Friday, March 22, 2013

भेदी - भाग ९


सुरुवातीला ह्या प्रकरणात नावे जाहीर झालेल्या मंत्रालयातील लोकांना थोडा फार धक्का बसला. परंतु एक दोन दिवसात ते सावरलेही. त्यातील दिग्गज लोकांनी अशी कित्येक प्रकरणे पाहिली होती. लोकांची स्मृती अल्पकाळ टिकते ह्यावर त्यांचा विश्वास होता. आतापर्यंत धरणाचे कंत्राट सोपवण्याच्या निर्णयावर स्थगिती आणली गेली होती. हे सर्व प्रकरण CBI कडे सोपविण्यात आले होते.
जामनिसांना एकंदरीत काय चालले आहे हे कळेनासे झाले होते. बरेच दिवस त्यांना मंत्रालयातील कंपूचा फोन / निरोप वगैरे आला नव्हता आणि रवानगी बाहेरच्या कामावर करण्यात आली होती. असे असले तरी त्यांचे मन मात्र मंत्रालयातच राहिले होते. मंत्रालयातील कंपू मात्र सर्व सारवासारव करण्याच्या मागे लागली होते. इतका मोठा मोहरा असल्या प्रकरणात अडकवून चालणार नव्हता. त्यामुळे पुराव्यासकट एखाद्या छोट्या प्याद्याला ह्यात अडकवायचे असे ठरत होते. आणि छोटे प्यादे म्हणून जी दोन तीन नावे पुढे येत होती त्यात जामनिस सतत अग्रस्थानी राहत होते. आणि दोन दिवसांच्या अखेरीस जामनिस ह्यांची निवड पक्की करण्यात आली. जामनिस निवडीच्या बाबतीत कितीही दुर्दैवी ठरले तरी त्यांच्या विषयी सहानुभूती असलेले एक दोघे मुख्य कंपूत होतेच. मध्यरात्री १२ वाजता जामनिसांचा फोन खणखणला. गाढ झोपेत असलेल्या जामनिसांनी त्रासिक मुद्रेनेच फोन उचलला. समोर पटवर्धन होते. पटवर्धनांनी जामनिसांना मोजक्या शब्दात सर्व परिस्थितीची कल्पना दिली. आपण एक जीप घेवून ड्रायव्हर पाठवत असल्याचे ते सांगत होते आणि ३० मिनिटात तयार राहण्याचा त्यांनी सल्ला जामनिसांना दिला. जामनिसांची पत्नी मागून हे सारे बोलणे ऐकत होती. तिने नजरेनेच जामनिसांना धीर दिला. आपल्या पत्नीच्या मनोबलाविषयी जामनिसांना नेहमीच कौतुक वाटत आले होते. आणि ३० मिनिटानंतर महत्वाच्या सामानासकट तिच्या आणि मुलासोबत जीपमध्ये शिरताना जामनिसांना ह्या ही परिस्थितीत तिचे फार कौतुक वाटत होते.
हणम्याचे लग्न आता आठवड्यावर आले होते. सर्व गुपचूप मामला असल्याने गावात तर आमंत्रणाची काही सोयच नव्हती. त्यामुळे आई वडील काहीसे हिरमुसले झाले होते. त्याही परिस्थितीत रत्नागिरीला राहणाऱ्या आत्याला घेवून येण्याची भुणभुण आईवडिलांनी त्याच्या मागे लावली होती. बऱ्याच दिवसांनी शैलेशबरोबर भटकायला मिळणार म्हणून हणम्याहि खुश झाला होता. भूमिगतासारखी त्याची अवस्था असल्याने पहाटे एक वाजताच त्यांची जीप रत्नागिरीला निघाली होती. हा सर्व खर्च केवळ न केलेल्या खुनाची कमाई आणि वडिलांना लागलेल्या लॉटरीच्या पैशानेच झेपतो आहे असा विचार राहून राहून भरधाव धावणाऱ्या जीपमध्ये बसलेल्या हणम्याच्या मनात येत होता. मुंबई गोवा महामार्गावर एका मोठ्या नाट्यातील दोन महत्वाची पात्रे दोन वेगवेगळ्या जीपमधून थोड्याशाच अंतरावर गोव्याच्या दिशेने चालली होती.
सकाळच्या मंद हवेत जामनिसांना छान झोप लागली होती. आयुष्य काय रंग दाखवतंय असा विचार राहून राहून त्यांच्या मनात येवून गेला होता. अचानक जीपला लावलेल्या जोरदार ब्रेकने जामनिसांचा निद्राभंग झाला. त्यांनी वैतागुनच त्रासिक मुद्रेने ड्रायवर कडे पाहिले. ड्रायव्हरने नजरेनेच त्यांना समोरच्या दिशेने खुणावले. समोर बस बाजूच्या छोट्या खड्ड्यात पडली होती. खड्डा काही खोलवर नसल्याने सुदैवाने प्रवासी केवळ जखमांवर निभावले होते. बस खड्ड्यात पडण्य़ाआधी तिने एका ट्रकला धडक दिली होती. त्यामुळे वाहनांची रांगच लागली होती.
मनाने सदैव दुसऱ्याला मदत करायला तयार असणाऱ्या जामनिसांना ह्याही परिस्थितीत राहवले नाही. त्यांनी लगेच बसकडे धाव घेतली. परंतु एकंदरीत परिस्थिती आटोक्यात आली होती. आधीच तिथे दोन तरुण सर्व प्रवाशांना मदत करीत होते. त्यामुळे जवळजवळ सर्व प्रवासी आता रस्त्याच्या कडेला येवून बसले. जामनिस कौतुकाने ह्या तरुणांकडे पाहत होते. त्यातल्या एकाचे त्यांनी आभारहि मानले दुसरा मात्र अजूनही पाठमोरा होता तो एका वृद्ध आजोबांना उचलून आणत होता. आजोबांना उचलून आणल्यावर त्याने मागे वळून पाहिले आणि.....

पटवर्धन ह्यांचा फोन अगदी वेळेत आला होता. सकाळीच सहा वाजता जामनिसांच्या घरावर CBI ची धाड पडली होती. परंतु जामनिस मात्र त्यांना सापडले नव्हते. प्रशासनीय कामात अगदी कुशल असणाऱ्या पटवर्धनांनी दूरध्वनीची नोंद गायब सुद्धा केल्याने जामनिस असे अचानक गायब कसे झाले ह्याचा अचंबा CBI बरोबर मंत्रालयातील कम्पुलाही वाटत होता. 

No comments:

Post a Comment