Monday, March 25, 2013

या सुखांनो या!

 
मराठी मध्यमवर्गीयांच्या नजरेतून मागील काही शतकांचा काळ पाहिल्यास ह्या वर्गाने पाहिलेली विविध स्थित्यंतरे लक्षात येतात. अगदी १७ व्या शतकातील शिवाजीराजांच्या कालावधीच्या बर्याच आधीपासून ते साधारणतः १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापर्यंत महाराष्ट्राने काहीसा युद्धाचा काळ पाहिला. अगदी थेट घरादारापर्यंत युद्ध आली नसली तरी घरातील कर्ते पुरुष मात्र सातत्याने युद्धात गुंतलेले राहायचे. त्यामुळे मध्यमवर्गीय जोडप्यांना बहुदा सुखी संसाराची स्वप्ने बघायला मिळाली नसावीत असा माझा तर्क. परंतु हे चुकीचेही असू शकते. आयुष्यभराची स्वप्ने बघायला एक क्षणही पुरा असू शकतो. त्यामुळे ह्या जोडप्यांना सुखी संसाराची स्वप्न फुरसतीत बघायला मिळाली नसावीत असे सुधारित विधान मी करू पाहतो. १८५७ नंतर थेट युद्ध जरी कमी झाली तरी इंग्रजाची राजवट आणि त्याच्या अनुषंगाने येणारे अत्याचार सुरु झाले. ह्या काळात मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती अजूनच खालावली. घरातील कर्ते पुरुष राष्ट्रप्रेमाने भारावून गेले असावेत आणि त्यामुळे त्यांना सुखी संसाराची स्वप्ने बघण्यास वेळ मिळाला नसावा. त्यामुळे गृहिणीनी आपली मने मारून नेली असावीत.

ही परिस्थिती बदलण्यास स्वातंत्र्यानंतर सुरुवात झाली असावी. युद्धे नाहीत, परकीय शत्रू नाही त्यामुळे बर्याच कालावधीनंतर पुरुषांना थोडा वेळ मिळाला. ह्या काळातील लेखक, कवी ह्यांनादेखील समरप्रसंग, शत्रू अशा विषयांपासून वेगळे विषय निवडण्याची गरज भासू लागली असावी. आणि म्हणूनच त्यांनी प्रेमाकडे आपला मोर्चा वळविला. हळूहळू पुरुष शैक्षणिक क्षेत्रात गुंतले होते. वाचनाचे प्रमाण वाढले. काही सुदैवी लोकांना मोजकीच परंतु नियमित अर्थप्राप्ती करून देणाऱ्या नोकर्याही लाभल्या. पुरुष वेळच्या वेळी घरी परतू लागले. आणि प्रथमच मराठी जोडप्यांना स्वप्नरंजनाचा वेळ मिळाला.

हे सर्व काही बदल होईपर्यंत ६०- ७० चा काल उजाडला. कृष्णधवल मराठी चित्रपटांनी देखील सुर्यकांत, अरुण सरनाईक, जयश्री गडकर ह्यांना हाताशी धरून ह्या मराठी जोडप्यांपुढे स्वप्नरंजनासाठी एक आदर्श चित्र समोर ठेवले. मराठी भावगीतकारांनी सुद्धा आपल्या परिने एकाहून एक सुरेख गीते लिहून आपला हातभार लावला. ह्या सर्व वातावरणाचा प्रभाव म्हणून मराठी जोडपी भावूक बनली त्यांनी सुखांना आपल्या घरी येण्याचे आवाहन केले. ह्या सुखांना आपल्या घरी पोषक वातावरण ठेवू असे आश्वासनही दिले. त्या आश्वासनांचा मान ठेवून सुखे मराठी मध्यमवर्गीय कुटुंबीयांकडे वास्तव्याला आली. १०-१५ वर्षे सर्व काही सुंदर चालले, ह्या पिढीची मुले शिस्तीत वाढली, शिकली आणि कर्तबगार बनली. घरात पैसा वाढला, लक्ष्मीचे आगमन झाले आणि कधीतरी, कुठेतरी सुखांची ह्या घरात कुचंबना होवू लागली. ह्या सुखांकडे पाहण्यास मध्यमवर्गीयांना वेळ मिळेनासा झाला. कौटुंबिक नात्यांची झालेली परवड सुखांना पाहवली नाही आणि एका क्षणी सुखांनी ह्या घरातून काढता पाय घेतला.

सुखांना आपल्या घरात बोलावणारी मध्यमवर्गीय पिढी आज ७० - ८० च्या वयोगटात पोहचली आहे. त्यांना अधून मधून आपल्या घरी आलेल्या सुखांची आठवण येते आणि मग त्यातच 'या सुखांनो या' हे गाणे त्यांच्या कानावर पडते आणि मग आपसूकच त्यांचे डोळे ओलावतात.

No comments:

Post a Comment