Wednesday, March 6, 2013

भेदी - भाग ५


एकंदरीत हे प्रकरण गुंतागुंतीचे होत चालले होते. मराठी वर्तमानपत्रांसोबत इंग्रजी पेपरनी सुद्धा क्ष च्या हत्येची बातमी सतत तापती ठेवली होती. मुख्यमंत्री हटाव ही महाराष्ट्रातील गेले ५० -६० वर्षे जुनी चळवळ पुन्हा सक्रिय होण्याच्या मार्गावर होती. चौकशी पथक एका विशिष्ट बिंदू पर्यंत पोहोचले होते परंतु त्या पुढे जायचे आदेश मात्र त्यांना मिळत नव्हते. चौकशी पथकातील सदस्यांना हा नेहमीचाच अनुभव असल्याने त्यांनीही हा निवांतपणा शांतपणे अनुभवायचे ठरविले होते. नेहमीप्रमाणे सत्ताधारी पक्ष ह्या सगळ्या गदारोळात अंतर्गत विरोधक आहेत कि खरे विरोधक आहेत ह्याचा छडा लावण्यात गुंतला होता. जामनिस त्यांना मिळालेल्या आदेशानुसार महाबळेश्वरची थंड हवा अनुभवत बसले होते.
मुखवटाधारी वाटाघाटीकर्त्यांच्या गुंतागुंतीच्या चर्चा आटोपल्या. समेटबिंदू ठरविण्यात आला. ह्या सर्व वाटाघाटीत सत्ताधारी गटाला मोक्याच्या काही विधानसभेच्या जागांची तिलांजली द्यावी लागली. परंतु मुख्यमंत्र्यांची खुर्ची शाबूत राहिल्याने ही किंमत तशी कमीच होती. पुढचा मार्ग ठरला होता. चौकशी पथक आपली कामगिरी पूर्ण करणार होते. क्ष च्या वैयक्तिक आर्थिक व्यवहारामुळे ही हत्या झाली असा जनतेपुढे मांडण्याचा सर्वमान्य निष्कर्ष ठरला. हणम्याला पुराव्यानिशी पकडण्यात सहकार्य देण्याचे निळी गाडी पार्टीने कबूल केले होते. आता एकंदरीत प्लान परिपूर्ण बनला म्हणून मंडळी आनंदात होती. परंतु ह्या क्लिष्ट समीकरणात असंतुष्ट राहिलेल्या एका गटाची ('य') नोंद कोणी घेतलीच नाही. हणम्याचा गेमच करून मग त्यात आपल्याला हवे त्याला गुंतवायचे अशी योजना ह्या 'य' गटाने आखली. अजून एक भेदी निघाला होता तर!
परेरा हणम्याच्या गावाशेजारी असलेल्या थंड ठिकाणी येवून पडला होता. कॅनडाचा व्हिसा दिल्लीच्या वकिलातीतून घ्यायचा त्याचा बेत होता. भ्रमणध्वनी क्रमांक बदलल्याने आपण सुरक्षित आहोत अशी त्याची भावना होती. त्याचे बिल्डिंगचे व्यवहार त्याचा विश्वासू सहकारी पाहत होता. निळी गाडी पार्टी त्यावर लक्ष ठेवून होती. आतापर्यंत त्यांना काहीच सुगावा लागत नव्हता. फक्त बँकेतून परेराच्या खात्यातून ठराविक कालांतराने रक्कम काढली जात होती. ही रक्कम कुठे जाते ह्यावर निळी गाडी पार्टी लक्ष ठेवून होती. बऱ्याच प्रयत्नाने त्यांना पुण्यापर्यंत त्याचा माग काढण्यात यश आले. आणि एक दिवस अचानक त्यांना परेराच्या थंड हवेच्या ठिकाणाचा पत्ता लागला!
हणम्याच्या गावाच्या दिशेने तीन पार्ट्या एकदम निघाल्या होत्या. एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव नसलेल्या! हणम्या जन्मठेप सजा मिळवून देण्याचा मनसुबा घेवून निघालेली जामनिसांच्या नेतृत्वाखालील पोलिसपार्टी, 'य' पार्टी आणि परेराच्या शोधार्थ निघालेली निळी गाडी पार्टी! नाट्य अगदी रंगत चालले होते!! 

No comments:

Post a Comment