णालयात पोलिस येऊन पोहोचलेत' हे ऐकताच मात्र मुंबईची व्यक्ती सावध झाली. 'तुम्ही कसलं झेंगट लावून दिलत असे त्रासिक स्वरात बोलत इन्स्पेक्टरचे नाव घेवून तिने फोन ठेवून दिला.
जाधवांनी घरी पोहचल्यावर झटपट जेवण आटोपले आणि आरामखुर्चीत बसत ते सर्व विखुरलेले तुकडे एकत्र जोडण्याचा प्रयत्न करीत होते. इतक्यात त्यांच्या भ्रमणध्वनीची घंटा खणखणली. मोठ्या साहेबांचा फोन होता. 'काय जाधव, एका मेकानिकच्या मागे तुम्ही इतकी शक्ती काय वाया घालविता? साहेबांनी सुरुवात केली. 'बर ते जाऊ द्यात, उद्या जामपुरला शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. तिथली जबाबदारी तुमच्यावर लागली' साहेबांच्या ह्या बोलण्याने जाधव एकदम बुचकळ्यात पडले. जामपूर होते १०० किलो मीटर अंतरावर आणि त्यासाठी आपली निवड का व्हावी हे कोडे त्यांना उलगडेना. साहेबांनी फोन ठेवून दिल्यावर त्यांना निराशेने ग्रासले. त्या आरामखुर्चीतच सुन्नपणे त्यांची संध्याकाळ गेली.
तिकीटवाटपाच्या चर्चेचे काम जोरात चालले होते. स्वरुपसिंग, अण्णासाहेब, सुजीतकुमार आणि शिष्ठमंडळांची बैठक जोरात चालली होती. युवाशक्तीचा जोर तिकीटवाटपात दिसतोय की नाही ह्याची मुकुल दिल्लीहून फोन करून अधूनमधून खात्री करून घेत होते. काही जागांच्या बाबतीत एकमत होत नव्हते. त्या जागा नंतरच्या चर्चेसाठी राखून ठेवण्याचे ठरले. विजयरावांचा अहवाल हाती नसल्याने त्या जिल्ह्याचे कामही बाजूला राहिले होते. दुपारनंतर अचानक स्वरुपसिंगांनी त्या जिल्ह्याच्या चर्चेला हात घातला त्यावेळी सर्वांना जरा आश्चर्यच वाटले. सुजीतकुमार आधी थोडे बावचळले पण लगेचच त्यांनी सावरले. 'आतापर्यंत १४० जागांचा निर्णय आपण पक्का केला त्यात युवा नेते १००, म्हणजे जवळजवळ 70 टक्के युवकांना प्राधान्य. आता निवडणूक निधीचे कसे बघायचे? तेव्हा अशी काही मंडळी विचारात घेतलेली बरी' त्यांच्या ह्या अनपेक्षित विधानाने सर्वच जरा आश्चर्यचकित झाले. परंतु मग त्यांनी आणि स्वरुपसिंगांनी मिळून चर्चेला अशी कलाटणी दिली की बघताबघता दिवेपुरच्या जागेवर विश्वासरावांची निवड पक्की झाली.
सत्ताधारी पक्ष इतक्या सुसूत्रपणे काम करत असताना, विरोधकांची हालत खराब होती. युतीची अनेक समीकरणे बनली होती आणि त्यातले कोणते उद्या निश्चित होणार ह्याची भगवंतालाही खात्री नव्हती.

No comments:

Post a Comment