Sunday, December 30, 2012

पट मांडला - भाग सातवा



संपतरावांचा राग दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत बराच निवळला होता. गरमागरम चहाचे घुटके घेता घेता त्यांनी विश्वासरावांना अभिनंदनाचा फोन लावला तेव्हा सगुणाबाईंच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. त्यांनी संपतरावांचे बोलणे आटोपता आटोपता फोन घेतला आणि वडिलाचे अभिनंदन केले. मायलेकीच्या गप्पा त्यानंतर तासभर चालल्या होत्या. संपतरावांनी आज मुद्दामच शेतीचे काम काढले. परीक्षा नापास झालेला मुलगा ज्याप्रमाणे काही दिवस तोंड लपवून बसतो त्याप्रमाणे थोडी त्यांची गत झाली होती. उसाच्या शेतीवर त्यांनी बऱ्याच दिवसांनी फेरफटका मारला होता. मालकांच्या अशा ह्या अचानक भेटीमुळे शेतावरचे मजूर आश्चर्यचकित झाले. त्यांच्या कामातील ढिसाळपणाचा संपतरावांनी आपल्या पद्धतीने समाचार घेतला. इतक्यात त्यांचा फोन खणखणला, अनोळखी क्रमांक न उचलण्याचा त्यांचा नेहमीचा शिरस्ता त्यांनी आज मोडत फोन उचलला. 'काय संपतराव काय म्हणता आहात', समोरची व्यक्ती विचारत होती. 'आपण कोण बोलत आहात?' संपतराव काहीशा त्रासिक स्वरात उद्गारले. वसंतरावांनी मग जास्त ताणून न धरता आपली ओळख करून दिली आणि आपला फोन करण्याचा उद्देश सांगितला. क्षणार्धात संपतरावांच्या मेंदूने अनेक गणिते मांडली. त्यातल्या बऱ्याचशा गणिताची उत्तरे नकारार्थी आल्याने त्यांनी नम्रपणे आपला नकार वसंतरावांना सांगितला. वसंतराव तसे लवकर हार मानणारे नव्हते. 'बघा दुपारपर्यंत विचार बदलला तर' असे म्हणून त्यांनी फोन ठेवला.
शेतकरी मोर्च्याचे काम सांभाळून आल्याने इन्स्पेक्टर जाधव काहीसे थकले होते. सकाळ थोडी आळसात घालविण्याचा त्यांचा मनसुबा होता. साहेबांनी कालच रात्री फोन करून त्यांना सुट्टीवर जायचे सुचविले होते. बायकोशी सल्लामसलत करून संध्याकाळच्या बसने गावाला जायचा त्यांनी बेत जवळजवळ पक्का केला होता. गावाला जायच्या आधी थोडी खरेदी करण्यासाठी बाजारात एक चक्कर मारण्याचे ठरवून ते निघालेही. बाजाराच्या नाक्याच्या ठिकाणी रस्ता थोडा अडला गेला होता. त्यांनी जरा कुतूहलाने नजर वळवून पाहिले, तर एक अंत्ययात्रा चालली होती. मृतात्म्याला शांती लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना करीत त्यांनी आपली बाईक पुढे दामटली. जाता जाता अंत्ययात्रेतील दोन तीन चेहरे ओळखीचे असल्याचा त्यांना भास झाला. परंतु हे चेहरे नक्की कोठले हे न आठवल्याने त्यांनी तसेच पुढे जायचे ठरविले. बाजारात सामान खरेदी करता करता त्यांना अचानक आठविले की ते चेहरे गराजमधील कामगारांचे होते. आता मात्र त्यांना स्वस्थ बसवेना. त्यांनी बाजारात चौकशी केली आणि त्यांचा संशय खरा ठरला. ती रमाकांतचीच अंतयात्रा होती. आता जाधव भयंकर अस्वस्थ झाले. काय करायचे हे त्यांना सुचेना. थोड्या शांत डोक्याने विचार करायचे ठरवून त्यांनी घरचा रस्ता पकडला. वाटेत विश्वासरावांच्या अभिनंदनाचे एक दोन बोर्ड त्यांच्या नजरेस पडले आणि ते अधिकच बुचकळ्यात पडले. एकंदरीत परिस्थितीनुसार त्यांनीसुद्धा संपतरावांना तिकीट मिळेल असा अंदाज केला होता. जे काही चालले आहे ते आपल्या आकलनापलीकडचे आहे असेच त्यांना वाटले. परतीच्या रस्त्यावर अचानक त्यांची गाठ महादेवशी पडली. पोलिस खात्याचा मध्यंतरी संगणकीकरणाचा कार्यक्रम आखण्यात आला होता त्यावेळी महादेवनेच त्यांना प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर त्यांची बऱ्यापैकी दोस्ती झाली होती. दोघेही तसे सध्या मोकळेच होते. २ मिनटात आटोपतील असे वाटून त्यांनी गप्पांना सुरुवात केली परंतु अचानक जाधवांनी आपल्या मनातील खदखदीला मोकळी वाट करून दिली. महादेव एकदम आश्चर्यचकित झाला. एकंदरीत हे फार गंभीर प्रकरण आहे ह्याची त्याला खात्री पटली. जाधवांना ते न जाणवून देता गप्पा आटपेपर्यंत त्याने धीर धरला. जाधव तिथून निघताच त्याने बाईक वरून थेट संपतरावांच्या घराचा रस्ता पकडला.

1 comment:

  1. विरोधी पक्षाच्या गळाला मासा लागत नाही आहे.
    त्यांना अजून मोठे आमिष संपतरावांना द्यावे लागणार आहे.

    ReplyDelete