Friday, March 8, 2013

प्राथमिक शिक्षक!


एखादा समाज विविध स्थित्यंतरातून जात असतो. एखाद्या विशिष्ट स्थितीत त्या समाजाचे काही चांगले गुणधर्म असतात आणि काही कमकुवत बाबी असतात. चांगल्या अथवा वाईट गुणधर्मांचे परिणाम दिसायला काही काळ जावा लागतो. समाजातील धुरिणांनी ह्या चांगल्या आणि वाईट गुणधर्मांचा वेळीच अभ्यास करून त्याच्या भविष्यातील परिणामांविषयी उपाययोजना करणे आवश्यक असते. चांगले गुणधर्म समाजाला मजबूत परिस्थितीत नेवू शकतात ही परिस्थिती वेळीच ओळखल्यास त्याचा पुरेपूर फायदा घेता येवू शकतो. त्याच प्रमाणे आपल्या कमकुवत बाबीवर वेळीच उपाययोजना आखल्यास त्याचे दुष्परिणाम कमी होवू शकतात.
हल्लीच्या समाजात प्राथमिक शाळांतील दर्जेदार शिक्षकांचा अभाव ही एक मोठी समस्या आहे. भारतीय मध्यमवर्गीय समाजाच्या गेल्या काही वर्षातील विविध क्षेत्रातील प्रगतीमागे ७०- ८० च्या सुमारास शिक्षकी पेशात शिरलेल्या गुणवान शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. लक्ष्मी आणि सरस्वती ह्याचे सख्य बहुदा नव्हतेच. परंतु त्या काळात शिक्षकी पेशाला समाजात मानाचे स्थान होते. आज प्रकर्षाने ह्या बाबीची उणीव जाणवत आहे. समाजातील बहुसंख्य गुणवान मुलांनी शिक्षकी पेशाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आपल्या पुढील पिढीवर होणाऱ्या संस्कारावर गंभीर परिणाम होत आहे. ह्याचे दुष्परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. ह्यावर उपाय योजणे आवश्यक बनले आहे. शिक्षकी पेशाची आपणास वयाच्या उमेदीच्या वर्षात निवड जरी करता आली नाही तरी वयाच्या ४५ -५० वर्षाच्या आसपास आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याची जाणीव आपल्यास जर झाली तर समाजाचे ऋण फेडण्यासाठी शिक्षकाच्या भूमिकेत उतरणे ही काळाची गरज बनली आहे. वेळीच योग्य पावले न उचलल्यास बौद्धिक गुणवत्तेची खाण समजल्या जाणाऱ्या भारतीय समाजाचा हा मुलभूत पायाच कमकुवत बनू शकतो.
 

No comments:

Post a Comment