Wednesday, July 16, 2014

ब्रायटन वास्तव्य - भाग ४



श्रीकांतचा जनसंपर्क तसा दांडगा होता. आमचं वास्तव्य अजूनही प्रिमियर लॉज मध्येच होतं. एकंदरीत आम्ही  त्या हॉटेलात ६ आठवडे राहिलो होतो. श्रीकांत मात्र बाजूच्याच दुसर्या हॉटेलात राहत असे. "मी इंग्लिश टीमला जेऊ घालणार आहे. त्यांना आपल्या भारतीय जेवणाची खरीखुरी चव कळली पाहिजे" असे भावूक आवाहन श्रीकांतने आम्हा सर्वांना केले. ह्या टीमबरोबर मी काम करीत असल्याने त्याने हे भावूक आवाहन केले नसतं तरी मला मदत करावीच लागली असती. पण एकंदरीत माझ्या बोलण्यावरून श्रीकांतने माझ्या पाककौशल्याविषयी योग्य समज करून घेतला होता आणि त्यामुळे माझ्या पाठिंब्याने त्याला फारसा आनंद झालेला दिसला नाही. बाकीचे लोक तसे बेरके होते. त्यांनी श्रीकांतचे बोलणं फारसं मनावर घेतलं नाही. पण प्रफुल्ल आणि शिवा करुमांची ह्या श्रीकांतच्या बियर बैठकीतील निष्ठावंत साथीदारांनी त्याला पूर्ण पाठींबा दर्शविला.
त्या  शुक्रवारच्या संध्याकाळी रेंगाळणार्या सूर्याच्या किरणांच्या साक्षीने मी  घरी (नव्हे ५२३, प्रिमियर लॉज) ला परत निघायच्या तयारीत असताना श्रीकांतने मला गाठलं. आमची पावलं वेटरोजच्या दिशेने निघाली. सध्या सुरु असलेल्या भारत - इंग्लंड ह्या मालिकेतील मैदानात आणि खेळाडूंच्या शर्टाच्या बाहीवर लावलेल्या वेटरोजच्या जाहिरातीमुळे ह्या आठवणी जागृत झाल्या. वेटरोजमध्ये कोलंबी, कच्च्या चिकनचे अनेक बंद पॅंक्स, बटाटे, कांदे, टोमाटो अशी जय्यत खरेदी करून आम्ही श्रीकांतच्या हॉटेलकडे निघालो. तज्ञ प्रफुल्ल आणि शिवा तिथे आधीपासून तयार होतेच. मंडळी तयारीला लागली. ब्रायटनला बादशाह नावाचे एक अरब मालकाचे दुकान होते. तिथे सर्व भारतीय मसाले वगैरे मिळत. तिथून विविध मसाले आणण्यात आले होते. नंतरच्या दिवसात असेच एकदा मी दुध्याच्या आठवणीने भावूक झालो असता ह्या दुकानातून २.२९ पौंड ह्या किमतीला दुधी खरेदी करून त्याची भाजी बनवली होती. असो चिकन, कोलंबी ह्या सर्व मांसाहारी पदार्थांना मसाले लावून (मेरीनेट) मुरवण्यासाठी ठेवण्यात आले होते. श्रीकांतने खरेदी उदार मनाने केली होती. ११ जणांची टीम आणि डोमिनिकचं कुटुंब मिळून १३-१४ मंडळी असली तरी त्याने ५- ६ डझन पिसेस आणले होते. त्याला मसाले लावता लावता प्रफुल्ल आणि शिवा कंटाळू लागताच श्रीकांतने बियरचे कॅन्स उघडले. त्यामुळे मंडळी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागली. ह्यातील उरलेल्या पिसेसना परत घेऊन यायचं आश्वासन श्रीकांतने मंडळींना दिलं. मी शनिवारी मांसाहार करणार नाही असं टुमणे चालू केल्याने श्रीकांतने बटाट्याची ओली भाजी बनविण्याचे आश्वासन दिलं.
दुसऱ्या दिवशी अकरा वाजताच्या सुमारास एक टॅक्सी करून त्यात हा सर्व कच्चा माल भरून आम्ही डोमिनिकच्या घराकडे प्रस्थान केलं. ठरलेल्या वेळेपेक्षा थोडा उशीरच झाल्याने मंडळी तशी तणावाखालीच होती. आम्हांला पाहताच त्यांचा जीव भांड्यात पडला. डोमिनिकचे घर अगदी प्रशस्त होते आणि घराला तीन मजली होते. आणि मागे  छोटीशी बाग होती. श्रीकांतने ताबडतोब किचनचा ताबा घेऊन चिकन ओवनमध्ये भाजण्यासाठी ठेवले. एका बाजूला बटाट्याची ओली भाजी करण्यास टाकली. मंडळी बियरचा मुक्तपणे आस्वाद     घेण्यात दंग होती. त्यांचा जोर पाहून मी सुद्धा कोकचे दोन तीन कॅन रिचवून टाकलेच. खरपूस भाजल्या जाणार्या चिकनचा खमंग वास बंगल्यात आणि बंगल्यामागील बागेत दरवळत होता. क्षणाक्षणाला माझा शनिवारी मांसाहार न करण्याचा निर्धार कमकुवत बनत चालला होता. काही वेळाने श्रीकांतला भात बनवावं लागेल ह्याचं स्मरण झालं. त्याने तत्काळ मला पाचारण केलं. नशिबाने भात चांगला जमला. जेरेमीने पापडंम भाजून काढले.
एका इंग्लिश माणसाच्या घरात एका जूनच्या प्रसन्न शनिवारी कोलंबी, खरपूस भाजलेलं चिकन, बटाटा ओली भाजी, पापड, स्वतः बनविलेला भात आणि बियरने धुंद झालेल्या इंग्लिश माणसाच्या गप्पा ऐकताना कसे मस्त वाटत होते. डोमिनिकची तीन चार वर्षांची मुलगी खरपूस भाजलेल्या चिकनचा आस्वाद घेताना पाहून डोमिनिकची पत्नी बेवर्ली अगदी खुश होत होती. जेवणं - गप्पा अगदी तीन वाजेपर्यंत रंगल्या. मग डॉमिनिकच्या थोड्या धास्तावलेल्या चेहर्याकडे पाहत आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे किचनच्या साफसफाईला लागलो. एव्हाना श्रीकांतला बहुदा प्रफुल्ल आणि शिवा आठवले असावेत. त्याने उरलेले पिसेस परत नेण्याचा मानस व्यक्त करताच बेवर्लीने वेगळा विचार व्यक्त केला. मुलीला हे पिसेस खूप आवडल्याने मी हे ठेवले तर चालेल का अशी विनंतीवजा सूचना केली. प्रफुल्ल आणि शिवा ह्यांना कसे तोंड द्यावे ह्याचा भययुक्त विचार करीत श्रीकांतने काहीशा नाईलाजाने ह्या प्रस्तावाला मान्यता दिली.
दिवस अगदी मस्त चालले होते. सध्या अमेक्स टीमचा विषय सुरु असल्याने एक पुढील महिन्यातील गोष्ट सांगतो!
ली आणि टीम आम्हांला अगदी त्यांच्यातले समजून प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करून घेत. असाच एक "टीम बिल्डींग" अर्थात संघभावना विकसित करण्याचा कार्यक्रम गुडवूड येथील अश्वशर्यतीच्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. तिथल्या प्रवेशाचे तिकीट २१ पौंड होते. आम्हांला सुद्धा लीने बोलावलं. सकाळी दहाच्या सुमारास बस ऑफिसच्या प्रवेशद्वाराशी आली. तिथून मग त्या बसमधून स्नॅक्सचा आस्वाद घेत आम्ही गुडवूड कडे निघालो. बसमध्ये विविध प्रकारचे गेम खेळले जात होते. त्यात मी सुद्धा चांगली कामगिरी बजावत होतो. ब्लॅक कैप म्हणजे न्यूझीलंडचा संघ असे उत्तर दिल्याचं मला आठवत.
सकाळी मी टीव्हीवरील बातम्यात मुख्य शर्यतीचा अंदाज वाचला होता आणि त्यात एका घोड्याला 'डार्क हॉर्स' म्हणून संबोधिण्यात आले होते. मी ऑफिसात आल्यावर मोठ्या उत्साहात हा अंदाज सर्वांना सांगितला. पण सर्वांनी मला वेड्यात काढलं होतं.
गुडवूडचे वातावरण उत्साहाने भारलेलं होतं. सूर्य निळ्या आकाशात चमकत होता आणि हिरव्यागार गुडवूडच्या परिसरात आम्ही हिंडत होतो. मुख्य शामियान्यात सुंदर इंग्लिश ललना पारंपारिक हॅट्स घालून स्थानापन्न झाल्या होत्या. माझ्यासाठी हे नवीनच विश्व होते, अशा सुंदर अनुभवासाठी मी सिंटेल आणि अमेक्स ह्या दोघांचे मनातल्या मनात आभार मानत होतो. मी उल्लेखलेली शर्यत सुरु होण्याची वेळ आली. माझ्या ज्ञानाचा पुन्हा एकदा उल्लेख करून इंग्लिश मित्रांनी दुसर्या घोड्यांवर पैसे लावले. श्रीकांतने मात्र मैत्रीला जागून मी सांगितलेल्या घोड्यावर पैसे लावले. आणि अहो आश्चर्यम! तो घोडा जिंकला. श्रीकांतने लावलेल्या ५ पौंडाचे त्याला ५६ पौंड मिळाले. इंग्लिश मित्रांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. पुढे अतिउत्साहात येउन श्रीकांतने हे ५६ पौंड गमावले ही गोष्ट वेगळी! मी सुद्धा गमाविलेल्या संधीमुळे पेटून उठून पुढील तीन शर्यतीवर ५, ५ आणि १० पौंड लावले. तिन्ही वेळा हरल्यावर नशिबाने डोके ताळ्यावर आले आणि मी पुढील बेटिंग थांबविले.मन विचलित करण्यासाठी मी नजर शामियानाकडे वळविली!
ह्या शामियान्याचा इंटरनेटवरून घेतलेला एक फोटो!


संध्याकाळी आम्ही अरुंडेल नदीच्या काठावर एका स्थानिक भोजनगृहात उतरलो. तिथे बार्बक्यूचा खमंग वास येत होता. पण श्रावणी गुरुवार असल्याने मी मात्र बटाटा, कांदा, ब्रोकोली वगैरे प्रकारांवर भूक भागविली. माझी प्लेट पाहून गाय म्हणाला सुद्धा, "आपल्या सर्वांपेक्षा आदित्याची प्लेट चांगली दिसतेय!" समोर अरुंडेल किल्ला दिसत होता. सायंकाळचे आठ वाजले तरी आकाशात रेंगाळनार्या सूर्यांची सोनेरी किरणे त्याला न्हाऊ घालीत होती. सर्व काही मस्त चालले असताना घरची आठवण मात्र मनाच्या एका कोपर्यात येत होती.

(क्रमशः)

ह्या आधीचे तीन भाग मागच्या डिसेंबर महिन्यात लिहिले होते. त्याच्या लिंक्स अशा

http://nes1988.blogspot.in/2013/12/blog-post_25.html



No comments:

Post a Comment