Thursday, December 6, 2012

ब्लॉग हिट संख्या - कबुलीजबाब


दोन वर्षापूर्वी मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेव्हा ह्या संकेतस्थळाला किती जणांनी भेट दिली हे आपण माहित करून घेवू शकतो हे मला ठाऊक नव्हते. मध्येच बहुदा ब्लॉग स्पॉटवाल्यांनी काही प्रशासकीय सुधारणा केल्या किंवा मी त्या प्रथमच पाहिल्या आणि मग मी बिघडलो. आधी स्वानंदासाठी लिहिणे हाच एक उद्देश होता. आता आपल्या ब्लॉगला किती हिट मिळतील हा विचार डोक्यात शिरू लागला. शालेय आणि खास मित्रांना पूर्वी पूर्ण ब्लॉग मेल मधून पाठवणारा मी आता फक्त लिंक पाठवू लागलो. त्यानंतर काही दिवसांनी हा ब्लॉग मराठी ब्लॉग विश्व (http://marathiblogs.net/) ह्या संकेतस्थळाला जोडला गेल्यावर ब्लॉग भेटींच्या संख्येत लक्षणीय सुधारणा झाली. तरी माझा ब्लॉग २०१० मध्ये (दीपक कदम ह्यांनी) बनविला असल्याने आणि त्याला एकदम आधुनिक स्वरुपात कसे आणायचे हे माहित नसल्याने त्याला एकूण किती लोकांनी भेटी दिल्या हे एकत्रितरित्या नोंदले जात नाही. ते कसे करून घ्यायचे हे मी कधीतरी शिकून घेईन असा मला विश्वास आहे.
असो ब्लॉगला मिळालेल्या भेटींच्या संख्येवरून मी त्यांची उतरत्या क्रमाने मांडणी केली.
न्यू इंग्लिश स्कूल वसई- शालेय जीवनातील आठवणी २३२ भेटी
PICTURE PERFECT अर्थात परिपूर्ण चित्र १५८ भेटी
रिकामी न्हावी... १४५ भेटी
चांगुलपणा, तक्रार, गिरीश कुबेर....१४० भेटी
गोंधळलेला बुद्धिमान वर्ग!! १२७ भेटी

असे काहीसे वर्गीकरण झाल्याचे आढळले. ज्या ब्लॉगची संख्या जास्त आहे त्यामागे अनेक कारणे आढळली.
१> विषय - शालेय जीवनातील आठवणी हा विषय असल्यावर आणि तो १००० सदस्य असलेल्या फेसबुक गटावर जबरदस्तीने लादल्यावर ही भेटसंख्या अपेक्षित होती. तसे बघितले तर हा लेख चांगला उतरला आहे. असा माझा समाज आहे :)
२> माझे भावजी निशांक सावे ह्यांनी काही ब्लॉग त्यांच्या फेसबुकवर प्रसिद्ध केले. त्यांचा मराठी रसिक मित्रपरिवार दांडगा असावा. कारण त्या ब्लॉगना चांगला प्रतिसाद मिळाला. माझ्या पत्नीने सुद्धा काही ब्लॉग तिच्या फेसबुकवर प्रसिद्ध करून हातभार लावला.
३> ब्लॉगचे शीर्षक - हे जितके आकर्षक तितके जास्त लोक वाचणार. ह्यात प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाचा समावेश केल्यास भेट संख्या नक्की वाढणारच.
४> जितका वेळ तुमचा ब्लॉग मराठी विश्वाच्या प्रथम पृष्ठावर राहणार तितका अधिक भेटी मिळायची संधी जास्त. भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री प्रसिद्ध केल्यास संख्या थोडी जास्त पटकन वाढते. बहुदा अमेरिकेतील मातृभूमीला आसुसलेले जीव मराठी ब्लॉगला जास्त भेट देत असावेत त्यांच्या शनिवारी सकाळी.
५> मध्ये मी गुलजार ह्यांच्यावर लिहायला घेतले पण माझ्या वडील भावाने, संजीवने  सुचवले की तूझे वैचारिक लेखन थांबवू नकोस. त्याचा सल्ला मी मानला.
ह्यात एकंदरीत मी बिघडलो! गंभीर विषयावरील लिखाण मी कमी केले. मला वैयक्तिक पातळीवर आवडलेले वैचारिक ब्लॉग ह्या यादीत खालच्या क्रमांकावर असल्याचे पाहून मला थोडे दुःख झाले. परंतु हा भ्रष्टाचार मी पुढे थोडा कमी करीन किंवा कमी करण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन मी तुम्हाला देतो! बाकी आजचा ब्लॉग ही अधिकाधिक भेटी मिळाव्यात असा दृष्ट हेतू मनात ठेवूनच लिहिला आहे.

No comments:

Post a Comment