व्यावसायिक जीवनात प्रत्येक वर्षी व्यक्तिगत, सामुहिक आणि संघटनेच्या पातळीवर ध्येये ठरविली जातात. ही ध्येये प्राप्त करण्यासाठी मार्ग आखला जातो आणि वर्षाच्या शेवटी ह्या ध्येयांच्या तुलनेत आपण प्रत्यक्ष किती प्रगती केली ह्याची तपासणी केली जाते. ह्या प्रक्रियेत सहभागी सर्व घटकांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे पूर्णपणे साध्य होत नाही परंतु यशस्वी कंपन्या बर्याच प्रमाणात ही प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबविताना दिसतात. भारताचे पुढील वर्षाचे, दशकाचे किंवा अधिक कालावधीचे ध्येय जाणून घ्यायचे असेल तर योग्य ठिकाण कोणते हा मला पडलेला प्रश्न.
पहिलीच एक कबुली की आपल्या प्रशासकीय प्रणालीबद्दल मला जवळजवळ शून्य ज्ञान आहे. त्यामुळे भारताचे ध्येय दाखविणारे एखादे कागदपत्र असेलही आणि असे असल्यास मला आनंद होईल. पण माझा अंदाज असा आहे की देश म्हणून आपली धोरणे असतात. संरक्षण धोरण, कृषी धोरण, औद्योगिक धोरण, क्रीडा धोरण इत्यादी इत्यादी. परंतु ह्यात उल्लेखलेली ध्येये बहुदा देशाच्या पातळीवर असतात. देशाचे आर्थिक / कृषी उत्पादन पुढील १० वर्षात इतक्या टक्क्यांनी वाढले पाहिजे इत्यादी इत्यादी. परंतु ह्यात वैयक्तिक पातळीवर आपण भारतीय नागरिकास काही कालावधीनंतर कोठे पाहत आहोत ह्याचा उल्लेख असावा की नाही ह्याबाबत मी साशंक आहे. समजा भारतीय समाजाचे आपण विविध वर्गात वर्गीकरण केलं, शेतकरी (ह्यात अल्प भूधारक आणि मोठे जमीनदार असे प्रकार येवू शकतात), नोकरवर्ग, लघु आणि मोठे उद्योजक आणि बाकीचे रोजंदारीवर जगणारे लोक. त्यानंतर ह्या प्रत्येक वर्गातील लोकांचे आर्थिक उत्पन्नानुसार वर्गीकरण करता येईल. आपली कृषी आणि औद्योगिक धोरणे ह्यातील किती वर्गांचे भवितव्य आखीत आहेत हे पाहणे महत्वाचे ठरेल. आपण जनगणनेद्वारे ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या माहितीच्या अचूकतेविषयी खात्री देता येईल असा विश्वास बाळगणे थोडे कठीण जाते.
सध्या मला मनात एक भीती वाटत आहे. आपण जी सध्या मध्यमवर्गाची प्रगती पाहत आहोत, ती दोन गोष्टीवर आधारित आहे. एक म्हणजे आपल्या पिढीची कष्ट करण्याची तयारी आणि दुसरे म्हणजे तुलनेने कमी असणारा पगार. १९९० - २००० च्या कालावधीत माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शिरलेले बहुतांशी लोक मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आले होते. हे सर्व आता उच्च मध्यमवर्गीय वर्गात मोडू लागले आहेत. ह्या वर्गातून पुढे येणारी पिढी इतकीच कष्ट करणारी असेल असा विश्वास देता येत नाही. केल्या जाणार्या कष्टाचे आणि मिळणाऱ्या पगाराचे समीकरण ह्या नवीन पिढीच्या बाबतीत धोकादायकरित्या बदलू लागले आहे.
कालच जो ब्लॉग लिहिला त्यात पुस्तक वाचून मला जाणवलेले कृषी क्षेत्राचे विदारक चित्र मी रेखाटले आहे. थोडक्यात सांगावयाचे झाले तर सध्याच्या आपल्या प्रगतीचे दोन्ही (कृषी आणि शैक्षणिक) खांब ठिसूळ पायावर उभे आहेत अशी मला भीती वाटते. त्यामुळेच जाणकार व्यक्तींनी भारतीय समाजाचा संख्यात्मक अभ्यास करून पुढील काही वर्षात लोकांना रोजगाराची खात्रीची क्षेत्रे उपलब्ध करणे आवश्यक आहे असे माझे ठाम मत आहे. पुन्हा इथे ही जबाबदारी बुद्धीजीवी वर्ग का स्वीकारत नाही हा प्रश्न उद्भवतोच!
No comments:
Post a Comment