Thursday, January 10, 2013

दिल्लीतील दुर्देवी घटना



गेल्या महिन्यात दिल्लीतील घडलेल्या दुर्देवी घटनेबद्दल बऱ्याच जणांनी लिहिले. त्यातील काही मुद्दे मला वेगळे वाटले. त्यांचा हा संक्षिप्त आढावा.
१> दिल्ली शहराची संरचना - लेखकाच्या म्हणण्यानुसार दिल्लीची जी गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे त्यात लांबलचक पसरलेले रस्त्यांचे जाळे आहे. ह्या रस्त्यांच्या आजूबाजूचा बराचसा भाग अजूनही मोकळा आणि निर्जन आहे. रस्त्याच्या नाक्यावरील किराण्याचे दुकान, रस्त्यावरील वर्दळ हा प्रकार तिथे अस्तित्वात नाही. रस्त्यावरील कान आणि डोळे उपस्थित नसल्यामुळे रात्री एकट्या स्त्रियांसाठी असा भाग धोक्याचा ठरू शकतो. अमेरिकतही अशी स्थिती आहे पण तिथे बहुतांशी लोकांकडे स्वतःची वाहने असल्याने तुम्ही सामान्य परिस्थितीत बर्यापैकी सुरक्षित असू शकता. माझे म्हणणे - थोडक्यात काय तर भारतातील शहरे हळू हळू फक्त श्रीमंत लोकांसाठी राहण्यायोग्य बनू लागली आहेत. अशा शहरात राहण्यासाठी तुमच्याकडे आर्थिक ताकद असणे आवश्यक असते. अन्यथा तुम्हाला दुष्कर जीवनाचा मुकाबला करावा लागतो. जर तुमच्याकडे आर्थिक ताकद नसेल तर तुम्हाला खूप सतर्क राहावे लागते. एखाद्या शहरातील सुरक्षित ठिकाणे, वेळा ह्याची प्रथम माहिती करून मगच तिथे जाण्याचे धाडस करावे.
२> उत्तर भारतीय पुरुषांची मानसिकता - उत्तर भारतातीलच एका कवी / लेखकाने हा काहीसा चाकोरीबाहेरचा विचार मांडला. तो म्हणतो की उत्तर भारतीय पुरुषांनी बरीच वर्षे परकीयांचे आक्रमण सहन केले, फाळणीचा मोठा फटकाही त्यांना बसला. ह्या दोन्ही प्रकारात त्यांनी आपल्या नातलग स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराचा विदारक अनुभव घेतला. ह्या अनुभवांमुळे त्यांच्या मनात एक प्रकारची कटुता निर्माण झाली. आपल्या कुटुंबावर ओढविलेल्या दुर्धर प्रसंगाला स्त्रिया जबाबदार आहेत अशी काहीशी मानसिकता त्यांच्यात निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्या मनातील स्त्रियांविषयीची आदरभावना नष्ट झाली आहे. त्यांची ही मानसिकता बदलण्यासाठी समुपदेशाची गरज आहे असे त्याचे म्हणणे होते. प्रथम दर्शनी मी हे म्हणणे अजिबात स्वीकारले नाही. परंतु नंतर मात्र ह्या विचाराचा थोडा खोलवर जाऊन विचार करावा असे मला वाटले. त्यावर पुन्हा कधीतरी.
आता माझे काही म्हणणे. स्त्रियावर अत्याचार करणाऱ्या भारतातील लोकांचे मानसिकदृष्ट्या आधुनिकता स्वीकारलेले आणि न स्वीकारलेले असे दोन प्रकार आहेत. मानसिक आधुनिकता स्वीकारलेले लोक प्रथम आपल्या लक्ष्याला वश करून घेण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यात यश न आल्यास मग ते निषिद्ध मार्ग अवलंबितात. शहरातील स्त्रियांचा मुख्य प्रश्न म्हणजे त्यांना सार्वजनिक जीवनात मानसिक दृष्ट्या मागासलेल्या पुरुषवर्गाचा बऱ्याच वेळा सामना करावा लागतो. स्त्रियांच्या आधुनिक पेहरावाचा, बोलण्या चालण्याचा ते वेगळा अर्थ घेतात. त्यांच्याशी सामना करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहावे लागेल.
एकंदरीत काय तर एक तर आर्थिक दृष्ट्या खूप सबळ बना आणि तसे जमत नसेल तर मग सार्वजनिक जीवनात खूप सतर्क राहा. एखाद्या समाजातील सर्वात दुर्बल घटकाच्या स्थितीवरून त्या समाजाच्या परिस्थितीचा अंदाज बांधायचा झाल्यास आपली स्थिती झपाट्याने ढासळत चालली आहे हे मात्र नक्की.

2 comments:

  1. १. दिल्लीचा काही भाग असा निर्जन असतो - अगदी दिवसाही - हे मान्य. पण हे आता ब-याच शहरात आहे. शहर श्रीमंत लोकांसाठी असं नाही म्हणता येणार (कारण त्यांना घरी मोलकरीण, ड्रायव्हर, लागतातच!) पण शहरातला काही भाग फक्त त्यांच्यासाठी राखीव ठरत जातो आहे.
    २. मुद्द्यात थोडी गफलत झाली आहे. प्रश्न स्त्रियांमुळे निर्माण झाला म्हणून त्यांच्याबाबत आदर कमी झाला असं नाही. तर 'बदला घेण्यासाठी स्त्रीचा वापर करता येतो' याचा अनुभव आहे म्हणून स्त्रियांवर अत्याचार होतात. शत्रूच्या स्त्रीवर बलात्कार करण्याची, तिचे हरण करण्याची पद्धत फार जुनी आहे. शिवाय अत्याचार हे सत्ता गाजवण्याचे एक साधन असते हे पुन्हपुन्हा दिसून आले आहे.

    आणि ही मानसिकता फक्त उत्तरेत आहे असं म्हणता येणार नाही. महाराष्ट्रातही अनेक घटना झाल्या आहेत, होत आहेत - दुर्दैवाने पुढेही होत राहतील जर आपण काही धडा शिकलो नाही आणि बदल केले नाहीत तर!

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

      तुमचा पहिला मुद्दा अगदी मान्य. शहरातील काही भाग फक्त श्रीमंतांसाठी राखीव ठरला जात आहे.

      दुसरा मुद्दाही योग्य आहे. फक्त सध्याची जी स्त्रियांवरच्या अत्याचाराची उदाहरणे आहेत त्यात ह्या स्त्रिया काही कोण्या शत्रूपक्षातील नाहीत. किंबहुना आपल्या पुरुषी वर्चस्वाच्या अहंकाराला कुठेतरी ठेच लागली म्हणून त्याचे वैफल्य काढण्याचा मार्ग म्हणून हे अत्याचार केले जात असावेत.

      Delete