दिनांक डिसेंबर २०१२
अभियांत्रिकीच्या एका सत्राच्या परीक्षेत मला एक विचित्र अनुभव आला होता. पहिल्या पेपरच्या रात्री दहा वाजता मी पुस्तक बंद करून झोपायला गेलो. अभियांत्रिकीच्या लोकांना हा जरा विचित्र अनुभव वाटेल कारण अभियांत्रिकीच्या पेपरच्या आदल्या रात्री १० वाजता झोपणे हे काहीसे सामान्य वर्गात मोडणारे नाही. आता माझा अभ्यास पूर्ण झाला होता अशातली गोष्ट नव्हती. तसं म्हटलं तर अभियांत्रिकीचा कोणाचा अभ्यास कधी पूर्ण होत असेल हे शक्यच नाही. परंतु आदल्या दिवशी रात्री नवीन काही वाचायची मला त्यावेळी सवय नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर (सुमारे ४ वाजता) उठून आधी केलेला अभ्यास पुन्हा एकदा पाहायचा असा माझा मूळ हेतू असायचा. ११ वाजले झोप नाही, १२ वाजले तरी नाही, असे करता करता मी पूर्ण रात्र जागून काढली. पहिल्या पेपरच्या वेळी हा मला नाउमेद करणारा अनुभव वाटला. त्याचा परीक्षेतील माझ्या कामगिरीवर विपरीत परिणाम झाला. मला नाउमेद होण्याचे मुख्य कारण उपलब्ध वेळ वाया चालल्याची अपराधी भावना. पुढे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या पेपरलाही (म्हणजे पेपरच्या आदल्या रात्री) असेच घडले. कळत नकळत मी ह्या परिस्थितीवर उपाय शोधून काढला. १० नंतर अभ्यास करणारच नाही ह्या माझ्या अट्टाहासाचा पुनर्विचार केला. मेंदू पूर्ण तरतरीत नसताना कोणते धडे वाचता येतील हे ठरविले आणि मुख्य म्हणजे वेळ वाया गेला म्हणून अपराधी वाटून घेण्याचे थांबविले.
असाच अनुभव परदेशवारीवर (लग्नाआधी) गेल्यावर आला. साप्ताहिक सुट्टीच्या वेळी वेळ मुबलक असायचा. इंटरनेटवर निरर्थक वेळ घालविला की एकदम निष्क्रिय बनल्यासारखे वाटायचे. गप्पा मारायला पण ज्यांच्याशी आपला ताळमेळ जुळतो असे मित्र उपलब्ध असायचेच असे नाही. हळूहळू मला समजून चुकले की उदास न होता मोकळा वेळ कसा घालवायचा हा माझा एक मुख्य प्रश्न आहे. यावर माझ्या परीने मी काही उपाय शोधून काढले. माझा ८ वर्षाचा मुलगा ह्या बाबतीत माझे आशास्थान आहे. सुट्टीच्या वेळी जुनी खेळणी काढून तो एकटाच काही खेळत बसतो. मीही मग ब्लॉग लिहिणे चालू केले, केबल वाहिन्यांवर चित्रपट बघण्याची आवड जोपासली. क्रिकेटपासून (ज्या सामन्यात भारत सहभागी आहे) दूर राहण्याचे ठरविले. ज्या क्षणी माझा मोकळा वेळ सुरु होतो त्यावेळी असलेला माझ्या मनाचा उत्साह जी कोणती क्रिया / उद्योग मोकळा वेळ संपेपर्यंत वाढवील किंवा किमान कायम ठेवील अशा उद्योगाची यादी मी बनविली. चालणे अथवा व्यायाम हा देखील एक उत्तम उपाय आहे. पुढे अजून थोडा विचार केला मग मला जाणवले की काही मानसिक दृष्ट्या प्रगत माणसांना हा प्रश्न भेडसावत नाही. कामाची वेळ येताच मनाचा मूड वगैरे क्षुल्लक गोष्टींना ते थारा देत नाहीत. परंतु असे काही करण्याचा मी प्रयत्न केला नाही. आमच्या समाजातील वयस्क लोकांना पाहिले, ते निमित्त काढून इतरांकडे जातात यात त्या व्यक्तीला बरे वाटतेच पण त्यांचा स्वतःचा मूडही सुधारतो.
प्रत्येकाकडे एक TO DO LIST असते. त्यातली काही कामे करण्यासाठी मनाची एक किमान विशिष्ट उत्साहवर्धक स्थिती आवश्यक असते. ती असेल तरच अशी कामे हाती घ्यावीत. आताच जाणवले की ह्या ब्लॉग मध्ये आधीच्या काही ब्लॉगची पुनरोक्ती आहे.
पुन्हा एकदा अभियांत्रिकी परीक्षेकडे! समजा आपण एका विषयाची तयारी करून गेलो आणि दुसराच पेपर सोडविण्याची वेळ आपल्यावर आली तर आपण कितपत टिकाव धरू शकू? अभियांत्रिकीची बहुतांशी मुले / मुली म्हणतील की हालत खराब होईल. शेवटच्या दिवशी केलेला अभ्यास ही उत्तीर्ण होण्याची जीवनरेखा आहे. परंतु मला हे काहीसे पटत नाही. अभियांत्रिकी परीक्षेत आपण पेपर हातात येण्याआधी आणि सुरुवातीची ५ -१० मिनटे बेचैन असतो. पण एकदा का आपण पेपरची तपासणी केली की आपला मेंदू साधारणतः विश्लेषण तयार ठेवतो, कोणता प्रश्न आपल्याला सहजासहजी सोडविता येईल आणि कोणत्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला मेंदूत खोलवर शिरावे लागेल. जर आपणास दुसराच पेपर सोडविण्याची वेळ आली तर सर्व प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी आपल्याला मेंदूत खोलवर शिरावे लागेल. असो मेंदूतील माहिती योग्य वेळी बोलण्या - लिखाणाद्वारे प्रकट करण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी!
No comments:
Post a Comment