Thursday, January 3, 2013

पट मांडला - भाग नववा



मुंबईत पक्षाचे प्रवक्ते चिंतामण जोशी ह्यांनी पत्रकार परिषद बोलावली. विश्वासराव ह्यांच्या शेतात सापडलेला जखमी कार्यकर्ता हे विरोधी पक्षाचे कारस्थान आहे आणि विश्वासराव हे निर्दोषी आहेत अशी ग्वाही ते देत होते.
गावात मात्र घडामोडींना जोरदार वेग आला. संपतरावांनी विरोधी पक्षातर्फे आपला अर्ज दाखल केला. वसंतराव आणि नगर जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांच्या अर्ज भरण्याच्या वेळी जातीने उपस्थित होते. ह्या बातमीने सत्ताधारी पक्षाला जोरदार धक्का बसला. गावातही चर्चेला उधाण आले. चिंतामण जोशी ह्याची परिषद चालू असताना तिथेही संपतरावांच्या बंडखोरीची बातमी कळली. आधी ही अफवा आहे असे सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा त्यांनाही फोन आला त्यावेळी मात्र मी अधिक माहिती मिळवून मगच बोलीन असे ते म्हणाले. पक्षातील बंडखोरांची गय केली जाणार नाही असा इशाराही जाता जाता देण्यास ते विसरले नाहीत.
इन्स्पेक्टर जाधवांना परत ह्या केसवर बोलविण्यात आले. हणम्याला अत्यंत कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले. सुजितकुमारांच्या डोक्यात मात्र वेगळेच चक्र फिरत होते. भाऊरावांना अडकवायचे हे तर नक्की ठरविले होते, पण त्यासाठी योग्य मुहूर्त कोणता हे त्यांना कळत नव्हते.
विरोधी पक्षनेते जितेंद्रराव मांडलेली युतीची गणिते तपासून पाहत होते. नगर जिल्ह्यातील दिवेपुरची जागा मिळण्याची शक्यता आता अधिक दाट झाली होती. ह्या निमित्ताने संपत रावासारखा होतकरू युवा नेता पक्षाला मिळाला आणि आता त्यांना मोठ्या समीकरणात कसे गुंतवता येईल ह्याची जितेंद्रराव स्वप्ने पाहत होते.
ह्या निमित्ताने दिवेपूर गाव खाजगी प्रादेशिक वाहिनींच्या बातमीपत्रातही झळकले. 'सासऱ्या - जावयाचा जंगी मुकाबला' ह्या ठळक मथळ्यावर ह्या वाहिन्यांच्या निवेदिका गळ्याच्या शिरा ताणून आपल्या परीने बातमी रंगवून सांगण्याचा प्रयत्न करीत होत्या. परंतु मुंबईत बसून अशी सनसनाटी लढत कव्हर करायची हे मायदेश वाहिनीच्या प्रमुखाला पटत नव्हते. त्याने आपली खास वार्ताहर आश्लेषा हिला थेट दिवेपूरला पाठविण्याचा निर्णय घेतला. अजून एक वाहिनीचा प्रमुख ह्या घटनेवर मराठी मालिका बनविता येईल का ह्याची चाचपणी करीत होता.
भाऊराव आता विश्वासरावांच्या प्रचारात पूर्ण गुंग झाले होते. मतदारसंघात त्यांनी विश्वासरावांना घेवून प्रचारसभांचा जोरदार बार उडवून दिला होता. पक्षाने (आणि संपतरावांनी केलेल्या) कार्याची त्यांनी विस्तृत पत्रके बनविले होती आणि ती सर्वत्र वाटली होती. अण्णासाहेब ह्यांची प्रचारसभा तर त्यांनी नक्की ठरविली होती त्यावर मुकुल ह्यांचे जर राज्यात प्रचारासाठी येणे झाले तर त्यांनाही मतदारसंघात बोलाविण्याचा त्यांचा मनसुबा होता. प्रचाराच्या दोन दिवसानंतर मात्र चहा पिता पिता भाऊरावांना जाणविले की आपणच इथे जास्त मेहनत करतोय. जे उमेदवार आहेत ते विश्वासराव मात्र अलिप्तपणे ह्या सर्व कार्यक्रमांत केवळ एक कर्तव्य म्हणून भाग घेत आहेत. भाऊरावांच्या मते रमेश तसा कमी अकलेचा पण तोही चहाचे घोट घेत घेत म्हणाला 'पट मांडला खरा, पण पांढरी सोंगटी कोणती आणि काळी कोणती हे ही कळेनासे झालया!' त्याच्या तोंडून हे वाक्य ऐकून भाऊराव चमकलेच. पण नंतर ते ही म्हणाले 'सोंगट्याचे जाऊद्यात, पांढरा वजिराचाच इरादा काय आहे हेच कळेनासे झाले आहे!'

No comments:

Post a Comment