Sunday, March 10, 2013

भेदी - भाग ७


'काही तरीच काय सुदामराव' शैलेश जवळजवळ किंचाळललाच! आपण सुदामरावांकडे यायचा विचार कसा केला हे आठविण्याचा शैलेश प्रयत्न करू लागला.
एकंदरीत परिस्थिती गंभीर असल्याचे शैलेशने जाणले होते. अशा वेळी सुदामरावांचा सल्ला घ्यावा हे अनुभवाने शैलेश शिकला होता. परंतु सर्व परिस्थिती सुदामरावांना सांगणे म्हणजे हणम्याच्या खऱ्या रुपाला गावकऱ्यासमोर आणणे! नेमकी हीच गोष्ट टाळण्याचा शैलेश प्रयत्न करीत होता. शेवटी पैश्याच्या आर्थिक व्यवहारातील गैरसमजुतीमुळे हणम्याच्या मागे काही लोक लागले असून ते गावापर्यंत पोहचले असून आता हणम्याच्या जीवाला धोका आहे असे सुदामरावांना सांगण्याचे शैलेशने ठरविले. सुदामरावांना एकंदरीत परिस्थितीचे गांभीर्य कळले. अशा परिस्थितीत तोडगा काढायचा तोही तसला नामी असे अनुभवी सुदामरावांनी जाणले. आणि आपला तोडगा शैलेशच्या कानात घातला. हणम्याचा रात्री खून झाला अशी बातमी पसरवायचा तो तोडगा होता. काही वेळ थंड डोक्याने विचार केल्यावर शैलेश तयार झाला. हणम्याला तयार करायला फारसा वेळ लागला नाही. आपल्या गावातच आपल्या मागे असली लोक आलेली पाहून तो एकदम भयभीत झाला होता. ह्या नंतरची पाळी होती हणम्याच्या आई वडिलांना समजविण्याची ! त्यांची समजूत काढावयास फार कठीण जाईल असे शैलेशला वाटत होते. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते ह्या योजनेला एकदम तयार झाले. 'य' पार्टीचे भयानक गुंड बघितल्यावर अशा लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याची त्यांची खात्री पटली.
त्याच रात्री निळी गाडी पार्टी गावात येवून पोहचली. त्या परिसरातील एकमेव चांगले हॉटेल म्हणजे जिथे परेरा उतरला होता, तिथेच त्यांनी मुक्काम ठोकण्याचा विचार केला होता. परेरा तसा नशीबवान होता, एक तर निळी गाडी पार्टी आली त्यावेळी तो झोपला होता. नाहीतर मुंबईच्या गाडीतून आलेले असले तगडे लोक पाहून त्याला हृदयविकाराचा झटकाच यायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जामनिस आणि मंडळीनी त्या छोटेखानी हॉटेलच्या सर्व खोल्या व्यापून टाकल्या होत्या त्यामुळे निळी गाडी पार्टीला गावातच दुसरा घरगुती आसरा शोधावा लागला. 'य' पार्टीने देखील असाच एक घरगुती आसरा एका शेतात शोधला होता. अशा प्रकारे त्या गावात नाट्यातील तिन्ही पार्ट्या आणि दोन्ही मुख्य पात्रे त्या रात्री हजर होती. एकदा योजना आखली की तिची एकदम परिपूर्ण अंमलबजावणी करण्यात सुदामरावांचा हातखंडा होता. दोन तासातच त्या योजनेची संपूर्ण तयारी झाली होती.
रात्री २ वाजताच्या सुमारास गावच्या त्या एकदम शांत वातावरणात एकदम आरडाओरडा ऐकू लागला.काही वेळाने एकदम रडण्याचे आवाज ऐकू येवू लागले. निळी गाडी आणि य पार्टीतील बऱ्याच लोकांची त्यामुळे झोपमोड झाली देखील! त्यातील काहींनी खोलीबाहेर येवून हा कसला आवाज आहे म्हणून चौकशी केली सुद्धा! सुदामरावांच्या मास्टरप्लाननुसार त्यांच्या चेल्यानी कोणीतरी मेले असेल आणि अशावेळी गावाबाहेर लोकांनी तिथे जाणे कसे योग्य नाही हे सांगून त्यांची समजूत घातली. ह्यात फारसा रस नसलेली ती मंडळी आपसूकच मग झोपी गेली. हॉटेल लांबवर असल्याने जामनिस आणि परेरा पार्टीची झोपमोड सुद्धा झाली नाही.
सकाळ सकाळी राम नाम सत्य हैं च्या स्वरात प्रेतयात्रा चालल्याचे पाहून गावातील लोक एकदम आश्चर्यचकित झाले. एरव्ही कोणाचा पाय मुरगळला तरी गावात ती मोठी बातमी व्हायची आणि इथे गावातील एका मरणाची बातमी सुद्धा आपल्यापर्यंत पोहचू नये ह्याचेच सर्वांना आश्चर्य वाटले. हे आश्चर्य ओसरते तोच सर्वांना दुसरा धक्का बसला आणि तो म्हणजे हे प्रेतयात्रा हणम्याची असल्याचा! आता मात्र आश्चर्यांचे रुपांतर क्रोधात झाले. आदल्याच दिवशी हणम्याच्या घरी आणि बस डेपोवर हणम्याचा शोध घेणारी मंडळीच ह्यामागे असावीत अशा निष्कर्षापर्यंत गावकरी येवून पोहचले. आणि त्यात सुदामरावांच्या हस्तकांनी अजून भर घातली. बघता बघता लोक स्मशानाच्या दिशेने निघु लागले ते पोहचण्याआधीच प्रेताला (खोट्या) अग्नी देण्यात आला होता. गावच्या पोलिसांना विश्वासात घेतल्याने सर्व काम सोपे झाले होते. इतक्या घाईत सर्व काही का आटोपण्यात आले असा प्रश्न सर्व गावकऱ्यांनी केला. खुनी लोकांनी हणम्याची दुर्दशा केल्याने इतकी घाई करावी लागली असा खुलासा करण्यात आला. सुदामरावांनी तिथेच जमलेल्या लोकांसमोर एक प्रक्षोभक भाषण केले आता मात्र गावातील सर्व मंडळी फार भडकली होती.
गावातील ह्या तापलेल्या वातावरणाची बातमी तिन्ही पार्ट्यापर्यंत पोहचविण्याची काळजी देखील मास्टरप्लान मध्ये समाविष्ट होती. त्याची खात्री पटविण्यासाठी त्यातील निवडक मंडळीना गावातून लपून फेरफटका देखील मारून दाखविण्यात आला. गावातील हे वातावरण पाहून अत्यंत घाबरलेल्या त्या मंडळीनी पुढील अर्ध्या तासात काढता पाय घेतला. निळी गाडी पार्टीला थोडा संभ्रम होता परंतु सर सलामत तर पगडी पचास असा सुज्ञ विचार करून त्यांनीही तिथून पलायन केले. 'य' पार्टी मात्र आधी थोडी खुश झाली. हणम्याचा कट काढण्याचे कारस्थान कसे आपसूक यशस्वी झाले याचा ते पळता पळता विचार करू लागले. परंतु थोड्या वेळाने जामनिस पार्टी हणम्याला का संपवेल असा प्रश्न त्यांच्या डोक्यात आला आणि त्या प्रश्नांचे उत्तर न शोधता आल्याने ते गोंधळून गेले. जामनिस मात्र पूर्ण घाबरून गेले होते. आपल्या हाती सोपविलेली कामगिरी पार न पाडता आल्याचे दुष्परिणाम काय होतील ह्याचा त्यांना अंदाजही बांधता येत नव्हता!
 

No comments:

Post a Comment