संपतरावांचा दिवस एकदम व्यग्र गेला होता. विजयरावांच्या गावीच त्यांचा मुक्काम होता. विजयरावांच्या घरच्या माणसांच्या जोडीला काम करत त्यांनी पुढील दिवसांच्या विधींची सोय तर लावलीच आणि विजयरावांच्या आर्थिक व्यवहाराची सोय लावण्यासाठी एका सल्लागाराची नेमणूक करून ते आले. संध्याकाळी घरी परतल्यावर ते जरा निवांतपणे पहुडले होते की महादेव धावत धावत घरी आला. त्याचे स्वागत सगुणाबाईंनी केले. 'ताई अभिनंदन, बाबांना निवडणुकीचे तिकीट मिळालेय!' महादेवचे हे अनपेक्षित शब्द सगुणाबाईंना धक्का देवून गेले. तोंडदेखले हसून त्यांनी विश्रांतीकक्षात डोकावून पाहिले तर संपतरावांची संतप्त मुद्रा त्यांच्या नजरेस पडली. महादेवचे बोल त्यांच्याही कानी पडले होते तर. त्यांनी खुणेनेच सगुणाबाईंना महादेवला नंतर येण्यासाठी सांगितले. महादेव गेल्यावर विश्रांतीकक्षात जाण्याची हिम्मत सगुणाबाईंना झाली नाही.
अभिनंदनाचे फोन घेता घेता विश्वासराव आणि इंदुमतीबाईंचा जीव मेटाकुटीला आला होता. मुली / जावयाकडून फोन आला नाही ह्याची खंत एकदा इंदुमतीबाईंनी बोलूनही दाखवली. विश्वासरावांची मनः स्थिती मात्र द्विधा झाली होती. मोठ्या जिकीरीनेच त्यांनी ह्या निर्णयाला होकार दिला होता. संपतरावांना तिकीट न मिळून देण्यासाठी भाऊरावांनी चंग बांधला आहे हे त्यांना कळून चुकले होते. आणि त्याचवेळी तुम्ही जर नाही म्हणालात तर दुसरा कोणी बाहेरचा बघू असा निरोप ज्यावेळी त्यांना मुंबईहून आला त्यावेळी त्यांनी होकार कळविला. जावयाची उमेदीची वर्षे बाकी आहेत आणि येत्या पाच वर्षात त्याच्यासाठी परिस्थिती अनुकूल करून ठेवू असेही त्यांनी मनोमन ठरविले होते. हे सर्व संपतरावांना बोलवून घेऊन स्पष्ट करून सांगण्याचे त्यांनी मनोमन ठरविलेही होते. परंतु गेल्या एक दोन दिवसात घडलेल्या घटनांमुळे त्यांना अजिबात फुरसतहि मिळाली नव्हती.
सुजीतकुमारांनी भाऊरावांना चांगलेच फैलावर घेतले होते. एका दिवसाच्या अज्ञातवासानंतर आज भाऊराव फोनवर आले होते. त्यांचा आवाजही एकदम भयभीत वाटत होता. 'आपले ठरले होते काय, आणि तुम्ही काय करून बसलात? फक्त अहवाल गायब करायला मी तुम्हाला सांगितला होता आणि तुम्ही आखखा माणूसच गायब केलात?' सुजितकुमारांचा पारा एकदम वर चढला होता. चुकीच्या माणसाकडे काम सोपविल्याचा भाऊरावांना पश्चाताप होत होता. 'त्या रमाकांतचे काय करायचे आता?' भाऊरावांच्या ह्या प्रश्नाकडे सरळ दुर्लक्ष करून सुजीतकुमारांनी फोन ठेवला होता. हे प्रकरण आपल्या अंगावर एकदम मोक्याच्या क्षणी शेकणार अशी अनामिक भीती त्यांना वाटू लागली.
संध्याकाळी सातच्या सुमारास आलेला महादेवचा फोन अखेरीस संपतरावांनी उचलला. त्यांची समजूत कशी घालायची ही कला महादेवाला चांगलीच अवगत होती. 'चला नदीकाठच्या धक्क्यावर जावून बसुयात', महादेवची ही विनंती संपतरावांना अव्हेरता आली नाही. तयारी करून ते तसेच निघाले. अशा प्रसंगी शांत राहणेच शहाणपणाचे असते हे सगुणाबाई अनुभवाने शिकल्या होत्या. महादेव तोपर्यंत अंगणात येवून पोहचलाच होता. त्याच्या बाईकवर मागे बसून जोडी नदीकाठी निघाली. रस्ता बाजारातून जात होता, तिथे नेमके ओळखीचे विश्वासू कार्यकर्त्ये भेटले. त्यांनी आग्रहाने त्यांना उपहारगृहात चहासाठी नेले. उपहारगृहाच्या एका कोपऱ्यात चहाला सर्वजण बसले. ते बसले त्यावेळी आजूबाजूची बाकडी रिकामीच होती. विश्वासू कार्यकर्त्याबरोबर बोलताना हळूहळू संपतरावांच्या जखमेची खपली पूर्ण निघाली आणि त्यांनी आपल्या मनातील शल्याला मोकळी वाट करून दिली. आपण गेले कित्येक वर्षे कसे खपलो, कसा आजूबाजूच्या भागाचा आणि त्याचबरोबर पक्षाचा ग्रामीण भागात विकास केला' हे ते मोठ्या उद्वेगाने कार्यकर्त्यांच्या ह्या गटास सांगत होते. ह्या सर्व गप्पामध्ये मागच्या बाकड्यावर येवून बसलेल्या एका माणसाकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.
थोड्यावेळाने सगुणाबाईंचा फोन आला तसे संपतरावांनी आपले बोलणे आटोपते घेतले आणि सर्वजण बिल चुकते करून निघाले. ते जाताच वसंतराव आपल्या जागचे उठले. हॉटेलबाहेर येताच त्यांनी मुंबईला फोन लावला. युतीच्या जागावाटपाची गणिते सोडवून शांत झालेल्या विरोधी पक्षाच्या जितेंद्ररावांनी फोन उचलला. 'दिवेपुरचा उमेदवार मिळाला आपल्याला' वसंतरावांचे बोलणे ऐकताच पुढील काही प्रश्न न विचारता हवापाण्याची चौकशी करून जितेंद्ररावांनी फोन ठेवला.
वाचतोय
ReplyDeleteआता खरा डाव सुरु होईल.