Monday, December 24, 2012

वसईचा ख्रिसमस आणि बौद्धिक


ख्रिसमसच्या आठवड्यातील वसईतील वातावरण लई भारी असते. यंदाही ते तसेच आहे. थंडी वसईच्या मानाने म्हणावी तितकी नसली तरी मुंबईपेक्षा भारीच. हल्लीच्या नोकरीत सुट्ट्या मिळतात. वर्षाच्या ह्या शेवटच्या आठवड्यातील ही सुट्टी मला खूप आवडते. कुठे काही लांब फिरायला जायची गरज नाही. शांतपणे घरात बसावे, ताज्या भाज्या, मासे - मटण ह्यांचा आस्वाद घ्यावा आणि २६ तारखेपासून सुरु होणाऱ्या कला क्रीडा महोत्सवाला भेट द्यावी. असा माझाच नव्हे तर कित्येक वसईकरांचा बेत असतो. ख्रिसमस निमित्ताने ख्रिस्ती  बांधव सुंदर गोठे आणि क्रिसमस ट्री बनवून त्यावर नयनरम्य दिव्यांची आरास करतात. ती पाहणे सुद्धा सुंदर अनुभव असतो. ह्या आठवड्यात वसईतील अनेक परदेशस्थ असलेले मित्र वसईत सुट्टीनिमित्त येतात. त्यांच्याशीही भेटी होतात.
माणसांचे वर्गीकरण बऱ्याच निकषावर करता येत. आशावादी / निराशावादी हा एक त्यातला निकष. मी मुळचा निराशावादी वर्गात मोडणारा, हे कळायला मला तसा फार वेळ लागला. भविष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या निराशावादी बाजूवर विचार करण्यात मी फार वेळ घालवतो हे मला कळून चुकले. एकदा कळून चुकल्यावर मात्र मी ह्यातून बाहेर पडण्यासाठी बरीच तंत्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक म्हणजे आशावादी माणसांना भेट द्यायची. ही माणसे तुमचा उत्साह खूप वाढवितात. अशाच दोन माणसांना मी ह्या आठवड्यात भेटलो. एक माझे शाळेचे शिक्षक आणि एक शालेय मित्र.
हल्ली बऱ्याच वेळा माझ्या चर्चेचा ओघ हा हाताबाहेर चाललेल्या सामाजिक परिस्थितीकडे जातो. पुढील २०- २५ वर्षात आपल्या देशातील परिस्थिती कशी सर्वसामान्य लोकांच्या पलीकडे जाणार आहे ह्याविषयी ही चर्चा असते. आता पुढील २०-२५ वर्षात ही परिस्थिती उद्भवणार आहे ह्याविषयी बऱ्याच मध्यमवर्गीयांचे एकमत आहे. त्यामुळे आपापल्या परीने प्रत्येकजण त्यावर उपाय शोधीत असतो. परदेशी स्थायिक होणे हा त्यातील सर्वात लोकप्रिय असणारा उपाय. परंतु तो सर्वांनाच शक्य असतो असे नाही आणि इथल्या परिस्थितीला टाळण्यासाठी तो उपाय स्वीकारणे कितपत योग्य आहे यावर बरीच चर्चा आपण करू शकतो. दुसरा उपाय म्हणजे आपल्या परीने जमेल तेवढी बचत, गुंतवणूक करून आपल्या पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करणे. ह्यावर ह्या मित्राने मार्मिक टिपण्णी केली. २० वर्षानंतर होणाऱ्या महागाईला तोंड देण्यासाठी आतापासून बचत करणे म्हणजे आपल्या सध्याच्या आवडीनिवडीला मुरड घालणे होय आणि पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित करताना आपण त्यांना अकर्तबगार तर बनवीत नाही ना हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणे आवश्यक आहे असे तो म्हणाला. योग्य वाटले ते मला. ह्यात अजून एक भर पडते ती काही जाहिरातींची. निवृत्त होताना तुमच्याकडे किमान ३-४ कोटी राशी जमा असणे हे आपल्याला पटवून देण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत असतात. त्यातल्या गृहीतकांमध्ये मुख्य असतात ती तुमचे निवृतीनंतरचे राहणीमान पूर्वीसारखेच राहणार आहे आणि तुम्ही दरवर्षी एक परदेश सहल करणार आहात. मध्यमवर्गीयांचा बुद्धिभ्रम करण्याचा हा प्रयत्न आहे हे मला मनापासून वाटते. भारतातील बहुतांशी जनता अजूनही महिन्याला ५ - १० हजारांत आपला संसार चालविते. अगदी त्या पातळीवर जाऊन नाही पण नक्कीच आपल्या सध्याच्या राहणीमानात बदल करण्याच्या खूप संध्या आपणास उपलब्ध आहेत. ह्यात अजून एक मुद्दा. निवृत्तीनंतर महानगरात राहणे हाच एक पर्याय मानला जातो. हल्ली साठीनंतरही लोक बरेच सक्रिय असतात. अशा लोकांनी छोट्या छोट्या गावात जाऊन वसाहती निर्माण करणे किती आवश्यक आहे ह्यावर आपण विचार करीत नाही. आणि गावात जाऊन शहरी पद्धतीची घरे बांधणे ही अजून एक चूक आपण करीत आहोत. ज्या गावी जावे तिथल्या पद्धतीने राहावे ह्या उक्तीचा विचार गंभीरपणे करणे आवश्यक आहे. निवृत्त लोकांनी अशा छोट्या वसाहती भारतातल्या गावोगावी निर्माण केल्यास बरेच फायदे होतील. त्यांचा राहणीमानाचा खर्च कमी होईल, गावांचा विकास होईल आणि निवृत्तीनंतर  आरोग्यावर होणारा खर्चही कमी होईल. परंतु असा विचार करण्याची आपली क्षमता आपण गमावून बसलो आहोत.
असो ह्या दोन्हि आशावादी लोकांशी बोलल्यावर असे जाणवले की तेही पुढील परिस्थितीविषयी फारसे आशावादी नाहीयेत. तुमचे काय म्हणणे आहे?

2 comments:

  1. थोडक्यात गांधीजी गावाकडे चला असे जे पूर्वी म्हणाले होते त्याचा व्यापक अर्थाने कसा विचार होऊ शकतो ह्याचे हे आदर्श उदाहरण आहे ,
    माझ्या डोक्यात नेमका हाच विचार आला.
    म्हणून आम्ही म्युनिक ह्या जर्मनी मधील महागड्या शहरात राहत असलो तरी घर विकत जर्मनी मधील खेड्यात घेणार आहोत , माझे भारतातील आईवडील मुंबई मधील अपार्टमेंट मधील जागा भाड्याने देऊन स्वतः आमच्या चाळीतील जुन्या घरात राहतात.
    ज्याचे भाडे महिना दोनशे रुपये आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सुरेख! मी फक्त लिहतोय, तुम्ही आणि तुमचे आईवडील हे प्रत्यक्षात अमलात आणताहेत हे वाचून आनंद खूप झाला

      Delete