Sunday, January 6, 2013

मॉल, पिझ्झा, IPL आणि उंचावलेली जीवनशैली



मागे अशाच एका चर्चेच्या वेळी एक मुद्दा बोलण्यात आला. कोणत्याही कालावधीत जुनी आणि नवीन पिढी यांत संघर्ष सुरूच असतो. ही इतिहासापासून परंपरा आहे. जुन्या पिढीला नवी पिढी बंडखोर आणि परंपरांचे पालन न करणारी वाटते तर नव्या पिढीला जुनी पिढी बुरसटलेल्या विचाराची वाटते. प्रत्येक कालावधीत जी पिढी जिंकते ती त्या कालावधीचे भवितव्य ठरविते . सध्याच्या कालावधीत हा संघर्ष थोडा असमान शक्तींचा सुरु आहे, कारण सध्याची जुनी पिढी नवीन तंत्रज्ञानाने हबकून गेली आहे. तिने आपला आत्मविश्वास गमाविलेला आहे आणि त्यामुळे नव्या पिढीला निर्बंध घालणारे जुन्या पिढीतील फारशी लोक नाही आहेत. परंतु चित्र वाटते तितके निराशावादी नाही आहे. तंत्रज्ञानाने शिकली सवरलेली पिढी आता चाळीशी ओलांडून गेली आहे. वयामुळे येणारी परिपक्वता ह्या पिढीत आली आहे आणि त्याच वेळी तंत्रज्ञानाची भीतीही ह्या लोकांना नाही, त्यामुळे जुन्या आणि नवी पिढीतील संघर्षात ही चाळीशीच्या आसपासची लोक मोलाची कामगिरी बजावेल अशी अपेक्षा आहे.
जर आपण १९९० साल, हे भारतातील आर्थिक बदल सुरु होण्याचे प्रमाणभूत वर्ष मानले तर त्यानंतर गेल्या २० वर्षात आलेल्या नवीन गोष्टी कोणत्या? मॉल, पिझ्झा, IPL , विभक्त कुटुंबे, मैदानी खेळाकडून संगणकीय खेळांकडे संक्रमण, उंचावलेली जीवनशैली अशी अनेक उदाहरणे देता येतील. भारतीयांचा एकंदरीत समाज म्हणून विचार केला तर ह्या सर्व गोष्टी पिढ्यानपिढ्या भारतीयांनी अनुभवल्या नव्हत्या त्यामुळे एक समाज म्हणून ह्या गोष्टींचे आकर्षण आपणास वाटणे स्वाभाविक होते. परंतु आता वीस वर्षांचा कालावधी ओलांडून गेल्यावर एक समाज म्हणून ह्या गोष्टींकडे एका प्रगल्भतेने बघण्याची आवश्यकता आहे. ह्यातील कोणत्या गोष्टी किती प्रमाणात स्वीकारणे सामाजिक आणि वैयक्तिक स्वास्थाच्या दृष्टीने योग्य आहे याचा वैयक्तिक पातळीवर विचार करणे आवश्यक आहे. आता वैयक्तिक पातळीवर का तर आज कोणीही दुसऱ्याचे सहजासहजी ऐकत नाही. काळ कितीही बदलो, तुमचे तुमच्या जवळच्या नातेवाईकांशी संबंध जर एकदम सुदृढ असतील तर बाकीच्या अन्य घटकांची प्रतिकूलता सहज सहन करू शकता. गेल्या काही वर्षात आपण आर्थिक प्रगतीकडे लक्ष केंद्रित केल्यावर आता पुन्हा काही काळ वैयक्तिक नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करायला हवे. सध्याच्या आर्थिक स्थितीत झपाट्याने प्रगती करण्याची गरज नाही आहे ती कायम ठेवली म्हणजे झाले.

No comments:

Post a Comment