Friday, March 1, 2013

भेदी - भाग १


जामनिसांनी आपल्या फायलीवरून पुन्हा एकदा नजर फिरविली. फाईल परिपूर्ण बनविण्यासाठी गेले कित्येक महिने त्यांची मेहनत सुरु होती. एकदा का ही फाईल जलसंपदा मंत्र्यांच्या सचिवाकडे सोपविली की त्यांचे आजचे काम पूर्ण होणार होते. त्या पुढचा फाईलचा प्रवास एका आखून दिलेल्या रेषेत होणार होता. आणि एकदा का ह्या धरणाचे काम सावंत कंन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले की मग जामनिसाचा पुढचा प्रवास स्वप्नमय होणार होता. पुढचा एक तास जामनिसांनी बाकीचे सोपस्कार पार पाडले आणि फाईल सचिवांकडे सोपवली. अंधेरी लोकलच्या गर्दीत शिरून जामनिस निघाले ते असंख्य मुंबईकरांसारखे गर्दीत स्वप्न बघत!
पुढील काही दिवस जामनिस आणि मंडळी आपल्याला हव्या त्या बातमीची उत्कंठेने वाट पाहत होते. परंतु कोणास ठाऊक पण का ही बातमी येतच नव्हती. आणि मग बातमी आली ती मोठा धक्का देतच. धरणाचे काम सावंत कंन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले नव्हते. जामनिसांना मोठा धक्का बसला. पुढील सर्व स्वप्नांचा तर चक्काचूर झालाच होता पण ह्या फाईलीच्या पुढील प्रवासासाठी केलेली मोठी गुंतवणूक वाया गेली होती. असला प्रकार गेल्या तीस वर्षात जामनिसांनी पाहिला नव्हता. अवैध असले तरी काय झाले ह्या जगाचे सुद्धा असूल होते आणि ह्या अलिखित नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर ह्या जगाचे अस्तित्व टिकून होते. नियम मोडणाऱ्याला एकच शिक्षा होती. आणि ती सर्वजण जाणून होते.
जामनिसांचे पुढील काही दिवस भयानक गेले. असल्या लोकांशी आपला संपर्क येईल असे त्यांनी स्वप्नात सुद्धा पाहिले नव्हते. ह्यात पहिली गोष्ट म्हणजे आपले निरपराधित्व सिद्ध करणे हे! बऱ्याच बैठकीनंतर त्यात जामनिसांना यश आले. त्यानंतरचा प्रकार मात्र भयप्रद होता. गुन्हेगार कोण ह्यावर जवळजवळ सर्वांचे एकमत झाले. आणि पुढची योजना आखण्यास सुरुवात झाली, ह्यात पडण्याची जामनिसांची अजिबात इच्छा नव्हती. परंतु ह्या दुनियेचा अजून एक नियम होता, एकदा आत शिरलेला माणूस अर्ध्या रस्त्यावरून प्रवास सोडू शकत नसे. त्यामुळे अत्यंत भयभीत अवस्थेत जामनिस हा सर्व प्रकार पाहत होते.
हणम्या आपल्या चाळीतील खोलीत निवांत बसला होता. निवांत बसला असला तरी त्याच्या मनात विचारांचे थैमान चालू होते. गावाकडे बहिणीचे लग्न उभे ठाकले होते. आणि म्हाताऱ्या आईबाबांकडे पैशाची चणचणच होती. इथे छोटी मोठी कामे करून पैसा काही साठविला जात नव्हता. त्यामुळे काहीतरी मोठे काम करावे अशी इच्छा त्याच्या मनात जोम धरू लागली होती. कालच रात्री आलेल्या आईच्या फोनने त्याच्या ह्या विचाराने उचल खाल्ली होती. अशा विचारातच दुपारी हणम्या टपरीवर गेला होता. बरेच दिवसांनी टपरीवर त्याला विजयप्पा भेटला. विजयप्पा त्या वस्तीतील एक लक्षणीय व्यक्तिमत्व होते. सगळ्या दोन नंबरच्या कामात त्याचा हात धरणारा कोणी नव्हता. तुरुंगातून त्याची ये जा चालूच असायची. तो हि आज कसल्या तरी विचारात गुंग होता. हणम्याकडे बघून सुद्धा त्याने सुरुवातीला दुर्लक्ष केले. पण थोड्या वेळाने तो तंद्रीतून बाहेर आला. हणम्याला बघून म्हणाला, 'काय रे कसल्या चिंतेत पडला आहेस एवढा?' मग थोडा वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या. तिथून बाहेर पडताना हणम्याचा चेहरा अगदी विचारमग्न होता.
बिल्डर परेरा आपल्या अलिशान ऑफिसमध्ये अगदी विचारग्रस्त होऊन बसला होता. एका अलिशान टॉवरमध्ये त्याची कोट्यावधीची रक्कम अडकून बसली होती. ह्या टॉवरच्या सर्व परवानग्या अडकून बसल्या होत्या आणि त्याच्या सर्व वित्तपुरवठादारांनी त्याच्या मागे पैशाचा तगडा लावला होता. आधी अधिकृत मार्गांनी चालू झालेला हा तगडा आता दुसऱ्या मार्गाने चालू झाल्याने परेरा आपली मनःशांती गमावून बसला होता. ह्या सगळ्या प्रकारातून बाहेर कसे पडावे हे कळत नसल्याने त्याची मती कुंठीत झाली होती.
 

No comments:

Post a Comment