Saturday, March 2, 2013

भेदी भाग २


संशयित गुन्हेगाराच्या (नाव क्ष) सर्व दैनंदिन कारभाराचा सविस्तर अभ्यास करण्यात आला होता. जामनिस सुद्धा त्या अभ्यासात सहभागी होते. एकंदरीत योजना पूर्णत्वाला जात होती. संध्याकाळच्या वेळी परतीच्या प्रवासात क्षला गाठून हिशोब चुकता करायचा असे ठरविण्यात आले.
हणम्या प्रचंड बेचैन होता. आपण होकार दिला खरा पण त्याला हे पटतच नव्हते. तरीही आई वडिलांचा केविलवाणा चेहरा डोळ्यासमोर आला की मात्र पुन्हा त्याच्या मनाचा निर्धार होत होता. अशाच बेचैनीत त्याने पुढील काही दिवस काढले. मध्येच एकदा त्याला लांबूनच क्ष चा चेहरा दाखविण्यात आला होता. हणम्याला त्याच्या कामगिरीबद्दल आगावू हप्ता देण्यात आला होता. ही रक्कम गावी पोहोचताच आईवडिलांच्या स्वरातला उत्साह त्याला काहीसा सुखावून गेला होता.
परेराने एकंदरीत सर्व परिस्थितीचा शांत डोक्याने विचार केला होता. त्याचा मेव्हणा त्याला गेले कित्येक वर्षे कॅनडात बोलावीत होता. परंतु इथल्या पैशाचा मोह त्याला अजिबात सोडवीत नव्हता. पण आताची परिस्थिती मात्र वेगळी होती. आता एकंदरीत प्रकरण जीवावर बेतेल असला प्रकार होता. म्हणूनच मेव्हण्याचा सल्ला गांभीर्याने घेण्याचे परेराने ठरविले होते. आपला पासपोर्ट नूतनीकरणासाठी त्याने पासपोर्ट कार्यालयात दाखल केला. आपल्या हालचालीवर इतक्या बारकाईने कोणी लक्ष देत असेल ह्याची त्याला तिळमात्र कल्पनासुद्धा नव्हती.
परेरावर लक्ष ठेवणारी मंडळी त्याच्या पासपोर्ट कार्यालयाच्या भेटीने एकदम सतर्क झाली. आपले लक्ष्य / भक्ष्य आपल्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे हे त्यांनी जाणले. त्यांनीसुद्धा आपल्या परीने हालचालीस सुरुवात केली.
मग तो दिवस उजाडला. हणम्याने सकाळीच अंघोळ आटोपली. देवाच्या फोटोकडे बराच वेळ टक लावून पाहताना त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. एक एक क्षण पुढे जाता जात नव्हता. ऑक्टोबर महिन्यातील हा दिवस दुपारचा उष्मा घेवून आलाच. हणम्याने गावाला फोन लावला आणि उद्या सकाळपर्यंत आपण गावी नक्की पोहोचतो असे आश्वासनही दिले. त्या आश्वासनाच्या पूर्ततेची खात्री फक्त भगवंतालाच होती.
दुपारी चार वाजता हणम्या दादर स्थानकाच्या पूर्वेला ठरल्याप्रमाणे ठरलेल्या व्यक्तीला भेटला. इतक्या रुबाबदार कपड्यांची त्याला सवय नसल्याने त्याला काहीसे अवघडल्यासारखे होत होते. वातानुकुलीत इनोवामध्ये हणम्या बसतो तितक्यात गावाहून त्याला फोन आला. खरेतर फोन घ्यायची त्याला आता बंदी होती पण बाबांचा फोन आहे हे ऐकल्यावर त्याने बाजूच्या गंभीर चेहऱ्याच्या माणसाला फक्त एक मिनिट अशी विनंती करून फोन घेतला. फोनवर बाबांचा अतिउत्साहित स्वर त्याच्या कानी पडला. सतत प्रयत्नशील असणाऱ्या त्याच्या बाबांनी लॉटरीचे तिकीट घेतले होते आणि त्यांना एक कोटीचे बक्षीस लागले होते. हणम्याने फोन ठेवला आणि त्याच्या मनात प्रचंड खळबळ माजली, गंभीर चेहऱ्याच्या माणसाने त्याला नजरेनेच सर्व काही ठीक आहे कि नाही असे विचारले. हो म्हणण्यावाचून हणम्याकडे पर्याय होता तरी कोठे? मुंबईच्या धावत्या रहदारीकडे खिडकीतून हणम्या पाहत होता. आकाशात अचानक ढगांची गर्दी होवू लागली होती. अजून इच्छित स्थळी पोहचण्यास सुमारे वीस मिनिटांचा अवधी होता. क्ष चा कार्यक्रम अपेक्षेप्रमाणे चालला होता. आपल्या लाल होंडा सिटीगाडीतून क्ष अगदी खुशीतच निघाला होता. शेवटच्या ५ -१० मिनिटात त्याचा कार्यक्रम आपल्या हातात घेण्याची त्यांना पूर्ण परवानगी होती.
परेरा आज एकदम खुशीतच होता. त्याचा पासपोर्ट नुतनीकरण करून त्याच्या हाती पडला होता. कॅनडाच्या वकिलातीच्या मुलाखतीची तारीख घेण्याचा विचार करीतच तो आपल्या ऑफिसातून लवकर बाहेर पडला. आकाशाकडे नजर टाकत आजचे सर्व कार्यक्रम रद्द करून थेट घरी जाण्याचा त्याने मनसुबा आखला. आपली नवी कोरी लाल होंडा सिटी त्याने बाहेर काढली.
क्ष अंधेरीला एस. व्ही. रोडवरून पूर्वेला जायला वळला आहे अशी खबर हणम्याच्या गाडीत पोहोचली. हणम्याची गाडी आता वेस्टर्न एक्स्प्रेस मार्गावरून अंधेरीच्या दिशेने वळली. आकाश अगदी भरून आले होते आणि अगदी कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी चिन्हे दिसत होती.
परेराच्या अनुभवी नजरेला गाडीतील आरश्यातून सतत दिसणारी निळी गाडी खुपत होती. ऑफिसातून निघाल्यापासून त्या गाडीने त्याचा पिच्छा पुरविला होता. आपला मार्ग बदलला पाहिजे असे त्याला वाटू लागले. अचानक त्याने तेली गल्लीत वळण घेतले. त्याच वेळी मोठ्या गडगडासहित पावसाची एक मोठी सर सुरु झाली. आपल्या गाडीसमोर आपल्यासारखीच लाल होंडा सिटी पाहून मात्र परेरा पुरता हैराण झाला. त्याने मुंबईतील आपल्या ड्रायव्हिंग कौशल्याला पुरते वापरून आपल्या पुढच्या सिटी गाडीला मागे टाकले.
इथे हणम्याच्या बेचैनीने अगदी कळस गाठला होता आणि त्यात पावसाने भर घातली. सिग्नलला गाडी थांबली आणि बाजुचा गंभीर फोनवर बोलण्यात गढला आहे हे पाहून त्याने पटकन दरवाजा उघडला आणि थेट धूम ठोकली. आधीच गर्दीचा अंधेरी पूर्वेचा भाग आणि त्यात ही पावसाची सर त्यामुळे हणम्या कोठे गायब झाला हे कळावयास गंभीर आणि मंडळीला वाव नव्हता. आता आयत्या वेळी प्लान वाया जाऊन द्यायचा नाही म्हणून गंभीरने आपल्या पिस्तुलाला हात घातला. निळ्या गाडीतील मंडळी हैराण झाली होती. परेरा गायब झाला कि काय अशी भीती त्यांना वाटू लागली होती, परंतु समोर लाल होंडा सिटी दिसताच त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. चिखलाने गाडीचा नंबर पडताळून पाहण्याची त्यांची संधी हिरावून घेतली होती.
निळ्या गाडीतील व्यावसायिक लोकांनी त्यांच्या समजुतीनुसार परेराचा खातमा केला होता. आजूबाजूला माजलेल्या गदारोळाची पर्वा न करता ते सफाईने तिथून पसार झाले. गंभीर आणि मंडळी घाईघाईने पोहचली खरी परंतु क्ष चा आधीच खातमा झाल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरले. म्हणायला अननुभवी. परंतु हा हणम्या तर एकदम व्यावसायिक निघाला असे म्हणून त्यांनी काम फ़त्तेचे एक दोन फोन लावले आणि शांत पणे आपली गाडी परतीच्या मार्गी लावली.
 

No comments:

Post a Comment