प्रत्येक माणूस काही वेगाने ज्ञानग्रहण करीत असतो. हा ज्ञानग्रहण करण्याचा वेग कालपरत्वे बदलत असतो. हे ज्ञानग्रहण कधी पुस्तकी माध्यमात असते तर कधी अनुभवाच्या माध्यमातून! ग्रहण केलेल्या ज्ञानाची व्यावसायिक आयुष्यात गरजेनुसार अभिव्यक्ती करावीच लागते. तिथे पर्याय नसतो. परंतु व्यावसायिक आयुष्यापलीकडे वैयक्तिक जीवनात माणसाने आपण ग्रहण केलेले ज्ञान किती, कसे आणि कुठे अभिव्यक्त करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न! वैयक्तिक जीवनात सतत ज्ञानाची अभिव्यक्ती करणाऱ्याने आपल्याला होणारा संबंधित ज्ञानाचा पुरवठा अबाधित राहिला पाहिजे ह्याची काळजी घ्यावयास हवी नाहीतर अभिव्यक्तीचा दर्जा घसरू शकतो. ज्ञान मिळविण्याचे वाचन, पर्यटन, चर्चा असे अनेक मार्ग आहेत. हे ह्या अभिव्यक्ती करणाऱ्या माणसाने जोपासावेत! असो हे होते मनन! लागू होते ते मला स्वतःला!
तसाच एक दुसरा प्रकार म्हणजे सातत्याने ज्ञानग्रहण करणाऱ्या लोकांचा! ते केवळ व्यावसायिक जीवनात अभिव्यक्ती करतात. त्यांनी खरेतर आपल्या ज्ञानाचा शिडकावा सर्वसामान्य लोकांवर करणे समाजाच्या हिताचे असते. परंतु अशा ज्ञानी लोकांना ओळखून त्यांना सामाजिक अभिव्यक्तीचे योग्य माध्यम उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आता ही जबाबदारी कोणाची ह्या संभ्रमात आपला समाज पडला आहे. अजून एक संभ्रम म्हणजे आपला समाज बऱ्याच वेळा प्रगतीच्या शिखरावर पोहचलेल्या व्यक्तींनाच केवळ व्यासपीठ उपलब्ध करून देतो. ह्यात एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे एक क्रीडाक्षेत्र सोडल्यास बाकीच्या क्षेत्रात प्रगतीच्या शिखरावर पोहचलेल्या व्यक्तीची उमेदीची वर्षे निघून गेलेली असतात. त्यांचे ज्ञान कालबाह्य झाले असल्याचा धोका संभवतो.
एकंदरीत इंटरनेटच्या ह्या बाह्यस्वरुपी ज्ञानस्फोट झाल्यासारखे वाटणाऱ्या ह्या युगात योग्य ज्ञान समाजात पोहोचविणाऱ्या पात्र व्यक्तींची आणि माध्यमांची निवड करण्याच्या प्रक्रियेचा अभाव ही एक सामाजिक समस्या बनली आहे.