लहानपणापासून तुम्ही जितके जास्त तंत्रज्ञानाला सामोरे जाता तितके तुमचा मेंदूचा भावनिक भाग कमी विकसित होतो. तंत्रज्ञान किंवा संगणकीय खेळ एका विशिष्ट आज्ञावलीवर आधारित असतात त्यात मानवी जीवनातील किंवा विविध मनुष्यांतील अनिश्चिततेचा अभाव असतो. हळूहळू अशा व्यक्तींच्या मेंदूची संगणकीय जीवन आणि प्रत्यक्षातील जीवन ह्यातील फरक समजण्याची क्षमता कमी होत जाते, किंबहुना आपल्या सभोवतालच्या व्यक्तींचे विश्लेषण करण्यात जितका वेळ द्यावयास पाहिजे तितका ह्या तंत्रज्ञानकुशल व्यक्तीस मिळत नाही. ह्यात आपल्या वडीलधारी व्यक्तींचे थोडे खोलवर निरीक्षण करणे हाही महत्वाचा भाग असतो. आपल्या वडीलधारी व्यक्तींच्या स्वभावाचे नीट निरीक्षण केल्यास त्यात आपणास आपल्याच स्वभावाच्या काही छटा दिसून येतात. ह्या छटांनी काही प्रमाणात परिसीमा गाठली असल्याची शक्यता असू शकते परंतु आपल्यामध्ये मर्यादित स्वरुपात असलेल्या ह्या छटा ओळखल्यास त्याचा योग्य फायदा उठवता येतो किंवा त्यावर उपाययोजना करता येते. त्याच प्रमाणे ज्यांची मुले आहेत त्यांना आपल्या स्वभावाच्या मुलभूत छटाहि पहावयास मिळू शकतात.
आपल्या मोकळ्या वेळेचा किती टक्के भाग तंत्रज्ञानाच्या हाती हवाली करायचा हा ज्याचा त्याचा निर्णय. तंत्रज्ञानाचा एक तर आपल्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी उपयोग होऊ शकतो जसे की इंटरनेट वर बिल भरणे, ह्या गोष्टीवर विचार करण्याची गरज नाही परंतु ज्यावेळी तुम्ही फेसबुकवर गेम खेळता त्यावेळी ह्यावेळेत आपण जिवंत व्यक्तींशी संवाद साधू शकतो का ह्याचा एकदा विचार करणे आवश्यक आहे.
जीवन अधिकाधिक यंत्रमय होत जाणार, नोकरीधंद्यातील स्पर्धा अधिक तीव्र होत जाणार हे सर्व जाणून आहेत, ह्यात जो कोणी भावनिक दृष्ट्या सक्षम असेल तोच माणूस टिकू शकणार. भावनिक सक्षमतेसाठी कोण्या मानसोपचार तज्ञाची गरज नाही.
No comments:
Post a Comment