Thursday, March 7, 2013

भेदी भाग ६


हणम्या आणि शैलेश बरेच दिवस विचार करीत होते. हणम्याने शैलेशला काही लपवून न ठेवता सर्व काही सांगून टाकले होते. शैलेशला आपल्या मित्राची काळजी लागून राहिली होती. मुंबई पोलिसात शेजारच्याच गावचा रमेश गेले १० वर्षे नोकरीला होता. मेहनती रमेश आता इन्स्पेक्टर पदाला पोहोचला होता. रमेश आणि शैलेश खास मित्र. शैलेशने रमेशला विश्वासात घेवून हणम्याविषयी सांगितले होते. पेपरात दररोज क्ष च्या बातम्या तर येतच होत्या. सर्व प्लान तयार होताच, 'क्ष हत्येची चौकशी अंतिम टप्प्यात' असा मथळा पेपरात झळकला आणि काही तासातच 'मंडळी गावाला निघाली' असा फोन रमेशने शैलेशला केला.
परेरा थोडाफार अस्वस्थ होत होता. थंड हवेच्या ठिकाणी येऊन एक आठवडा उलटला होता आणि तरीही दिल्लीत विसा मुलाखतीची तारीख काही मिळत नव्हती. एकाच ठिकाणी इतके दिवस राहणे धोक्याचे होते. हॉटेलच्या खोलीत बसून बसून तो कंटाळला होता. मुंबईची नंबर प्लेट त्याने एव्हाना बदलली होती आणि हा बदल हॉटेलमधील कोणाच्या लक्षात आला नसावा अशी आशा तो बाळगून होता. आज पहिल्यांदाच आजूबाजूला फेरफटका मारावा असा त्याने विचार केला होता.
रमेशचा फोन येताच शैलेश घाईनेच कामाला लागला होता. हणम्याच्या घरी अचानक हणम्या मुंबईला परतणार ह्याची धावपळ सुरु झाली आणि एका तासातच हणम्या शैलेशने बोलविलेल्या गाडीत बसून मुंबईला निघाला. आई वडिलांच्या अश्रुकडे पाहताना हणम्याच्या मनात सुरु असलेल्या वादळाची कोणालाच कल्पना नव्हती. हणम्याची गाडी बस डेपोत जाणार होती. परंतु अचानक मध्येच हणम्याला त्याचा खास मित्र भेटल्याने त्याने गाडी सोडून दिली आणि तो मित्राच्या बाईकवरून निघाला. मित्राची बाईक बस डेपोत न जाता आडबाजूच्या गावाकडे निघाली. बाजूच्या गावातील एका उसाच्या मोठ्या मळ्यात हणम्या उतरला. आणि मळ्यातील कामगारात एकाची वाढ झाली.
एकंदरीत शैलेशची घाई कामास आली होती. हणम्या मळ्यात कामाला लागत नाही तोच 'य' पार्टी हणम्याच्या घरापर्यंत पोहोचली होती. घराचा कानाकोपरा त्यांनी उलथून काढला. बिचाऱ्या वयस्क आईवडिलांची त्यांनी रांगड्या भाषेत चौकशी केली. शेवटी नाईलाजाने हणम्या मुंबईची बस पकडून गेला ही बातमी वडिलांनी त्या गुंडांना दिली. हे ऐकताच सर्व काही सोडून ते सर्व गाडी बसले आणि बस डेपोच्या मार्गाची चौकशी करत निघाले. एका शांत गावात झालेल्या असल्या प्रकाराने तिथे एकदम खळबळ माजली. मुंबईपासून इतक्या लांबवर आल्याने तोंडावर फडके टाकून वावरण्याची काळजी ह्या लोकांनी घेतली नव्हती.
हणम्याच्या गावात पोहोचताच जामनिस एकदम खुश झाले. हे सगळे प्रकरण आटोपताच काही महिन्यात मुंबईचा गाशा गुंडाळून अशाच एका शांत गावी स्थिरस्थावर व्हायचे मनसुबे ते रचू लागले. जीप एव्हाना बस डेपो पार करून जात होती. जामनिसांच्या दक्ष नजरेने अजून एका सुमोच्या मुंबई नंबर प्लेटची मेंदूत नोंद केली. सुमो पूर्ण नजरेआड होता होता एक ओळखीचा चेहरा दिसल्यासारखे त्यांना वाटले. अर्धा मिनिट गाडी पुढे जात नाही तोच त्यांनी गाडी परत फिरविण्याचा इशारा केला. हा ओळखीचा चेहरा आताच्याच वाटाघाटीतील होता ह्याची त्यांना खात्री झाली. गाडी परत फिरताफिरता त्यांनी वरिष्ठांना फोन करून ही धक्कादायक बातमी दिली. आश्चर्यचकित झालेल्या वरिष्ठांनी जामनिसांना सबुरीने धोरण स्वीकारण्याचा सल्ला दिला. संशय खरा असल्यास त्या लोकांशी थेट पंगा न घेता त्याच्या मागावर राहण्याचे जामनिसांना सांगण्यात आले.
संशय तर खरा होताच. मंडळी संपूर्ण बस पिंजून काढत होती. हणम्या न मिळाल्याने निराश झालेली मंडळी सीटची मोडतोड करीतच खाली उतरली. चाणाक्ष शैलेशने एव्हाना हणम्याच्या आईवडिलांना घरून हलविले होते. आणि घरात प्रशिक्षित कुत्रांची फौज लपवून ठेवली होती. य पार्टी बघता बघता गायब झाली. स्वतःचे अस्तित्व लपवायला बसलेले जामनिस त्यांच्या अचानक गायब होण्याचे एकदम वैतागले परंतु वरिष्ठांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला व तिथेच आसपास मुक्काम करावयास सांगितले.
गावातून फेरफटका मारून परतलेला परेरा स्वागतकक्षातील पोलीस मंडळींना पाहून एकदम चरकला. जमेल तितका चेहरा लपवित त्याने खोलीत पोबारा केला. 

1 comment:

  1. शेवट अजुन रंजक करावयास हवा होता

    ReplyDelete