Monday, March 4, 2013

भेदी भाग ४


तपासणी पथकाचा तपास दोन वेगवेगळ्या मार्गांनी सुरु होता.
पहिल्या मार्गात क्ष चे सर्व व्यवहार तपासून बघितले जात होते. धरणाच्या कामातील त्याचा सहभाग आणि हे कंत्राट मिळण्याची सर्वात जास्त शक्यता असलेल्या सावंत कंन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित असलेल्या सर्व लोकांची चौकशी असला हा प्रकार सुरु होता. एक दोन दिवसांपूर्वी खुशीत असलेल्या जामनिसांना ह्या तपासणीची ज्यावेळी कुणकुण लागली त्यावेळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.
तपासणीच्या दुसऱ्या मार्गात घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व साक्षीदारांची साक्ष घेतली जात होती. परंतु त्यातून काही ठोस निष्पन्न होत नव्हते. गाडीची नंबर प्लेट तर खोट्या क्रमांकाची होती. तीन दिवसांनी ह्या वर्णनाशी मिळती जुळती गाडी गुजरात मध्ये सापडली होती आणि ती चोरीची असल्याचे तपासात सिद्ध झाले होते. तरीही पोलिसांनी आशा सोडली नव्हती. गाडीच्या मूळ मालकाचा पत्ता त्यांनी शोधला होता आणि तिथे तपास सुरु केला होता.
निळी गाडीतील क्ष चा चुकून गेम करणारी मंडळी घाबरली होती. पोलिस मूळ मालकापर्यंत पोहचले म्हणजे ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आता वाढीस लागली होती. त्यांनी आता क्ष चा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. ही व्यक्ती कोण आणि त्यांचे अधिक तपशील काढण्यास त्यांना फारसा वेळ लागला नव्हता. त्यांच्या खबऱ्यानी जेव्हा पोलिस तपासाची पहिली दिशा धरणाच्या कामाकडे कशी वळतेय ह्याची बातमी त्यांना दिली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आणि मग थोडे अधिक तपशील मिळविताच त्यांना चित्र स्पष्ट झाले. आणि मग निळी गाडी पार्टीकडून जामनिसांना पहिला फोन आला.
ह्या फोन नंतर जामनिसांची हालत खराब झाली. सर्व सोडून हिमालयात पळून जावे असे त्यांना वाटू लागले. परंतु ह्या खेळत असे अर्धवट पळून चालणार नव्हते. निळी गाडी पार्टी त्यांचा पिच्छा सोडीत नव्हती. जामनिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ह्या खेळातील आपल्या वरिष्ठ मंडळींना ह्या सर्व प्रकारची जाणीव करून दिली. त्यानंतर जामनिसांचे वरिष्ठ आणि निळी गाडी पार्टी ह्यांच्यातील संवाद जामनिसांना काही माहित पडला नाही.
आपल्या बहीणीच लग्न व्यवस्थित पार पडलं म्हणून हणम्या अगदी खुशीत होता. आता तू सुद्धा दोनाचे चार हात कर म्हणून आई वडील त्याच्या मागे लागले होते.
जामनिसांची बेचैनी कायमच होती. निळी गाडी पार्टीकडून आलेल्या त्या दोन फोन नंतर सर्व काही शांत शांत होते. ही वादळापूर्वीची शांतता आहे हे जामनिस चांगलेच जाणून होते. आणि मग जामनिसांच्या वरिष्ठांकडून तो फोन आला. हणम्या त्या निळ्या गाडीत होता आणि क्ष चा खून हणम्यानेच केला हे सिद्ध करण्याची जबाबदारी जामनिसांवर सोपविण्यात आली होती. भेदी क्ष एका क्षणात सुटला आपण मात्र ह्यात कायमचे अडकून बसलो असा विचार जामनिसांच्या मनात डोकावलाच!

 

1 comment: