Wednesday, March 20, 2013

सर्वांगीण विकासाची ऐसी की तैसी !


मानो वा ना मनो प्रत्येकजण कोणत्या न कोणत्या बाबतीत पूर्वग्रहदुषित दृष्टीकोण बाळगून असतो. मी ही आधुनिक एका अग्रगण्य इंग्लिश पेपरच्या दैनंदिन पुरवणीविषयी आणि त्यातील तथाकथित नायक नायिकाच्या बातम्याविषयी असाच दृष्टीकोन बाळगून आहे. कोणताही विचार न करता एखादा बिनकामाचा पेपर हवा असेल तर मी ही पुरवणी उचलतो. तीच गोष्ट ह्या पेपरच्या मुख्य आवृत्तीमधील आतल्या काही पानांची. परंतु कधीतरी इथे आपल्या हा पूर्वग्रहाला छेद देणारी एखादी चर्चा वाचनात येते.
विषय होता अपत्य न होवून देण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेणार्या काही आधुनिक स्त्रिया. त्यातील काहीजणींनी केवळ समाज म्हणतो म्हणून मुले होवू देणे कसे चुकीचे आहे ह्यावर आपले विचार मांडले. एकीने मला माझे स्वच्छंदी आयुष्य कसे प्रिय आहे आणि म्हणून मी मुलांना न्याय देवू शकणार नाही असा विचार मांडला. मी माझा पूर्वग्रह बाजूला ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याने त्यांनी अकलेचे तारे तोडले असे म्हणत नाही ह्याची सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी. असो ह्यात लक्षात राहिली ती एकीची प्रतिक्रिया, ती म्हणाली मला तर मुंबईत राहणे भाग आहे. ज्या प्रकारच्या स्पर्धात्मक वातावरणात ही मुंबईची मुले वाढतात ते पाहून मला कसेसेच होते. ही मुले तंत्रज्ञानाच्या अगदी आहारी गेली आहेत. मी अगदी खुश झालो जणू काही http://nes1988.blogspot.in/2013/03/blog-post_17.html मधले विचार ती मांडत होती. ती पुढे म्हणाली की आपण मुले वाढवत नसून रोबो वाढवत आहोत आणि मला माझे मुल अशा प्रकारे वाढलेले आवडणार नाही आणि म्हणूनच मी मुल न होवू देण्याचा निर्णय घेतला. आता ही एकदम टोकाची भूमिका आहे हे मान्य, म्हणजे दुसऱ्या छोट्या शहरात जावून सुद्धा मुले वाढविता येतील परंतु ह्यातल्या 'आपण रोबो वाढवत आहोत' ह्या वाक्याने मला खळबळून टाकले.
हल्ली सर्वांगीण विकास ह्या संकल्पनेने धुमाकूळ घातला आहे. क्रिकेट, फुटबॉल, गायन, चित्रकला, हस्तकला, सितार / गिटार वादन हे आणि अनेक असंख्य पर्याय मुलांच्या सर्वागीण विकासासाठी वापरले जातात. परंतु मुलांना त्यात खरोखर आनंद मिळतो कि नाही ह्यावर फारसा विचार केला जात नाही. संगणक आणि भ्रमणध्वनीवरील खेळ ह्यात तर मुले तरबेज झालीच आहेत. खरा प्रश्न उद्भवतो तो जेव्हा मुले १० -१२ च्या आसपास येतात. त्यावेळी ती ह्या सर्व सर्वांगीण विकासाच्या पलीकडे गेलेली असतात आणि ह्या वेळी त्यांच्या मोकळ्या वेळीतील अत्यंत सक्रिय असलेल्या मेंदूला खाद्य देण्याचे पर्याय फार कमी पालकांकडे उपलब्ध असतात. मुद्दा असा आहे की मुलांच्या पूर्ण आयुष्याचा विचार करा. त्यांना तंत्रज्ञान कला क्रीडा ह्यात लहानपणीच पूर्ण गुंतवून मग वयाच्या १५ व्या वर्षी वाऱ्यावर सोडून देवू नका. त्यांच्या सर्वांगीण विकासाचा आलेख हा कमी वेगाचा असला तरी चालेले परंतु तो अचानक अर्ध्यावर सोडला जाता कामा नये.
लहानपणापासून मोकळा वेळ शांतपणे घालविण्याची क्षमता मुलांच्यात निर्माण करावयास हवी. नाहीतर माणसाच्या अर्ध्या समस्या त्याच्या रिकामी वेळ शांतपणे खोलीत न घालवता येण्याच्या त्रुटीने निर्माण होतात ह्या वाक्याचा प्रत्यय येईल.
 

No comments:

Post a Comment