Friday, September 21, 2012

संवाद कला


मनुष्यजातीला संवादकला बऱ्याच काळापूर्वी अवगत झाली. संवादाचा मूळ हेतू दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी लागणाऱ्या एकमेकांच्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्याच्या गरजेशी निगडीत होता. सुरुवातीला प्राथमिक अवस्थेत असणारी ही संवादकला काही जणांनी मग अगदी चांगल्या प्रकारे पारंगत केली. एखादा ज्ञानी मनुष्य आणि संवादकला यांचा दुधशर्करा योग काही जणांत जुळून आला. अशा लोकांनी आपल्या विद्वत्तेने मोठ्या जनसमुदायास प्रभावित करण्याचे काम उत्तमरीत्या पार पाडले.
पुढे काळ बदलला. ज्ञानी माणसांव्यतिरिक्त अजून काही जणांनी सुद्धा संवादकला हस्तगत केली. ह्यात दोन प्रकार आले, पहिल्या प्रकारातील लोकांनी संवादात गोडवा आणण्याची कला हस्तंगत केली. समोरच्या माणसाचे संवेदनशील मुद्दे ओळखून त्याभोवती त्यांना आवडेल असे संभाषण करून त्यांच्याकडून आपल्याला हवे तसे काम करून घेण्यात ह्या लोकांनी यश प्राप्त केले. समोरच्या माणसाला आपण यात फसले जातो हे कळूनसुद्धा आपली स्तुती करून घेण्याचा मोह अनावर होत असल्याने ती माणसे ह्या पहिल्या प्रकारातील माणसांकडे वारंवार जातात. दुसऱ्या प्रकारातील लोकांनी जड शब्दांचे जंजाळ उभे करण्याची कला पारंगत केली. समोरची माणसे ह्या माणसांच्या शब्दसामर्थ्याने दिपून जातात, आणि मग संभाषणाचा मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. त्यामुळे ही माणसे आपल्याला हवा असणारा मुद्दा मान्य करून घेत. संभाषण पूर्ण झाल्यानंतर काही काळाने समोरचा माणूस भानावर येतो आणि मग त्याला कळते की आपली काही प्रमाणात फसवणूक झाली आहे. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली असते. आता ही माणसे कालांतराने शहाणी होतात आणि ह्या दुसऱ्या प्रकारातील माणसांशी सावधपणे वागू लागतात. ह्या दोन्ही प्रकारातील माणसांपासून थोडे सावध राहून वागावयास हवे कारण ही माणसे कमी प्रयत्नांत यश प्राप्ती करू इच्छितात. ह्या दोन्ही प्रकारातील माणसांपैकी काही जण आपले हे चातुर्य घरापर्यंत घेवून येतात आणि मग सर्वांसाठी बिकट परिस्थिती निर्माण होते.

बाकी वैयक्तिक जीवनात आपण संवादाला हवे तितके महत्त्व देत नाहीत असे मला वाटते. पूर्वीच्या पिढीतील कुटुंबांमध्ये, बऱ्याच प्रमाणात पिता -पुत्र, पती-पत्नी ह्या नात्यांत संवादांची कमतरता आढळून येत असे. ह्यातील प्रभावी घटकाने (पती, पिता) आपल्या नात्याचा प्रभाव कायम राहावा म्हणून हा उपाय योजला असावा असे मला वाटते. कालांतराने कमी संवादाची जागा विसंवादाने घेतली. बाहेरच्या लोकांशी बोलताना / वागताना असणारा समजूतदारपणा घरातील लोकांशी मात्र गायब होताना काही व्यक्तींच्या बाबतीत दिसतो. सुसंवादात अडथळे आणणारे घटक म्हणजे कार्यालयीन काम, दूरदर्शन, माहिती मायाजाळ, मॉल इत्यादी इत्यादी.. ह्या पातळीवरील संवादासाठी आपल्या जवळच्या माणसासाठी खास वेळ काढण्याची इच्छा असणे हा प्रभावी घटक बनतो.

अजून एक पातळी असते ती मित्रांमधील संवादाची. ह्यातील काही जीवाभावाच्या मित्रांना सततच्या संवादाची गरज नसते. कितीही कालावधीनंतर ते एकमेकाला भेटले तरी लगेच पूर्वीइतक्या तन्मयतेने एकमेकांशी संवाद साधू शकतात. याउलट काही जीवाभावाचे मित्र केवळ दोघांनीही संवाद साधण्याचा प्रयत्न न केल्याने दुरावतात. तसाच एक विशेष संवाद पूर्वी असायचा तो दोन प्रियकारांमाधला जो नजरेच्या माध्यमातून चालायचा. कधीही न बोलता प्रेम केवळ नजरेतून व्यक्त केले जायचे. इंटरनेट आले आणि हे सर्व दुर्मिळ संवाद प्रकार एकदम नष्ट झाले.

संवादाच्या पुढील पातळीत एक कुटुंब हा एक एकक बनतो. मग दोन कुटुंबांमधील संवाद हा चर्चेचा मुद्दा बनतो. पूर्वी असलेले दोन कुटुंबातील जिव्हाळ्याचे संबंध सध्या झपाट्याने कमी होताना दिसतात. ह्यात दुसऱ्याच्या वैयक्तिक जीवनात आपण अडथळा तर आणीत नाही आहोत नाही ना ही भिती प्राथमिक कारण असते. केवळ सुरुवातीचा पुढाकार न घेतल्याने हे संबंध प्रगत होत नाहीत. अशा पातळ्या पुढे वर वर जातात, एका समाजातील विविध कुटुंबांचा संवाद, दोन समाजातील संवाद, दोन राष्ट्रातील संवाद..एका विशिष्ट पातळीच्या पुढे संवाद राखण्यासाठी काही माणसांची नेमणूक केली जाते. अशा माणसांच्या कुशलतेवर त्या पातळीवरील ( उदा. दोन राष्ट्रांतील) संवादांची यशस्विता अवलंबून असते.

बाकी सर्व मनुष्यजात दोन प्रकारच्या संवादासाठी फार पूर्वीपासून प्रयत्नशील आहे.पहिला म्हणजे मनुष्य आणि सर्वशक्तिमान देव ह्यांतील संवाद आणि दुसरा म्हणजे मनुष्य आणि अंतरिक्षातील अजूनही न सापडलेल्या दुसऱ्या सजीवांशी संवाद! 

Sunday, September 16, 2012

सामाजिक वर्गांचे विश्लेषण



मध्यमवर्गातील काही वर्गास हल्ली वाटत असते की सद्ययुगात महागाई, भ्रष्ट्राचार अनागोंदी वाढली आहे. प्रसारमाध्यमांवर चुकीच्या वृत्तींचे नियंत्रण आहे. आंग्ल भाषेतील एका अग्रगण्य दैनिकाने सभ्येतेच्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत. साधारणतः २५ वर्षांपूर्वी असलेली मराठी वर्गाची सभ्यतेची व्याख्या लयास गेली आहे. एकंदरीत परिस्थितीचा भावनात्मक न होता विचार करण्याचा हा प्रयत्न. इथे मराठी समाजातील विविध वर्गांच्या दृष्टीने ह्या परिस्थितीचे पृथ्थकरण करण्याचा हा प्रयत्न!
१> मध्यमवर्गीय नोकरपेशा बुद्धीजीवी प्रगत वर्ग
साधारणतः ६० -७० च्या सुमारास हा वर्ग शिक्षकी पेशात, सरकारी नोकरीकडे वळला होता. ह्या वर्गाने बदलत्या सामाजिक परिस्थितीचा वैयक्तिक पातळीवर अभ्यास केला. आपल्याला आपली शैक्षणिक पातळी उंचावली पाहिजे हे त्याने जाणले. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन ह्या क्षेत्रात ह्या वर्गाने आपल्या पुढील पिढीला गुंतवले. आर्थिक उदारीकरणाच्या सुमारास उत्तम संधी उपलब्ध होताच ह्या वर्गाने त्या हस्तगत केल्या. परदेश, शहरात ह्या वर्गाने स्थलांतर केले. ह्या वर्गाची वैयक्तिक प्रगती होत असतानाच ह्या वर्गाचा सामाजिक जीवनातील सहभाग कमी झाला. सार्वजनिक जीवनातील कार्यक्रमांच्या दर्जावर ह्याचा विपरीत परिणाम झाला. ह्या वर्गाने आपली आर्थिक परिस्थिती महागाईने परिणाम होण्याच्या पलीकडे नेल्याने हा वर्ग सद्यस्थितीत गप्प बसला आहे. आपली उर्जा आपली वैयक्तिक परिस्थिती अजून उंचावण्याच्या कामी राखून ठेवण्याचा ह्या वर्गाचा कल आहे. आपली आर्थिक स्थिती ह्या वर्गास इतकी प्यारी झाली की ह्या वर्गातील उरलासुरली वीरता नाहीशी होण्याच्या मार्गावर आली आहे.
२> इतर मध्यमवर्गीय वर्ग
ह्यात आपण दोन गट पाडू शकतो.
अ> पहिल्या गटाने सामाजिक , व्यावसायिक जीवनात उपलब्ध असलेल्या संध्या (संधी ह्या शब्दाचे अनेकवचन) हेरल्या. ह्या वर्गाने योग्य वेळी धाडस दाखवीत ह्या संधी हस्तगत केल्याने, त्यांचा पुढील मार्ग सुकर झाला. आपल्या आर्थिक स्थितीच्या जोरावर ह्या वर्गाने एकंदरीत सामाजिक जीवनावर प्रभाव प्रस्थापित केला. परंतु समाजाला योग्य वैचारिक दिशा देण्याच्या क्षमतेचा ह्या वर्गाकडे अभाव असल्याने परिस्थिती एकंदरीत दीनवाणी झाली. ह्या वर्गाचे बाकी व्यावहारिक कौशल्य वाखाणण्याजोगे! मॉल, व्यापारीकरण केलेले गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्र ह्या सारख्या उत्सवाद्वारे त्याने मूळ समस्यांपासून लक्ष दूर नेण्यात यश मिळविले.
ब> दुसरा गट तसा काहीसा कमनशिबी ठरला. कमनशिबी हा शब्दच ह्या वर्गाची कथा सांगून जातो. ह्या वर्गाने आपले भविष्य नशिबाच्या हाती सोपविले, आपल्या हाती घेतले नाही. ह्या वर्गाला ना शैक्षणिक क्षेत्रातील बदलाची चाहूल लागली ना सामाजिक क्षेत्रातील संधींची. सध्याच्या परिस्थितीत सर्वात भरडला गेला असेल तो हाच वर्ग. सरकारच्या मदतीची सर्वात जास्त गरज ह्याच वर्गास असते. परंतु ती न मिळाल्यास आवाज उठविण्यासाठी आवश्यक असलेला संघटीतपणा अथवा आत्मविश्वास याचा ह्या वर्गाकडे अभाव आहे.
३> सामाजिक अपवृत्ती
ह्या वर्गाने सुरवातीला २ अ वर्गाला पुढे करीत सामाजिक जीवनात चंचुप्रवेश केला आणि कालांतराने आपले पुन वर्गीकरण करीत सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून घेतली.
४> सुसंस्कृत गर्भश्रीमंत वर्ग
हा वर्ग समाजात एकंदरीत आपली आब राखून होता. आणि ह्या वर्गाचे वागणेही जबाबदारीचे. परंतु कालौघात ह्या समाजाचे आर्थिक वर्चस्व तितकेसे कायम राहिले नाही. २ अ आणि ३ ह्या वर्गाने ह्या वर्गास स्पर्धा प्रस्थापित केली. २ अ आणि ३ ह्या वर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याची असलेली सवय. परंतु ४ वर्गाने आपला आब कायम ठेवीत आपल्या वागण्यात फारसा बदल केला नाही.
एकंदरीत हल्लीच्या समाजाचे ढोबळमानाने वर्गीकरण करण्याचा हा एक प्रयत्न. राजकारणी वर्गाला ह्या परिस्थितीचे योग्य आकलन आहे. २ ब हाच खरा गांजला गेलेला वर्ग, त्याला संघटीत होवू न देणे, सार्वजनिक उत्सवांद्वारे, IPL द्वारे त्याचे लक्ष विचलित केले जाते. प्रश्न असा आहे की ही परिस्थिती किती काळ कायम राहणार? दोनच गोष्टी ही परिस्थती बदलू शकतात. १> आर्थिक मंदीने वर्ग १ प्रभावित होवून त्याचा बफर नाहीसा झाला. २> २ अ आणि ३ ह्यांच्यात एका बिंदूवर स्त्रोतांसाठी संघर्ष निर्माण होऊन माफिया राज निर्माण झाले तर.....

 

Friday, September 14, 2012

गुलजार आंधी चित्रपट




हा एक सत्तरच्या दशकातील गाजलेला चित्रपट. इंदिरा गांधीच्या आयुष्याशी असलेल्या काहीशा साधर्म्यामुळे ह्यावर काही काळ बंदी घालण्यात आली होती. एका महत्वाकांक्षी स्त्रीने तरुणपणात आपल्या संसारातून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय, ९ वर्षानंतर पतीशी झालेली अचानक भेट. आयुष्यातील ध्येयाला मिळविण्यासाठी नायिकेने कठोर निर्णय घेतलेला असतो पण पतीशी भेट झाल्यानंतर स्वतःच्या भावनांना ती आवर घालू शकत नाही. त्यानंतर पतीच्या अस्तित्वामुळे तिच्या आयुष्यात येणारे वादळ..एक सुरेख चित्रपट.
ह्या चित्रपटातील गाणी जशी अप्रतिम तसेच संवाददेखील थेट हृदयाला भिडणारे. गाणी, संवाद या बरोबर संजीवकुमार आणि सुचित्रा सेनचा अभिनयही अवर्णनीय! काही प्रसंगांचे चित्रीकरण कायमचे लक्षात राहणारे. भेटीनंतर पतीच्या घरात शिरतानाची तिची भिरभिरती नजर. ही नजर आपणास बरेच काही सांगून जाते. माझ्याशिवाय हा कस आयुष्य जगतोय, ह्याच ठीक चाललंय ना, एक नजर बरेच काही सांगून जाते. संवाद ही कसे, एकाच वाक्यातून जीवनातील अर्थही सांगून जाणारे. दिर्घ काळानंतरच्या पहिल्याच भेटीत तो म्हणतो 'थोडा पतला हो गया हुं'. मी शरीराने तर खचलोच पण मानसिक दृष्ट्या (तुझा सहवास नसल्याने) कमजोर बनलो आहे. एका प्रसंगात नायिका म्हणते. तुम्हारी साथ कविता न होती तो तुम सामान्य होते. बर्याच वेळा असंच होत बघा, प्रेमिक एखाद्या गुणावर भाळून जातात. नायक नायिकेला जवळच्याच एका भग्न जुन्या वास्तूच्या स्थळाविषयी माहिती देवून म्हणतो की जेवणानंतर आपण तिथे फिरायला जात जाऊ, त्यानिमित्ताने ह्या उजाड इमारतीला थोडे जीवन तरी लाभेल.

ह्या चित्रपटातील ३ गाणी ऐकणार्यास मंत्रमुग्ध करून टाकतात. चित्रपटाच्या कथेत ही गाणी एकदम चपलख बसतात अगदी देहात वसणाऱ्या हृदयाप्रमाणे!
१> तुम आ गये हो नूर आ गया हैं
तू माझ्या जीवनात आल्याने माझ्या जीवनाचा कायापालट झाला आहे. जीवनात रस निर्माण झाला आहे. नाही तर जीवन एकदम भकास चालले होते. तू माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला आहेस. तू येण्याआधी मी एक दिशाहीन जीवन जगात होतो. कोठून कोठे चाललो आहे हे माझेच मला कळत नव्हते. पण मला विश्वास होता की जीवनाच्या एका वळणावर आपण परत भेटू. तुझी इच्छा मला तुझ्याकडे खेचून आणत होती.
२> इस मोड से जाते हैं
बहुदा हे गाणे चित्रपटात दोनदा येत. पहिल्यांदा नायक नायिका लग्नाआधी भेटतात तेव्हा आणि दुसर्यांदा नऊ वर्षानंतरच्या भेटीच्या वेळी.
आयुष्याच्या ह्या वळणावर आपण भेटलो आहोत. इथून जाणारे काही रस्ते वेगवान (नायिकेचा महत्वाकांक्षी मार्ग) आहेत तर काही सुस्त (नायकाने साध आयुष्य जगण्याचा घेतलेला निर्णय) आहेत. ह्या वळणावरून पुढे बनणारी काही नाती चिरेबंदी वाड्याप्रमाणे भरभक्कम आहेत तर काही काचेच्या महालासारखी क्षणभंगुर आहेत. एका सुसाट वादळाप्रमाणे जाणारा हा एक मार्ग माझ्या मार्गाजवळ आल्यावर मात्र काहीसा बुजरा होतो. ह्या अनेक मार्गांतील एक मार्ग असा असावा जो मला तुझ्याकडे घेवून जाईल.   

३> तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं
एक तू सोडलीस तर माझी जीवनाविषयी काहीच तक्रार नाही. पण तुझ्यावाचूनच्या जीवनाला जीवन म्हणणे जीवावर येते. माझी जीवनरेखा तुझ्या पाऊलवाटेशी मिळतीजुळती असती तर किती बरे झाले असते. तू जर बरोबर असलीस तर आयुष्यात ध्येयांची काही कमतरता नाही.
मग मध्येच संवाद येतो
ह्या ज्या फुलांच्या माळा दिसतायेय त्या माळा नाहीयेत अरबी भाषेतील रचना आहेत दिवसा स्पष्ट दिसतात दिवसा हा परिसर पाण्याने भरलेला असतो. नायिका त्याला अडवून म्हणते दिवसाच्या गोष्टी का करतोस, मी थोडीच दिवसा इथे येवू शकणार? मग नायक आकाशातील चंद्राकडे वळून म्हणतो हा दिवसा नसतो, रात्रीच येतो. इथे परिस्थितीमुळे दिवसा नायकाला भेटू न शकणारी नायिका लक्षात घ्या. पण मग कधी कधी अमावस्या येते, (कृष्णपक्ष), खरेतर कृष्ण पक्ष १५ दिवसांचा असतो पण या वेळी बराच काळ (९ वर्ष) टिकला. इथे नायिका भारावून म्हणते नऊ वर्षांचा दुरावा फार कठीण होता नाही?
खरेतर आपल्या महत्वाकांक्षी वृत्तीमुळे नायिकेने स्वतंत्र मार्ग पत्करलेला आहे. पण अशा क्षणी तिची नायकाच्या बाहुपाशात येवून आपली सर्व दुःख अश्रुद्वारे मोकळे करून टाकण्याची इच्छा अनावर होते. पुढची पंक्ती पहा. तुम जो कह दो तो आज कि रात चांद डूबेगा नही! नऊ वर्षांनी आज एकमेकाला परत भेटलेलो आपण, जर तुझी इच्छा असेल तर तर माझ्या आयुष्यातील ही रात्र , तुझ्या रूपाने आलेला चंद्र असाच कायम राहील. हे नायकाने नायिकेला आपल्याबरोबर राहण्यासाठी केलेले आर्जव किती अप्रतिमरीत्या रुपकाद्वारे मांडले गेले आहे.

घर असो वा आंधी, प्रेमी युगुलाचा वास्तविक जीवनातील प्रवास गाण्याभोवती गुंफला गेला आहे. प्रत्येक मनुष्याचे एक स्वत्व असत, प्रेमात असताना हे स्वत्व फुलून निघत, उजळून निघत. लग्नानंतर समोर येत ते व्यावहारिक जीवनातील कठोर सत्य. ह्यात दोन वेगळे जीव आपापली स्वत्व घेवून जीवन जगत असतात. जीवनरगाड्यात आपल स्वत्व तर हरवून जात तसच आपल्या साथीदाराच्या स्वत्वाच्या अस्तित्वाचा देखील कधी कधी विसर पडू शकतो. गुलजार यांची ही गाणी ह्या स्वत्वाभोवती कशी गुंफली जातात हे अनुभवण शब्दांच्या पलीकडल असत.

Thursday, August 30, 2012

एक गुलझार प्रतिक्रिया!



माझ्या एका खास मित्राची ही एक 'गुलझार' प्रतिक्रिया!

तुझ्या गुलझार लेखमालेच्या निमित्ताने एक प्रसंग आठवला.

" माझ्यासारखाच बालपण वसईत जगलेला वसईकर एका प्रकल्पावर सतत भेटत असे. एकदा म्हणाला की तुला वसईत जाऊन स्थाईक व्हावेसे वाटत नाही का? प्रश्न वाटतो तेवढा सरळसोट नव्हता. कळले नाही की तो प्रश्न बालपणाविषयी आहे की वसईविषयी आहे? नंतर जाणवले की बालपण तर कधीच संपले आणि ज्या वसईशी बालपण जोडले आहे ती वसई. ती ही ती राहिली नाही. विचार गद्यात करणे कठीण वाटू लागले. आणि माझ्यातला गुलझार जागा झाला.

बालपणाबरोबर हरवलेली वसई .......
झुळझुळणारे वारे होते, मतलई तर कधी खारे होते

बिदीत पकडलेले मासे तर जिवापेक्षा प्यारे होते
त्या काळात सण होते, गावात आपलेपण होते

निवांत असे क्षण होते, शाळेत बालपण होते
मैत्री प्रेमाचे बंध होते, निश्शब्द अदृश्य गंध होते

सोपे साधे छंद होते, क्षितिजावरचे वास्तव मात्र बेबंद होते
यथावकाश बदलले सारे, झुळझुळणारया वार्याच्या वेगाने
अजूनही आठवते सारे, हळहळणारया स्वप्नाच्या आवेगाने......

Wednesday, August 29, 2012

गुलजार भाग ३ - 'मेंरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं'



१९८७ च्या सुमारास आलेला इजाजत हा चित्रपट तसा चिकित्सक लोकांसाठी! दोन नायिकेंमध्ये गुंतलेल्या नायकाच्या मनाचे हिंदोळे ह्या चित्रपटात सुरेखरीत्या मांडले गेले आहेत. एक प्रेयसी आणि एक पत्नी. प्रेयसी आणि पत्नीमध्ये नायकाची ये जा चालू असते. ह्या चित्रपटाच्या कथानकात काही मी खोलवर जात नाही. पण त्यातले एक गाणे, 'मेंरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं' केवळ अप्रतिम. अशाच एका प्रेयसीकडून पत्नीकडून परत गेल्यानंतरच्या क्षणी नायक प्रेयसीला तिच्या राहिलेल्या वस्तू परत पाठवून देतो. आपल्या ह्या वस्तू परत करून नायक आपली आठवण विसरण्याचा प्रयत्न करतोय हे जाणवून दुःखी झालेली अनुराधा पटेल हे सुंदर गाणे गाते.

ती नायकाला भौतिक वस्तूंच्या पलीकडील राहिलेल्या आठवणींची जाणीव करून देते. यात श्रावणातील (सावन ह्या शब्दाची शृंगारिक जाणीव श्रावण ह्या शब्दात येत नाही, असो!) एकत्र घालविलेले पावसातील भिजलेले क्षण, तिच्या पत्रात गुंतलेल्या रात्रीच्या आठवणी परत करण्याची ती मागणी करते. पानझडीच्या मौसमात पानांचा पडणारा आवाज मी कानात साठवून मी परत आले होते, ती झाडाची फांदी अजूनही माझ्या मनात थरथरत आहे. ती फांदी, त्या फांदीच्या आठवणी मिटवून टाक असे ती म्हणते. एका पावसाच्या वेळी एका छत्रीत आपण अर्धे सुके आणि अर्धे भिजले होतो. त्यातला केवळ सुका भागच (तुझा रुक्षपणा) मी घेवून आले आहे. त्यातला तुझा प्रेमाचा ओलावा तुझ्याचकडे राहिला आहे, तो मला परत पाठवून दे.

ह्या पुढील भाग माझ्या आकलन शक्तीपलीकडील. अनुराधाला नायकासोबत घालविलेल्या एकशे सोळा चांदण्या रात्री आठवतात! आता ११६ च का यावर मी बरीच डोकेफोड केली. वर्षाच्या रात्री ३६५. त्यातील शुक्ल पक्षाच्याच रात्री समाविष्ट करायच्या असे ठरविले तर १८२ रात्री. पावसाळ्यातील १२० पैकी ६० शुक्ल पक्षाच्या रात्री ढगाळ वातावरणाने गेल्या तर राहिल्या १२२ रात्री. असा विचार करता करता डोक्यात प्रकाश पडला की इथे कविमन पाहिजे, यांत्रिकी नव्हे! असो, त्या नायकाबरोबर घालविलेल्या ११६ रात्रीतील एक त्याच्या खांद्यावर टेकून घालविली होती आणि त्यावेळी आपण दोघांनी खोट्या खोट्या तक्रारी, खोटी खोटी आश्वासने दिली होती. त्या तक्रारी, ती आश्वासने तू मला परत दे!

ह्या गाण्याचा शेवट पहाना! ह्या सर्व आठवणी परत दे आणि ह्या सर्व आठवणी जमिनीत पुरून टाकण्याची तू मला परवानगी दे असे हरिणाक्षी अनुराधा बोलते. ह्या आठवणी पुरल्यावर मी पूर्णपणे तुझ्यापासून मोकळी होईन आणि मग माझ्याकडे काहीच बाकी उरणार नाही आणि मग मी तिथेच निद्रिस्त (कायमची) होऊन जाईन! वा गुलजार साहेब वा! प्रेमभंग झाल्यानंतरची विरहिणीचे दुःख याहून अचूक शब्दात कोण पकडू शकेल असे मला वाटत नाही.

एकंदरीत प्रेमिकांच्या विश्वात नात्यांच्या अनेक छटा असतात. एक गीतकार म्हणून विविध चित्रपटांसाठी गाणी लिहिताना ह्या छटा गीतकारास अचूक पकडाव्या लागतात (किंवा लागत असत). गुलजार यांच्या विविध गाण्यांचा अभ्यास करता करता त्यांनी ह्या विविध छटा कशा ओळखल्या आहेत आणि एकाच भावनेला वेगवेगळ्या चित्रपटात समर्पक शब्दांद्वारे / रुपकांतून कसे अचूकपणे पकडले आहे हे पाहून मन थक्क होते.

Tuesday, August 28, 2012

गुलजार भाग २ - घर चित्रपट


 
पहिल्या भागात आप की आखों में कुछ, महके हुए से राज हैं ह्या गाण्याचा उल्लेख आला. एका अतिशय सुंदर अशा घर ह्या चित्रपटातील हे गाणे. हा चित्रपट पाहावा तो विनोद मेहराच्या अभिनयासाठी, सुंदर रेखासाठी, मनाला भिडणाऱ्या कथानकासाठी आणि गाण्यांसाठी! एकमेकांच्या प्रेमात पडलेले नायक, नायिका, वडिलांची लग्नाला परवानगी न मिळाल्यामुळे घर सोडून जाणारा नायक, लग्नानंतरचा सुखद काळ, मग नायिकेच्या आयुष्यात होणारा हादसा आणि त्यानंतर त्या दोघांचा मानसिक संघर्षाचा काळ. हा सर्व चित्रपटाचा मूड गुलजार यांनी कसा गाण्यातून अप्रतिमरित्या टिपला आहे पहा.

पहिलं गाणं 'आजकल पाँव ज़मीं पर नहीं पड़ते मेरे'. हा लग्नाआधीचा प्रेमिकांचा प्रणयाराधनेचा काळ, प्रेमिका इतकी सुखात न्हाऊन निघाली आहे की तिचे पाय जमिनीवर पडत नाहीत. आता पुढे अतिशोयक्ती अलंकारांचा वापर करून ती नायकास विचारते की तू मला उडताना तर पाहिले नाहीस ना? तुझा हात तर हातात आला आहे. लोक म्हणतात की दोघांच्या हस्तरेषा मिळाल्यात, पण इथे तर मी दोन आयुष्य, दोन भाग्य मिळताना पाहिली आहेत. मी रात्रंदिवस एका वेगळ्याच दुनियेत असते, आणि तुझाच चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर असतो. माझ्या अवतीभोवती दिवस रात्री काही बाही होत असत. त्याचा आपल्याशी संबध असो वा नसो पण माझ्या हृदयाची धडधड ते वाढवून जात! प्रेमात पडलेल्यांना वास्तवाचे भान नसतं हे आपण म्हणतो. गुलजार ह्यांनी हे कसे अचूक शब्दात पकडलं आहे बघा.

नंतरच गाणे 'तेरे बिना जिया जाये ना'. दोघांचे लग्न होते. लग्नानंतर व्यावहारिक जीवनाचं वास्तव समोर येत. नायक कार्यालयात जातो. नायिकेस घरी करमत नाही. त्यावेळचे हे गाणे. तुझा विचार येताच माझे सर्वांग सुगंधाने भरून जात आणि अशा स्थितीत मी बैचैन होऊन जाते, एकटी राहू शकत नाही. तुझा रेशमी सहवास मला काही दररोज मिळू शकणार नाही अशी खंत ती व्यक्त करते. ह्या जीवनात मला तुझ्याशिवाय काहीच रस वाटत नाही असे ती म्हणत असतानाच नायक घरी परततो.

पुढे ह्या दोघांच्या जीवनात एक दुर्देवी घटना घडते. नायिकेवर बलात्कार होतो आणि ती उद्ध्वस्त होऊन जाते. आपण नायकाच्या प्रेमास पात्र राहिलो नाही असे तिला वाटू लागते. मध्येच तिची मनःस्थिती पूर्ण बिघडून जावून ती नायकाला तू माझ्यावर दयेचे नाटक करू नकोस असा आरोपही करते. अशा वेळी नायक मात्र आपला संयम कायम ठेवतो. तो म्हणतो ही रात्रही तीच आहे आणि आपण दोघेही तेच आहोत. आणि अशा रात्री बघितलेली स्वप्नेही तीच आहेत आणि त्या स्वप्नात मी अजून तुलाच पाहतोय. ह्या अशा रात्री तू जे स्वप्न बघशील त्यात तू मला पापण्याच्या पडद्याआडून बोलाव असे आर्जव तो करतो. आता तो थोड वास्तवाकडे वळतो, ही स्वप्न काचेच्या तुकड्यासारखी आहेत ती थेट डोळ्यांना टोचू शकतात,म्हणजेच प्रत्यक्षात ही स्वप्ने उतरवणे कधीकधी दुखदायक असू शकतो म्हणून त्यांना झोपेतच बंद पापण्यात ठेवून डोळ्यात साठवण्याचा तो सल्ला तिला देतो.

बघा कसं आहे. एका बाजूला आहे दोन तासांचा चित्रपट आणि दुसऱ्या बाजूला आहेत १५ मिनिटांची ही चार गाणी. संपूर्ण चित्रपट ह्या चार गाण्यातून साकार केला आहे गुलजार यांनी!
जे न देखे रवी, ते देखे कवी!


Sunday, August 26, 2012

गुलजार भाग १



अकरावीत प्रवेश घेतल्यावर दादरला वर्तक वसतिगृहात मी रहावयास गेलो. माझा मोठा भाऊ आणि त्याचे मित्रमंडळ त्यावेळी तिथे वास्तव्यास होते. मुंबईत एकंदरीत कसे वावरायचे याचे धडे मला भावाकडून आणि त्याच्या मित्रमंडळीकडून मिळाले. राजेश सावे हा भावाचा एक खास मित्र. राजेशबरोबरच्या भावाच्या गप्पा बऱ्याच विषयांवर चालत. ह्या दोघांचा हिंदी चित्रपटाचा व्यासंग दांडगा. आधीच्या वर्षी इजाजत हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. एकदा हे दोघे ह्या चित्रपटाच्या गाण्याविषयी चर्चा करीत होते. एक सो सोला चांद कि राते वरून त्यांची गाडी गुलजारवर आली. त्यांची ती चर्चा आज मला फार काही आठवत नाही पण माझी आणि गुलजारची ही पहिली ओळख. त्यानंतर जेव्हा केव्हा गुलजार यांची प्रेमिकांच्या भावनांचे विविध कंगोरे शब्दात अचूक पकडणारी गाणी मी ऐकतो तेव्हा मी मंत्रमुग्ध होतो. काहींचा अर्थ मला समजला, काहींचा नाही ! अशाच काही गाण्यांचे मला समजलेल्या अर्थाचे हे वर्णन!
सुरुवात करूया आँखों में हम ने आप के सपने सजाये हैं या गाण्यापासून! यात प्रियकर प्रेयसीच्या प्रेमात आकंठ बुडला आहे. त्याच्या स्वप्नात, वास्तवात फक्त तीच आहे. त्याने हिऱ्यांची कठोर तपासणी करून तिच्या डोळ्यांचा रंग निवडला आहे. बऱ्याच परिश्रमानंतर त्याला जीवनाचे रंग गवसले आहेत. त्यामुळे तिची मिळालेली साथ सहजासहजी सोडायला तो स्वप्नातही तयार नाही. ती जेव्हा जेव्हा हसते तेव्हा त्याला जीवनाचा खरा अर्थ गवसतो. ती जेव्हा त्याच्या डोळ्यात बघते तेव्हा कालचक्रच थांबून जाते आणि त्या थांबलेल्या क्षणात त्याला तिच्याबरोबरच्या युगोनयुगे सहवासाचा आनंद मिळतो.
असेच एक दुसरे प्रेयसीच्या डोळ्यांविषयीचे अप्रतिम गाणे, आप की आखों में कुछ, महके हुए से राज हैं. यात प्रेयसीच्या डोळ्यांत दडलेली गूढ रहस्ये प्रियकराला शोधायची आहेत. प्रेयसिपेक्षा तिची अदा अधिक मोहक आहे असे म्हणण्याचे धाडसही तो करतो. तिने ओठ उघडल्यावर त्याला मोगऱ्याची फुले फुलल्याचा भास होतो, तिच्या डोळ्यात जीवनभराची साथ देणाऱ्या साथीदाराची त्याला खात्री पटते आणि तिच्या अबोलतेतही ती तिला जे काही म्हणायचे आहे ते सर्व सांगून जात आहे असे त्याला वाटते. आता वेळ आली ती नायिकेची! नायकाच्या बोलण्यात अवखळपणा नाही, तो आपली उगाचच स्तुती करीत नाही.पण त्याचे एकंदरीत अविर्भाव बघता त्याच्या मनात काही भलतासलता विचार तर नाही ना अशी शंका तिच्या मनात येते आणि ही तर तुझ्या बदमाशीची हद्दच झाली असा सरळसरळ आरोप करावयास ती कचरत नाही.
नंतरचे एक गाणे मासूम चित्रपटातील! हा चित्रपट एकदम भावूक. पिता असूनही अनाथपण अनुभवायला लागलेल्या एका लहान मुलाच्या भावविश्वाभोवती गुंफलेला! अशा ह्या चित्रपटात अचानक प्रियकराची / नवऱ्याची प्रेयासिविषयी असलेली मालकीभावना सुंदर शब्दात पकडणारे हुजूर इस कदर भी ना इतराके चलिए हे एक सुंदर गाणे. यात प्रेयसीने आपल्या सौंदर्याचे उगाचच प्रदर्शन करून नये असे प्रियकराला वाटते, तिच्या सौंदर्याने भाळून कोणी एखादा आशिक तिच्या मागे लागेल असे त्याला वाटते. पण ह्या गाण्याच्या शेवटी मात्र प्रियकर एक खंत व्यक्त करतो. हे सौंदर्य वगैरे सर्व ठीक आहे पण प्रेयसीकडे हृदयच नसल्याचे त्याला दुःख वाटते. तिच्याकडे जर हृदय असते तर एक सुंदर प्रेमकहाणी इथे लिहिली गेली असती असे त्याला वाटते. ह्या गाण्याचा पूर्वार्धाच्या मला समजलेल्या अर्थाविषयी मला पूर्ण खात्री नाही.
गुलजार ऐकणे हा सुंदर अनुभव आहे, पण गुलजार समजणे हे फार मोठे कठीण काम आहे. ज्याला जसा गुलजार समजेल तसा त्याने समजून घ्यावा आपापल्या भावविश्वाशी जोडावा. खूप आनंद मिळतो. असाच मला समजलेले गुलजार तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न मी पुढील काही दिवस चालू ठेवीन!

Thursday, August 23, 2012

कीर्तनकार


कंपनीत अधूनमधून प्रशिक्षण वर्गासाठी तुमची नेमणूक केली जाते. प्रशिक्षण वर्ग म्हणजे हे जग आदर्शवादी आहे असे समजून प्रशिक्षकाने दिलेले ग्यान! अशाच एका वर्गात प्रशिक्षक ग्यान देता झाला, एखाद्या माणसाला कठोर उपदेश द्यायचा असेल तर एकदम त्याकडे वळू नका, प्रथम त्याने केलेल्या चांगल्या कामाचा आढावा घ्या आणि हळूहळू कोठे चूक झाली, चुकीला कारणीभूत असलेले घटक कोणते याकडे वळा. आम्ही सर्वांनी माना डोलावल्या. नाण्याला दोन बाजू असतात. तुम्ही कधी उपदेश देणारे असता तर कधी घेणारे. थोडे विषयांतर, हल्ली एकंदरीत आपली झणझणीत बोलणे ऐकण्याची, खाणे खाण्याची क्षमता कमी झाली आहे हे मात्र खरे. पांढरपेशे बनण्याचा हा दुष्परिणाम!
माझ्या मनात मात्र संशयाचे भूत शिरले. कोणी बोलताना माझ्याविषयी चांगले बोलू लागले की मी हल्ली एकदम सावध होऊन जातो. त्या प्रशिक्षकाची आठवण येते आणि हा चांगले बोलण्याचा भाग खऱ्या उपदेशाची प्रस्तावना तर नव्हे असा संशय येतो. मध्येच एका जवळच्या मित्राने फोन केला. अरे आदित्य तू एकदम चांगले ब्लॉग लिहतो. झाले, मी सावध स्थितीत गेलो. प्रस्तावना झाल्यावर तो म्हणाला, तुझे ब्लॉग वाचून मला मंदिरातील कीर्तनकाराची आठवण येते. मी धन्य झालो. फोनच्या पलीकडील त्याचे अदृश्य हास्य मी पूर्णपणे पाहू शकत होतो.
बोलणे संपल्यावर काही वेळाने मात्र मी खुश झालो. मध्येच मी फेसबुकावर ग्यान पाजळले होते, दोन पिढ्यांमधील संघर्ष हा कायम राहणार. नवीन पिढीला जुनी पिढी सदैव पुराणमतवादी वाटणार आणि जुन्या पिढीला नवीन पिढी सदैव बंडखोर वाटणार. सध्याच्या युगातील तंत्रज्ञानाच्या झपाट्यामुळे जुनी पिढी काहीशी हबकली आहे. त्यांचा ज्ञान देण्याचा आत्मविश्वास काहीसा कमी झाला आहे. परंतु घाबरण्याचे कारण नाही, ही तंत्रज्ञानाचे दिंडोरे पिटणारी नवीन पिढी काही वर्षात आपली भूमिका बदलेल आणि मग मजा येईल असा माझ्या ज्ञानाचा सूर होता. तर मी माझी समजूत करून घेतली की मी जुन्या पिढीचा प्रतिनिधी आहे आणि त्या पिढीतर्फे कीर्तनकाराची भूमिका मी बजावतो आहे.
एखाद्या पिढीचे प्रतिनिधित्व करून ज्ञान देण्यासाठी कशाची गरज असते? मध्येच माझ्या पत्नीने चांगला मुद्दा मांडला identity चा. एखाद्या गावात, एकत्र कुटुंबात वाढलेल्या मुलास आपण त्या गावाचे, कुटुंबाचे प्रतिनिधी आहोत याचे बाळकडू लहानपणापासून अप्रत्यक्षरीत्या मिळत असते आणि मग तो आयुष्यभर त्या संस्कृतीचा पुरस्कर्ता बनतो. आजूबाजूच्या जगातील थिल्लर गोष्टींचा अशा मुलांवर परिणाम होण्याची शक्यता थोडी कमी असते. जेव्हा आजच्या युगात तुम्ही आपल्या मुलांस मुंबईत, अमेरिकेत वाढवता तेव्हा ह्या घटकांची उणीव भासते असा एकंदरीत तिच्या बोलण्याचा सूर होता. बायकोचे बोलणे निर्विवादपणे मान्य करण्याचे जे दुर्मिळ क्षण येतात त्यातला हा एक क्षण!
देवळातील कीर्तनकार हा उपदेश देणारा अधिकृत माणूस. पण गावात जवळजवळ सर्वचजण स्वखुशीने ही भूमिका बजावत असतात. शहरात मात्र लोक काहीसे अलिप्त बनतात. पूर्ण वाक्यातील संवाद मग तो सार्वजनिक जीवनातील असो की वैयक्तिक, झपाट्याने कमी होताना दिसतो. नक्कीच सध्या जगाला कीर्तनकाराची आवश्यकता आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल!

Tuesday, August 14, 2012

खेळ गृहितकांचा




माणसाचं आयुष्य हे एक गृहितकाने भरलेलं विश्व आहे. मनातल्या मनात आपण आजूबाजूच्या परिस्थितीविषयी, लोकांविषयी कळत न कळत अनेक गृहितक बनवत असतो. ही गृहितक बनविताना आपण आपल्याला आलेल्या अनुभवांचा किंवा ऐकीव / वाचलेल्या माहितीचा वापर करीत असतो. उदाहरणे द्यायची तर अनेक, रात्री झोपताना, झोपून उठल्यावर पृथ्वीने अर्धे परिभ्रमण पूर्ण करून सकाळ झाली असेल हे गृहितक आपण बनवितो, रात्रभरात वर्तमानपत्रे ताज्या बातम्या छापून सकाळी पेपर आपल्या दारात टाकतील हे अजून एक गृहितक. ही झाली सामान्य परिस्थितीविषयीची गृहीतके, तुम्ही जर अगदीच 'सिक्थ सेन्स' चित्रपटात नसाल तर बर्याच वेळा ही गृहीतके खरी ठरतात. पण हळूहळू ही गृहीतके थोडी क्लिष्ट स्वरूप धारण करू लागतात. बाजारात जीवनावश्यक वस्तूंचे भाव कसे बदलतील, निर्देशांक कसा उसळी मारेल याविषयी तुम्ही बनविलेली गृहीतके बर्याच वेळा चुकू शकतात. पण ठीक आहे, ही गृहीतके चुकू शकतात याची पूर्वकल्पना असल्यामुळे आपण त्यासाठी नियोजन करून ठेवले असते.

मामला जेव्हा व्यक्तींकडे वळतो तेव्हा थोडा गंभीर बनतो. आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी काही ठोकताळे बांधतो. ह्या साठी आधी म्हटल्याप्रमाणे आपण त्या व्यक्तीच्या आपल्याला आलेल्या अनुभवांचा, त्यांच्याविषयी आपण ऐकलेल्या, वाचलेल्या माहितीचा वापर करतो. आपण म्हणजे आपला मेंदू. ह्या सर्व माहितीचे पृथ्थकरण करून त्या व्यक्तीविषयी आपण आपलं मत बनवितो आणि ही व्यक्ती विविध प्रसंगी कसं वागेल याचा अंदाज बांधतो. यात अजून एक गृहितक असत, आणि ते म्हणजे आपल्या मेंदूच्या पृथ्थकरण करण्याच्या क्षमतेच्या खात्रीविषयीचे आपले गृहितक. आपली ही पृथ्थकरण करण्याची क्षमता निर्विवादपणे श्रेष्ठ असणार हे अजून एक गृहितक आपण करतो. आपल्या भोवतालच्या व्यक्तीसुद्धा आपल्या विषयी अशी गृहितक करतात. अशी ही गृहितक दोन व्यक्तींच्या नात्याचा पाया बांधतात. जेव्हा केंव्हा ह्या व्यक्तीचा संपर्क येतो तेव्हा एकतर त्या व्यक्ती एकमेकांच्या गृहीताकांप्रमाणे वागतात किंवा नाही वागत! मग आपण निराश होतो, त्या व्यक्तीने आपला अपेक्षाभंग केला असे म्हणतो. या उलट कधी आपणास ह्या व्यक्ती अपेक्षेपेक्षा चांगले वागून सुखद धक्का देतात.

लेखाचा उद्देश एकच, ज्याने त्याने आपापली गृहीतके तपासून बघा आणि आपली पृथ्थकरण क्षमताही!
 

Saturday, August 11, 2012

ऑलिम्पिक २०१२ एक आढावा


ऑलिम्पिक मी मनसोक्त बघतोय. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी तर भरभरून बघतोय. उद्घाटन सोहळा सुंदर झाला, अगदी बीजिंग इतका नसला तरी चांगला झाला. कोणी मधुरा नावाच्या बंगलोरच्या युवतीने भारतीय पथकात समाविष्ट होवून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणा तिला तरी दोष का द्यावा, फुकटच श्रेय मिळवण्याची सवय लागलेल्या हल्लीच्या भारतीय मनोवृत्तीचे तिने जगासमोर दर्शन घडविले.
  1. धनुर्धारी
पहिल्या शनिवारी पुरुषांच्या सांघिक धनुर्धारी स्पर्धेत भारतीय संघाच्या सहभागाने ऑलिम्पिक मधील भारताच्या मोहिमेची सुरुवात झाली. एका संघात तीन स्पर्धक, एका मागोमाग येवून समोरच्या निशाणाचा नेम साधायचा. बरोबर मध्यावर / आतल्या वर्तुळात नेम लागला तर १० गुण, त्याबाहेरील वर्तुळात नेम लागला तर ९ गुण आणि असेच पुढे! आपल्या संघाने सुरुवात तर चांगली करून जपानवर सुरुवातीला आघाडी घेतली. ह्यात दोन महत्वाच्या गोष्टी येतात, जेव्हा तुम्ही झोन मध्ये येता म्हणजे जेव्हा तुमची ब्रह्मांडी टाळी लागते त्यावेळी जमतील तितके १० गुण मिळवून घ्यावेत. आणि कितीही लक्ष विचलित झाले तरी ८ च्या खाली गुणसंख्या जावून द्यायची नाही. क्रिकेटच्या पंढरीवर (लॉर्डसवर) हे सामने खेळले जात होते. इंग्लंडचे लहरी हवामान, थंड वारा ह्या गोष्टी आपल्या धनुर्धारांबरोबर त्यांच्या बाणांचेही लक्ष विचलित करायला पुरेशा ठरल्या. मध्येच एक दोन वेळा आपल्या स्पर्धकांनी ६ गुणांचा नीचांक गाठला. २४ फेर्यांच्या शेवटी दोन्ही संघांच्या गुणांची बरोबरी झाली (२११ -२११) आणि कोंडीफुटीच्या (tie breaker ) मध्ये आपण हरलो. उत्तम लढत पण एक चांगली संधी आपण गमाविली.
महिला संघाकडून तर अधिक जास्त अपेक्षा होत्या कारण त्यात आपली जगज्जेती दीपिका समाविष्ट होती. तिथेही अशीच गोष्ट. पहिल्याच फेरीत आपण हरलो. महिला संघाने तर आपल्या क्षमतेच्या जवळपासही खेळ केला नाही. वैयक्तिक स्पर्धेतही दीपिका पहिल्याच फेरीत हरली. 'क्या हो रहा था यह समजने के पहेलेही सब ख़तम हुवा था' असे दुःखी स्वरात ती म्हणाली.
२. बॅडमिंटन
बॅडमिंटनमध्ये दुहेरी सामन्यापासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ज्वाला गट्टा दुहेरीच्या महिला आणि मिश्र अशा दोन्ही सामन्यात पराभूत झाली. नंतर मात्र महिला दुहेरीच्या सामन्यात तिने अश्विनी पोन्नापाच्या साथीने साखळीतील शेवटचे दोन सामने जिकून आशा जिवंत केल्या. त्यांचा शेवटचा सामना सुरु व्हायच्या आधी समालोचकाने म्हटले सुद्धा की उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशासाठी त्यांना हा सामना एका विशिष्ट गुण फरकाने जिंकणे आवश्यक आहे. चुरशीच्या पहिल्या गेम नंतर दुसर्या गेम मध्ये त्यांनी ९ -० आणि मग ११- १ अशी आघाडी घेतली सुद्धा, पण नंतर मात्र सिंगापोरच्या जोडीने चुरस देत पराभवाचे अंतर कमी केले. महिला दुहेरीचे सामने गाजले ते काही गटातील निर्णय दोन्ही जोडीनी आपसात ठरविल्याने. ह्यात चीनच्या जोडीचाही समावेश होता. त्या बद्दल शिक्षा म्हणून ह्या जोड्यांना बाद ठरविले गेले. हे तर योग्य झाले, पण हा आदेश त्यांना ज्यांनी दिला त्या उच्च पदाधिकाऱ्यांचे काय? आपल्या जोडीनेही आपल्या गटातील एका निर्णयावर आक्षेप घेतला पण तो मान्य केला गेला नाही. इतके करून सुद्धा चीनचे खेळाडू महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावून गेले.
बाकी सैना नैहवालचे कौतुक करावे तितके थोडे. तिची एकाग्रता वाखाणण्याजोगी, चीनच्या खेळाडूंच्या मोठ्या समूहाला एकटीने टक्कर द्यायची हे काय सोपे काम नाही. उपांत्य फेरीत ती हरली खरी पण कास्न्य पदकासाठीच्या सामन्यात तिला तमाम भारतीयांच्या प्राथनानी साथ दिली आणि चीनी खेळाडूला दुखापतीपायी माघार घ्यावी लागली. कश्यपने देखील सुखद धक्का देत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली.
३. टेनिस
हा एकमेव असा खेळ जिथे आपणाकडे दुहेरीतील जागतिक स्तरावरील खेळाडू आहेत. परंतु व्यक्तिगत अहंकाराने राष्ट्रभावनेला तिलांजली देण्यात आली. पेस - भूपती आणि भूपती - मिर्झा अशा आपल्या जोड्यांना विजयाची उत्तम संधी होती. पण आपल्या महान खेळाडूंनी तसे काही होवून दिले नाही. आणि आपले आव्हान दुसर्या फेरीच्या पुढे काही जावू शकले नाही.  बाकी फेडरर ज्या प्रकारे मरेकडून अंतिम सामन्यात हरला ते काही मला झेपले नाही. एक तर फेडरर अगदीच सुमार खेळ खेळीत होता किंवा दमला होता किंवा ....
४. नेमबाजी
मला सुरुवातीपासून १० meter air rifle ह्या स्पर्धा प्रकारापासून खास आशा होत्या. कारण एकच ह्यात आपले दोन खंदे वीर गगन नारंग आणि अभिनव बिंद्रा भाग घेत होते. नेमबाजीच्या ह्या स्तरावरील स्पर्धेत शेवटी एकाग्रता आणि मानसिक सामर्थ्याची कसोटी लागणार. २००८ ला अभिनवने बाजी मारली आणि ह्यावेळी गगनने. गगनने पदकांचे खाते उघडले आणि मी धन्य झालो. १९८० च्या मास्को ओलीपिक मधील हॉकीच्या सुवर्णपदकानंतर १९८४, ८८, ९२ अशी तीन ओलीपिक मध्ये भारताच्या पदकाची पाटी कोरीच राहिली होती. त्या मुळे हल्ली प्रथम मी पहिले पदक कधी मिळते याची वाट पाहत असतो. बाकी त्यानंतर विजय कुमारने पिस्तोल शूटिंग मध्ये अनपेक्षितरित्या रौप्य पदक मिळवून दिले. जिंकल्यावर गडी म्हणाला, 'ह्या स्तरावर जिंकण्यासाठी मनोबलाची आवश्यकता असते आणि आम्हाला सैन्यात ह्याची सवय असते.' अखंड भारतात शिस्त कोठे अस्तित्वात असेल ती सैन्यात!
५. हॉकी
आज भारत दक्षिण आफ्रिकेकडून हरला. आणि बाराव्या / अंतिम स्थानावर राहिला. भारताचे ऑस्ट्रेलीयान प्रशिक्षक नोब्ब्स यांना अजून थोडी संधी द्यावयास हवी असे माझे वयैक्तिक मत. बाकी आपण ज्याकाळी जिंकायचो त्याकाळची आणि आजची हॉकी फारच वेगळी. तेव्हा नैसर्गिक मैदानावर सामने खेळले जायचे आणि त्यामुळे शक्तिमान लांबलचक पास देण्याची पद्धती अस्तित्वात नव्हती, हॉकीच्या काठीने चेंडू खेळवत नेत, प्रतिस्पर्ध्याला चकवत गोल करण्यात आपली खासियत. हॉकीचा पृष्ठभाग बदलला आणि खेळही बदलला. त्यामुळे मी मात्र आपल्या संघाकडे सहानभूतीने बघतो. इथे गरज आहे ती ललित मोदि किंवा शरद पवार सारख्या धूर्त लोकांची जे परत हॉकीला नैसर्गिक पृष्ठभागावर घेऊन येतील.
६. बॉक्सिंग
मेरी कोमने सुंदर खेळाचे प्रदर्शन केले. परंतु दुर्दैवाने उपांत्य फेरीत तिला सुवर्णपदकविजेत्या ब्रिटीश खेळाडूकडून हार पत्करावी लागली. आजच तिच्या आहाराविषयी लेख वाचला. तिने कारकिर्दीतील सुरुवातीचे बरेच दिवस भात आणि भाज्या अशा आहारावर काढले. बाकी विजेंदर सिंग आणि इतर बॉक्सर झुंज देत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचले परंतु तिथे हरले. आपण निर्णयाविरुद्ध मागितलेली दाद फेटाळली गेली. इथे एक बाब मला खटकली. एक प्रश्न पडला, आपण हार खुल्या दिलाने पत्करू शकत नाही का?
७. कुस्ती.
प्रत्येक अंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी जेव्हा भारतीय संघ जाहीर होतो त्यावेळी मी कोल्हापूरच्या आखाड्यातील कोणी कुस्तीवीर दिसतो कि नाही याची तपासणी करतो.
योगेश्वर दत्तने कमाल केली. उपांत्यपूर्व फेरीत हरून सुद्धा त्याने मिळालेल्या संधीचे सोने करीत कांस्य पदक पटकाविले. सुशीलकुमारचे तर कौतुक करावे तितके थोडे. त्याने अनेक तगड्या पैलवान्नाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. नंतर मात्र मान दुखावल्यामुळे तो अंतिम फेरीत हवा तसा प्रतिकार करू शकला नाही आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
८ Gymnastic
हा देखील एक सुंदर खेळ. महिला सांघिक स्पर्धेत रशिया संघ जिंकण्याच्या स्थितीत असताना एका खेळाडूची उडी चुकली आणि आणि त्यांचे सुवर्णपदक हुकले. ध्येयाच्या किती जवळ तरीही किती दूर!
९. लयबद्ध जलतरण
ह्या खेळात भारताचा सहभाग नसला तरी हा खेळ पाहणे अत्यंत आनंददायी अनुभव असतो. अनेक खेळाडूंनी पाण्यामध्ये साधलेल्या समन्वय हालचाली, त्यामागची मेहनत. धन्य ते खेळाडू!
असो प्रत्येक देशांच्या दृष्टीने प्राधान्य दिल्या जाणार्या गोष्टी वेगळ्या असतात. चीनच्या काही सुवर्णपदकविजेत्यांनी जो काही वैयक्तिक त्याग केला त्याच्या गोष्टी ऐकल्या की अंगावर शहारे येतात. उत्तर कोरियातील ज्या खेळाडूंना पदक मिळाले नाही त्यांना छळ छावणीत पाठविले जाते अशी वाचलेली बातमी खोटी असो अशी मी प्राथना करतो.
पुढील ऑलिम्पिक २०१६ साली ब्राझील मधील रिओ इथे होणार. एका विकसनशील देशाला ऑलिम्पिक भरविण्यासाठी माझ्या शुभेच्छा! बाकी २०१६ साठी भारताने १००० खेळाडू निवडून, त्यांच्या चरितार्थाची सोय करून त्यांना पुढील चार वर्षासाठी एका थंड हवेच्या ठिकाणी सरावासाठी ठेवावे अशी भोळीभाबडी सूचना! बाकी आतापर्यंतची ६ पदकांची आपली सर्वोत्तम कामगिरी बजाविणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन!

Sunday, August 5, 2012

दोन नियम



व्यावसायिक जगात अधूनमधून काही चांगल्या संकल्पना ऐकायला मिळतात. गेल्या एक दोन वर्षात ऐकलेल्या संकल्पना म्हणजे MOVE ON (झाले गेले विसरुनी जावे पुढे पुढे चालावे) आणि keep the emotions out of it . व्यावसायिक जीवनात असे काही प्रसंग येतात की जेव्हा आपल्याला हवे तसे घडत नाही त्यावेळी पहिली संकल्पना वापरावी असे म्हणतात आणि जेव्हा केव्हा काही कठोर चर्चेचे प्रसंग येतात आणि जिथे वस्तुनिष्ठरित्या विचार करण्याची गरज असते तिथे दुसरी संकल्पना वापरली जाते / वापरण्याचा प्रयत्न करावा.

व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक जीवनांत काही गोष्टी / नियम सारख्याच प्रमाणात लागू होतात. आता पहाना MOVE ON ची पहिली संकल्पना आपण वैयक्तिक जीवनात किती कमी प्रमाणात वापरतो. एखाद्याशी झालेल्या तंटा, कधी झालेला वैयक्तिक मानभंग आपण किती प्रदीर्घ काळ लक्षात ठेवतो. त्यावर किती प्रमाणात आपली बौद्धिक शक्ती खर्ची पाडतो. हेच जर आपण move on यशस्वीपणे अमलात आणू शकलो तर किती बरे होईल. तसेच बघायला गेले तर आयुष्यात आपल्याला कधी कधी अपयशाचा, आजारपणाचा मुकाबला करावा लागतो. काहीजण मात्र अरे माझ्याच बाबतीत असे का घडते ह्याच मुद्द्यावर अडून बसतात.

दुसरा मुद्दा keep the emotions out of it चा. काही चर्चेचे प्रसंग असे असतात जिथे दोन्ही पक्ष भावनाविवश होवू शकतात. राजकीय पक्षांच्या युतीमध्ये एखादी जागा असते जी एका पक्षाच्या वृद्ध आमदाराकडे असते आणि ही जागा आपल्याच मुलाला मिळावी असा त्याचा / त्या पक्षाचा अट्टाहास असतो. परंतु सद्यपरिस्थितीत सारासार विचार करता जोडीदार पक्षाला विजयाची तिथे जास्त संधी असते. तिथे हा मुद्दा लागू पडतो. नवराबायकोच्या सहजीवनात याची उदाहरणे खचखचून भरलेली असतात. दैनंदिन जीवनातील क्षुल्लक विवादाचा मुद्दा कधी आणि कसा भावनिक पातळीवर जावून पोहचतो हे कळतच नाही. परंतु एक मात्र खरे, ही नियम फक्त योग्य ठिकाणी आणि अगदी कमी प्रमाणातच वापरायला हवा.

मनुष्य म्हटला की भावना आल्याच! आणि उठसुठ का आपण ह्या भावना बाजूला ठेवायला लागलो की आपण यंत्र कधी बनू हे आपलेच आपल्याला कळणार नाही.

Tuesday, July 31, 2012

I MISS YOU पांगारा!



लहानपणची गोष्ट! वसईची थंडी मार्च सुरु झाला तरी मागे सरण्याचे नाव काढत नसे. शाळेतील क्रीडा महोत्सव फेब्रुवारी मध्ये व्हायचा. त्यानंतर स्नेहसंमेलन वगैरे झाले की वार्षिक परीक्षांचे वारे सुरु व्हायचे. दहावी बारावीच्या परीक्षा सुरु झाल्यावर आमची शाळा अर्धवेळ म्हणजे दुपारी ३ वाजताच्या सुमारास चालू व्हायची. अशा सुमारास मला अभ्यासासाठी गच्चीवर जायला आवडायचे. आंघोळ, न्याहारी आटपून सकाळी साडेआठ - नऊच्या सुमारास मी दोन तीन विषयाची पुस्तके घेवून जात असे. अभ्यासाबरोबर तिथला एक उद्योग म्हणजे गच्चीजवळील पांगार्याच्या झाडाचे निरीक्षण. मार्च महिन्याच्या सुरुवातीस हे झाड लाल फुलांनी बहरून जाई. आजूबाजूच्या परिसरातील पक्षी ह्या झाडावर गर्दी करीत. पोपट, कोकिळा, कावळा अशा नेहमी आढळणाऱ्या पक्ष्यांसोबत बाकीचे पक्षीही गोळा होत. मग झाडावर चाले तो ह्या पक्ष्यांचा सुमुधुर कलकलाट! ह्या कलकलाटासोबत अभ्यास करण्याचा आनंद वेगळाच. हे सर्व पक्षी ह्या फुलांचा मध पिण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत. कावळे थोडीफार दादागिरी देखील करीत. एप्रिल मध्ये परीक्षा सुरु होईपर्यंत ही फुले मग हळू हळू नाहीशी होत. उरे मग केवळ काट्यांनी व्यापलेले पांगार्याचे झाड! पुढे पावसाला आला की हेच झाड हिरव्या पानांनी बहरून जाई. आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला आपला पर्णसंभार झाडून देई! ह्या पांगार्याच्या झाडाच्या बिया दगडावर घासल्या की बर्यापैकी गरम होत आणि मग बालमित्रांना चटका द्यायला उपयोगी पडत!

पुढे काळ बदलला. हे झाड आमच्या आणि शेजार्याच्या बरोबर हद्दीवर होते. ह्या जगात नुसत्या कलात्मक सौंदर्याला किंमत नसते, टिकायचे असेल तर एकतर ही कला बाजारात विकता यावी किंवा त्या वस्तूचे व्यावसायिक मोल असावे लागते. बिचाऱ्या पांगार्याच्या झाडाच्या लाकडाला काही व्यावसायिक किंमत नव्हती आणि एके दिवशी येवून लाकूडतोड्यांनी ह्या झाडाला तोडून टाकले. ते झाडही गेले आणि त्याबरोबर नाहीसा झाला तो मार्चच्या सुंदर सकाळचा पक्ष्यांचा सुमधुर किलकिलाट. ह्या नष्ट झालेल्या आनंदस्थळामुळे त्या परिसरातील पक्ष्यांचे दुखावलेले भावविश्व आपणास कसे कळावे? बाकी वसईत ह्या झाडांची संख्या मग झपाट्याने कमी होत गेली. रमेदी ते पारनाका ह्या रस्त्यांवरील वेगाने कमी झालेल्या जुन्या वाड्यान प्रमाणे!  आज अचानक ह्या पांगार्याची आठवण आली. नेटवर मिळालेला हा एक पांगार्याचा फोटो!

Friday, July 27, 2012

बदलांचा मागोवा!


असे म्हणतात की सद्ययुगात एकच गोष्ट कायम आहे आणि ती म्हणजे बदल! खाजगी क्षेत्रातील यशस्वी कंपन्या हे सत्य ओळखून आहेत आणि जगातील संभाव्य बदलांचा मागोवा घेत त्यानुसार भविष्यकाळातील धोरणे आखण्यासाठी ह्या कंपन्यांनी सल्लागार लोकांची नेमणूक केली असते. ज्या कंपन्यामध्ये अशा पदांवर योग्य व्यक्ती असतात त्याच कंपन्या कालौघात टिकून राहतात. परंतु बाकीच्या क्षेत्रांचे काय? स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही शासनपद्धतीचा अंगीकार केला. त्याचबरोबर छुप्या रूपाने काही गोष्टी घडल्या. ज्या विशिष्ट वर्गाने आधी बराच काळ भारतीय सामाजिक जीवनावर आधिपत्य गाजविले त्या समाजाला राजकारणापासून पद्धतशीररित्या दूर ठेवले गेले. त्यामुळे भारतीय समाज त्या वर्गातील अंगजात असलेल्या नेतृत्वगुणाला मुकला. स्वातंत्र्यकाळापासून आजवर भारताने प्रगती तर केली परंतु नक्कीच आजचे चित्र पाहता आपणास आशादायक भविष्यकाळ दिसत नाही. खाजगी क्षेत्र असो की राजकारण असो, एका विशिष्ट बिंदूच्या पलीकडील प्रगतीसाठी 'तिथे पाहिजे जातीचे' म्हणजेच त्या कामासाठी योग्य व्यक्तीच हवी ही उक्ती सार्थ ठरते. आपल्या देशातील लोकशाही पद्धतीच्या संरचनेमुळे लोकानुनय करण्याऱ्या धोरणांचाच स्वीकार केला जातो. प्रादेशिक पक्षांचे वाढलेले सामर्थ्य देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक अश्या धोरणांच्या आड येते. साधे उदाहरण घ्यायचे झाले तर आपल्या भारतात तयार होणारे अभियान्त्रिक पदवीधर. पुढील २० वर्षात भारताला आणि जगाला किती अभियान्त्रिक पदवीधरांची गरज आहे आणि एकंदरीत उद्योगधंद्यांची वाढ कोणत्या दिशेने होणार आहे याचा अभ्यास करण्याच्या दूरदृष्टीचा पूर्ण अभाव सध्याच्या राजकीय नेतृत्वात दिसतो. साधारणतः १५ वर्षापूर्वी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी गरज निर्माण झाली. त्यासाठी आपण तयार नव्हतो. मग काय झाले तर बाकीच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील लोक त्या क्षेत्रात शिरले. प्राथमिक पातळीवरील कामे करण्यासाठी हे ठीक होते परंतु नवीन product निर्माण करणे अशा विकसित स्वरूपांच्या कामासाठी आपण तयार नव्हतो. आजची स्थिती काय आहे तर आपण फक्त माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते निर्माण करण्यावर लक्ष देत आहोत. अभियांत्रिकीच्या मुलभूत शाखांमध्ये (स्थापत्य, विद्दुत, mechanical ) भविष्यातील गरज काय आहे याचा अभ्यास करण्याच्या दूरदृष्टीचा / किंवा ह्या दूरदृष्टीच्या क्षमतेचा पूर्ण अभाव आपल्या राज्यकर्त्यांकडे दिसतो. वाईट इतक्याच गोष्टीचे वाटते की खाजगी क्षेत्रात ह्या सर्व प्रश्नांचा दूरगामी विचार करू शकणारे अनेक व्यवस्थापक आहेत. परंतु सद्य राजकीय प्रणाली अशा सक्षम लोकांना भविष्यातील धोरणे ठरविण्यासाठी समाविष्ट करून घेत नाही. काही अपवाद आहेत जसे की नंदन निलकेणी यांचा UIDAI प्रकल्पातील समावेश! परंतु लालफितीचा मुकाबला करण्यात त्यांची अर्धी शक्ती वाया जात असल्याचे जाणवते.

जाता जाता हेच म्हणावेसे वाटते, भारताचे सध्याचे यश दोन घटकांमुळे आहे एक खाजगी क्षेत्रातील सक्षम नेतृत्व आणि चांगुलपणावर विश्वास ठेवून जीवनातील असंख्य अडचणींचा शांतपणे मुकाबला करणारा मध्यमवर्ग. परंतु आपल्या देशाची ही एक उत्तम स्थिती आपण राजकीय क्षेत्रातील दूरदृष्टीच्या अभावामुळे वाया घालवीत आहोत हीच खंत. ह्या राजकीय प्रणालीत बदल कोण आणि कसे आणणार हाच खरा प्रश्न आहे.
 

Tuesday, July 24, 2012

रिकामी न्हावी...



मुलांना मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्या की शहरातील पालक धास्तावतात! पूर्वीसारखा नातेवाईक, शेजारी असणारा समवयस्क मुलांचा घोळका हल्ली कमी होत चालला आहे आणि त्यामुळे मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी पालकांना उद्योग शोधावे लागतात. हे झाले एकदम प्राथमिक उदाहरण, पण ह्या प्रश्नाची प्रगतावास्थेतील उदाहरणे अनेक, सतत कामात गुंतून राहणाऱ्या नोकरपेशा किंवा व्यावसायिक माणसाला अचानक मोकळी अशी साप्ताहिक सुट्टी मिळाली किंवा त्याने / तिने एका आठवड्याची सुट्टी टाकली तर ही व्यक्ती घरी शांतपणे बसू शकत नाही. व्यावसायिक स्त्रियांना बाळंतपणानंतरची अल्पमुदतीची किंवा कायमची सुट्टी, नवऱ्याच्या नोकरीनिम्मित परदेशी / परगावी स्थायिक व्हावे लागल्यामुळे सुटलेली नोकरी ही अजून काही उदाहरणे. माणसाची नोकरी गेली किंवा माणूस निवृत्त झाला तरी हा प्रश्न उद्भवतो.

कधीतरी वाचले होते की माणसाचे अर्धे प्रश्न त्याच्या एका खोलीत शांतपणे बसू शकण्याचा क्षमतेच्या अभावामुळे निर्माण होतात. हे विधान बऱ्याच प्रमाणात मला पटले. आता हा प्रश्न गावापेक्षा शहरात अधिक उग्र स्वरूप निर्माण करतो. अमेरिकेतील कुटुंब फोन न करता अगदी जवळच्या मित्राच्या घरी देखील जाणार नाहीत. मुंबईत फोन न करता घरी जाण्याचा हक्क आपण काही मोजक्या कुटुंबात गाजवू शकतो. वसईत मात्र आपण बहुतांशी सर्वांच्या घरी हा हक्क बजावू शकतो. समजा एखादे आई, बाबा आणि मुल असे छोटे कुटुंब आहे तर हे कुटुंब रविवारी संध्याकाळी काही न करता दूरदर्शन न लावता, संगणक सुरु न करता किती वेळ घरात सुसंवाद साधू शकते हा ह्या कुटुंबातील सुसंवाद किती आहे याचा मापदंड असू शकतो.

माणसाला समाजाशी संवादाची गरज का भासते? आपल्याला समाजाने स्वीकारले आहे ह्या जाणीवेवर माणसाला वेळोवेळी शिक्कामोर्तब हवे असते. हे शिक्कामोर्तब किती प्रमाणात हवे आणि त्याची वारंवारता किती असावी हे व्यक्तीनुसार बदलते. निवृत्त माणसांना हा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो. ह्यातील काही नशीबवान माणसे सामाजिक संस्थावर एखादे मानाचे स्थान मिळवून वर्षोनवर्षे बसून राहतात. आणि आपल्या अनुभवाचा समाजाला उपयोग करून देतात! पण एक क्षण असा येतो की ज्या क्षणी ह्या पदावरील ह्या व्यक्तीचे अस्तित्व ही समाजापेक्षा त्या व्यक्तींची गरज बनते. एकंदरीत हा आपण भारतीयांचा सामाजिक आणि राजकीय जीवनातील प्रश्नच आहे ना! तरुणपणीच्या उमेदीच्या वर्षात आपल्याला कधी संधीच मिळत नाही मग ते सामाजिक जीवन असो की राजकीय जीवन. ८० व्या वर्षी राष्ट्रपती झालेल्या प्रणावदांचे अभिनंदन!

माणसाला मोकळा वेळ घरी शांतपणे घालविता येत नाही ह्या गृहितकावर अनेक उद्योगधंदे सध्या निर्माण झाले आहेत. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी ओसंडून वाहणारे मॉल, मे महिन्यात पालकांचा खिसा रिकामी करणारे तथाकथित ज्ञानी लोकांनी चालविले सुट्टीतील वर्ग ही त्याची उदाहरणे होत. अरेच्या हा ब्लोग पण त्याचे उदाहरण नव्हे ना :)

Sunday, July 22, 2012

हल्लाबोल


मागच्या सायकल शर्यतीच्या लेखात एक मुद्दा मांडायचा राहून गेला. आघाडीचा जथ्था बरेच अंतर एकत्र जात असतो. अंतिम रेषेला २-३ किमी अंतर बाकी असताना त्यातला एखादा स्पर्धक अचानक ह्या समूहातून पुढे निघतो, शेवटचा हल्ला चढवितो. ह्या क्षणाच्या निवडीमागे मोठे गणित असते. ह्या क्षणानंतर असतं ते अंतिम युद्ध! आपण हा शेवटचा निकराचा प्रयत्न किती काळ टिकवू शकतो, शेवटचा मार्ग कसा आहे, आपली आणि प्रतिस्पर्ध्याची शक्तिस्थाने, कमकुवत दुवे कोणते ह्या सर्वच अभ्यास करून ह्या क्षणाची निवड केली जाते. हा हल्लाबोल चढविणारा स्पर्धक नेहमीच शर्यत जिंकतो असे नाही, पण तरीदेखील प्रत्येक दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत असा एक स्पर्धक असावाच लागतो. इथले उदाहरण शर्यतीचे, पण तसेच लागू पडते ते स्पर्धात्मक व्यवसायात, युद्धात असे क्षण येतातच!

परवा ओवल सामन्यात शतक पूर्ण केल्यावर ग्राहम स्मिथ म्हणाला की पहिल्या दिवसानंतर इंग्लंडने सामन्यावर बर्यापैकी पकड बसविली होती. बहुतांशी कसोटी सामने ह्या स्थितीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकतात. परंतु दक्षिण आफ्रिकेने दुसर्या दिवसानंतर सामना फिरवला. इंग्लंडला झटपट गुंडाळून धावांचा डोंगर उभा केला. इथे मुद्दा येतो तो मनसामर्थ्याचा, ज्याचे मनोबल जास्त तो आपल्या जवळील साधनांचा, आपल्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग करून घेतो आणि यशस्वी बनतो. बारावीला असताना रुपारेल होस्टेलला राहिलो. तिथेही काहीसा असाच प्रकार अनुभवायला मिळाला होता. तिथे बारावीच्या मजल्यावर राहणारे सर्वजण एकदम हुशार, योग्य पात्रतेचे. दहावीपर्यंत अतिशय चमकलेले. फरक इतकाच की बारावीत पालकांचे संरक्षक कवच वसतिगृहात २४ तास उपलब्ध नव्हते, आपल्याहून अधिक क्षमतेची मुले आपल्या डोळ्यासमोर होती. आपल्यातील काही कच्चे दुवे प्रथमच स्वतःला कळत होते. मग १२ वीच्या निकालानंतर दोन वर्ग समोर आले. काही जणांनी ह्या सर्व घटकांना तोंड देत दैदिप्यमान यश मिळविले आणि काहीजण मात्र आपल्या क्षमतेइतके यश मिळवू शकले नाहीत.

अजून एक महत्वाची बाब डोळ्यासमोर येते आणि ती म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीचे झटपट विश्लेषण करून योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता. तुमची परिस्थिती कितीही बिकट असो, त्या परिस्थितीतही तुमच्यासमोर एखादा उत्तम मार्ग उपलब्ध असतो. तो तुम्हाला शोधता आला पाहिजे.

Saturday, July 21, 2012

टूर द फ्रांस, ऑलिम्पिक, रसिकता वगैरे वगैरे


मागच्या ब्लोगमध्ये ज्ञानी लोकांच्या लिखाणाविषयी म्हटले होते. ह्या लोकांचा त्या विषयातील व्यासंग दांडगा असतो. सद्यकालीन आणि माझ्या मर्यादित वाचनात आलेला असा ज्ञानी लेखक म्हणजे डॉ. गिरीश कुबेर! लोकसत्तेत शनिवारी ते सुंदर लेख लिहितात.
पहिला लेख होता कर्ता आणि करविता ह्या विषयावर! करविता ह्या वर्गातील लोक मुळच्या आर्थिक भांडवलाला कृत्रिम फुगवटा आणण्याची कामे करतात, ही फुगी खरी असल्याचा आभास निर्माण करण्याची किमया हे करविते करतात. असाच हा कृत्रिमरीत्या वाढविलेला फुगा केव्हातरी फुटतो आणि ह्या फुगवट्याच्या आधारावर केलेली सर्व गणिते कोलमडून पडतात. असा एकंदरीत ह्या लेखाचा मतितार्थ! आजचा दुसरा लेख होता विविध आर्थिक घोटाळ्यात सापडलेल्या उच्चपदस्थ अनिवासी भारतीयांविषयी! ह्या अशा उच्चपदस्थ घोटाळ्यातील भारतीयांची संख्या वाढत चालल्याचे त्यांनी सोदाहरण पटवून दिले आहे.
सध्या टूर द फ्रांस ही जगप्रसिद्ध सायकल शर्यत चालू आहे. बरेच दिवस चालणारी ही सायकल शर्यत, ज्या प्रमाणे स्पर्धकांच्या शारीरिक क्षमतेची कसोटी पाहते त्याचप्रमाणे स्पर्धकाच्या विविध गटांचे डावपेच पाहणे सुद्धा आनंददायी अनुभव असतो. मी जेव्हा संधी मिळते तेव्हा ही शर्यत पाहतो त्याचे मुख्य कारण फ्रान्सच्या नयनरम्य गावांचे घडणारे मनोहर दर्शन! ह्या स्पर्धेतील गट कसे पाडले जातात आणि त्यांची गुणपद्धती कशी आहे ह्याचा मला अजिबात ठावठिकाणा नाही. नयनरम्य फ्रान्सच्या भागातून जाणारे हे सायकलस्वारांचे जथ्थे! एक आघाडीचा आणि बाकी सर्व पिछाडीचे! ह्या सायकलस्वारांचा वेग तसा बर्यापैकी, ताशी २५ किमी ते शेवटच्या टप्प्यात ४० किमीपर्यंत जात असावा. आघाडीच्या समूहातील सायकलस्वार बरेच अंतर एकत्र पार पाडतात, त्यांच्याबरोबर असतात त्या मोटारी, बाइक्स आणि हेलीकोप्तर. इतके अंतर पार पाडायचे असल्याने शक्ती राखून ठेवणे आवश्यक, जरा वेळ मान समोर ठेवून सायकल चालविल्यावर थोडा वेळ मान खाली आणून सायकल चालावावयाची, मध्येच बाजूच्या सहाय्य चमूकडून पाण्याची बाटली घेवून आपली तहान भागवायची, हे सर्व करता करता आपल्या प्रतिस्पर्ध्यावर नजर ठेवायची ह्या सर्व गोष्टी हे स्पर्धक साधत असतात. त्यांचे हे सर्व डावपेच पाहणे मजेशीर असते. ही शर्यत जेव्हा एखाद्या गावातून जाते त्यावेळी तेथील ग्रामस्तांच्या चेहऱ्यावरील आनंद टिपण्याजोगा! अगदी पूर्वी बलिप्रतिपदेला वसईला होणार्या सायकल शर्यतीतील स्पर्धक रमेदिहून गेले की मला होणार्या आनंदासारखा!
पुढील आठवड्यात ऑलिम्पिक चालू होईल. माझी सर्वांना कळकळीची विनंती! सर्व मालिका, इंटरनेट सर्व काही बाजूला सोडा आणि ऑलिम्पिक पहा. देशाच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणर्या खेळाडूंचा यज्ञ पाहण्यासारखा आनंद नाही! लयबद्ध जलतरण स्पर्धा, मेराथोन स्पर्धा, नेमबाजी स्पर्धा, लांब पल्ल्याच्या धावण्याच्या / पोहण्याच्या स्पर्धा - मनुष्याच्या शरीराच्या / मनाच्या एकाग्रतेची कसोटी पाहणाऱ्या ह्या विविध स्पर्धा एकत्र पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही! हा आनंद लुटताना आयोजकांच्या अथक परिश्रमाला दाद द्यायला विसरू नका!
लेखाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ह्यात एकच समान सूत्र. जीवनातील झटपट आनंदाच्या / सुखाच्या मागे लागलेलो आपण बहुतांशी भारतीय. आणि छोट्या छोट्या सुंदर गोष्टीतून जीवनाचा आनंद खर्या अर्थाने लुटणारे प्रगत देशातील खेळाडू, क्रीडा आणि कलारसिक! आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्याचे आपले स्वप्न साकार करता करता आपली रसिकता जोपासण्याचे थोडेसे प्रयत्न आपण करून बघुयात का?

Sunday, July 8, 2012

नवलेखकाचे मनोगत!


लेखक बनण्यासाठी मुलभूत गुणधर्म कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास विविध बाबी नजरेसमोर येतात.
  1. आपल्या संभाव्य वाचकवर्गाची माहिती, त्या वाचकवर्गाला आवडेल अशा विषयांची निवड, त्या वाचकवर्गाला आवडेल / समजेल अशी लिखाण शैली
  2. ज्या विषयात लिहायचे त्या विषयातील ज्ञान. (लिखाणाचे विषय अनेक; प्रवासवर्णन, ऐतिहासिक विषयांवरील लेखन, तात्कालिक घटनांवरील भाष्य, आत्मचरित्र, व्यक्तीचरित्र, सामाजिक समस्यांवरील लेखन, कथा (दीर्घकथा, लघुकथा). यादी अशी लांबतच जाईल.
  3. वाचक वर्गाला खिळवून ठेवण्यासाठी एक तर आपल्या लिखाणाने त्याच्या ज्ञानात भर पडली पाहिजे किंवा आपल्या विनोदी लिखाणाने त्यांना खिळवून ठेवता आलं पाहिजे.
जसजसा समाज प्रगत होत जातो तसतस लोक लिहू लागतात. वरील बाबींपैकी सुरुवातीला एकही बाब ह्या नवलेखकांमध्ये उपस्थित नसते, परंतु ह्या नवलेखकांची चिकाटी आणि उत्साह दांडगा असतो. ई-मेल ने धुमाकूळ घालण्याआधी भारतीय टपालखाते चालविले ते ह्या नवलेखाकानीच. आपले लेख सर्व वर्तमानपत्रे, मासिके यांना पाठविणे, आपल्या सर्व मित्रवर्गात, नातेवाईकांमध्ये आपल्या लेखांची चर्चा मुद्दामच उपस्थित करणे ह्यात ह्या नवलेखकांचा हात कोणीच धरू शकत नाही. ई-मेल / इंटरनेट आल्यावर तर या नवलेखकांचे काम सोपे झाले. ह्यांनी ब्लॉग लिहिले, लोकांचे मेल बॉक्स भरून टाकले. आता वरती म्हटल्याप्रमाणे बर्याच नवलेखकांकडे एखाद्या विषयावर अधिकारवाणीने लिहिण्याच्या मुलभूत गुणधर्माचा अभाव असल्याने ते तात्कालिक विषयांकडे,ढासळणार्या सामाजिक मूल्यांविषयी लिहितात. मराठी समाजाने लिखाणात आणि चर्चेत जो वेळ घालविला त्याच्या १० टक्के वेळ जरी त्या समाजाने प्रत्यक्ष कृतीत घालविला असता तर त्या समाजाची स्थिती बरीच वेगळी असती. दुर्देवाने नवलेखक ही गोष्ट विसरतात. हे नवलेखक प्रतिक्रियेचे आणि स्तुतीचे भुकेलेले असतात. त्यांना मिळालेली एक प्रतिक्रिया पुढील दहा लेखांना जन्म देते!
अशाच एका नवलेखकांच्या जबरदस्तीने बनविलेल्या वाचकवर्गा, माझा तुला सलाम!

Saturday, June 23, 2012

विवाह संस्था !





२३ जूनच्या चतुरंग पुरवणीत दोन लेख वाचले, एक 'एकाकी नसलेले एकटेपण' आणि दुसरा 'विवाह संस्थेतील ढोंग!' व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार केला तर दोन्ही लेखातील मुद्दे योग्य! आयुष्यात एकटेपण बर्याच जणांना अनुभवावे लागते. काहींनी ते ठरवून स्वीकारले असते तर काहींना परिस्थिती ते स्वीकारण्यास भाग पाडते. पूर्वी एकटेपण म्हटले की मनुष्य दुःखी असणार असेच अभिप्रेत असायचे. परंतु आजच्या काळात एकाकी असूनसुद्धा आनंदी असलेले बरेचजण आहेत असा पहिल्या लेखाचा सारांश. दुसर्या लेखात एकंदरीत विवाहसंस्थेची चिरफाड केलेली! आयुष्यातील तथाकथित सुरक्षेच्या, स्थिरतेच्या शोधात अजूनही बहुतांशी स्त्रिया नवर्यांचा दांभिकपणा कसा सहन करतात यावर या लेखाचा भर. दोन्ही लेख स्त्रियांनी लिहलेले. अतिशय संतुलित विचारसरणीने लिहिलेले. आधी म्हटल्याप्रमाणे व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीकोनातून दोन्ही लेखातील विचार एकदम योग्य.
दोन्ही लेखात सध्याच्या जगात प्रकर्षाने जाणवणारे एक समान सूत्र आढळते. ते म्हणजे आजच्या पिढीत वाढलेली स्वत्वाची भावना. हा जो स्व असतो तो सदैव स्वतःसाठी अनुकूल वातावरण शोधत असतो. हवी ती शाळा, हवे तसे घर, हवी ती नोकरी, हवे तसे मित्र अशी ह्या स्व ची मानसिकता असते. ह्या सर्व गोष्टींमध्ये नाही पटले तर त्वरित दुसरा पर्याय शोधला जातो. तसेच जीवन साथीदाराच्या बाबतीत होण्याची शक्यता असते. म्हणून काही जण लग्नाचा मार्ग स्वीकारायचे नाकारतात तर काही जण लग्नानंतर हा मार्ग तत्काळ बदलायचे धाडसही दाखवू शकतात. आपल्या भारतातील किंवा जगभरातील ज्या काही विवाहसंस्था आजच्या काळापर्यंत टिकल्या त्यासाठी व्यक्तिगत त्यागाचा मोठा हातभार लागला. प्रेमविवाह असो की जमविलेले लग्न असो, लग्नानंतर संसार करताना दोघा साथीदारांचे सूर सदोदित जुळणे हे बरेचसे कठीण. परंतु ह्या प्रवासात जेव्हा कधी हे सूर जुळतात तेव्हा त्या क्षणाच्या जोरावर बाकीचे मतभेद पचविण्याची प्रगल्भता दोघांकडे हवी. नाहीतर न पटणार्या गोष्टींचाच सदैव विचार केल्यास उरतो तो केवळ दोन समांतर रेषांचा प्रवास.
इथे आपण आपल्या पूर्वजांच्या मानसिकतेचा थोडा विचार करूया. त्यांनी विवाहसंस्थेच्या दुषपरिणामांविषयी विचार केला नसावा असे मला वाटत नाही. त्यांना नक्कीच माहित असणार की तत्कालीन विवाहपद्धतीत (त्यातही एकत्र कुटुंबपद्धतीत) कोणत्या तरी एका बाजूची (९९.९९ टक्के स्त्रियांची) परवड होणारच! त्यांनी त्यांच्यासमोरील दोन पर्यायांचा विचार केला असावा. व्यक्तीस्वातंत्र्यास प्राधान्य की आपल्या संस्कृतीचे मनुष्यजातीच्या पिढ्यान मार्फत हस्तांतरण! त्यावेळी त्यांनी दुसर्या पर्यायाचा स्वीकार केला. हे हस्तांतरण योग्यरित्या व्हावे यासाठी त्यांना कुटुंबसंस्थेची गरज भासली. त्यांच्या चाणाक्ष नजरेने ओळखले असावे की या कामासाठी स्त्रियांचा त्यावेळचा स्वभाव योग्य! म्हणून त्यांनी विविध रीतीभाती निर्माण करून स्त्रियांना त्यात समाविष्ट करून घेतले. खरोखर परखड परीक्षण केले तर असे जाणविते की भारतीय संस्कृतीने, समाजाने स्त्रियांची मेंदूधुलाई केली. स्त्री ही एक क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते अशी भव्य दिव्य विधाने करून त्यानी स्त्रियांना भावनिक पाशात अडकविले. संसार टिकले ते स्त्रियांच्या अपत्यप्रेमापोटी, पतीप्रेमापायी नव्हेत!
आधी म्हटल्याप्रमाणे आपल्या समोर दोन पर्याय आहेत. व्यक्तीस्वातंत्र्यास प्राधान्य की आपल्या संस्कृतीचे मनुष्यजातीच्या पिढ्यान मार्फत हस्तांतरण! बदलत्या काळानुसार ह्या दोन पर्यायांतील कोणता स्वीकारायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. कारण त्यातील एक पर्यायच आहे मुळी व्यक्तिस्वातंत्र्याचा! हा स्वीकारताना आपण समाज म्हणून काय गमावतो आहे हा प्रश्न फक्त एकदा स्वतःला विचारून पहावा! विवाह संस्था पूर्णपणे नष्ट होणे सुद्धा कोणालाही आवडणार नाही. आयुष्यातील तथाकथित सुरक्षेच्या, स्थिरतेच्या शोधापायी, अपत्यप्रेमापोटी, किंवा विवाह संस्थेचा पूर्ण लोप होवून न देण्यासाठी माझा वैयक्तिक हातभार असावा ह्या भावनेपायी बरेचसे विवाह टिकून राहणार. राहिली गोष्ट आदर्श संसाराच्या शोधाची. मृगजळाच्या शोधाप्रमाणे त्याचा शोधही चालूच राहणार.

Friday, June 1, 2012

रानात सांग कानात आपुले नाते



FM रेडिओवर रेनबो वाहिनीवर सकाळी ५ वाजल्यापासून बऱ्याचदा अतिशय सुंदर मराठी गाणी ऐकवली जातात. काही माहितीतली तर काही प्रथमच ऐकली जाणारी! पण काही गाणी मात्र अशी असतात की आपण ती पहिल्यांदा ऐकताना सुद्धा त्यांच्या प्रेमात पडतो. असेच एक गाणे रानात सांग कानात आपुले नाते. हे गाणे तत्कालीन प्रसिद्ध गाणे असावे. ह्या गाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर खालील संकेतस्थळाला भेट द्या. इथे हे संपूर्ण गीत लिखित स्वरुपात आणि गजानन वाटवे यांच्या स्वरातही उपलब्ध आहे.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ranat_Sang_कानात

आता प्रेमिक फार पूर्वीपासून प्रेमात पडतात. प्रेमात पडताना दोन भाग असावेत. एक म्हणजे प्रियकर / प्रेयसी आवडणे, आणि दुसरा म्हणजे प्रेमभावनेचा! ही प्रेम भावनाच अतिशय कोमल, सुखकारक असावी. ह्या गीतात ही सुंदर भावना निसर्गातील सुंदर, प्रसन्न गोष्टींच्या मदतीने कशी सुंदर फुलवली आहे पहा ना! सर्व काही कसे सूचक! पहाटेच्या रमणीय अशा निसर्गात कवीने फुलविलेली सुंदर प्रेमभावना आणि नादमय शब्दांचे जुळलेले यमक! आता ह्या गीतात प्रियकर / प्रेयसीला दुय्यम स्थान मिळाले म्हणून खंत करणारा तो खरा अरसिक!
आता ही प्रेम करायची लाजरी रीत पहा ना! आधीच जायचे रानात जिथं कोणी नसणार आणि तरी तिथे सुद्धा कानातच आपलं नाते सांगायचं आणि ते सुद्धा भल्या पहाटे ! आपल हे गुपित कोणाला कळू नये यासाठी किती ही प्रयत्नांची पराकाष्टा!
हे गाणे गजानन वाटवे आणि रंजना जोगळेकर ह्या दोघांच्याही सुमधुर स्वरात गायले गेले आहे. ह्या आठवड्यात एके दिवशी सकाळी हे गाणे ऐकताना इतके प्रसन्न वाटले! आता ह्या गाण्यातील काही मराठी शब्दांचा अर्थ समजला नाही ही खंत करण्याची गोष्ट! असेच कित्येक मराठी शब्द कसे न वापरत असल्याने दैनंदिन व्यवहारातून गायब होत असावेत! असो आपल्याला देखील ह्या गाण्याचा आनंद लुटता यावा करिता ग दि माडगुळकरांचे हे गीत मी इथे उदधृत करीत आहे!

रानात सांग कानात आपुले नाते
मी भल्या पहाटे येते
पाण्यात निळ्या गाण्यांत भावना हलते
हळुहळु कमलिनी फुलते

आभाळ जगाचे भाळ मळवटी नटते
उगवतीस हासू फुटते
ज्या क्षणी विरहि पक्षिणी सख्याला मिळते

हरभरा जिथे ये भरा शाळु सळसळते
वाऱ्यात शीळ भिरभिरते,
त्या तिथे तुला सांगते, हरळिणी देते
बोलावुन तुजसी घेते, हा घेते, हा घेते

आनंद पुढे पाणंद, सभोवती शेते
पूर्वेस बिंब तो फुटते, हा फुटते, हा फुटते
त्या तिथं तुला सांगते, हरळिणी देते
बोलावुन तुजसी घेते, हा घेते, मी घेते

Wednesday, May 30, 2012

जगी सर्व सुखी असा कोण आहे?


समुद्राच्या लाटांचा किनार्यावरील खेळ बघणे हा सर्वांचा एक आवडता छंद. ही लाट येते आणि आपल्या मार्गावरील सपाट शांत अशा वाळूला उधळून लावते. वाळूचे जीवन अंतर्बाह्य बदलून टाकते. पण ह्या लाटेच्या मर्यादा असतात. त्यापलीकडील वाळू मात्र आपले जीवन शांतपणे जगत असते. असेच काही आपल्या जीवनशैलीतील बदलाबाबत होत असते. हे बदल प्रथम महानगरात पोहचतात. त्यानंतर ही लाट आजूबाजूच्या नगरांना आणि मोठ्या खेड्यांना व्यापून टाकते. त्यापलीकडील छोटी खेडी मात्र आपले जीवन पूर्वीप्रमाणेच जगत राहतात. तथाकथित विकसित भागातील लोकांची नजर मग ह्या दुर्गम भागाकडे पोहचते. ह्या दुर्गम भागातील लोक कसे अप्रगत, अशिक्षित आहेत आणि त्याना कशी विकासाची गरज आहे यावर चर्चा झडतात. बर्याच वेळा ह्या चर्चा पंचतारांकित हॉटेलात होतात ही गोष्ट वेगळी!

असो जोपर्यंत ह्या चर्चा अप्रगत / अशिक्षित ह्या मुद्द्याभोवती घोटाळत राहतात तोपर्यंत ठीक आहे, पण ज्यावेळी कोणी एखादा महाभाग हे लोक कसे सुखापासून वंचित आहेत असे विधान करतो त्यावेळी मात्र मी विचार करू लागतो. आपली सुखाची व्याख्या काय? प्रत्येक माणसागणिक ही व्याख्या बदलणार, काही जनांनी स्वतःसाठी सुख म्हणजे काय याची व्याख्या ठरविली देखील नसणार. काही लोकांना आपण आयुष्यात कधी सुखी होवू किंवा नाही याची शास्वती देखील नसणार.

आता आपण सुखाचा उहापोह करूयात. काही गोष्टी अशा असतात की ज्यांच्याशिवाय सर्वसाधारण माणसे सुखी होत नाहीत परंतु त्या गोष्टींचे अस्तित्व माणसास सुखी बनविण्यास पुरेसे नसते. ह्या गोष्टींमध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा यांचा समावेश होतो. सर्वसाधारण माणसे ह्या गोष्टींशिवाय सुखी होवू शकत नाहीत. ह्याला अपवाद असतातच जी ह्या मुलभूत गरजाशिवाय सुखी राहू शकतात. असो परत आपण सर्वसाधारण माणसांकडे वळूयात. मनुष्यजातीच्या उत्क्रांतीच्या प्राथमिक स्थितीत मुलभूत गरजांची चिकित्सा करण्याची पद्धत नव्हती. पण माणसाला देवाने बुद्धी दिली त्यामुळे ह्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यामध्ये देखील माणसाने वैविध्य, विविध पातळ्या शोधल्या. ह्या वैविधतेचे दोन पैलू असतात; प्रथम म्हणजे तो मनुष्य खरोखर चोखंदळ असतो आणि दुसरे म्हणजे मनुष्यास आपणच दुसर्यापेक्षा कसे श्रेष्ठ हे दाखविण्याची उर्मी असते. आता पहिल्या प्रकारात माणसास समाधान मिळू शकते परंतु दुसर्या प्रकारात असतो तो केवळ आसुरी आनंद!
मुलभूत गरजांच्या पलीकडे बघितले तर मग येतात ते वाहनांचे, आभूषणांचे छंद आणि नाद. यात देखील वरती उल्लेख केल्याप्रमाणे दोन पैलू येतातच. त्यानंतर येतात ते माणसाचे छंद! कला, क्रीडा, वाचन, भटकंती ह्याला वाहून घेतलेली छंदिष्ट माणसे काही कमी नव्हेत. अशा माणसांना त्यांच्या छंदात असीम आनंद नक्कीच मिळतो पण ते सुखी असतात का? कधीतरी त्यांच्या जीवनात लौकिकार्थाने सुखी होण्यात काहीतरी कमतरता असू शकते.

ह्यापलीकडे जावून बघितले तर मग येतात ती माणसाची नाती. माता, पिता, पती, पत्नी, कन्या, पुत्र, बंधू, भगिनी इथून सुरु होणारी ही नाती आपणास सुखसमाधान देतात तसेच कधीतरी दुःखही ! ही नाती असतात मात्र फार क्लिष्ट आणि गुंतागुंतीची! माणूस नात्यांमध्ये किती यशस्वी आहे यावर त्याचे सुख काही प्रमाणात अवलंबून असते. तसेच माणसाच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतात ते त्याचे मित्र. हे मित्र त्याच्या सुख दुःखाच्या प्रसंगी हजर असतात. काही बाह्य घटकसुद्धा माणसाच्या जीवनात तत्कालीन सुख / दुःख निर्माण करतात. यात आजारपण, यश, जन्म मृत्यू अशा घटनांचा समावेश होतो.

माणसाचे मन वरील उल्लेखलेल्या सर्व घटकांचे पृथ्थकरण करीत असते. त्यानुसार प्रत्येकजण स्वतःला तात्कालीन सुखी / दुःखी आणि दीर्घकालीन सुखी / दुःखी समजत असतो. माणसाचा स्वभाव देखील यात महत्वाची भूमिका बजावतो. आपल्याकडे नसलेल्या गोष्टीवरच आपण लक्ष केंद्रित केल्यास आपण कधीच सुखी होणार नाहीत. जसजशी माणसाचे क्षितीज उंचावत जाते तसतसे त्याला विश्वातील सुंदर , महागड्या वस्तूंचा परिचय होत जातो. ह्या वस्तूंच्या परिचयानंतर त्या वस्तूंची अभिलाषा निर्माण होते, किंवा त्या उच्चभ्रू वर्तुळात राहण्यासाठी ह्या वस्तूंची त्याला निकड भासते. अशा वस्तूंचा परिचय होऊन सुद्धा त्यापासून विरक्त राहणारा मनुष्य विरळाच! ह्या वस्तू मिळविण्यासाठी केलेल्या संघर्षात माणसे बर्याच वेळा आपल्या प्रकृतीचा ऱ्हास करून घेतात.

सारांश म्हणजे सुखाची व्याख्या माणसागणिक बदलते. आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वःतास माहित असावयास हवी. सुखाची ही व्याख्या निरपेक्ष असावी त्यात दुसर्या कोणाशी तुलना केलेली नसावी. त्याचबरोबर मला सुखी व्हायचे आहे की नाही हे ज्याने त्याने ठरवावे! कारण सुखी होणे आणि लौकिकार्थाने यशस्वी होणे ह्या बर्याच वेळा दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. ह्या लेखाचा शेवट संत तुकडोजी महाराजांच्या ह्या कवितेने!
 
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥

पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥

’तुकड्या’ मती करावी, पायी तुझ्या नमावी
मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥८॥

Sunday, May 27, 2012

शक्तिमान विरुद्ध बुद्धीजीवी

 

कधी मला प्रश्न पडतो की मनुष्यजातीने बनविलेल्या नियमांत कसकसे बदल होत गेले असतील आणि ते कसे विकसित होत गेले असतील. म्हणजे बघा ना प्रथम बळी तो कान पिळी असाच नियम असणार. असेच मानव सर्व स्त्रोतांवर अधिकार गाजवीत असतील. मग ते शिकार असो की जमीन असो. बाकीचे त्यांचा अधिकार मान्य करून, शक्तीमानाने आपला हक्क गाजविल्यावर उरलेसुरले जे काही मिळेल ते आपले भाग्य असे समजून जीवन कंठीत असतील. मग हळूहळू ह्या गांजलेल्या लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढू लागला असेल. त्यांना कळून चुकले असेल की आपण बहुसंख्य आहोत आणि शक्तिमान अल्पसंख्य आहेत. तसेच शक्तीमानाला सुद्धा कळून चुकले असेल की अहोरात्र शक्तीच्या जोरावर सत्ता गाजविणे कठीण आहे. एक गाफील क्षण सुद्धा आपल्याला महागात पडू शकतो.

तत्कालीन शक्तीमानांकडे बुद्धी कमी असावी, त्यामुळे बहुसंख्य बुद्धीजीवांनी आपल्याला अनुकूल अशी नियमावली बनविण्यात पुढाकार घेतला असावा. ही सर्व नियमावली बनवून अमलात आणल्यावर शक्तीमानांना एकंदरीत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. परंतु आता उशीर झाला होता. बुद्धीजीवांनी पोलीस, न्यायालये अशी सुरक्षा कवचे बनविली होती आणि शक्तीमानांचे पंख झटून टाकले होते. काही काळ असाच गेला. शक्तीमानांना बळाचा वापर करायच्या कमी संधी मिळत गेल्या परंतु थोडा मोकळा वेळ मिळाला. कधी नव्हे तो त्यांनी विचार करायला सुरुवात केली. उघड स्वरूपात कायदा हाती घेणे शक्य नाही हे सत्य त्यांनी स्वीकारले. मग त्यांनी शत्रू गटातील काही सीमारेषेवरील बुद्धीजीवांशी हातमिळवणी केली आणि कायद्यातील पळवाटा शोधून काढल्या. आता हे शक्तीमानांना कायद्याच्या कचाट्यात पकडणे कठीण जावू लागले. बुद्धीजीवी वर्ग सुद्धा पवित्र राहिला नाही त्यातील बहुसंख्याने शक्तीमानांचे कायद्याशी उघड शत्रुत्व न पत्करता आपला स्वार्थ साधण्याचे धोरण स्वीकारले.

मनुष्यजातीत सदैव evolution होत राहिले आहे. शक्तिमान आणि बुद्धीजीविंचा संघर्ष चालूच आहे. सध्या म्हणायला गेले तर कायद्याचे राज्य आहे पण आतून शक्तीमानच राज्य गाजवितात. हीच वेळ आहे बुद्धीजीवींना मनन करण्याची आणि आपल्या डावपेचात बदल घडवून आणण्याची. पण बुद्धीजीवी वर्ग त्याच्या शुद्ध स्वरूपात अस्तित्वात राहिलाच नसेल तर?
 

Saturday, May 19, 2012

उम्र का हिसाब

 

सकाळी बोरिवलीहून वसईला निघालो. एकटाच असल्याने तयारी लवकर आटपली. सुदैवाने एक नंबरच्या फलाटावर वसई जलद लोकल गाडी मिळाली. सकाळची वेळ, मधल्या स्थानकांवर न थांबता सुसाट धावणारी लोकल, सारे काही प्रसन्न वाटत होते. नंतर मग जाणवले सर्वजण शांत विचारात गढून गेले आहेत. माणसाचं असंच असत, कधी अशी शांतता मिळाली की आपण सारे विचारात मग्न होतो. त्या डब्यात सर्वजण विचार करीत होते. विचार जर दृश्य असते तर? त्या डब्यात विचारांचा झंझावात दिसला असता. आता माणस अश्यावेळी कोणता विचार करीत असतील? तात्कालिक समस्या माणसाच्या विचारांना ग्रासणारा प्राथमिक घटक असेल. मग पाच - दहा मिनटांनी माणसाचे मन असंच मागे जात असावं .
तेव्हाच मला उमराव जान मधील गाण्यातील ह्या ओळी अचानक आठवल्या.
ये किस मकाम पर हयात मुझको लेके आ गयी
ना बस खुशी पे हैं जहाँ, ना गम पे इख्तयार है
तमाम उम्र का हिसाब मांगती हैं जिन्दगी
असेच काही निवांत क्षण मिळतात, आणि आपल्या गतआयुष्याचा हिशोब मांडायला प्रवृत्त करतात .



Monday, May 7, 2012

ग्यान, गलका, शिराळा, कसाब

 
एखा द्या देशाच्या परिस्थितीचा परिणाम त्या देशाच्या नागरिकांच्या मनोस्थितीवर होत असतो. आता आपल्या भारताचेच पहा ना! सर्व प्रसिद्धीमाध्यमांच्या मते आपण प्रगतीच्या वाटेवर कूच करीत आहोत. हे वाचून आपला आत्मविश्वास बळावतो. माझेच उदाहरण घ्या. मी स्वतःला ज्ञानी (ग्यानी म्हटले तर अजून प्रभाव पडतो!) समजू लागतो. ब्लोग लिहून जबरदस्तीने लोकांच्या ई मेल वर पाठवतो. चार लोक जमले की फंडे देतो. पण ई-मेल वर ज्ञान देणे आणि प्रत्यक्ष भेटीत ज्ञान देणे यात फरक असतो. ई-मेल वरील ज्ञान लोक त्यांची खरोखर इच्छा असेल तर वाचतात अथवा बर्याच वेळा ई-मेलचा नाश करतात. परंतु प्रत्यक्ष भेटीत ज्ञान देताना आपण समोरच्या व्यक्तीचा वेळ घेत असतो. इतकेच नाही तर त्याने आपल्या चेहऱ्यावर अनुकूल हावभाव आणले पाहिजेत अशी आपली अपेक्षा असते.
हल्लीचा जमाना मात्र बदलला आहे. फुकटात कोणी ऐकून घेत नाही. FM रेडिओवर उद्घोषक ३-४ मिनिटाच्या गाण्यानंतर १० मिनिटे वायफळ गडबड करतो. त्या वेळी आपण दुसरे स्टेशन लावतो. माझी प्रत्यक्षातील ज्ञानवाणी ऐकून घेणारे फार कमी लोक; बायको, मुलगा आणि कार्यालयातील टीम. कार्यालयातील टीम ही माझी ज्ञानवाणी ऐकण्यासाठी बांधील असते. त्या बैठकीच्या वेळी त्यांना मी बंधक बनवितो. तेथील माझ्या प्रवचनास ग्यान हा अधिक उचित शब्द आहे. ग्यान म्हणजे आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी वरच्या पदावरील माणसाने उधळलेली मुक्ताफळे!
घरी मात्र परिस्थिती वेगळी असते. लोकशाही भारताच्या कानाकोपर्यात, सर्व वयोगटात पसरली आहे याचा अनुभव मला येतो. बाबा, पुन्हा पुन्हा तेच काय सांगता, मला माहितेय असे का मुलगा बोलला की मी आवरते घेतो. बायकोकडे तर हजार उपाय. प्रवचन चालू असताना अचानक अरे आज भाजी आणावी लागेल, किंवा बिल भरावे लागेल असे लक्ष विचलित करणाऱ्या घोषणा ती करते. मात्र हल्ली सर्वजण सुज्ञ बनले आहेत. माझ्याकडून काही करून घ्यायचे असले की मात्र माझे प्रवचन ऐकून घेतले जाते.
आता आपण प्रवचन का देतो तर मुलाची जडणघडण (अर्थात formatting ) करण्यासाठी. बायको ही formatting च्या पलीकडे असते ही गोष्ट वेगळी. बायको ही आपले formatting करू शकते हे लक्षात असू द्यावे. ती ज्या नवऱ्यास लवकर कळली त्याचा संसार सुखाचा झाला. असो मुलाच्या जडणघडणीचे मार्ग कालौघात बदलले. पाठीवर धपाटा हा पूर्वीचा राजमान्य आणि सर्वात सोपा मार्ग. ह्याद्वारे मुलाला अनेक गोष्टी शिकायला मिळायच्या. इथे चर्चेला वाव नाही, मी इथला अधिकारी व्यक्ती आहे आणि बरेच काही. काळ बदलला, चर्चा करून, मन वळवून निर्णय घेण्याचे, ज्ञान देण्याचे दिवस आले. परंतु कधी कधी ह्याच्याही पुढे जावून प्रत्यक्ष कृतीतून धडा द्यावा लागतो.
आयुष्यात सदैव काही मनासारखे होणारे नाही. सुखानंतर दुःख हे येणारच सगळ्याला तोंड देता यायला पाहिजे, असे ज्ञान आपण सर्व तासनतास देवू शकतो. परंतु आपण हे ज्ञान स्वयंपाकघरातून सुद्धा देवू शकतो. रविवारी ,सुग्रास जेवणावर ताव मारल्यावर सोमवार, मंगळवार मुलावर गलका, शिराळा, पडवळ, दुधी अशा ठेवणीतल्या भाज्यांचा मारा करावा. त्यात मीठ, मसाला कमी टाकावा. जर आपला मुलगा ह्या भाज्या खाऊ शकला तर तो जीवनात कोठेही समाधानाने राहू शकेल. आता बघा मुलाला ह्या भाज्यांच्या महत्त्वाविषयी ग्यान देण्यापेक्षा हा उपाय केव्हाही सोपा, त्यातून एक पुढे आयुष्यात कामास येणारा महत्वाचा उपदेश मुलास मिळतो. वरिष्ठ पदावरील व्यक्ती न बोलता सुद्धा कृतीतून आपली वाट लावू शकतो. गलका, शिराळ्याच्या भाजीतून असा काही उपदेश देता येऊ शकतो हे ज्यावेळी मला जाणवले त्यावेळी मी एकदम धन्य झालो. बाकी ह्या भाज्या घेवून ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये गेल्यास एकच गलका होतो ही गोष्ट वेगळी!
कसाबला भारत देशाचे सर्व नागरिक पोसतात. मला खूप संताप येतो. असाच एकदा मी संतापलो होतो पण मग एक विचार डोक्यात आला. मृत्यूचे भय तर दहशतवाद्यांना नसणारच, पण तुरुंगात खिचपत पडण्याचा विचार त्यांना झेपत असेल का? मानसिक स्थिती झपाट्याने बिघडू शकते. आपले अधिकारी मुद्दाम तर त्याला जिवंत ठेवत नसावेत ना? असो.. तुरुंगात कसाबला गलका, शिराळा, पडवळ, दुधी अशा ठेवणीतल्या भाज्या देवून त्याचे फोटो पेपरात छापले तर?


 

Friday, April 20, 2012

Level1, Level2...

 


गेल्या महिन्याभरातील या काही घटना! म्हणायला गेलं तर असंबंधित पण अचानक त्यात काहीतरी समान सूत्र असल्याची जाणीव झाली.
  1. महाबळेश्वरला जाताना वाईपर्यंतचा सपाट भूभागावरील प्रवास आणि मग माथ्यावर घेवून जाणारा चढणीचा, वळणावळणाचा रस्ता.
  2. कंपनीने एका शैक्षणिक सत्राला पाठविले. विषय होता नेतृत्वमार्गातील विविध टप्पे आणि त्यातील वळणे
  3. गेल्या आठवड्यात काहीश्या चिंतीत स्वरात पत्नी म्हणाली, हल्ली सोहम कसा बदललाय, शाळेतून आल्याआल्या न सांगता अभ्यासाला बसला आणि रात्री शेवटी त्याला सांगावे लागले की बस झाले आता, राहिला असेल तर उद्या पूर्ण कर. सोहमचा अल्लडपणा संपण्याची प्रक्रिया सुरु झाली की काय हे तिच्या चिंतेचे मुख्य कारण होते.
अजून थोडा मागे गेलो. सोहमला संगणकीय खेळांनी झपाटून टाकले होते. Level1, Level2 ची संकल्पना त्याला भारी आवडली, संगणकावरून जबरदस्तीने उठवल्यावर गडी खेळण्यातील गाड्या घेवून शर्यतीचा रस्ता बनवे आणि मग त्यात अडथळ्याचे प्रमाण वाढवीत नेत त्याचे level1 , level2 चे पुराण पुन्हा चालू होई.
आयुष्याचा प्रवासही काहीसा असाच. कधी सपाट भूप्रदेशावरील प्रवासासारखा, एका दिशेतील, न चढणीचा, एका वेगाचा, तर कधी शिखरमाथ्यावर घेवून जाणार्या चढणीच्या रस्त्याप्रमाणे वळणावळणाचा! ह्या प्रवासात येतात ते मैलाचे दगड. शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, अभियांत्रिकी शाखेची निवड, नोकरीसाठी योग्य अशा क्षेत्राची निवड, व्यावसायिक जीवनातील विविध टप्पे, जीवनसाथीची निवड ही काही महत्वाच्या टप्प्यांची उदाहरणे. आता ह्या प्रत्येक milestone बरोबर आपली जीवनातील भूमिका आणि तिच्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदार्या बदलत जातात. Level बदलते.
आता त्या शैक्षणिक सत्रातील महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तिथे नेतृत्वामार्गातील विविध स्थितींची ओळख करून देण्यात आली होती. एका स्थितीतून दुसर्या स्थितीत होणारे संक्रमण हे एक वळण घेवून येत. ह्या वळणानंतर जबाबदार्यांची क्लिष्टता वाढते, त्यांचे स्वरूप बदलते. आता मुख्य आव्हान हे असते की, ह्या बदललेल्या जबाबदार्या नक्की काय हे बर्याच वेळा लिखित स्वरूपात उपलब्ध नसते. प्रत्येकजण आपापल्या अकलेनुसार ह्या जबाबदार्या आणि त्याबरोबर येणाऱ्या अपेक्षा पुर्या करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळी आपल्यात भिनलेल्या आधीच्या भूमिकेच्या मनोवृत्तीला झटकून टाकायचा प्रयत्न करतो. काही जण यशस्वी होतात तर काही जणांना हे जमत नाही. जितक्या उंच जावून तुम्ही कोसळाल तितक्या गंभीर स्वरूपाचे परिणाम भोगावे लागतात.
यातला एक मुद्दा माझ्या मनाला भिडला. आपल्यात भिनलेली आधीच्या भूमिकेतील मनोवृत्ती! हा मुद्दा किती योग्य आहे. ह्या मनोवृत्तीचा आवश्यक नसलेला भाग तुम्ही किती लवकर आणि केवढ्या प्रमाणात झटकून टाकू शकता ह्यावर तुमचे पुढील भूमिकेतील यश अवलंबून असते. आपल्या मुलाला तुम्ही शिशुवर्गात असताना जसं शिकविता त्या पद्धतीत आणि तो तिसरीत गेल्यावर शिकविण्याच्या पद्धतीत बदल व्हायला हवा. विशीमध्ये असताना न पटलेल्या गोष्टीविषयीची तुमची प्रतिक्रिया देण्याची पद्धत आणि तीशीमधील पद्धत आपसूक बदलते, कारण level बदलली असते. आपल्या पूर्वजांनी किती सोप्या पद्धतीने चार आश्रमांची व्याख्या ठरवल्या होत्या. एका प्रकारच्या level च होय. आज मात्र आपण किती level ठरवायच्या आणि त्यातल्या किती आणि कधी पार करायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न!

Saturday, April 14, 2012

अवती भोवती


मध्यंतरी १४- १५ वर्षांच्या वयोगटातील मुलांच्या दोन बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या. एक आत्महत्येविषयी आणि दुसरी या वयोगटातील मुलांनी अपहरण करून हत्या केलेल्या एका मुलाविषयी. संवेदनशील समाजाला अस्वस्थ करणाऱ्या ह्या बातम्या. त्या हल्ली आपणास अस्वस्थ करीत नाहीत त्याची कारणे वेगळी. माणूस / समाज जसजसा प्रगत होत जातो तसतसे आपल्याभोवती सुरक्षित कुंपणे घालून घेतो. ह्या कुंपणांची सीमा आर्थिक प्रगतीच्या प्रमाणाशी समप्रमाणात धावते. स्वतःच्या सदनिकेत अतिसुंदर सजावट करण्यापासून सुरुवात करून, स्वतःचा बंगला, बाग, कुंपण त्यानंतर अशा देखण्या बंगल्याचे संकुल असे टप्पे गाठत ही वृत्ती कधी कधी एखाद्या देशाच्या मनोवृत्तीत उतरते. जगात काहीही होवो पण माझ्या सुरक्षित कुंपणात जो पर्यंत काही होत नाही तो पर्यंत मला देणेघेणे नाही अशी ही वृत्ती. आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या पायऱ्या ओलांडणारे आपण कधी ह्या मनोवृत्तीचे बळी बनतो हे आपणास कळत नाही.

विषयांतर बाजूला ठेवून मूळ मुद्द्याकडे आता वळतो. १४ - १५ वर्षांची मुले म्हणजे वैचारिक परिपक्वतेच्या मार्गावर अर्धा-अधिक प्रवास केलेली मनुषावस्था! वैचारिक परिपक्वता किती गाठली आहे हे मुलाच्या मुळच्या क्षमतेवर आणि त्याचावर झालेल्या संस्कारावर अवलंबून असते. आपल्या अपत्याच्या मनात असणार सर्वात प्रभावी विचार ओळखण्याची इच्छा आणि क्षमता किती पालकांमध्ये असते हा महत्त्वाचा मुद्दा. समजा इच्छा आणि क्षमता दोन्ही असतील तर हा जो विचार आपल्या अपत्याच्या मनात घोळत आहे तो योग्य आहे का आणि नसल्यास त्याला योग्य वळण देण्याची जाणीव पालकांनी दाखवली पाहिजे. आता ही इच्छा असण्यानसण्याची कारणे पालकांचे स्वतःचे बालपण कसे गेले, पालकांना त्यांच्या जीवनसंघर्षाने कितपत व्यापून टाकले आहे आणि पालकांचे परस्परांमधील संबंध कसे आहेत यावर अवलंबून असू शकतात. क्षमतेमध्ये मुख्य मुद्दा येतो तो पालकांनी गाठलेल्या प्रगल्भतेचा! काही व्यक्तींमध्ये आपण आता पालक बनलो; आता आपल्या वागण्यात थोडाफार बदल करायला हवा हे समजण्याची प्रगल्भता कधीच येत नाही. ह्या वरील कारणांमुळे पालक आणि अपत्य ह्यांच्यातील संवाद कधी प्रगतावस्था गाठतच नाही. बदलेल्या काळामुळे एक गोष्ट झाली आहे. जर तुम्ही मुलांशी मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधला नाही तर ती केव्हाच तुमच्याशी मोकळेपणाने बोलणार नाहीत. हाच अनुभव कार्यालयात येतो, व्यवस्थापक आणि कर्मचारी ह्यांच्यातील नाते हे सुद्धा बदलत्या काळानुसार मित्रत्वाचे झाले तरच यशस्वी होवू शकते. पालक आणि अपत्य हा जर संवाद खुरटला तर मुले बाहेरील व्यक्तीशी आपले मन मोकळे करतात आणि ह्या बाहेरील व्यक्ती मग त्यांची मते प्रभावीत करू शकतात.

इथे अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो. पालकत्वाची पूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा आणि क्षमता असलेल्या पालकांकडे मुलांच्या सुखी भविष्यासाठी दोन पर्याय असतात.

१> मुलांसाठी गडगंज संपत्ती निर्माण करून ठेवणे.

२> मुलाला एक सुजाण नागरिक बनविणे.

मागील मध्यमवर्गीय पिढीने दुसरा मार्ग स्वीकारला. आजच्या काही पालकांमध्ये पहिला मार्ग स्वीकारण्याची इच्छा दिसून येते. ते जसे चुकीचे तसेच केवळ दुसरा मार्ग स्वीकारणे हे पुरेसे नाही याचे भान असणेही महत्वाचे!

आत्महत्या

ह्या प्रकारचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल.

१> प्रसार माध्यमातील एखाद्या बातमीचे / दृश्याचे त्याच्या परिणामाची जाणीव नसल्याने केलेले अंधानुकरण. ह्या मध्ये स्वतःची उपेक्षा झाल्याने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असू शकतो.

२> जीवनरुपी ग्रंथातील अगाध अनुभवाची जाणीव नसल्याने त्यातील केवळ एक दोन क्लेशदायक पाने समोर आल्याने निराश होवून आत्महत्या. ह्या प्रकारात एकदम सुखवस्तू घरातील मुलेसुद्धा येवू शकतात, ज्यांना जीवनात कधी नकार, अपयश यांचा सामना करावाच लागला नसतो.

खंडणीसाठी अपहरण / हत्या

हा मनुष्यजातीतील निरागसतेचा अंत किती लवकर होवू लागला आहे त्याचे उदाहरण होय. समाजात, मित्रांच्या समूहात प्रतिष्ठा, मान्यता हवी असेल तर कमीत कमी मोबाईल, गाडी असणे आवश्यक आहे असा समज तरुण पिढीने करून घेतला आहे आणि ती काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे. योग्य मार्गाने ही तथाकथित प्रतिष्ठेची साधने मिळविण्याची सर्वांची क्षमता नसल्याने अस्वस्थतता निर्माण होवू शकते आणि त्याच्या जोडीला निरागसतेचा अंत आणि पालकांची संवादाचा अभाव असे घटक असल्यास खंडणीसाठी अपहरण/ हत्या अश्या टोकाच्या भूमिका घेतल्या जावू शकतात.

वरील दोन्ही प्रकारात प्रसारमाध्यमांच्या सुजाणतेचा अभाव हा मुद्दा प्रकर्षाने जाणवतो. इंग्रजीतील सध्याचे अग्रगण्य स्थान मिळवलेल्या आणि वैभवशाली इतिहास असलेल्या वृत्तपत्राचे सध्याचे स्वरूप, त्यातील बातम्या ह्या फिल्मी, गुन्हेगारी विश्वाला जास्त लक्ष प्राप्त करून देणाऱ्या अशा आहेत. पूर्वी सुजाण, सुशिक्षित लोकांनी प्रसारमाध्यमाद्वारे जनमतावर प्रभाव टाकला. आता काळ बदलला, मते मांडण्याचा अधिकार सर्वांना मिळाला, काहींनी तो आपल्या आर्थिक बळावर मिळविला. पण ह्या अयोग्य लोकांनी आपल्याभोवती अशुद्ध विचाराचा कलकलाट केला. प्रसार माध्यमात काम करताना सामाजिक बांधिलकीची जाणीव असणे आवश्यक असते हे समजण्यापलीकडे असणाऱ्या किंवा त्याची पर्वा नसणाऱ्या लोकांच्या हातात आज प्रसारमाध्यमे आहेत ही सत्यस्थिती आहे. आजच्या कलियुगात ह्या अशुद्ध विचारांचा प्रतिकार करू शकणारे समर्थ, परिपक्व विचारांचे चक्र आपल्या आणि समाजातील मुलांभोवती निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपल्या सुरक्षित कुंपणापलीकडे पडण्याची आपली तयारी हवी.


Sunday, April 1, 2012

क्षण ओळखावा क्षण अनुभवावा

क्षण अनुभवावा

क्षण आणि युग यांचे नाते तसे अतूट! एका क्षणाच्या सुखासाठी युगांची तपस्या लागते आणि एका क्षणाच्या चुकीची सजा युगोंयुगे भोगावी लागू शकते. मर्त्य मानवांच्या भाग्यात युगे पाहण्याचे लिहिले नाही तेव्हा त्यांनी क्षणांचे महात्म्य ओळखणे केव्हाही उचित!

आयुष्यात अविस्मरणीय असे क्षण वारंवार येत नाहीत. ज्यांच्या आयुष्यात असे क्षण कमी वेळा येतात तो दुर्दैवी परंतु त्याहून दुर्देवी तो ज्याला आयुष्यात आलेले असे अविस्मरणीय क्षण ओळखता / अनुभवता येत नाहीत. असे हे क्षण कोणते? ही प्रत्येकाची वेगवेगळी संकल्पना. 'दिल ही छोटासा, छोटीसी आशा' अशी परिस्थिती असल्यास, अविस्मरणीय क्षण वेगळे आणि 'ये दिल मांगे मोर' अशी परिस्थिती असल्यास असे क्षण वेगळे.

अगदी लहानपणापासून सुरुवात करायची झाली, तर मे महिन्यातील एकत्र कुटुंबात / मामाकडे घालविलेल्या सुट्ट्या, सकाळी उठून गोळा केलेले आंबे, शाळेतील स्पर्धेत पहिल्यांदा मिळालेले पारितोषक, सायकलवर तोल सांभाळता आलेला पहिला क्षण असे काही क्षण सांगता येतील. महाविद्यालयीन जीवनात ह्या क्षणांची परिसीमा अधिक व्यापक होते. आपल्या व्यावसायिक जीवनावर पकड मिळविणे हे प्राथमिक ध्येय बनते. त्यामुळे ११ -१२ मध्ये भौतिक, रसायन आणि गणित ह्या विषयात मिळविलेले उत्तम गुण हे अशा क्षणांचा भाग बनू शकतात. अशातच केव्हा एखादी आवडलेली मुलगी ज्यावेळी स्मितहास्य देते किंवा बोलते त्यावेळी तो ही एक महाअविस्मरणीय क्षण बनून जातो. पुढे पहिली नोकरी मिळते, त्यावेळी स्वअस्तित्वाला मिळालेली मान्यता त्या क्षणाला संस्मरणीय बनवितो. पुढे परदेश प्रवास, लग्न, नोकरीत बढती, अपत्याचे आगमन असे क्षण येत राहतात. पण मधल्या काळात जीवनसंघर्ष आपल्या ह्या क्षणांना उत्कटतेने अनुभवण्याच्या क्षमतेला काहीसे कमजोर बनवितो. आपण चिंतातूर जंतू बनून सदैव चिंताग्रस्त होवून राहतो आणि हे क्षण अनुभवण्याचे सुख गमावून बसतो.

कलाकार लोकांचे एक बरे असते. बर्याच वेळा त्यांना ब्रह्मानंदी टाळी लागते (आता हा शब्दप्रयोग मी योग्य अर्थाने वापरतो आहे की नाही याची मला खात्री नाही). त्यांच्यासाठी असे क्षण नक्कीच अविस्मरणीय असतात. एखाद्या खेळत देशाचे प्रतिनिधित्व ज्यांना करायला मिळते त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. आणि आयुष्यात पहिल्यांदा देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा क्षण अविस्मरणीयच!

ह्याचा एक वेगळा पैलू देखील आहे. बेशिस्तीत वाढलेली गर्भश्रीमंत लोकांची मुले, आयुष्यात लहानपणीच यशाची परमोच्च शिखरे गाठलेले कलाकार, खेळाडू यांची मनःस्थिती काहीशी नाजूक बनते. यातील काही जण ह्या अविस्मरणीय क्षणाच्या, अलौकिक अनुभवांच्या वेगवेगळ्या चवींच्या शोधात नको त्या मार्गाला लागू शकतात.

जर आपण फार पुढचा विचार केला तर आयुष्याच्या सायंकाळी मागे वळून बघता आपल्याला हे क्षण नक्कीच आठवतील. त्यावेळी ही खंत वाटायला नको की मी हा क्षण गमावला.

म्हणूनच मी म्हणतो क्षण ओळखावा, क्षण अनुभवावा!

Thursday, March 29, 2012

विचारांची सरमिसळ



आज बर्याच विचारांची एकत्र सरमिसळ इथे मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

सुरुवात करतोय ते मृत्यूविषयीच्या काही विचाराविषयी! मृत्यूविषयी प्रत्येकजण आपापल्या परीने विचार लढवीत असतो. मृत्यूनंतर आपले काय होत असावे ह्याविषयी बरेच सिद्धांत आहेत. मला असे वाटते की जो कोणी सर्वशक्तिमान आहे त्याच्याकडे आत्म्याचे बरेच द्रव्य साठले असावे. नवीन जीव निर्माण होताना तो ह्या द्रव्यातील थोडा भाग काढून त्या जीवात आत्मा म्हणून पाठवून देत असावा. आणि मृत्युनंतर हा आत्मा परत अनंतात विलीन होत असावा. आता वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके आत्माद्रव्य ह्या सर्वशक्तीमानाकडे असेल की नाही, त्याच्याकडे ह्या द्रव्याचे वैविध्य कसे असावे आणि हा सिद्धांत प्राण्यांसाठी लागू होतो की नाही यावर आपणा पामरांनी विचार करू नये. ह्या भूलोकावरील जीवनाची, इथल्या नियमावलीची आपणास बर्यापैकी सवय झाली आहे. आपण नियमानुसार वागले तर आपणास दंड होण्याची शक्यता बरीच कमी. परंतु जर मृत्यूनंतर जर आपण मनाने (आत्म्याने) अस्तित्वात राहिलो आणि त्या अस्तित्वातील नियम आपल्या आकलनापलीकडील असतील तर लागली ना बोंब!

दररोज दिवस संपला की आपण जे काही समाधान मिळाले असेल त्यात आनंद मानून घरी येतो. आठवडा संपला की मागे वळून पाहता थोडे समाधानी होत, साप्ताहिक सुट्टीच्या पलीकडील दुसर्या आठवड्याकडे नजर लावतो. तीच गोष्ट वार्षिक सुट्टीची. आयुष्याच्या ह्या प्रत्येक टप्प्यावर समाधान मोजण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे मापदंड असतात. ह्या मापदंडानुसार काहीजण समाधानी होतात तर काही असमाधानी! प्रश्न असा आहे की आयुष्याच्या यशस्वीतेचे वा अयशस्वीतेचे मापदंड कोणी बनवितो का? आता हा मापदंडाला विविध मिती असतील; व्यक्तिगत यश, कौटुंबिक समधानाची पातळी, जोडलेली माणसे, समाजकार्य अशा विविध पातळ्यांवर आपण आपल्या आयुष्याची यशस्विता अजमावू शकतो. प्रश्न असा आहे की असा मापदंड बनविण्याची आणि त्या निकषानुसार हवी ती पातळी गाठल्यावर सामाजिक आयुष्यातून निवृत्ती घेण्याची आपली तयारी आहे काय?

तात्कालिक समाधानाची प्रत्येकाची आपली वेगवेगळी संकल्पना असते. लहान बालकाला आईचा सहवास समाधान देवून जातो. हल्लीच्या बर्याच लहान मुलांना (वयोगट ७ - ८ वर्षे आणि अधिक) मैदानी खेळापेक्षा संगणकीय खेळ अधिक समाधान देवू लागले आहेत. विद्यार्थांना परीक्षेतील गुण समाधान देवून जातात. माणूस वयाने कितीही मोठा होत गेला तरीही त्यास आपले कोणीतरी कौतुक करावे, आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी अशी सुप्त इच्छा असते. परंतु हे काही सदैव शक्य नसते. मग त्यावेळी आर्थिक लाभाकडे पाहत ही माणसे दिवस लोटतात. आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी ह्याच्या सुद्धा विविध छटा असू शकतात. काही जणांना आपली दखल घेतली तरी पुरसे असते तर काही जणांना इतरांपेक्षा आपली जास्त दखल घेतली जावी असा अट्टाहास असतो. सार्वजनिक समारंभात अशा व्यक्तींचे वागणे पाहणे हा एक मजेशीर अनुभव असतो. घरातील वयस्क माणसांना अन्य व्यक्तींचे असणे देखील समाधान देवून जाते. हल्ली फेसबुकने आपल्या अस्तित्वाची दुसर्यास जाणीव करून देण्याचा एक चांगला मार्ग उपलब्ध करून दिला.

कालच मी महाबळेश्वरला सुट्टीचा आनंद लुटून मुंबईला परतलो. महाबळेश्वर म्हणा किंवा वसई म्हणा ह्या दोन्ही ठिकाणात रोजच्या जगण्यात जीवन अधिक प्रमाणात अनुभवता येते असे माझे मत आहे. मुंबईत असतो तो जीवनाचा केवळ संघर्ष. जेवढे तुम्ही निसर्गाच्या अधिक सहवासात जाल तितकी त्या सर्वशक्तीमानाशी संवाद साधण्याची शक्यता अधिक प्रबळ होते. आता हा संवाद म्हणजे काय तर आपल्या ह्या शरीरात जो त्या सर्व शक्तीमानाचा अंश आहे त्याच्याशी त्या सर्व शक्तीमानाने साधलेला संपर्क. आतापर्यंत आज हा काय अध्यात्माच्या मार्गाने चालला की काय असे तुम्हाला वाटू लागले असेल. ह्या मार्गाविषयी मला काही अनुभव नाही परंतु ह्या मार्गावर खरोखर जे पुढे गेले आहेत त्यांच्या विचारांच्या परिपक्वतेविषयी मात्र अतीव आदर आहे! बाकी पुढील आठवड्यात एकदा का कार्यालयीन कामकाजात मग्न झालो की मग हे विचार मागे पडतील. कसे मजेशीर आहे पहा ना, माणसाच्या मनात विचारांची अगदी दाटीवाटी झाली असते, त्यातील काहीच मनाचा काही काळापर्यंत ताबा घेवू शकतात आणि त्यातील अगदी थोडेच भाग्यवान बोलण्या / लिखण्याद्वारे दुसर्यांपर्यंत पोहचू शकतात.

बाकी आधी म्हटल्याप्रमाणे ही विचारांची अगदीच सरमिसळ आहे. आपण जर ह्याचा सामना करीत लेखाच्या शेवटपर्यंत पोहचला असाल, तर धन्यवाद!



Wednesday, March 14, 2012

नाती



नाते म्हणजे काय? नाते म्हणजे दोन वस्तूंमधील (त्यातील एकतरी सजीव हवी) परस्पर संबंधांची समजलेली / न समजलेली गुंतागुंत! नाते जसे दोन सजीव व्यक्तींमध्ये असू शकते तसेच ते एक सजीव आणि एका निर्जीव वस्तुमध्ये सुद्धा असू शकते, जसे की काहीजणांचा जुन्या घरांमध्ये अडकलेला जीव. परंतु हे नाते सजीवापुरता मात्र एकमितीय असते. वस्तूची अथवा वास्तूची सजीवाप्रती भावना असते वा नाही आणि असल्यास ती कोणत्या स्वरूपात असते हे समजण्याइतके आपण प्रगत झालो नाहीत. असो आजचा विषय आहे तो दोन सजीवांच्या (मनुष्यरुपी) नात्यांविषयी! नात्यांची रूपे अनेक; पालक - अपत्ये, नवरा बायको, मित्र, सासू - सुना, नणंद- भावजय, शेजारी...काही नाती लौकिकार्थाने रूढ तर काही त्या पलीकडची!

प्रत्येक मनुष्याच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक छटा असतात. प्रेमळ, समंजस, अडाणी, व्यावसायिक यशाच्या मागे धावणारा, भावूक, उत्साही, दुर्मुखलेला अशी ही यादी वाढतच जाईल. नात्यातील एका व्यक्तीच्या क्ष छटा असतील आणि दुसर्या व्यक्तीच्या य छटा असतील तर कोणत्याही प्रसंगी ह्या दोन छटांची शक्यता क्ष गुणिले य इतकी असू शकते. म्हणजे एक व्यक्ती उत्साही आणि दुसरी व्यक्ती त्याच वेळी दुःखी असू शकते. नाते काही वेळा फुलते तर कधीतरी एखाद्याची नात्यात घुसमट होते. पूर्वी असे म्हणतात की संसारासाठी स्त्रिया त्याग करायच्या! संसार यशस्वीरीत्या चालविण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. संसाररुपी नात्याच्या त्या owner होत्या. परंतु असे करताना त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या कित्येक छटा बंदिस्त करून ठेवल्या होत्या. काहीजणींनी आपली ही घुसमट आयुष्याच्या उत्तरार्धात व्यक्त केली. पण संसार मात्र यशस्वी पणे चालविले.

आजच्या जमान्यात घुसमट वगैरे कोणी होवू देत नाही. पण त्यामुळे मात्र संघर्षाचे प्रसंग मात्र उदभवू शकतात. लग्नाआधी आपण आईवडिलांच्या छत्राखाली सुखाने वावरत असतो. आपल्या व्यक्तिमत्वाच्या केवळ सुखद छटा / पैलू उलगडलेले असतात, आपणास ज्ञात झालेले असतात. लग्नानंतर मात्र आपल्या वागण्याचा थेट परिणाम जिच्यावर होतो अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते. आधीच आपण आणि साथीदाराने स्वतःला पूर्णपणे ओळखलेले नसते, आणि त्यात आपणास एकमेकांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक छटा अज्ञात असतात. आणि त्यामुळे ह्या क्षय combinations पैकी काही तणावांचे प्रसंग निर्माण करू शकतात. प्रत्येक नात्यात तणावाचे प्रसंग करणारी काही combinations असणारच. एकदम आदर्श असे कोणतेच नाते नसते. आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक नात्याला एक owner असावा लागतो. काही नात्यांचा owner प्रत्येक तणावाच्या प्रसंगाची जबाबदारी घेतो तर काही नात्यात तणावाच्या प्रसंगाच्या स्वरूपावरून कोणी एक साथीदार owner बनतो. परंतु काही नात्यांचा owner नसतो आणि ती मात्र फुलण्याआधीच मिटतात! तणावाच्या प्रसंगावेळी साथीदारांनी हे लक्षात घ्यायला हवे की दोघांच्या व्यक्तिमत्वाच्या कोणत्या छटा त्यावेळी प्रकट झाल्या आहेत. सहजीवनाच्या काही वर्षानंतर साथीदारांच्या व्यक्तिमत्वाच्या छटा बदलत जातात; त्या कधी समांतर रेषेप्रमाणे धावतात, कधी एक रेष बनून जातात तर कधी एका बिंदुतून वेगळ्या दिशेत निघालेल्या दोन रेषांप्रमाणे धावतात, पुन्हा कधी परत न मिळण्यासाठी!