Sunday, March 3, 2013

भेदी - भाग ३


क्ष च्या खुनामुळे मुंबईत / राज्यात जबरदस्त हल्लकल्लोळ माजला. मंत्रालयातील इतक्या उच्चपदस्थ गृहस्थाचा दिवसाढवळ्या खून होत असेल तर सामान्य माणसाच्या सुरुक्षिततेचे काय असा प्रश्न विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केला. एकंदरीत मुंबईतील वातावरण तप्त झाले होते.
हणम्या जबरदस्त भयभीत झाला होता. त्याने तत्काळ गावी पळ काढला खरा पण घरी जायचे त्याने टाळले. आपला खास मित्र शैलेश ह्याच्या शेतातील घरात त्याने आश्रय घेतला. आपल्या मागावर मुंबईहून माणसे येणार ह्याची त्याला खात्री होती पण त्यात आपल्या घरच्यांना अडकविण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. शैलेशला अधूनमधून घरी पाठवून लग्नाची तयारी व्यवस्थित चालली आहे ना ह्याची खातरजमा तो करून घेत होता. अशाच एका दुपारी शैलेश आला तो घरी एक अनोळखी इसम मोठी रक्कम हणम्याच्या वडिलांना देऊन गेल्याची खबर घेऊनच. हणम्या आता प्रचंड गोंधळला. हे काय चालले आहे हे त्याला अजिबात समजेनासे झाले. शैलेश मात्र शांत डोक्याचा होता. हणम्याने त्याला विश्वासात घेऊन सर्व सांगितले होते. असाच शांतपणे विचार करताना मध्येच त्याने तालुक्यावरून आलेल्या पेपरांचा जुडगा हणम्याकडे फेकला. आठवड्यातून फक्त दोनदा हे पेपर गावी यायचे. त्यातल्या पहिल्याच पेपरचे पहिले पान उघडताच हणम्या पूर्ण हैराण झाला. क्ष च्या खुनाच्या बातमीने हे पान पूर्ण व्यापले होते. जरी हणम्याला क्ष चे नाव माहित नव्हते तरी देखील तेली गल्लीचा उल्लेख वाचून त्याला खुलासा झाला होता. आणि घरी आलेल्या रकमेचेही स्पष्टीकरण मिळाले होते. आता त्याला दुसरीच भीती वाटू लागली, एकतर खुनी म्हणून आपल्यामागे ससमिरा लागेल किंवा ही रक्कम आपणास परत करावी लागेल. जरी लॉटरी लागली तरी त्याचे पैसे मिळायला वेळ लागणार होता आणि आलेली रक्कम तर वडील खर्च करून मोकळे झाले होते. शेवटी त्याने निर्णय घेतला की बहिणीचे लग्न आनंदात घालवायचे आणि पुढचे पुढे बघून घ्यायचे.
परेरा पुढील दोन तीन दिवस घराबाहेर पडलाच नाही. बाहेर पडण्याची त्याची हिम्मतच नव्हती. क्ष च्या खुनाची घटना त्याने बाजूच्या गल्लीतून स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती आणि हे निळ्या गाडीतील मारेकरी आपल्यासाठी आलेले होते हे समजावयास त्याला वेळ लागला नव्हता. आता आपल्या सुरक्षिततेची त्याला अजिबात खात्री राहिली नव्हती. मग एक दोन दिवसांनी परेराच्या बिल्डिंगमधून एक बुरखाधारी स्त्री बाहेर पडली आणि तिची गाडी निघाली ती योगायोगाने हणम्याच्या गावाकडे!
निळ्या गाडीतील मंडळींना बराच मार पडला होता. त्या माराने त्यांची अंगे काळी निळी पडली होती. योग्य सावज पकडण्यासाठी त्यांना एक आठवड्याची मुदत देण्यात आली होती.
हणम्याच्या घरी पैसे पाठविल्यानंतर जामनिस आणि मंडळींना क्ष चा खून निळ्या गाडीतून आलेल्या मारेकऱ्यांनी केल्याचे कळून चुकले होते. पैसे गेल्याचे त्यांना दुःख नव्हते पण चौकशीचा ससेमिरा आपल्या मागे लागणार नाही ह्याचा त्यांना जबरदस्त आनंद झाला होता. परंतु त्यांचा अंदाज चुकला होता. क्ष कोणकोणत्या निर्णयात सहभागी होता ह्याची खोल तपासणी चालू होती. आणि धरणाचे कंत्राट देण्याच्या निर्णयातील त्यांचा सहभाग सतत चौकशी करणाऱ्यांच्या डोळ्यात खुपत होता.  

No comments:

Post a Comment