२०१२ मध्ये केरळच्या जवळील समुद्रकिनाऱ्यातून इटलीचे एक तेलवाहू जहाज जात होते. त्या जहाजाच्या जवळ एक भारतीय मच्छिमारांची नौका जरा जास्तच जवळ गेली. इटलीच्या जहाजावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी त्या नौकेवर गोळीबार केला, त्यात दोन भारतीय मच्छिमारांचा मृत्यू झाला. भारतीय पोलिसांनी तत्काळ कारवाई करून इटलीच्या त्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. कालांतराने इटलीतील निवडणुकीतील मतदानासाठी त्या दोघा कर्मचाऱ्यांना इटलीत जाण्यासाठी जामिनावर सोडण्यात आले. कालांतराने त्यांना भारतात न्यायालयीन चौकशीसाठी परत पाठविण्यात येईल अशी भारतीय सरकारची अधिकृत समजूत होती. परंतु आता इटलीने त्या खलाशांना भारतात परत न पाठविण्याची भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे अधिकृतरित्या संतप्त झालेल्या भारतीय सरकारने इटलीला जाणार्या राजदूताचा प्रवास स्थगित केला असून इटलीचा अधिकृत राजनैतिक दर्जा निम्नस्तरावर आणून ठेवला आहे. आता हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणीसाठी जाईल अशी माझी समजूत आहे.
एकंदरीत हे प्रकरण मनमोहन सिंग ह्यांना फार काळजीपूर्वक सांभाळावे लागणार आहे. सोनिया गांधी ह्यांना इटलीच्या त्या दोन कर्मचार्यांची काळजी तर घ्यावी लागली म्हणूनच तर त्यांना मतदानासाठी परत जाण्याचा निर्णय घेण्यात आला. हल्लीच्या संगणकीय युगात भारतातून मतदान करता येवू शकले नसते असे समजणे चुकीचे आहे. परंतु समजा भारतीय न्यायालयाने त्यांना ४-५ वर्षे शिक्षा सुनावली असती तर इटली नाराज झाला असता आणि ही इटलीची नाराजी मनमोहन सिंग ह्यांना परवडली नसती. त्याच प्रमाणे २०१४ च्या निवडणुका तोंडावर उभ्या ठाकल्या आहेत अशा वेळी हे प्रकरण म्हणजे विरोधकांच्या हाती आयते कोलीत बनू शकते त्यामुळेच सरकारला ह्यावर कारवाई करणे किंवा कारवाई करण्याचा बहाणा करणे आवश्यक बनले आहे.
एखादा निर्णय घेताना साधी माणसे हो किंवा नाही असे दोनच पर्याय विचारात घेतात. परंतु धूर्त माणसे त्यातला सुवर्णमध्य शोधून काढतात. एकदा का आंतरराष्ट्रीय लवादाकडे हे प्रकरण गेले की नक्की ते २-३ वर्षे चालेल आणि एकदा का २०१४ च्या निवडणुका आटोपल्या की मग त्याचा निर्णय काही का लागेना कोणाला त्याचे काय पडले आहे. त्या मच्छीमारांचे कुटुंबीय मात्र एक वेडी आशा लावून ह्या प्रकरणाकडे पाहत बसणार.
No comments:
Post a Comment