Sunday, December 16, 2012

पट मांडला ! भाग पहिला


घरची सभा संपल्यावर कार्यकर्त्यांना घेवून जाणारी जीप जशी नजरेआड झाली तशी संपतरावने सुटकेचा निश्वास टाकला. विधानसभेची निवडणूक घोषित होणार होणार म्हणून जी काही इतके दिवसाची अनिश्चितता होती ती एकदाची काल संपुष्टात आली. पुढच्या महिन्याच्या १२ तारखेला विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या. संपतराव इतके दिवस लपूनछपून मोर्चेबांधणी करीत होता. आपल्याला स्थानिक पातळीवर किती पाठिंबा आहे याची चाचपणी करीत होता. ही सर्व चाचपणी करताना भाऊरावांना त्याचा सुगावा लागणार नाही याची कसोशीने काळजी घेत होता. दिवेपूर मतदारसंघ तसा मोक्याचा होता. सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार भाऊराव मागच्या दोन खेपेला निवडून आले होते. आणि गेल्या दहा वर्षात सत्ताधारी पक्षात त्यांनी तसे मोक्याचे स्थान बनविले होते. मंत्रिमंडळाच्या मागच्या खेपेच्या विस्तारात भाऊरावांची वर्णी लागणार अशी जोरदार बातमी होती. संपतराव बिचारा पाण्यात देव बुडवून बसला होता. एकदा का भाऊराव मंत्री बनले की आपल्या आमदारकीच्या स्वप्नांना कायमचा सुरुंग लागणार हे तो ओळखून होता. तसे त्याला एकदोन वेळा विरोधी पक्षाकडून निरोपही आले होते. परंतु एवढी मोठी जोखीम घ्यायची त्याची तयारी नव्हती. आणि मग ज्यावेळी मंत्रिमंडळाची यादी जाहीर झाली आणि त्यात भाऊ रावांचा समावेश झाला नाही त्यावेळी संपतने सुटकेचा निश्वास टाकला.
'कसला विचार करत बसलात, जेवण वगैरे घ्यायचे कि नाही? आता तर निवडणुका नुसत्या जाहीर झाल्या आहेत! ' सगुणाबाईच्या ह्या शब्दांनी संपतराव भानावर आले. पुढचे विचार मनातच ठेवत त्यांनी हातावर पाणी टाकले आणि ते पानावर बसले. सगुणाबाई जिल्ह्याच्या सहकारी साखर कारखान्याच्या संचालकाच्या कन्या. त्या संपतरावांच्या आयुष्यात आल्या आणि संपतरावांचे आयुष्य पुरते पालटून गेले. कारखान्याच्या कार्यालयात सर्व हिशोब कसोशीने सांभाळणारा हा चुणचुणीत पदवीधर विश्वासरावांना आधीपासूनच आवडायचा. एकदा आर्थिक वर्षाच्या शेवटी हिशोबाचा ताळमेळ लावताना मोठा बाका प्रसंग उद्भवला. कार्यालय नियोजित वेळेच्या पुढे चालू ठेवले तर काहीतरी गडबड आहे हे साऱ्यांच्याच लक्षात यायचे. तसे व्हायला नको म्हणून विश्वासरावांनी सर्व कारभार घरी हलवायचा हुकुम दिला. संपतराव आणि कर्मचारीवर्ग विश्वासरावांच्या बंगल्यावर दाखील झाला. रात्रभर सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत आणि त्यांच्या कामाची तपासणी करीत, सकाळपर्यंत संपंतरावने परिस्थिती आटोक्यात आणली. ह्या सर्व प्रकारात संपतने विश्वासरावांचा विश्वास तर संपादन केलाच आणि त्याच बरोबर सगुणाच्या नजरेतही ते भरले. आपल्या वडिलांना बिकट परिस्थितीतून बाहेर काढणारा हा सावळासा तरुण सगुणाला आवडून गेला. पुढे संपतचे बंगल्यावर कामानिमित्त येणेजाणे वाढत गेले. आणि एकंदरीत परिस्थिती ध्यानात येण्यास चाणाक्ष विश्वासरावांना वेळ लागला नाही. सुरुवातीला ह्या नात्याला फारसे अनुकूल नसणाऱ्या विश्वासरावांनी आधुनिक काळातील परिस्थिती ध्यानात घेत ह्या जोडीस आपली अनुकुलता दर्शविली.
लग्नसमारंभ मोठ्या थाटात झाला. आपल्या लग्नात एवढी मोठी नेते मंडळी येतील असे संपतने स्वप्नातही पाहिले नव्हते. आमदार शंकरराव, जिल्ह्याचे राज्यमंत्री ह्या सर्वांनी त्यांच्या लग्नसमारंभास उपस्थिती लावली. विश्वासरावांनी गावजेवण घातले. लग्नानंतर काही दिवसांनी फुरसत मिळाल्यानंतर संपतने आपल्या परीने लग्नखर्चाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत आपली ही नोकरी आपण आयुष्यभर जरी केली तरी असे  लग्न आपण आयोजित करू शकणार नाही याची त्याला खात्री त्याला पटली. मग अचानक बातमी आली ती शंकररावांच्या हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यूची! त्यांचे गाव दिवेपुरच्या बाजूचेच! त्यांच्या मृत्यूचा शोक सरतो न सरतो इतक्यात आमदारकीच्या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली. त्या भागातील मोठे उस शेतकरी असलेल्या भाऊरावांनी आपली प्यादी व्यवस्थित मांडून ठेवली होती. त्यांचे वजीर होते ते विश्वासराव! एकदंरीत सर्व काही मनाजोगते होवून गेले आणि भाऊरावांची आमदारपदी वर्णी लागली. ह्या सर्व घडामोडीत नवा जावई संपत बैठकीत आजूबाजूलाच असायचा. एकंदरीत संपतला हे क्षेत्र आवडते हे जसे विश्वासरावांनी जाणले तसे सगुणानेही. थोड्याच दिवसात संपतने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. मग आलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संपत बिनविरोध निवडून आला आणि संपतराव सरपंच म्हणून विराजमान झाले.
क्रमशः

 

2 comments:

  1. वाचत आहे ,
    खूप दिवसांनी ग्रामीण राजकारणावर वाचायला मिळत आहे.

    ReplyDelete
  2. ग्रामीण राजकारणाचा आणि माझा काही संबंध नाही. म्हटले प्रयत्न तर करून पाहू. मुख्य म्हणजे भाषा. तिथे आपलं घोडं अडतंय. तरी पण बघतोय प्रयत्न करून. कसं जमतेय ते जरूर सांगा!

    ReplyDelete