Sunday, July 6, 2014

कहानी घर घर की!


यशस्वी कंपन्या आपली ध्येये अचूक ओळखतात, त्यांना शब्दात मूर्त स्वरूप देतात आणि त्याचा पाठपुरावा करतात. कंपन्याना जशी ध्येये असतात तशी प्रत्येक घराला असतात का? असली तरी त्यावर कुटुंबातील मंडळी चर्चा करून त्यानुसार कृती करतात का?
माझ्या लहानपणी गोष्टी बऱ्यापैकी साध्यासरळ होत्या. शिक्षणाचे महत्त्व नुकताच जाणलेला मध्यमवर्ग "मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन आयुष्यात चांगली नोकरी मिळवावी" हे एक महत्त्वाचे ध्येय घेऊन जगला. पालकांच्या नोकरीतील प्रगतीचा आलेख बऱ्याच वेळा क्षितीजसमांतर पातळीत धावत असल्याने त्यांच्या करियरने त्यांच्या मुलांकडे लक्ष देण्याच्या क्षमतेवर बहुदा परिणाम केला नाही. आणि हो मुलांची स्वतंत्रपणे मते मानण्याची क्षमता काही कारणाने फारशी विकसित झाली नाही किंवा ती विकसित व्हावी अशी पालकांची फारशी इच्छासुद्धा बहुदा नसावी.
वरील वर्णन पूर्वीच्या सर्व घरांना लागू होईलच असे नाही. काही घरात "माझ्या लहानपणी माझ्याकडे कोणी लक्ष नाही दिलं, मग मी सुद्धा ह्याच्याकडे का देऊ? शिकायचा असेल तितका शिकेल आणि बघून घेईल काय ते " असाही विचार काहींनी केला. म्हणजेच "काही विशिष्ट धोरण आखायचं नाही" हेच धोरण ठरविलं गेलं.
पुढे काळ बदलला. केवळ शिक्षण हे ध्येय समोर ठेवून लहानपण व्यतीत केलेली पिढी नोकरीमध्ये शिरली. नोकरीतील प्रगतीचा आलेख क्षितीजसमांतर पातळीत न राहता तो आकाशाकडे झेपावू लागला. मग एका क्षणी ह्यापुढील प्रगतीसाठी केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी नाही ह्याची जाणीव ह्या पिढीला झाली. व्यक्तिमत्व विकास, भोवतालच्या आर्थिक परिस्थितीचे योग्य ज्ञान ह्या घटकांची त्यात भर पडली. केवळ पुस्तकी अभ्यास ह्या एका घटकाभोवती गुंफले गेलेले कुटुंबाच्या ध्येयाचे समीकरण आता अनेक घटकांच्या समावेशाने अगदी क्लिष्ट बनून गेले. त्यात पालकांच्या सतत व्यग्र बनणाऱ्या करीयरच्या घटकाची भर पडली. आणि मग पुढ्यात ठाकला तो हे समीकरण सोडविण्याचा आटापिटा!
क्लिष्टता दोन प्रकारची! पहिली म्हणजे अनेक घटकांचा कुटुंबाच्या ध्येयात समावेश आणि दुसरं म्हणजे ह्या घटकांच्या महत्त्वाचं सतत बदलणारं प्रमाण! आज मुलांचा अभ्यास महत्त्वाचा तर उद्या पालकांचं करीयर महत्त्वाचं तर परवा नात्यातला कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने येणारी तयारी महत्त्वाची! जरा खोलवर पाहिलं आजची कुटुंब दोन प्रकारची
१) आयुष्य जसं घडेल तसं घडून देणारी कुटुंब!
२) पण काही कुटुंब मात्र वर उल्लेखल्याप्रमाणे तात्कालिक महत्वाच्या घटकावर लक्ष केंद्रित करतात. जसे की मुलांच्या परीक्षा आल्या की सर्व समारंभ, जिभेचे चोचले पुरविण्यासाठी केलेलं हॉटेलिंग सार काही बंद! नेहमी साग्रसंगीत जेवण बनविलं जात असेल तर परीक्षेच्या कालावधीत थोडक्यात जेवण आटपून आई अभ्यासाला जास्त वेळ देणार! बाबांच्या ऑफिसात काही महत्त्वाची कामं असली की त्यांना घरच्या जबाबदारीतून सूट वगैरे वगैरे! ह्यातून एक कुटुंब म्हणून आपण एकत्र आहोत ही भावना विकसित होण्यास मदत होते. ह्यात काही घटक असे असतात ते पूर्णपणे नियंत्रणाच्या पलीकडचे असतात! मुलगा मोठा होईल त्यावेळी कोणते व्यावसायिक क्षेत्र जोरात असेल, त्यात आपल्या मुलांना चमक दाखविता येईल का आणि त्यांनी निवडलेली क्षेत्र आयुष्यभर जोरात राहतील का? आपल्या मुलांना योग्य असे साथीदार मिळतील का? त्याचं आयुष्य कसं जाईल? ह्या घटकांच्या बाबतीत तयारी करून सुद्धा काही फरक पडत नाही. जे काही घडायचं असेल तसंच होईल. आणि केवळ ह्या घटकामुळे कधी कधी पहिल्या प्रकारची कुटुंबाची विचारसरणी योग्य वाटते.


लेखाचा उद्देश्य एकच! आपल्या कुटुंबाच्या मुख्य ध्येयाची जाणीव असू द्यात आणि आपली विचारसरणी कोणत्या प्रकाराकडे झुकते आहे  हे ही माहित करून घ्या



 

No comments:

Post a Comment