Monday, March 11, 2013

नरसिंह राव ते मिकी आर्थर आणि NO DECISION IS A DECISION


आपल्या भारताचे माजी पंतप्रधान नरसिंह राव हे त्यांच्या निर्णयविलंबनाच्या धोरणाबद्दल प्रसिद्ध (वा कुप्रसिद्ध) होते. एखाद्या कठीण समस्येवरील निर्णय घेण्याचे काही काळ टाळले तर काही वेळा ती समस्या आपसूकच सुटते असा त्यामागचा विचार असे. त्यांच्या ह्या धोरणावर तेव्हा फार टीका झाली. कणखरपणाचा अभाव असल्याने त्यांनी हे धोरण स्वीकारले अशी टीकाही झाली.
आता वळूयात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर ह्यांच्याकडे! भारताकडून पहिल्या दोन क्रिकेट सामन्यात पराभव झाल्यावर त्यांनी एकदम आणीबाणीचे बटन दाबले. आधुनिक व्यवस्थापन शास्त्रानुसार त्यांनी सर्व खेळांडूकडून पराभवाच्या कारणाबद्दल आणि परिस्थिती कशी सुधारता येईल त्याबद्दल मते मागविली. चार चांगल्या खेळाडूंनी आपली मते ठरलेल्या मुदतीपर्यंत न दिल्याने मिकी साहेबांचा पारा चढला आणि त्यांनी ह्या मातबर खेळांडूना तिसऱ्या कसोटीतून वगळण्याचा निर्णय घेतला. आता या निर्णयाने शेन वाटसनचे डोके सणकले आणि त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. आता पहा प्रश्न अधिकच गहन झाला.
शांत डोक्याने विचार केला तर असे जाणवते की भारताने पहिल्या दोन कसोट्या जिंकल्या म्हणजे भारतीय कंपूत सर्व काही आलबेल आहे असे नाही. हैद्राबाद कसोटीत विजय आणि पुजाराची ३७० ची भागीदारी आणि धोनी, विराट सोडले तर बाकी फलंदाज ढेपाळले होते. तिसरी कसोटी मोहाली इथे आहे जिथे वेगवान गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी आहे. तिथे PATTINSON ला वगळून मोठी धोरणात्मक चूक मिकी साहेब करीत आहेत.
एकंदरीत काय हल्ली आपली सहनशीलता कमी झाली आहे आपण प्रत्येक ठिकाणी झटपट उपायाच्या मागे असतो, ह्याची उदाहरणे अनेक, जरासा सर्दी खोकला झाला की घ्या औषध, कार्यालयात जरासे न पटेनासे झाले की सोडा नोकरी अजून पुढे म्हणजे नवराबायकोचे थोडे पटेनासे झाले की घ्या घटस्फोट! परंतु एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक झटपट निर्णयांचे दुष्परिणाम असतात. त्यामुळे असे निर्णय घेतांना सर्व घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. काळ सुद्धा काही समस्यांचे उत्तर देवू शकतो. धोनिचेच पहा ना इंग्लंड, ऑस्ट्रेलियातील आपली ४ - ० धुलाई कोणाला आठवते तरी का सध्या?
 

No comments:

Post a Comment