Saturday, July 19, 2014

ब्रायटन वास्तव्य - भाग ५


 इंग्लिश उन्हाळा व्यवस्थित चालला होता. साधारणतः सकाळी चारला उगवणारा सूर्य रात्री १० नंतर केव्हातरी मावळे. मनातल्या मनात मी गणित करत होतो. ब्रायटनचा सर्वात मोठा दिवस १८ तासाच्या अवधीचा तर हिवाळ्यातील सर्वात छोटा दिवस ६ तासाच्या आसपास! म्हणजे जून ते डिसेंबर ह्या १८० दिवसाच्या अवधीत दिवसाचा अवधी १२ तासाने कमीजास्त होतो. १२ तास म्हणजे ७२० मिनिटे. म्हणजे एका दिवसात ४ मिनिटाचा फरक पडतो.अर्थात २ मिनिटे सूर्योदय आधी आणि २ मिनिटे सूर्यास्त नंतर! दिवस वाढत असताना हा फरक मस्त वाटत असे, पण पुढे सप्टेंबर महिन्यात जसजसे दिवस छोटे होत गेले तेव्हा मात्र हा फरक अगदी जीवावर येऊ लागला. एखादा अनमोल ठेवा हातातून निसटून जातोय अशी अवस्था सप्टेंबरात झाली.
बाकी भारतात चंद्रोदय दररोज आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५२ - ५३ मिनिटे उशिरा होतो. चंद्रोदयाच्या वेळेतील हा फरक अक्षांशानुसार बदलतो किंवा नाही  पडताळून पाहण्याची संधी मला ब्रायटनला मिळाली नाही  किंवा मी गांभीर्याने प्रयत्न केला नाही. मध्येच एकदा इंटरनेटवर ह्या विषयी काही शोधन केले. पण ते पूर्णत्वाला नेले नाही. अशाच एका शुक्रवारी संध्याकाळी जेवणानंतर मित्रांसोबत ब्रायटनच्या सुंदर समुद्रकिनार्यावर बसलो असता मला त्या दिवशी कृष्ण पक्षातील द्वितीया असल्याची आठवण झाली. घड्याळात पावणेनऊ वगैरे झाले असतील. काही वेळाने चंद्रोदय होईल असे मी छातीठोकपणे सांगितलं. शुक्रवारची संध्याकाळ  असल्याने मंडळी फुरसतीत होती. त्यातील बर्याच जणांना मी फेकतोय असेच वाटत होते. आकाशात चंद्र आल्याशिवाय इथून निघायचचं नाही असे त्यातील एकाने घोषित केलं. साधारणतः मंडळी शुक्रवार आणि साप्ताहिक सुट्टीच्या वेळी असे एकाला लक्ष करण्याच्या मूडमध्ये असत. ह्यावेळी मी लक्ष बनलो आहे हे आता नक्की झाले  होते. सरणार्या एकेक मिनिटाला माझा आत्मविश्वास काहीसा डळमळीत होऊ लागला होता. इतक्या वरती उत्तरेला चंद्राचे नियम वेगळे असतील तर अशी भीती मला वाटू लागली. साडेनऊ वगैरे झाले आणि मंडळीचा गलका वाढत चालला. पण मी ही हार मानण्याच्या तयारीत नव्हतो. आणि शेवटी नऊ चाळीसच्या सुमारास चांदोमामा आकाशात आले. आता मात्र मी जोरदार कल्ला केला.
सहा आठवड्याच्या वास्तव्यानंतर प्रिमियर लॉज सोडण्याची वेळ आली. आम्ही तिघांनी मिळून १३८, विक हॉल, होव इथे एक प्रशस्त सदनिका घेतली होती. एका शनिवारी सकाळी ५२३, प्रिमियर लॉज सोडण्याची वेळ आली. आणि शेवटची बॅग घ्यायच्या वेळी रूमला निरोप घेताना मला काहीसं गहिवरून आलं. वास्तूशी सुद्धा ऋणानुबंध जुळतात हे केवळ ऐकलं होतं पण ते प्रत्यक्षात अनुभवलं होतं. वसई - मुंबईच्या बाहेर फारसा कधी न गेलेल्या मला आता ब्रायटन अगदी जवळचे वाटू लागलं होतं आणि मला स्थिरावून देण्यात ह्या ५२३ रूमचा मोलाचा वाटा होता. फायर अलार्म, विंदालू वगैरे सर्व आठवणी क्षणभर डोळ्यासमोर आल्या.
ऑफिसात आमच्या दोन आज्ञावली तर पहिल्या काही दिवसातच तयार असल्याने उपभोक्ता मार्गदर्शिका (User Guide चे क्लिष्ट आणि वजनदार न वाटणारे भाषांतर) बनविण्यासाठी आम्हांला खूप वेळ मिळाला होता. मी अशा कामात खूप रस घेतल्याने १४० पानाची मार्गदर्शिका तयार झाली होती. गाय चा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून हे पहिलच काम असल्याने सर्व प्रोसेस (पद्धती ? की रीतीभाती!) अवलंबिण्यात त्याला खूप रस होता. त्यामुळे ह्या १४० पानांवर तो खूप खुश होता. तसेच ह्या दोन आज्ञावली CICS प्रोग्रॅमद्वारा यशस्वीरित्या बोलावल्या जाऊ  शकतात हे सिद्ध करण्यासाठी त्याने माझ्याकडून दोन CICS प्रोग्रॅमसुद्धा लिहून घेतले.
मेनफ्रेम संगणकांची मोठमोठी माहिती हाताळण्याची क्षमता निर्विवाद असल्याने मोठमोठ्या वित्तीय संस्थाची माहितीभंडारे मेनफ्रेमवर असतात. विविध व्यावसायिक नियमांचा ह्या माहितीवर अवलंब करणारे बरेच प्रोग्रॅम सुद्धा मेनफ्रेमवर असतात. त्यांना ऍप्लिकेशन प्रोग्रॅम म्हटले जाते. युरो प्रोग्रॅमसाठी आम्ही विकसित केलेले ह्या  दोन प्रोग्रॅमना बाकीचे ऍप्लिकेशन प्रोग्रॅम आता बोलावणार होते. सिंटेल आणि अमेक्सची दुसरी मोठी टीम ऍप्लिकेशन प्रोग्रॅममधील आज्ञावली युरो चलनासाठी बदलत होती. आता आमचे २ हिरो प्रोग्रॅम आणि हे ऍप्लिकेशन प्रोग्रॅम एकमेकांशी व्यवस्थित संवाद साधू शकतात की नाही हे पडताळून पाहण्याची वेळ आली होती. त्यामुळे आमचं नेपियर हाउस मधून लँचेस्टर हाउस मधील येणे जाणे वाढलं होते.
मधल्या काळात आम्ही लंडन, स्कॉटलंड अशा ठिकाणांना भेटी देऊन आलो होतो. मी ससेक्स आणि केंट ह्यांचा सामनाही होवच्या मैदानावर जाऊन पाहून आलो होतो. ह्या सर्वाचे वर्णन पुढील काही भागात!
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात येणाऱ्या बहुतेक सर्वांनाच परदेशप्रवासाची मनोमन इच्छा असते. अधिक जबाबदारीच्या कामाचा अनुभव मिळावा, परदेशी लोकांशी थेट संवाद करून संभाषणकौशल्य सुधारावं अशी व्यावसायिक कारणं असतात, त्याचबरोबर अधिक अर्थाजन, चांगल्या राहणीमानाचा अनुभव, पर्यटनस्थळ पाहण्याची सुवर्णसंधी हे ही फायदे असतात. लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसणारे नवयुवकांचा भाव वाढण्यास ह्या वारीची मदत होते. पण  अजून एक वर्ग असतो ज्यांना ह्या अधिक अर्थाजनाची आपल्या कुटुंबासाठी खूप गरज असते. असाच एक आमचा सहकारी, जो खरेतर आमच्यासोबत ब्रायटनला यायचा! पण इंग्लंडचा विसा मिळविण्यासाठी जी अगदी कडक वैद्यकीय तपासणी केली जाते त्यात त्याच्या हृदयात एक छोटे भोक असल्याचे आढळलं होतं आणि त्यामुळे त्याचा विसा लांबणीवर पडला होता. त्याला अधिक विस्तृत वैद्यकीय चाचण्या करावयास सांगण्यात आल्या होत्या. आम्हांला येऊन तीन महिने झाले तरी ह्या चाचण्या आणि वकिलातीतील त्याच्या फेर्या सुरूच होत्या. आणि त्याच्या सुदैवाने शेवटी एकदाचा विसा मंजूर झाला होता. त्याच्यासोबत माझ्या घरून थर्मल आणि अजून काही जिन्नस पाठविण्यात येणार होते. ह्या ब्रायटन भेटीआधी घरापासून सलग दूर राहण्याचा माझा उच्चांक २२ दिवसांचा होता आणि एव्हाना ९० दिवस होत आले होते. इतक्या काळात फोनवरून बोलणे आणि विक हॉलच्या सदनिकेत गेल्यानंतर पोस्टाने येणारी पत्रे ह्याहून अधिक म्हणजे घरून काही वस्तू येणार होत्या. मोठ्या उत्कंठेने मी रमेशची वाट पाहत होतो. 

No comments:

Post a Comment