Thursday, December 27, 2012

पट मांडला भाग ४


इन्स्पेक्टर जाधव आणि त्यांच्या हवालदारांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेतली होती. अपघाताचे कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. जीपचा साफ चेंदामेंदा झाला होता. रस्त्यावर दुभाजक नव्हता आणि जीप आपली बाजू सोडून समोरून येणाऱ्या ट्रकला आदळली होती.आदळल्यावर जीप बाजूच्या थोड्या खोल असणाऱ्या भागात जावून पडली होती. ट्रकवाल्याने स्वतःहून पोलिसांना खबर दिली होती. त्यालाही बराच मार लागला होता. पंचनामा करून सर्व सोपस्कार आटोपल्यावर जीपचे भग्न अवशेष अधिक तपासणीसाठी पाठवून देण्यात आले.
मुंबईत मात्र मोठे उदास वातावरण होते. स्वरुपसिंग मोठ्या विचारात पडले होते. विजयराव तसे पक्षाचे उभारते नेते. ह्या निवडणुकीनंतर त्यांच्यावर अधिक जबाबदारी सोपविण्याचा श्रेष्ठींचा मनसुबा होता. त्यांच्या अशा ह्या अचानक जाण्याने सर्वच समीकरणे कोलमडून पडणार होती. आणि त्यांच्या जिल्ह्यातील पक्षात एक मोठी पोकळी निर्माण होणार होती. ह्या सर्व दीर्घकालीन समस्या होत्या. तत्कालीन समस्या होती ती जिल्ह्यातील उमेदवारी अर्जांच्या छाननीची! विजयरावांनी सर्व उमेदवारांच्या भेटी घेऊन आपला अहवाल बनविला होता. अहवालाचा विचार येताच एकदम स्वरुपसिंग उठून बसले, सुजीतकुमारांना त्यांनी हळूच विचारले, अपघातस्थळी अहवाल सापडला का? ह्या प्रश्नाने सुजितकुमारांचा चेहरा काहीसा उतरल्यासारखा त्यांना वाटला. परंतु सुजितकुमार सावरून म्हणाले, मी दिवेपुरला फोन करून विचारतो.
सुजीतकुमार बाहेरच्या कक्षात आले आणि त्यांनी तात्काळ भाऊरावांना फोन लावला. भाऊरावांनी फोन काही उचलला नाही. नाईलाजाने त्यांनी विश्वासरावांचा फोन लावला आणि इन्स्पेक्टर जाधव ह्याच्याकडे अहवालाची चौकशी करण्यास सांगितले. हे भाऊराव गेले तरी कोठे असा विचार करीत, सुजीतकुमार पुन्हा स्वरुपसिंगांच्या कक्षात आले. एव्हाना अण्णासाहेबांचे आगमन झालेच होते. निवडणूक अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस होता आणि सर्व उमेदवारांना अर्ज भरण्यास वेळ मिळावा म्हणून आजच यादी जाहीर करण्याचा श्रेष्ठींचा आदेश होता. एकदमच काही अपवादात्मक परिस्थिती असेल तर मोजक्या जागांचा निर्णय दुसऱ्या दिवसावर थोपवून धरण्याची परवागनी देण्यात आली होती.
इथे इन्स्पेक्टर जाधव विजयरावांच्या बंगल्यावर पोहचले होते. अतिशय शोकाकुल वातावरण होते तिथे. विजयरावांच्या पत्नीची आणि मुलांची स्थिती तर पाहवत नव्हती. कार्यकर्त्यांची पण ही गर्दी उसळली होती. जाधव तिथे पोहचल्यावर एका कोपऱ्यात जर शांतपणे जाऊन परिस्थितीची पाहणी करीत उभे राहिले. सदैव गावात ड्यूटी लागणाऱ्या इन्स्पेक्टरच्या मानाने त्यांचा स्वभाव तसा सौम्यच. इतक्यात एक विश्वासू कार्यकर्ता त्यांच्याकडे येत झाला. त्यांना एका बैठकीच्या खोलीत नेण्यात आले. जाधवांनी त्याला विजयरावाविषयी त्यांना विचारायचे होते ते प्रश्न विचारून घेतले. थोड्या वेळाने त्यांना विजयरावांच्या पत्नी आणि मुलांशीही बोलण्यास मिळाले. पत्नी तर धाय मोकलून रडत होती. सकाळीच मी नऊ वाजता ह्यांच्याशी बोलले आणि दहा वाजता निघायचे म्हणून हे काही जास्त बोलले नाही. मला काय माहित हे शेवटचेच बोलणे असणार आहे, रडता रडता ती बोलत होती. जाधव तिची समजूत घालून निघाले. पण आता मात्र ते अस्वस्थ झाले होते. सकाळी दहा वाजता निघणारी जीप इतक्या उशीरा का निघाली हे त्यांना समजत नव्हते. जीपमधील कोणीच व्यक्ती जिवंत न राहिल्याने माहितीचा तो स्त्रोत उपलब्ध नव्हता. जाधवांनी आपला मोर्चा विजयराव ज्या हॉटेलात उतरले होते तिथे वळविला. इतक्यात त्यांच्या फोनची घंटा खणखणली. विश्वासरावांचा फोन होता, जीपमध्ये काही कागदपत्रे वगैरे सापडली का असे ते विचारात होते. जाधवांनी त्यांना नकारार्थी उत्तर देवून फोन ठेवला खरा, पण आता मात्र त्यांचा मेंदू पूर्ण सक्रिय झाला होता. हॉटेलच्या स्वागतकक्षात त्यांच्या आगमनाने थोडीशी धांदल उडाली. पण मग व्यवस्थापकाने येवून तो त्यांना खोलीत घेऊन गेला. विजयरावांना हॉटेलातून निघण्यास उशीर होण्याचे कारण काय? जाधवांनी थेट मुद्द्याला हात घातला. उशीर कसला उशीर? ते तर बरोबर १० वाजता इथून निघाले. व्यवस्थापक उद्गारला. जाधवांना आता मात्र एकदम संशयास्पद वातावरण वाटू लागले होते. त्यांनी हॉटेलातील नोंदींची पाहणी केली त्यातही विजयरावांनी १० वाजता हॉटेल सोडल्याची नोंद होती.
जाधव हॉटेलबाहेर उतरले. आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी करू लागले. जिल्ह्यातील ठिकाणी जितकी वर्दळ दिसावसाय हवी तितकी इथेही दिसत होती. त्यांची नजर समोरच्या पानवाल्याकडे गेली. इन्स्पेक्टरचा मोर्चा आपल्याकडे येतोय हे पाहताच तो बिचारा बावरला. विजयरावांची जीप जाताना पाहिली का रे? जाधवांनी त्याला विचारले. आपल्या छोट्याशा मेंदूला ताण देत त्याने हे विजयराव कोण हे आठवण्याचा प्रयत्न केला. मग त्याला आठवली ती कालच सकाळी आपल्या दुकानासमोरच बंद पडलेली जीप. तो म्हणाला विजयरावांची का काय माहित नाही पण एक जीप काल बंद पडलेली मी पाहिली इथे. ड्रायव्हरने कशी बशी चालू केली पण त्याने मला गराजचा पत्ता विचारला म्हणून माझ्या लक्षात राहिली ती. गराज कोठे आहे, जाधवांनी त्याला दरडावूनच विचारले. ह्या पहिल्या नाक्यावर डावे वळण घेतले कि सरळ जावा, शंभर मीटर गेलात की एक चहाची टपरी लागेल, त्याच्याच बाजूला आहे गराज, पानवाला उद्गारला. जाधव घाईघाईने गराजवर पोहचले. सर्व काही आलबेल होते. म्हणजे गाड्यांच्या दुरुस्तीची कामे जोरात चालू होती. तिथला मालक पुढे आला. जाधवांनी त्याच्याकडे कालच्या जीपविषयी विचारले आणि ती आली कधी, त्यात काय प्रॉब्लेम होता आणि तसा कसा दुरुस्त केला असा प्रश्नांचा मारा केला. 'साहेब काय सांगू, रमाकांतने गाडीवर काम केले आणि तोच काल संध्याकाळपासून बरे नाही वाटत म्हणून घरी गेला तर त्याचा काही पत्ताच नाही बघा' रमाकांतच्या घराचा पत्ता घेऊन जाधवांची बाईक सुसाट निघाली.
 

No comments:

Post a Comment