Monday, March 18, 2013

भेदी भाग ८


हणम्याच्या आकस्मिक खुनाच्या बातमीने सगळीकडे हलकल्लोळ माजविला. थंड हवेत जीव सुखाविलेल्या चौकशी पथकाला अचानक जागृत व्हावे लागले. एकदा का हणम्याला पकडले की सर्व काही प्रकरण बासनात गुंडाळून ठेवावयास सोपे जाणार होते. परंतु आता हणम्याच ह्या भूतलावरून नाहीसा झाला होता आणि त्याच्या खुनाच्या चौकशीचे नुसते लचांड आता चौकशी पथकाच्या मागे लागले होते. ज्या सर्व गटांनी मिळून हे कारस्थान रचले ते आता एकमेकांकडे प्रचंड अविश्वासाने पाहू लागले होते. त्यांच्यातील संवाद आता संपुष्टात आला होता. जे काही प्रयत्न आता करायचे होते ते चौकशी पथकाला प्रभावित करण्याचे. जामनिस गट, य पार्टी त्याच प्रयत्नात गुंतले होते.
चौकशी पथकाला मात्र आता सर्व बाह्य घटक सोडून देऊन प्रामाणिकपणे चौकशी करणे भाग पडले होते. क्ष च्या खुनाच्या वेळी हजर असलेल्या प्रत्यक्षदर्शी लोकांची त्यांनी साक्ष काढली होती. त्यातील एकाने गोळी मारणाऱ्या माणसाचा चेहरा बघितला. त्याने केलेल्या वर्णनानुसार खुन्याचे रेखाचित्र बनविण्यात आले. हे रेखाचित्र बनविण्यात आले आहे ही बातमी आतल्या वर्तुळात फुटताच निळी गाडी पार्टी प्रचंड बैचैन झाली. आपल्या परीने हे चित्र दाबून ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली. त्यांचे खाशा लोकांना फोन चालूच होते की एका खासगी वाहिनीवर हे संशयित खुन्याचे चित्र फुटले. हे चित्र फुटताच जामनिस हादरले. हा संशयित खुनी वाटाघाटीत सतत पुढाकार घेत असे. निळी गाडी पार्टीचा पराकोटीचा संताप झाला होता.
अशा प्रचंड अनिश्चित वातावरणातच दुसरी सकाळ उजाडली. जामनिसांना झोप तर लागली नव्हती. बायकोने सकाळी उठवून चहाचा कप त्यांच्या हाती सोपविला. जामनिसांनी चहाचा घोट घेतच दूरदर्शन संच सुरु केला आणि त्यांच्या हातातून चहाचा कप निसटलाच. निळी गाडी पार्टीने आपला बदला घेतला होता. निळी गाडी पार्टीला इतक्या सर्व चर्चेत जी काही माहिती मिळाली होती ती सर्व 'गगनभेदी बातमी' च्या नावाखाली त्या खासगी वाहिनीवर यथासांग झळकत होती. मंत्रालयातील बड्या प्रस्थांच्या नावांचा त्यात पुराव्यानिशी उल्लेख करण्यात आला होता. आता हे प्रकरण व्यवस्थितपणे बड्या घोटाळ्यात समाविष्ट झाले होते.
परेराला एकंदरीत ह्या सर्व गोंधळात फुरसत मिळाली होती. निळी गाडी पार्टीचे त्याच्याकडे व्यवस्थित दुर्लक्ष झाले होते. त्याने ह्याचाच फायदा उठवीत कॅनडाचा विसा मिळविण्यात यश मिळविले आणि एका मध्यरात्रीच्या विमानाने परेरा आपल्या बायकोमुलासहित कॅनडाला रवाना झालाही! कथेतील एक सबकथानक संपल्यासारखे वाटत होते.
सुदामराव, शैलेश, हणम्या आणि हणम्याचे आईवडील पुढच्या योजनेच्या तयारीत होते. सुदामरावांनी हणम्यासाठी दूरवर मराठवाड्यात राहणाऱ्या आपल्या मामेभावाच्या मुलीचे स्थळ हणम्यासाठी आणले होते आणि हणम्या पंधरा दिवसातच लग्नाचा बार उडवून तिथेच स्थिरस्थावर होण्याचा विचार करीत होता.
 

No comments:

Post a Comment